डीआर काँगो आणि भारतीय शांतीसेना

डीआर काँगो आणि भारतीय शांतीसेना

डेमॉक्रँटिक रिपब्लिक ऑफ काँगोमधील गोमा शहरानजिकचा ज्वालामुखी भडकून गेल्या आठवड्यात मोठी हानी झाली. गोमा ही किऊ प्रांताची राजधानी. त्यातील माणसांना वाचविण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाच्या विद्यमाने तेथे कार्यरत असलेल्या भारतीय शांतिसेनेच्या जवानांनी जीव धोक्यात घालून अनेकांचे प्राण वाचविले. पंधरा लोकांचा मृत्यू झाला, तर पाचशेपेक्षा अधिक घरे जाळून बेचिराख झाली. पाच हजार लोक घर सोडून गेले. सुमारे 25 हजार लोकांनी पश्चिमोत्तर साके या प्रदेशात आश्रय घेतला. अजूनही 170 मुले बेपत्ता आहेत, असा युनिसेफच्या अधिकाऱ्यांचा अंदाज आहे. युरोपच्या दौऱ्यावर असलेले काँगोचे अध्यक्ष फेलिक्स शिसेकेडी दौरा अर्धवट सोडून परतले.

राष्ट्रसंघाच्या नियंत्रणाखाली जगात कार्यरत असलेल्या भारतीय शांतीसेनेची काही वर्षांपूर्वी सर्वाधिक संख्या, सुमारे चार हजार ही डीआर काँगोमध्ये होती. जगात जेथे जेथे तणाव, वर्ग वा टोळीयुद्ध असेल, तसेच, सत्ता हडपण्यासाठी लष्करी गटांत चाललेल्या युदधामुळे, बंडखोरीमुळे अशांतता आहे, अशा देशात शांतता प्रस्थापित करण्यासाठी, कमजोर शक्तींना पाठिंबा देण्याचे काम ही सेना करते. वाटाघाटीतही त्यांनी भूमिका बजावली आहे.

22 मे रोजी गोमानजिक नियारागोंगो ज्वालामुखीचा उद्रेक झाला. केसरी रंगाच्या ज्वाळांनी रात्र व्यापून टाकली, लाव्हाच्या नद्या वाहू लागल्या जवळजवळ 24 वर्षांनी झालेल्या या उद्रेकामुळे जीव वाचविण्यासाठी हजारो लोकांनी गोमा शहर सोडले. काही सीमा ओलांडून शेजारच्या रूआंडात आश्रयासाठी गेले. सुदैवाची गोष्ट म्हणजे, पर्वतावरून वाहणारा लाव्हा शहराच्या वेशीपाशी येऊन थांबला. तो शहरात घुसला असता, तर काय झाले असते, याची कल्पना करता येत नाही. भूकंपाचे धक्के बसत होते. 2002 मध्ये झालेल्या उद्रेकात एक लाख लोकांवर बेघर होण्याची वेळ आली होती. आता आठ दिवसांनी लोक पुन्हा घराकडे परतू लागलेत. सरकारने लोकांना तेथून काढण्याची योजना राबविली.

डीआर काँगो आणि भारतीय शांतीसेना
पाकमध्ये माध्यमांची गळचेपी? नव्या नियमांमुळे विरोधकांचा गोंधळ

विशेष म्हणजे, गोमा शहरात संयुक्त राष्ट्रसंघाच्या शांतीसेनेची तसेच, काही जागतिक स्वयंसेवी संस्थांची कार्यालये आहेत. काँगोच्या विद्यमान सरकारला अऩेक वर्षे विरोध होत असून, अऩेक भागात युद्धसदृश स्थिती असते. काँगोमध्ये दुर्मिळ खनिज संपत्ती आहे. तिच्यावर ताबा मिळविण्याचा बंडखोरांच्या टोळ्यांतर्फे प्रयत्न चालू असतो.

शांतीसेनेचे भारतीय ब्रिगेड यावेळी गोमाच्या नागरिकांच्या मदतीसाठी धावून गेले. ब्रिगेडचे मुख्यालय गोमाच्या विमानतळानजिक आहे. त्यातील सत्तर टक्के जवानांना जवळच्या हम्बी कंपनीच्या ऑपरेटिंग तळानजिक हलविण्यात आलं. ब्रिगेडने लोकांना सुरक्षित स्थळी पोहोचविले. डीआर काँगोमध्ये सध्या दोन हजारांपेक्षा अधिक भारतीय शांतीसेना आहे.

दिल्लीतून किन्शासा या डीआर काँगोच्या राजधानीत उतरायला विमानाने 27 तास लागतात. 2011 मध्ये आदिस अबाबा येथे होणाऱ्या भारत आफ्रिका फोरमच्या शिखर परिषदेच्या निमित्ताने भारत सरकारने काही पत्रकारांना आफ्रिकेतील चार देशांना भेट देण्यासाठी पाठविले होते. त्या पथकात डीआर काँगो, मोझांबिक, इथिओपिया, केनिया आदी देशांना जाण्याची संधी मला मिळाली. किन्शासामधील भारतीय शांतीसेनेचे अधिकारी तसेच राष्ट्रसंघाच्या अधिकाऱ्यांशी त्यावेळी तेथील परिस्थितीबाबत चर्चा झाली होती.

डीआर काँगो आणि भारतीय शांतीसेना
चीनमधून आणखी एक धोका; बर्ड फ्लूच्या नव्या स्ट्रेनची मानवाला लागण

देशाची सूत्रे प्रसिद्ध नेते लॉरेन्ट डिझायर कबिला यांचे चिरंजीव जोसेफ कबिला यांच्याकडे होती. त्यांचे शासकीय निवासस्थान महाकाय काँगो नदीच्या तीरावर होते. त्याभोवती एक रणगाडा व अऩेक सशस्त्र सैनिकांचा पहारा होता. आम्ही काँगोच्या तीराकडे जाण्यास निघालो, तेव्हा सैनिकांनी अडवले. परंतु, आमच्या बरोबर किन्शासामध्ये अनेक वर्षे स्थाईक झालेले मूळचे मुंबइचे भारताचे मानद कौन्सुल रशिद पटेल असल्याने त्या परिसरात प्रवेश मिळाला. काही दिवसांपूर्वीच निवासस्थानावर हल्ला झाला होता, तेव्हापासून सुरक्षाव्यवस्था अधिक कडक करण्यात आली होती.

दुसऱ्या दिवशी आम्ही भारतीय होमगार्डसच्या कार्यालयाला भेट दिली, तेव्हा तेथे काम करणाऱ्या महिला होम गार्ड्स पाहून अभिमान वाटला. भारतीय महिला जगाच्या काना कोपऱ्यातील सुरक्षादलात काम करीत आहेत. त्यांच्या कामाबद्द विचारता, एका महिला अधिकाऱ्याने सांगितले, की किन्शासामध्ये केव्हा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, हे सांगता येत नाही. अनेक वेळा अशा परिस्थितीता आम्ही रस्त्यावरील वाहतुकीचे संचालन केले आहे, तसेच शांतता प्रस्थापित करण्यात मदत केली आहे. काँगोत चीनने बराच शिरकाव केला असून किन्शासातील एकमेव शंभर फूट रूंद रस्ता चीनने बांधला आहे. शहरात भ्रमंती करताना कुणीही फोटो काढू नये, असे आम्हाला बजावण्यात आले होते.

महाकाय काँगो नदीत पाऊण तास नौकानयन करताना तिच्या तीरावर अजस्त्र पण भंगार झालेल्या अनेक बोटींतून छोटी शहरेच वसलेली दिसली. ती पाहून मार्लन ब्रँडोचा अप्रतिम अभिनय असलेल्या - अपॉकिलेप्सी नाऊ -या व्हिएतनामच्या युद्धावरील आधारीत चित्रपटाची आठवण झाली. त्यातील निबिड जंगलातील सीआयएची मोहीम व त्यातील भयानक चित्रण आठवले.

डीआर काँगो आणि भारतीय शांतीसेना
भारतातील स्ट्रेनचं WHO ने केलं नामकरण

परराष्ट्र मंत्रालयानुसार, राष्ट्रसंघाच्या शांतीसेनेच्या मोहिमेत (युएनपिकेओज्) दोन लाख सैनिक कार्यरत असून त्यांनी आजवर एकूण 71 मोहिमांपैकी 49 मोहिमांत काम केले आहे. 1960 मध्ये डीआर काँगोने देशात शांतता प्रस्थापित करण्यासाठी राष्ट्रसंघाकडे भारतीय शांतिसेना पाठविण्याची विनंती केली. त्यानुसार 14 जुलै 1960 व 30 जून 1964 रोजी दोन भारतीय ब्रिगेड्स काँगोत रवाना करण्यात आली. त्यावेळी बंडखोरांबरोबर झालेल्या चकमकीत 39 जवान ठार झाले. त्यावेळी वीरगती प्राप्त झालेला कॅ.गुरूबचन सिंग यास व कॅ.जी.एस.सलारिया यांना दक्षिण काँगोमधील कटांगा या प्रांतात केलेल्या शांतीकार्याबद्दल मरणोत्तर परमवीर चक्र बहल करण्यात आली.

आफ्रिकेत दोन काँगो आहेत. त्यापैकी वरील एक व दुसरा रिपब्लिक ऑफ काँगो. हा देश राजधानी काँगोच्या दुसऱ्या तीरावर असून, त्याची राजधानी ब्राझाव्हिले ही आहे. विमानाने तेथे जाण्यास केवळ पंधरा मिनिटे लागतात. त्यामुळे, कधीकधी काँगोबाबत गल्लत होते. आफ्रिकेतील कोणत्या न कोणत्या देशात सतत कलह होत असल्याने देशांचे विभाजन होते. ताजे उदाहरण सुदानचे आहे. त्याचे दोन भाग झाले असून, 9 जुलै 2011 रोजी दक्षिण सुदान हे नवे राष्ट्र स्थापन झाले. मूळ सुदानची राजधानी खार्टूममध्ये अनेक वर्षांपासून भारतीय दूतावास आहे. आता दक्षिण सुदानची राजधानी जुबा येथेही भारतीय दूतावास स्थापन करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com