टिपूर चांदण्याची कोजागरी पौर्णिमा ! 

विनय जोशी, (भारतीयविद्या अभ्यासक)
Friday, 30 October 2020

भारतीय समाज हा निसर्गप्रेमी आणि उत्सवप्रिय आहे.अगदी प्राचीन काळापासूनच शरद चांदणे अनुभवण्याचा हा लोकउत्सव समाजात प्रचलित होता. यालाच शेतीतून हाती आलेली समृद्धी कृतज्ञतेने देवाला अर्पण करण्याची जोड आहे.जो जागा म्हणजे सजग आहे ,प्रयत्नशील आहे त्याला यशश्री नक्की मिळेल असा विचार देखील यामागे आहे.आत्ताच्या  काळात आटीव दुधाचा आस्वाद घेत रंगलेल्या गप्पांच्या मैफिलीत कोजागरीचे हे प्राचीन संदर्भ आठविणे ही रंजक ठरावे 

वर्षातील सगळ्यात आल्हाददायक पौर्णिमा म्हणजे आश्विन महिन्यातील कोजागरी. या काळात वर्षा ऋतू संपून आल्हाददायक शरद ऋतूला सुरवात झाली असते. आकाश निरभ्र होऊन टिपूर चांदणे पडू लागते. हे नितळ चांदणे अनुभवण्याचा उत्सव म्हणजे कोजागरी पौर्णिमा. ह्या दिवशी पाळावयाच्या व्रताला ‘कोजागरव्रत’ म्हणतात. दिवसा उपवास करून रात्री लक्ष्मी, इंद्र यांची पूजा करावी, चंद्राला आटीव दुधाचा नैवेद्य दाखवावा  असा ह्या व्रताचा विधी सांगितला आहे. या पौर्णिमेच्या दिवशी साक्षात लक्ष्मीदेवी चंद्रमंडळातून येऊन पृथ्वीवर उतरते आणि ‘को जागर्ति’ (कोण जागा आहे?) असे विचारत घरोघर फिरते. जो जागा असेल, त्याला धनधान्य देऊन समृद्ध करते असे मानले जाते.

वैदिक काळात अश्विनी पौर्णिमेला इंद्र, अश्विनीकुमार यांना आहुती देत आश्वयुजिकर्म हे कर्म केली जात असे. काठक गृह्यसूत्रात या दिवशी घरातील पशुधनाला  सजवून पूजन करण्यास सांगितले आहे. वामन पुराणात यारात्री लक्ष्मीच्या स्वागतासाठी सगळीकडे दिवे लावावेत असे सांगत या उत्सवाला दीपदानजागर असे म्हटले गेले आहे. ब्रह्मपुराणात या दिवशी घर स्वच्छ करून गृहद्वाराजवळ अग्नी प्रज्वलित करून त्याची पूजा करावी असे म्हटले आहे. गोपालकांनी सुरभी, हत्ती बाळगणाऱ्यानी विनायक, घोडे पाळणाऱ्यानी रेवंत आणि मेंढे बाळगणाऱ्यांनी वरुण या देवतांची पूजा करावी असे सांगितले आहे. भागवतानुसार शरद पौर्णीमेला श्रीकृष्णांनी गोपिकांसोबत रासक्रीडा केली होती.

उन्मादयंती जातकावरून बौद्धकाळात हा उत्सव कशा प्रकारे साजरा होत असे याची कल्पना येते. विशाखादत्ताच्या मुद्राराक्षस या नाटकात कौमुदी महोत्सव म्हणून या दिवसाचा उल्लेख आढळतो. शरद ऋतूतील आल्हाददायक वातावरणात प्रेमीजनांना उपकारक असा हा शृंगाराचा महोत्सव म्हणून त्याचे विशेष आहे. वात्सायनाने कामसूत्रात यक्षरात्रि, कौमुदीजागर, सुवसन्तक,अभ्यूषखादिका अशा सर्वत्र साजऱ्या होणाऱ्या सार्वजनिक उत्सवांची माहिती दिली आहे. यातील कौमुदीजागर म्हणजे अश्विनी पौर्णिमेला नगरातील लोक एकत्र जमून चांदण्यात काव्य शास्त्र विनोदात रात्र जागून काढत असत. आयुर्वेदानुसार दिवसा उन आणि रात्री थंडी यांच्यामुळे हा पित्तवर्धक काळ आहे. पित्त शमनासाठी चांदण्यात ठेवलेले आटीव दुध पिण्यास सांगितले आहे. पित्तशामक प्रवाळ पिष्टी हे औषध तयार करण्यासाठी आश्विनी पौर्णिमा हा महत्वाचा दिवस मानला जातो. बौद्ध परंपरेत या दिवशी भिक्खू संघाचा वर्षावास संपतो म्हणून याला महाप्रवारणा पौर्णिमा म्हणतात.

कोजागरी पौर्णिमा भारताच्या विभिन्न भागात वेगवेगळ्या पद्धतीने साजरी होते. महाराष्ट्रात कुटुंबातील ज्येष्ठ अपत्याला ओवाळून 'आश्विनी' साजरी करतात. बंगाली लोक 'लोख्खी पुजो' असे म्हणत घुबड वाहन असणाऱ्या लक्ष्मीची पूजा करतात. राजस्थानात महिला या दिवशी शुभ्र वस्त्र नेसून,चांदीचे दागिने घालून चंद्राची पूजा करतात. गुजरातमध्ये गरबा खेळत 'शरद पुनम' नावाने साजरी केली जाते. मिथिलेमध्ये या रात्री कोजागरहा ही पूजा केली जाते. ओडिशामध्ये 'कुमार पौर्णिमा' असे म्हणता गजलक्ष्मीची पूजा करतात. भारताच्या उत्तर प्रांतात नव्याने तयार झालेल्या भाताची गायीच्या दुधातील आटीव खीर-‘दूध पौवा’ तयार करतात. अनेक वनवासी जमातीत या रात्री होजागरी नृत्य केले जाते. वनवासी बांधव मायलोमा ह्या भातशेतीचे रक्षण करणाऱ्या देवीची पूजा करतात. शेतकऱ्यांसाठी ही नवान्न  पौर्णिमा एक कृषीउत्सव आहे. शेतात पिकलेले नवीन धान्य घरी आणून त्याची पूजा करून वापरता आणले जाते. कोकणात नवं म्हणजे आंब्याच्या पानात भाताची लोंब, नाचणीचं कणीस, कुर्डूचं फुल एकत्रित करून घराच्या प्रवेशद्वारावर बांधण्याची पद्धत आहे.

भारतीय समाज हा निसर्गप्रेमी आणि उत्सवप्रिय आहे.अगदी प्राचीन काळापासूनच शरद चांदणे अनुभवण्याचा हा लोकउत्सव समाजात प्रचलित होता. यालाच शेतीतून हाती आलेली समृद्धी कृतज्ञतेने देवाला अर्पण करण्याची जोड आहे.जो जागा म्हणजे सजग आहे ,प्रयत्नशील आहे त्याला यशश्री नक्की मिळेल असा विचार देखील यामागे आहे.आत्ताच्या  काळात आटीव दुधाचा आस्वाद घेत रंगलेल्या गप्पांच्या मैफिलीत कोजागरीचे हे प्राचीन संदर्भ आठविणे ही रंजक ठरावे !

(Edited By Pratap Awachar)

इतर ब्लॉग्स