स्क्रीन टाईमच्या काळात हुन्नर गुरुकुलचे कौशल्य विकास शिक्षण...

सचिन चराटी
सोमवार, 20 जुलै 2020

काही वर्षांपासून ऑनलाईन शिक्षणाची चर्चा वेगाने सुरू आहे. सध्या बाजारात विविध ऍपच्या माध्यमातून विद्यार्थी धडे गिरवत आहेत.

शिक्षण, माहिती, मनोरंजनासाठी विविध डिजिटल माध्यमांचा वापर वाढला आहे. दिवसभरात कोणत्या ना कोणत्या डिजिटल भिंतीसमोर आपला वेळ सध्या जातोय. लॉकडाउनच्या कालावधीत तर स्क्रीनवर आपले डोळे वारंवार खालून वर किंवा वरून खाली स्क्रोल होत राहिले. आपण डिजिटल भिंतीसमोर घालवलेला हा वेळ अर्थात 'स्क्रीन टाईम' हा शब्द सध्या परवलीचा झाला आहे.

विद्यार्थ्यांनी ऑनलाईन धडे गिरवायला सुरवात केल्यापासून तर घराघरात या 'स्क्रीन टाईम'चा आलेख वाढताच आहे. यातून विद्यार्थ्यांवरील ताण वाढू शकतो किंवा वाढतोय हे लक्षात आल्यावर केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने ऑनलाईन शिक्षणाच्या वेळेसंदर्भात काही मार्गदर्शक तत्वे लागू केलीत. नव्या निकषानुसार आता बालवाडीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन क्‍लासचा कालावधी तीस मिनिटांपेक्षा अधिक असता कामा नये, आठवीसाठी पंचेचाळीस मिनिटे, तर नववी ते बारावीसाठी ही वेळ तीस ते पंचेचाळीस मिनिटांचे चार सेशन अशी असावी, असे सांगण्यात आले आहे.

काही वर्षांपासून ऑनलाईन शिक्षणाची चर्चा वेगाने सुरू आहे. सध्या बाजारात विविध ऍपच्या माध्यमातून विद्यार्थी धडे गिरवत आहेत. या ऍपच्या माध्यमातून विविध पाठ विस्तृतपणे उलगडून सांगितले जात असल्याने प्रथमदर्शनी तरी ही पद्धत विद्यार्थ्यांच्या पसंतीस उतरली असल्याचे त्या 'ऍप'ना मिळणाऱ्या प्रतिसादावरून पाहावयास मिळते. एक प्रकारे व्यक्ती ते व्यक्ती या संज्ञापन किंवा संवाद पद्धतीने ही प्रक्रिया सुरू असल्याचे पाहावयास मिळते, तर दुसरीकडे सध्या आपल्याकडे शाळांत सुरू असलेले ऑनलाईन शिक्षण हे वर्गातून शिक्षक शिकवताहेत आणि विद्यार्थी मोबाईलद्वारे घरून ते आत्मसात करण्याचा प्रयत्न करताहेत. साधारण समूह संवादासारखी ही पद्धत दिसते. मुळात समूह संवादाच्या काही मर्यादा आहेत. अशात मोबाईल, लॅपटॉप वा डेस्कटॉपच्या माध्यमातून ही शिक्षण प्रक्रिया पार पडतेय. यामध्ये इंटरनेट, अन्य साधनांची उपलब्धता यांमुळे ज्ञान ग्रहण करताना मुलांना अडचणी येणे स्वाभाविकच आहे. अशा तणावातून कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात महाविद्यालयीन तरुणीने आपले जीवन संपविण्यापर्यंत कटू पाऊल उचलले. यावरून या प्रश्‍नाची तीव्रता लक्षात यावी. बरं सर्व अडथळ्यांची शर्यत पार करून विद्यार्थ्यांना विषयाचे आकलन किती होणार, विद्यार्थी त्या आकलन झालेल्या ज्ञानाचा प्रत्यक्ष जीवनात किती उपयोग करणार, या गोष्टींचा विचार आपल्यासाठी खूप दूरचा वाटू लागतो.

या सर्व धबडग्यात आजरा तालुक्‍यातील उत्तूरमध्ये कार्यरत असलेली 'हुन्नर गुरुकुल' ही कौशल्य शिक्षण देणारी संस्था पाहण्यात आली. येथे सतरा वर्षांवरील मुलांना सुतारकाम आणि बांधकामासंदर्भातील शिक्षण मोफत दिले जाते. वर्षभरात ही मुले लाकडी स्टूलपासून ते घराच्या खिडक्‍या-चौकटी आणि भिंतीपासून ते घर बांधण्यापर्यंत पारंगत होतात. या लेखात आपण पाहत असलेला मॅक्‍सिकन डोम (मॅक्‍सिकोमध्ये प्रचलित असलेले घराचे छत) हा या विद्यार्थ्यांनी नुकताच बांधून पूर्ण केला. प्रकल्प समन्वयक पांडुरंग जाधव आणि गणेश सुतार हे या मुलांना तयार करण्यासाठी धडपडत आहेत.
आपल्याच समाजात प्रचलित असलेल्या या दोन शिक्षण प्रणाली आहेत. एकात माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोचविण्यासाठी प्रयत्न सुरू आहे, तर दुसऱ्यात प्रत्यक्ष कार्यानुभवातून मुलांना घडविण्याचा प्रयत्न सुरू आहे. या दोन्हींचा मेळ साधत आपल्याला पुढे जाता येईल का? यावर विचार व्हावा.

 

संपादन - मतीन शेख

इतर ब्लॉग्स