पुरोगामी महाराष्ट्राची जडणघडण करणारे कर्मवीर डॉ. भाऊराव पाटील 

Bhaurao Patil
Bhaurao Patil

पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील हे संपूर्ण महाराष्ट्रास शिक्षणतज्ज्ञ म्हणून परिचित आहेत. त्यांचा जन्म 22 सप्टेंबर 1887 रोजी कुभोज येथे झाला. तर 9 मे 1959 रोजी पुणे येथे त्यांचे निधन झाले. अवघ्या 72 वर्षांच्या आपल्या कारकिर्दीत त्यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना करून बहुजन समाजाला शिक्षणाच्या प्रवाहात आणले. त्यामुळे पुरोगामी महाराष्ट्राची जडणघडण झाली. 

कर्मवीर भाऊराव पाटील यांनी 4 ऑक्‍टोबर 1919 रोजी कार्ले येथे आयोजित करण्यात आलेल्या सत्यशोधक समाजाच्या अधिवेशनात रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. त्यामुळे बहुजन समाजातील मुलांना शिक्षणाची द्वारे खुली झाली. पुढे, 1924 मध्ये सातारा येथे संस्थेचे स्थलांतर करण्यात आले. भाऊरावांनी गाव तेथे शाळा काढण्याचा संकल्प केला होता. त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात 578 व्हॅलेंटरी शाळा काढल्या. त्यांच्या या कार्याचे अनेक महान व्यक्तींनी कौतुक केले. बहुजन समाजातील मुलांच्या राहण्याची सोय व्हावी म्हणून 1927 मध्ये सतारा येथे त्यांनी शाहू बोर्डिंग हाउस सुरू केले. वसतिगृहाचे नामकरण महात्मा गांधी यांच्या हस्ते केले. या समारंभात गांधीजींनी भाऊरावांच्या कार्याचे तोंडभरून कौतुक केले. सर्व जातिधर्माची मुले एकाच वसतिगृहात राहतात हे पाहून गांधीजी म्हणाले, की "मला साबरमतीच्या आश्रमात जे करता आले नाही तो प्रयोग भाऊरावांनी यशस्वीपणे करून दाखविला.' 

वसतिगृहाच्या कामानिमित्त भाऊराव नेहमी फिरतीवर असत. त्या वेळी वसतिगृहातील मुलांच्या संगोपनाची जबाबदारी त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई पाटील (वहिनी) यांच्याकडे असे. लक्ष्मी वहिनींनी वसतिगृहातील मुलांच्या भोजनासाठी आपल्या अंगावरील माहेरून आणलेले 90 तोळे सोन्याचे दागिने मोडले. शेवटी आपला सौभाग्याचा अलंकार मणी- मंगळसूत्र कर्मवीरांच्या कार्यासाठी देऊन त्यागाची परिसीमा गाठली. भाऊराव संस्थेच्या कामानिमित्त ग्रामीण भागात जात असत, त्या वेळी बहुजन समाजातील हुशार व होतकरू मुलांचा शोध घेऊन त्यांना वसतिगृहात घेऊन येत असत. ग्रामीण भागातील दारिद्य्र त्यांनी जवळून पाहिले होते, त्यामुळे त्यांनी आपल्या संस्थेत "कमवा व शिका' ही योजना राबविली. "स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद' अशी घोषणा करून श्रमाच्या मोबदल्यात मोफत उच्च शिक्षण गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना त्यांनी दिले. 

व्हॅलेंटरी शाळा, अध्यापक विद्यालये स्थापन केल्यानंतर भाऊरावांनी 1947 मध्ये छत्रपती शिवाजी कॉलेजची स्थापना करून बहुजन समाजातील विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाची व्यवस्था केली. भाऊरावांच्या शिक्षण प्रणालीत स्वाभिमान, समता, स्वावलंबन आणि श्रमप्रतिष्ठा या चतु:सूत्रीचा समावेश असल्यामुळे स्वावलंबी शिक्षण घेऊन बाहेर पडलेले युवक व युवती स्वाभिमानाने जीवन व्यतीत करू लागले. भाऊरावांच्या या कार्यामुळे जनतेने त्यांना "कर्मवीर' ही पदवी दिली; तर भारत सरकारने "पद्मभूषण' हा किताब बहाल केला. आज कर्मवीरांच्या रयत शिक्षण संस्थेची 42 महाविद्यालये, सात ट्रेनिंग महाविद्यालये, 438 माध्यमिक शाळा व 51 प्राथमिक शाळा आहेत. त्यातून ज्ञानदानाचे कार्य सुरू आहे. सुमारे 18 हजार शिक्षक, सेवक हे कार्य करत आहेत. 

कमवा आणि शिका हा अभिनव उपक्रम संस्थेमध्ये आजही राबविला जात आहे. स्त्री-शिक्षणासाठी स्वतंत्र व्यवस्था करून स्त्रियांना सक्षम करण्याचे कार्य संस्थेकडून अविरतपणे सुरू आहे. कर्मवीरांचे स्वाभिमानी विद्यार्थी घडविण्याचे स्वप्न संस्थेने साकार केले आहे. आज 22 सप्टेंबर - कर्मवीरांची जयंती. त्यानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन. 

- प्रा. डॉ. राजेंद्रसिंह लोखंडे 

संपादन : श्रीनिवास दुध्याल 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com