मला वजन जलदपणे कमी करायचंय ; काय करू?... हे वाचा..

प्रणत पाटील
Saturday, 29 February 2020

जिममध्ये पाऊल ठेवल्यावर व बाहेर पडताना दररोजच्या दररोज वजनकाट्यावर उभे राहून वजन चेक करणारा एक मोठा वर्ग आहे. खरेतर हा एक आजारच. कारण कोणताही वजनकाटा हा वजनात झालेली घट ही चरबीची की स्नायूंची आहे हे सांगू शकणार नाही.

मला वजन जलदपणे कमी करायचंय; काय करू? हा जीममध्ये येणाऱ्या प्रत्येकाच्या मनातील गुंतागुंतीचा आणि तितकाच जिव्हाळ्याचा प्रश्‍न. लग्न ठरलेय, नोकरीच्या मुलाखतीला जायचंय. डॉक्‍टरांनी रेड सिग्नल दिलाय अशी पार्श्‍वभूमी असते. काही करा आणि काही दिवसांतच वजन कमी करा असा अट्टाहास असतो. पण पी हळद आणि हो गोरी असं इथंही नसतं. 
 
"वेट लॉस' म्हणजेच "फॅट लॉस' हा आजघडीचा मोठा गैरसमजच. व्यायाम "वेट लॉस'साठी नव्हे तर "फॅट लॉस' करिता केला जातो. त्यामुळे जास्तीत जास्त रिझल्टस मिळविण्याकरिता अगदी उपाशीपोटी राहून किंवा जास्त वेळ व्यायाम करून आपण आपले अंतिम ध्येय गाठू शकणार नाही. 
अशा प्रकारांमुळे शरीरावरील चरबीचे प्रमाण कमी तर होत नाहीच पण आपल्या मेटॅबॉलीझमवर त्याचा गंभीर परिणाम होतो. बरेचजण फक्‍त फळे, फळांचा रस, भाज्यांचे सूप, सॅलेड, कोशिंबीर किंवा नुसताच प्रथिनयुक्‍त आहार घेतात हेही बरोबर नाही. अशा तात्पुरत्या बदलांमुळे किंवा उपायांमुळे वजनात झालेली घट ही काही काळापुरतीच टिकेल व कालांतराने आपली स्थिती "जैसे थे'च राहील. 

जिममध्ये पाऊल ठेवल्यावर व बाहेर पडताना दररोजच्या दररोज वजनकाट्यावर उभे राहून वजन चेक करणारा एक मोठा वर्ग आहे. खरेतर हा एक आजारच. कारण कोणताही वजनकाटा हा वजनात झालेली घट ही चरबीची की स्नायूंची आहे हे सांगू शकणार नाही. योग्य आहार व व्यायामाच्या जोडीने "फॅट लॉस' व "मसल गेन' या दोन्ही क्रिया शरीरात एकाचवेळी घडू शकतात. वर्षानुवर्षे झालेली वजनवाढ ही काही दिवसांतच कमी व्हावी असा अट्टाहास का? एरवी नाही तर एखाद्या आजारपणात आपले वजन आठवड्याभरात दोन-चार किलो सहज उतरते म्हणून त्याला आपण "हेल्दी फॅट लॉस' म्हणतो का? 

या वजनवाढीमागील कारणे शोधून त्याप्रमाणे आपल्या जीवनशैलीत बदल करणे आवश्‍यक आहे. आपल्याकडे लोक सहज म्हणतात "वजन कमी करणे हे काही खायचं काम नाही!' खरेतर हे खायचेच काम आहे तेही संतुलित व वेळेवर खायचे. "we are what we eat '' प्रमाणे आपला आजचा आहार आपले उद्याचे जगणे सुखकारक करणार आहे. त्यामुळे जिममधील त्या एक तासाबरोबरच उरलेल्या तेवीस ताससुद्धा शरीराला तितकेच जपा. "थेंबे थेंबे तळे साचे' या म्हणीप्रमाणे "थेंबे थेंबे फॅट जळे' हे ही ध्यानात ठेवा. त्यासाठी शरीराला पुरेसा वेळ द्या ! 
  
 

इतर ब्लॉग्स