अनोख्या समाजसेवेचे कोल्हापूर रोल मॉडेल... 

डॉ. प्रमोद फरांदे 
रविवार, 22 मार्च 2020

सुबरावतात्या सत्यशोधक चळवळीचे कट्टर पुरस्कर्ते. १९४५ ला तात्यांनी स्वत:च्या घरी अंत्यविधी साहित्य विक्रीचा व्यवसाय समाजसेवेतून सुरू केला. लोकांच्या गरजेचा गैरफायदा घेऊन अंत्यविधी साहित्यासाठी त्याकाळी भरमसाट पैसे उकळले जात होते. गरिबांना मरणाचेही भय वाटावे, अशी काहीशी स्थिती त्यावेळी होती. तात्यांनी लोकांची लुबाडणूक थांबविण्यासाठी ना नफा, ना तोटा तत्त्वावर अंत्यविधी साहित्य विक्री सुरू केली.

    बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या मोहंमद शरीफ यांना २६ जानेवारीला केंद्र सरकारचा पद्मश्री किताब मिळाला. शरीफ यांनी हिंदू धर्मातील ५ हजार, मुस्लिम धर्मातील २५०० मृतदेहांवर मोफत अंत्यसंस्कार केले आहेत. शरीफ यांच्या या समाजसेवेची देशभर चर्चा आहे. शरीफ यांच्यासारखीच समाजसेवा एके काळी कोल्हापुरातही सुरू होती. त्या व्यक्तीचे नाव आहे, सुबराव (तात्या) निकम.

सुबरावतात्या सत्यशोधक चळवळीचे कट्टर पुरस्कर्ते. १९४५ ला तात्यांनी स्वत:च्या घरी अंत्यविधी साहित्य विक्रीचा व्यवसाय समाजसेवेतून सुरू केला. लोकांच्या गरजेचा गैरफायदा घेऊन अंत्यविधी साहित्यासाठी त्याकाळी भरमसाट पैसे उकळले जात होते. गरिबांना मरणाचेही भय वाटावे, अशी काहीशी स्थिती त्यावेळी होती. तात्यांनी लोकांची लुबाडणूक थांबविण्यासाठी ना नफा, ना तोटा तत्त्वावर अंत्यविधी साहित्य विक्री सुरू केली. अनेकांनी त्यांना बहिष्कृत केले; पण तात्यांनी हाती घेतलेले सामाजसेवेचे कार्य सोडले नाही. रात्री-अपरात्री कोणीही तात्यांना हाक दिली की, हाकेलाच तात्या ‘ओ’ देत. तात्या एवढ्यावरच थांबले नाहीत; तर स्मशानभूमीवरील ठेकेदारांकडून अंत्यसंस्कारावेळी होणाऱ्या पिळवणुकीविरोधात आवाज उठविला. स्मशानभूमीवर लाकूड, शेणी पुरवण्याचे काम नगरपालिकेने स्वत:च्या ताब्यात घ्यावे, यासाठी तात्यांनी पाठपुरावा केला. नगरसेवकांच्या घरी जाऊन निवेदने देत ठेकेदारांची मक्तेदारी मोडून काढली. 
त्याकाळी स्वत:ला उच्च समजला जाणारा समाज आपल्याच वर्गातील एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यास त्यांच्याही अंत्ययात्रेस जमा होत नसे. अंत्ययात्रेला जाणे हे उच्च समजणारे लोक अशुभ मानत. सत्यशोधकी संस्कारामुळे तात्यांनी शुभ-अशुभ असे काहीच मानले नाही. स्वत:ला उच्च समजणाऱ्या लोकांच्या अंत्ययात्रेला खांदेकरी नसल्यास तात्या स्वत: खांदा देत. तात्यांनी आयुष्यात कधीही घड्याळ वापरले नाही; पण तात्यांच्या वक्तशीरपणावरून लोक आपले घड्याळ लावत. तात्यांना रोजनिशी लिहिण्याची सवय होती. तात्या म्हणजे कोल्हापूरचा चालता-बोलता इतिहास होता. लोकांचे वाढदिवस, पुण्यतिथी तारखांची नोंद त्यांच्या डायरीत असे. दोन दिवस आधी संबंधित व्यक्तीच्या घरी जाऊन पुण्यतिथीची घरातील लोकांना आठवण करून देत. चांगली सुभाषिते, काव्य, पदे, अभंग त्यांना तोंडपाठ असत. त्यांचा ते भाषणात वापर करत. 

तात्यांनी अखेरपर्यंत अंत्यविधी साहित्य विक्री केली; पण त्यातील रुपयाही कधी स्वत:साठी, कुटुंबासाठी वापरला नाही. साहित्य विक्रीतून जे काही मिळे, ते सारे शैक्षणिक संस्थांना मदत म्हणून देत. २५ वर्षांहून अधिक काळ त्यांचे हे कार्य सुरू होते. स्वत: व कुटुंबाचा उदरनिर्वाह ते स्टॅम्प विक्रीतून चालवत असत. 
तात्यांनी निधनापूर्वी एक महिना अगोदर स्वत:च्या अंत्यविधी व इतर विधीसाठी लागणारे पैसे एका अपत्याकडे देऊन ठेवले होते. जीवनाप्रमाणे मरणानंतरही त्यांनी स्वावलंबन, स्वाभिमानीपणा दाखवून दिला. समाजसेवेचा आदर्श निर्माण करणारे तात्या मात्र उपेक्षितच राहिले.

इतर ब्लॉग्स