असे संभाळा तुमचे डोळे...

Keeping the eyes safe is just as important
Keeping the eyes safe is just as important

लॉकडाउनमुळे जीवनशैली बदलत आहे. विशेषतः त्याचा लहान मुलांवर मोठा परिणाम होत आहे. घरोघरी लहान मुलांचे वाढणारे हट्ट, चिडचिड अशा छोट्या-छोट्या घटनांमधून तुम्ही तो शोधू शकता. लॉकडाउनमध्ये अनेक पालक कामानिमित्त म्हणा किंवा मनोरंजनासारख्या अन्य कारणांमुळे मोठ्या प्रमाणात स्क्रीनशी बांधले गेले आहेत. पालकांचे पाहून मुलेही तेच शिकली आहेत. अनेकदा पालकही आपली सुटका म्हणून मुलांच्या हाती मोबाईल देत आहेत. परिणामी गेल्या दोन महिन्यांत डोळ्यांवर निर्माण झालेला ताण मोठा आहे.

आता लॉकडाउनमध्ये काहीएक फरक झालेला नाही. शिथिलता आली तरी शाळा सुरू नाहीत किंवा मैदानेही खुली होऊ शकलेली नाहीत. त्यातच पावसाळा सुरू होत आहे. त्यामुळे लहान मुलांवर घराबाहेर पडण्यासाठी आता आणखी बंधने येणार आहेत. लहान मुलांना बाजारात घेऊन येणाऱ्या पालकांवर दंड करण्याचेही जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेले आहे. दुसरीकडे शाळा सुरू होऊ शकलेल्या नाहीत; पण ऑनलाईन अभ्यासाचा नवा फंडा समोर आलेला आहे. सर्व प्रकारची आणि सर्व इयत्तांची पाठ्यपुस्तके घराघरांतील मोबाईलवर डाउनलोड झाली आहेत. शाळा सुरू होईपर्यंत हाच पर्याय समोर आहे. त्यामुळे मुलांचे स्क्रीनला चिकटणे आता या निमित्ताने वाढणार आहे. आधी अभ्यास, मग मनोरंजन म्हणून त्यांचा कालावधी वाढणारच आहे. त्याचा डोळ्यांवर येणारा ताण सर्वाधिक असणार आहे. तुम्ही बारकाईने लक्ष दिल्यास अंघोळीनंतर मुलांचे डोळे लाल होणे, डोळ्यांखालील भागावर सूज दिसणे किंवा तो भाग काहीसा काळसर दिसणे अशी प्राथमिक लक्षणे तुम्हाला आढळतील. स्क्रीन अपरिहार्य आहे, तर डोळे सुरक्षित ठेवणे तितकेच महत्त्वाचे आहे.

डोळ्यांसाठी करा हे व्यायाम

  • डाव्या हातात पेन्सिल धरा. तो हात जेवढा शरीरापासून सरळ रेषेत दूर नेता येईल तेवढा न्या. पेन्सिलच्या टोकावर तुमची नजर केंद्रित करा. तेथून हात दुमडत तुमच्या चेहऱ्याजवळ आणा. पुन्हा तो तसाच मागे न्या. हा व्यायाम किमान दोन ते तीन मिनिटे करा.
  • थोड्या लांबवर असलेल्या एखाद्या वस्तूवर नजर केंद्रित करा. त्या वस्तूच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे नजर फिरवत ठेवा. त्यामुळे तुमच्या डोळ्यांच्या स्नायूंना व्यायाम मिळेल. रक्तप्रवाह अधिक उत्तम होईल. नजर अधिक सुधारण्यासाठी मदतही होईल.
  • डोळ्यांना हलका मसाज करता येईल. तुमचे तळहात डोळ्यांवर ठेवा आणि अगदी हलका दाब देऊन ते वर्तुळाकार हळूहळू फिरवा. पापण्या, भुवया अशा सर्वांना मसाज होईल असे पाहा. मसाजमुळे डोळ्यांतील उष्णता बाहेर पडेल.
  • या व्यायामांशिवाय तुम्ही डोळ्यांवर काकडीचे काप ठेवून त्यातील उष्णता कमी करू शकता. काकडी नाही मिळाली तर तुम्ही कोरफडीचा गर असलेला काप डोळ्यांवर ठेवू शकता. तेही नसले तर खादी कापडाची पट्टी थंड दुधात भिजवून तीही डोळ्यांवर ठेवू शकता.
  • या सर्वांबरोबरच तुम्हाला गरज वाटत असेल तर नेत्र वैद्यकांना भेटा. त्यांनी सुचविलेला व्यायाम, औषधे यांचे तंतोतंत पालन करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com