रंगलेली गझल मैफल, अन्‌ उलगडलेली गझलवाट... 

युवराज यादव
रविवार, 23 फेब्रुवारी 2020

वाचलेली-ऐकलेली माणसे गेली कुठे, 
पुस्तकातून पाहिलेली माणसे गेली कुठे... 
रोज अत्याचार होतो आरशावरती आता, 
आरशाला भावलेली माणसे गेली कुठे... 

वाचलेली-ऐकलेली माणसे गेली कुठे, 
पुस्तकातून पाहिलेली माणसे गेली कुठे... 
रोज अत्याचार होतो आरशावरती आता, 
आरशाला भावलेली माणसे गेली कुठे... 

असा सवाल करीत त्यांनी आपल्या नादमधुर आवाजात सप्तसूर छेडले आणि रसिकांची अविस्मरणीय अशी गझलसफर सुरू झाली... सवाल-जवाब आणि त्याबरोबर त्यांच्या स्वर्गीय आवाजात सादर झालेल्या अविट गोडीच्या गझला यातून गझलवाट आपसूक उलगडत गेली... निमित्त होते, इचलकरंजी नगर परिषदेच्या गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर व्याख्यानमालेतील गझलनवाझ भीमराव पांचाळे यांच्या मैफलीचे. सुमारे 40 वर्षे मराठी गझल जनमानसात आपल्या सुरांतून रुजविणाऱ्या एका अवलियाचा जीवनपट रसिकांसमोर मांडला गेला. याचबरोबर गझलेची वेगळ्या परिप्रेक्षातून ओळखही झाली... 

जरी या वर्तमानाला कळेना आमुची भाषा 
विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही 

असे हयातीतच लिहून ठेवलेल्या मराठी गझलेचे खलिफा सुरेश भट यांची पहिली भेट आणि तिथेच झालेली गझलेशी ओळख भीमरावांनी सांगितली. माधव ज्युलियनांनंतर मराठी गझलेसाठी झपाटून काम करणारा हा द्रष्टा माणूस उपेक्षित वातावरणातही थेट जनसामान्यांना आपल्या गझला ऐकवत असे. अमरावतीतला राजकमल चौक हा त्यांचा अड्डा आणि पायडल रिक्षा हे त्यांचे आसन. ते चौकात आले की सारे लोक आपापली जागा पकडून स्थिर होत आणि मग आपल्या पहाडी आवाजात भटसाहेब त्यांच्यापुढे नव्याने लिहिलेली गझल सादर करीत... 

जाणतेही बाग माझ्या सोसण्याच्या सार्थकाला 
मी इथे हे अमृताचे रोपटे रुजवून गेलो... 

अशा या माहोलात छोटा भीमरावही एका कोपऱ्यात उभे राहून तन्मयतेने त्यांच्या गझला ऐकत असे. अष्टगाव या खेड्यातून शिकण्यासाठी आलेला भीमराव तसा शास्त्रीय संगीताचेही धडे घेत होता. पण, या चौकात त्याला त्याच्या जीवनाची दिशा सापडली आणि त्याने गझलेची वाट धरली. नंतर "एक जखमी सुगंधी' या अल्बमने त्यांची ओळख जगाला झाली. दरम्यानच्या काळात मराठी गझलेवर उपेक्षेचे घाव होतच होते. भटांसारखेच भीमरावांनाही हेटाळणीला सामोरे जावे लागले. मात्र... 

जखमा किती सुगंधी झाल्यात काळजाला 
केलेत वार ज्याने तो मोगरा असावा... 

असे सूर आळवत त्यांनी मार्गक्रमण सुरूच ठेवले. महाराष्ट्रात, देशभरात आणि जगभरात गझल मैफली आणि कार्यशाळांच्या माध्यमातून त्यांनी गझल पोचवली. यातून गझलकार, रसिकांचा एक मोठा स्नेहमयी गोतावळा त्यांच्याभोवती जमा झाला. 

या गझलप्रवासातील अशा अनेक आठवणींना त्यांनी या वेळी उजाळा दिला. त्याचबरोबर गझल कशी असावी, येथपासून गझलकाराची ही निर्मिती गझलगायकाने केवळ एक माध्यम बनून "ये हृदयीचे ते हृदयी' या न्यायाने रसिकांपर्यंत कशी पोचवावी, याबाबतही विवेचन केले. याशिवाय, गेल्या काही काळात गझलेत केलेले प्रयोगही सांगितले. मग, 

ऐ सनम आँखो के मेरी खुबसुरत साज दे 
येऊनी स्वप्नात माझ्या एकदा आवाज दे 

ही हिंदी-मराठी गझल रसिकाग्रहास्तव सादर झाली आणि सामान्य माणसांची व्यथा मांडणाऱ्या... 

गरिबाच्या लग्नाला नवरी, गोरी काय काळी काय 
महागाईने पिचलेल्यांना, होळी काय दिवाळी काय 

या भैरवीतल्या गझलेने या कधीही संपू नये, अशा वाटणाऱ्या मैफलीची सांगता झाली. सारा रसिकवर्ग अविस्मरणीय असा गझलानंद घेऊन घरी परतला... तेही भीमरावांनी जोपासलेले ब्रीद मनात साठवून... कारवॉं आहे गझलचा, जायचे आहे पुढे, हे मराठी गझलवैभव न्यायचे आहे पुढे..!!

इतर ब्लॉग्स