हुतात्मा शोएब उल्ला खान : निजामाच्या हुकूमशाहीविरोधात लढणारा पत्रकार

journalist Shoaib Ullah Khan who fought against Nizam dictatorship in Marathwada mukti sangram
journalist Shoaib Ullah Khan who fought against Nizam dictatorship in Marathwada mukti sangram

सध्या देशात इतिहासातील अनेक लढे हे धार्मिक चष्म्यातून बघण्याचा ट्रेंडच निघाला आहे. माध्यमातूनही इतिहास तसाच दाखवला जातो. असाच एक स्वातंत्र्याचा लढा 'हैदराबाद मुक्तिसंग्राम' हा धार्मिक चष्म्यातून नेहमीच पाहत आलो आहोत. हैदराबाद मुक्तसंग्राम लढा हा प्रथमदर्शनी जरी हिंदू आणि मुस्लिम यांच्यातील संघर्ष वाटत असला तरी वास्तविकता तशी नव्हती. याच निजाम सरकारच्या हुकुशाहीविरोधात एका मुस्लिम पत्रकाराने आवाज उठवल्यामुळे त्याचे हात कलम करून हत्या करण्यात आली होती. त्या पत्रकाराचे नाव हुतात्मा शोएब उल्ला खान होते.

भारत १५ ऑगस्ट १९४७ साली स्वतंत्र झाला असला तरी, भारतातील हैदराबाद संस्थान हे भारतात विलीन झाले नव्हते. हैदराबाद संस्थान हे निजामाच्या पोलादी जोखडाखाली होते, येथे आसफिया घराण्याची सत्ता १७२४ सालापासून नांदत होती. हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाल्याशिवाय अखंड भारत अस्तित्वात येणे शक्य नव्हते. पण येथील संस्थानिक सातवा निजाम मीर उस्मान अली खान भारतात सामील होण्यास नकार देत होता. निजामाच्या अन्यायी राजवटी विरुद्ध संस्थानातील जनतेने अभूतपूर्व असा लोकलढा उभारला.

हैदराबाद संस्थानात रझाकार संघटनेचे लोक हिंदूंचा छळ तर करीत असत. परंतु संस्थानात जे चालले होते ते सर्वच मुस्लिम लोकांना पसंद होते असे नव्हे, त्यांच्याविरोधात बोलणाऱ्या मुसलमानांनाही ते तितक्यात क्रूरपणे वागवीत असत. निजामाच्या एकतंत्री कारभारास व रझाकारांच्या अन्यायाला जाहीरपणे विरोध करणाऱ्यामध्ये ‘इमरोज’या उर्दू वर्तमानपत्राचा तरुण संपादक शोएब उल्ला खान यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागते.

शोएब उल्ला खान हे पूर्वी 'रयत' नावाच्या वृत्तपत्रात अग्रलेख लिहीत असत. जेव्हा त्यांचे लेख निजामाच्या अव्यवस्थेची लक्तरे काढू लागले तेव्हा निजाम सरकारने त्यांच्या वृत्तपत्रावर बंदी घातली. बंदी घातल्यानंतर निजामाच्या अराजकतेवर लिहिण्यासाठी त्यांनीही लेखणी तडफडू लागली. लिहिण्यासाठी ते बेचैन होते. तेव्हा बी.रामकृष्णराव यांनी शोएबला आपल्या घरी अभय देऊन वर्तमानपत्र चालवण्याची परवानगी दिली. शोएबने इथे आल्यानंतर 'इमरोज' या नावाचे एक उर्दू दैनिक सुरु केले. या दैनिकाचा पहिला अंक १५ नोव्हेंबर १९४७ रोजी प्रकाशित झाला होता.

शोएब उल्ला खान हे पुरोगामी विचारांचे तरुण संपादक होते. ते आपल्या दैनिकातून धर्मांध प्रवृत्तीवर कडाडून टीका करीत असत. तसेच निजाम आणि रझाकारांचे दडपशाहीचे धोरण त्यांना मान्य नव्हते. एकदा शोएब उल्ला खान यांनी आपल्या दैनिकात निजाम सरकारवर 'दिन की सरकार और रात की सरकार' असा लेख लिहून प्रखर टीका केली होती. तेव्हा कासीम रिझवी चिडून रझाकारांच्या मेळाव्यासमोर बोलताना असे विधान केले की, निजाम साहेबांविरोधात लिहिण्याची हिंमत करणाऱ्यांचे हात कलम करायला हवेत.

कासीम रिझवीच्या भाषणामुळे रझाकारणकडून 'इमरोज' चा गळा दाबण्यासाठी कट रचण्यात आला. २० ऑगस्ट १९४८ ला धमकी देणारे एक पात्र शोएबला मिळाले. त्यात असे लिहिले होते की, ''आपल्या लेखणीला आवरा अन्यथा मरणाला तयार राहा'' परंतु शोएब उल्लाह खानने या धमकीला भीक घातली नाही. इमरोजला आपल्या उद्देशांपासून ढळू दिले नाही.

२१ ऑगस्टच्या रात्री एक वाजता शोएब आणि त्याचा मेहुणा प्रेसमधून घरी जाण्यास निघाले. त्यांच्या मागून पाच-सहा रझाकार गुंडांची टोळी आली, त्यांनी समोर येऊन आदाब अर्ज केला आणि विचारले इकडून तीन-चार रझाकार लोकांना पळत जात असल्याचे आपण बघितले आहे का? शोएब म्हणाले नाही. पण भानगड काय आहे? हे शब्द उच्चारतो न उच्चारतो तोच एकाने शोएबच्या हातावर तलवारीचा वर केला. हात शरीरापासून वेगळा झाला. मागून मोईन खां या रझाकाराने त्याच्या पाटीवर गोळ्या झाडल्या. तोच शोएबचा मेहुणा महंमद इस्माईल खांने शोएबला खाली पडण्यापासून वाचविण्याचा प्रयत्न करीत असताना त्याच्याही हातावर वार करण्यात आले. त्याचाही हात शरीरापासून वेगळा झाला. गोंधळ ऐकून लोक घटनास्थळी जमले. लोकांना पाहून रझाकार पळून गेले. त्याच अवस्थेत शोएबला त्यांच्या घरी घेऊन जाण्यात आले, थोड्याच वेळात शोएबने सर्वांसमक्ष आपले प्राण सोडले.

पत्रकार शोएब उल्ला खानच्या मृत्यूची बातमी पंडित जवाहरलाल नेहरूंना समजताच ते दुखी झाले. त्यांना या गोष्टीची जाणीव झाली की, हैदराबादमध्ये खरोखरच अराजकता माजली आहे. या घटनेनंतर त्यांनी सरदार वल्लभाई पटेलांसमोर हैदराबादच्या बाबतीत चिंता व्यक्त केली होती. शोएब उल्ला खानच्या बलिदानानंतर अवघ्या २३ दिवसानंतर पोलीस ऍक्शनची कारवाई सुरु झाली. १७ सप्टेंबर १९४८ रोजी हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले.

ज्या लोकांचा भ्रम होता किंवा आहे की, हैदराबाद हिंदू मुसलमानांचा संघर्ष आहे तो राजकीय संघर्ष नाही. असे म्हणाऱ्यांची या मृत्यूने दातखिळी बसली. कारण हा लढा धार्मिक लढा नव्हता तर हुकूमशाहीच्या विरोधात लोकशाहीच्या प्रस्थापनेसाठी सामान्य जनतेने दिलेला लढा होता.आपल्या मातृभूमीसाठी आणि हुकूमशाहीच्या विरोधात लढण्यासाठीची प्रेरणा हुतात्मा शोएब उल्ला खानच्या बलिदानातून मिळत राहील. तेलंगणा आणि मराठवाडा मध्ये यावर्षी हैदराबाद मुक्तिसंग्रामाला ७५ वर्ष पूर्ण झाले म्हणून अमृत महोत्सवी वर्ष म्हणून साजरा केला जात आहे. अमृत महोत्सवी वर्षात हुतात्मा शोएब उल्ला खानच्या बलिदानाचा गौरव झालाच पाहिजे म्हणून वरील माहिती देण्याचा एवढाच प्रयत्न आहे.

हुतात्मा शोएब उल्ला खान यांचा सन्मान

उस्मानिया विद्यापीठात हुतात्मा शोएब उल्ला खान पत्रकारिता पुरस्कार सुरु करण्यात आला. तर नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने हैदराबाद मुक्तिसंग्रामाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून गोविंदभाई श्राफ यांच्या उपस्थितीमध्ये विद्यापीठ सभागृहाला 'शोएब उल्ला खान सभागृह' असे नाव देऊन त्यांची पावनसमृती भावी पिढयांना लक्षात यावी, या दृष्टीने स्तुत्य पाऊल उचलले होते. (मात्र नवीन स्वारातीम विद्यापीठ इमारतीच्या परिसरात शोएब उल्ला खान यांचा साधा उल्लेख दिसून येत नाही)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com