
युरोपातून समुद्रमार्गे भारतात परतताना त्यांची अथांग निळ्या आकाशाशी आणि निळ्याशार पाण्याशी मैत्री झाली. मात्र, आकाश निळ्या रंगाचेच का दिसते? हा प्रश्नही त्यांना सतावू लागला. भारतात परतल्यानंतर त्यांनी पाणी, बर्फ यामधून प्रकाशाच्या होणाऱ्या विकिरणावर किंवा स्कॅटरिंगवर संशोधन सुरू केले. यातूनच त्यांना आकाशाच्या निळ्या रंगाचे उत्तर मिळाले... जे त्यांच्याच ‘रामन इफेक्ट’ या नावाने प्रसिद्ध झाले आणि त्याने भारताला भौतिकशास्त्राचे नोबेलही मिळवून दिले. २८ फेब्रुवारी १९२८ ला भारतरत्न सर सी. व्ही रामन यांनी आपला हा शोध जगासमोर सादर केला. या दिवसाचे औचित्य साधून १९८७ पासून भारतात हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
रामन यांच्या मनातील कुतुहलाने एक नव्या शोधाला जन्म दिला. त्यातून जगासमोर विकिरणाच्या आण्विक प्रक्रियेसंबंधीचे, रचनेसंबंधीचे माहितीचे भांडारच खुले झाले. जगातील प्रत्येक शोधाबाबतच्या अनेक कथा प्रसिद्ध आहेत. मनातील कुतूहल जागणे व त्याचे उत्तर शोधण्यासाठी झपाटून काम करणारे न्यूटन, आईन्स्टाईन, आर्किमिडीज, बर्नाले, ग्रहम बेल, एडिसन, अल्फ्रेड नोबेल यांच्यासारख्या अनेक अवलियांनी मानवी जीवनाला दिशा देणाऱ्या अनेक शोधांचा खजिना आपल्यापुढे रिता केला आहे. तत्पुर्वी विज्ञानाचा जन्म आपल्या आसपासच्या वस्तू, घटना यांच्याबाबत जाणून घेण्याच्या मानवी कुतूहलातूनच झाला असावा. ज्याने पहिल्यांदा दगडावर दगड घासून अग्नि निर्माण केला, तो कदाचित पहिला शोध असावा. मुळात गरज ही खरी शोधाची जननी आहे, असे म्हणतात. प्रारंभीच्या काळी माणसाचे जगणे सुसह्य होण्यासाठी, उपजिविकेतील अनेक नित्यकर्मे सोपी होण्यासाठी अनेक गोष्टींचा शोध लागत गेला. शिकारीसाठी हत्यारे बनवणे, अन्न शिजवणे, घर बांधणी आदी गोष्टींपासून याची सुरवात झाली. धातूच्या शोधानंतर त्यातही सुधारणा होत गेली. नंतर जसा चाकाचा शोध लागला, तसा वैज्ञानिक शोधांना अधिक गती मिळाली आणि त्यायोगे मानवी जीवनही वेगाने सुधारू लागले.
एकोणिसावे शतक वैज्ञानिक शोधांसाठी क्रांतिकारी ठरले आणि संगणकाच्या शोधाने तर डिजिटल क्रांतीचा जन्म झाला. विज्ञानाच्या प्रत्येक शाखेत आज संगणकाने शिरकाव केला असून, त्यामुळे तेथील आकलनाचा वेग शेकडो पटीने वाढला. भारताच्या बाबतीत सांगायचे तर येथील विज्ञानाचा विकास पुराणकाळापासून झाला. आर्यभट्ट, भास्कर, भारद्वाज, गर्ग, सुश्रुत, चरक, पतंजली, कपिल अशा अनेक ऋषीमुनींनी त्याचा पाया रचला आहे. भारतानेच शून्य दिला आणि जगाला अंतर मोजण्याला पाया मिळाला. अनेक शोधांनाही त्यातून गती मिळाली. नंतरही भारतीय वैज्ञानिकांनी मोलाचे योगदान विज्ञानाच्या विविध शाखांना दिले आहे. आज वैज्ञानिक शोधांनी आपले जीवन समृद्ध केले आहे. जणू काही आपण विज्ञानाच्या कोषातच जगतो आहेत. रोज नवनवा शोध अनुभवतो आहोत. विज्ञानाचा सकारात्मक दृष्टीने वापर करणे हे आपल्या हातात आहे. हेच आजच्या विज्ञानदिनी सांगणे...
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.