जागतिक माहितीचा वाटाड्या घेतोय कायमची रजा

प्रफुल्ल सुतार
Monday, 7 September 2020


ब्राउजर्स बंद झाल्यावर आउटलूक मेल, वन ड्राईव्ह, ऑफिस ३६५ यांसारख्या सेवा युजर्सना वापरता येणार नाहीत. ९ मार्च २०२१ पासून ‘मायक्रोसॉफ्ट ॲज लिगसी डेस्कटॉप ॲप’ला नवीन सुरक्षा अपडेट मिळणार नाही. 

इंटरनेटवरून ज्याच्या आधारे जगभरातील माहिती शोधली गेली, ते ‘इंटरनेट एक्‍स्प्लोरर’ बंद होत आहे. मायक्रोसॉफ्टचा हा वेब ब्राउजर की ज्याच्या आधारे तब्बल जगभरातील नेटिझन्सनी इंटरनेटवरची अक्षरशः हवी ती माहिती मिळवली, तो वाटाड्या आता कायमचा निरोप घेईल. विशेष म्हणजे, भारतात एक्‍स्प्लोरर सुरू होऊन २५ वर्षे पूर्ण झाली आहेत, आणि मायक्रोसॉफ्टकडून हा निर्णय घेण्यात आला. ‘इंटरनेट एक्‍स्प्लोरर ११’ आणि ‘एज’ हे ब्राउजर २०२१ च्या सुरवातीपासून काम करणे बंद करतील, असे मायक्रोसॉफ्टकडून सांगण्यात आले आहे. लवकरच या ब्राउजर्सचे टेक्‍निकल सपोर्ट बंद केले जातील. त्यामुळे हे ब्राउजर वापरणाऱ्यांना अडचणी निर्माण होतील. 

सध्या सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या गुगलच्या ‘क्रोम’ तसेच ‘मोझिला फायरफॉक्‍स’च्या लोकप्रियतेत इंटरनेट एक्‍स्प्लोरर वापरणाऱ्यांची संख्याच हातावर मोजण्याइतपत खाली आली आहे. त्यामुळे कंपनीने हा निर्णय घेतला. २०२१ च्या सुरवातीला हे ब्राउजर्स बंद होणार असले तरी त्याची प्रक्रिया ही या वर्षीच्या ३० नोव्हेंबरपासूनच केली जाणार आहे.

ब्राउजर्स बंद झाल्यावर आउटलूक मेल, वन ड्राईव्ह, ऑफिस ३६५ यांसारख्या सेवा युजर्सना वापरता येणार नाहीत. ९ मार्च २०२१ पासून ‘मायक्रोसॉफ्ट ॲज लिगसी डेस्कटॉप ॲप’ला नवीन सुरक्षा अपडेट मिळणार नाही. 

आज असे कुठलेही क्षेत्र नाही की जेथे इंटरनेटचा वापर होत नाही. इंटरनेटवर काहीही शोधायचे झाल्यास ब्राउजरशिवाय पर्याय नाही. मायक्रोसॉफ्ट ही जगातील सर्वांत जुनी तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनी आहे. जेव्हा एखादा कॉम्प्युटर व लॅपटॉप खरेदी करतो, त्या वेळी त्यासोबत मायक्रोसॉफ्टची सॉफ्टवेअर्स ही बाय डिफॉल्ट इंस्टॉल झालेली मिळतात. मायक्रोसॉफ्टने काळानुसार एक्‍स्प्लोररमध्ये नवनवीन अपडेटेड ब्राउजर जारी केले आहेत. मात्र, अलीकडच्या काळात गुगलचे क्रोम आणि मोझिला फायरफॉक्‍स यांसारख्या अत्याधुनिक ब्राउजर्समुळे एक्‍स्प्लोरर ब्राउजर्सचा वापर केला जात नाही. हे याबाबतची आकडेवारी पाहिल्यास लक्षात येते. २००१ मध्ये इंटरनेट एक्‍स्प्लोरर वापरणाऱ्यांची संख्या ही ९० टक्के होती. तीच २०२० मध्ये केवळ १.३ टक्के युजर्सवर आली आहे; तर २.२ टक्के युजर्स हे ‘मायक्रोसॉफ्ट ऐज’ वापरत आहेत.

मायक्रोसॉफ्टने १६ ऑगस्ट १९९५ ला इंटरनेट एक्‍स्प्लोररची सुरवात केली. त्यानंतर २००२ मध्ये मोझिला फायरफॉक्‍स तसेच २००८ मध्ये गुगल क्रोमने ‘एंट्री’ केली. आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने इंटरनेट एक्‍स्प्लोररच्या वर्चस्वाला हादरा बसण्यास सुरवात झाली. सध्याचा वापर पाहिल्यास क्रोमचा वापर हा ६६ टक्के, ॲपल सफारी १६.६५ टक्के, ओपेरा २.०२ टक्के आणि मोझिला फायरफॉक्‍सचा ४.२६ टक्के वापर होत आहे.

संपादन - अर्चना बनगे

इतर ब्लॉग्स