होय, हीच ती वेळ! चला कोरोना योद्‌ध्यांना बळ देऊया! 

विजय वेदपाठक 
Saturday, 12 September 2020

जिल्ह्यातील शेकडो हातांनी कोरोनाविरुद्धचा लढा सुरूच ठेवला आहे. गेले साडेपाच महिने रात्रंदिवस कशाचीही तमा न बाळगता या योद्‌ध्यांनी अक्षरशः झोकून दिले आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या महिनाभरात कोरोना संसर्गाचा उद्रेक पाहायला मिळतो आहे. रोज बाधितांची संख्या वाढती आहे. मृत्युदरही चिंता वाढविणारा आहे. केंद्र सरकारने तर हा जिल्हा "हॉटस्पॉट'च्या यादीत टाकला आहे. कुणाच्या संपर्कामुळे कोरोना झाला, हा विषय आता बाजूला पडल्यात जमा आहे. अपुरी बेडसंख्या, ऑक्‍सिजनचा पुरवठा, उपचारासाठी करावी लागणारी धावाधाव, खासगी रुग्णालयांचे सामान्यांच्या आवाक्‍याबाहेर जाणारे दर असे एक ना विविध प्रश्‍न "आ' वासून समोर उभे ठाकले आहेत. कोरोनाशिवाय आजारी व्यक्तींना उपचार मिळणेही अवघड झाले आहे. त्या उपचारांबाबतचे आर्थिक गणितही छाती दडपून टाकणारे आहे. परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. 

अशा परिस्थितीतही जिल्ह्यातील शेकडो हातांनी कोरोनाविरुद्धचा लढा सुरूच ठेवला आहे. गेले साडेपाच महिने रात्रंदिवस कशाचीही तमा न बाळगता या योद्‌ध्यांनी अक्षरशः झोकून दिले आहे. जिल्हा प्रशासन, महापालिका, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत व त्यांचे सर्व कर्मचारी, सर्व शासकीय रुग्णालये, त्यातील डॉक्‍टर, परिचर-परिचारिका, तंत्रज्ञ, चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी, रुग्णवाहिकांचे चालक, लिपिकांपासून ते अधिकाऱ्यांपर्यंत सारे काही झटत आहेत. लोकप्रतिनिधींनी आपापल्या परीने या लढ्यात योगदान दिले आहे. पोलिसांचे योगदानही मोठे आहे. कायदा-सुव्यवस्था सांभाळताना हा लढा त्यांनी अगदी पहिल्यापासून अंगावर घेतला आहे. आशा वर्कर्स यांनी विशेषतः ग्रामीण भागात दिलेला लढा कौतुकास्पद आहे. आलेली अनेक संकटे झेलून, प्रसंगी अवहेलना सोसून त्यांनी तुटपुंज्या मानधनावर कार्य सुरूच ठेवले आहे. सामाजिक संघटना, विविध संस्था, तालीम मंडळे असे शेकडो हात आपल्या परीने लढा उभारत आहेत. या लढ्यातील अनेक जण कोरोनाबाधित झाले. कोरोनामुक्त झाल्यानंतर त्यांनी लढ्याकडे पाठ फिरविली नाही, तर पुन्हा नव्या दमाने सहभाग घेतला. या शेकडो हातांना या साडेपाच महिन्यांत काय मानसिक यातना झाल्या असतील, त्याची मोजदाद करणेही अशक्‍य कोटीतील गोष्ट आहे. तरीही ही सारी मंडळी पाय रोवून खंबीरपणे उभी आहेत. या शेकडो हातांनी समाजावर केलेले हे अनंत उपकारच आहेत. त्या ऋणातून आपल्याला मुक्त होता येणार नाही. 

काय अपेक्षा आहे या साऱ्या मंडळींना? त्यांचे लक्ष्य फक्त एकच आहे, कोरोनामुक्तीचा तो सुदिन लवकरच यावा. मग तुम्ही आम्ही या लढ्यात काय योगदान देऊ शकतो? आपल्याकडून त्यांच्या काय अपेक्षा आहेत? फक्त एकच अपेक्षा आहे, कोरोनाचे नियम काटेकोर पाळा! लक्षणे दिसल्यास तातडीने चाचणी करा आणि संसर्गाची साखळी तोडा. गर्दी होऊ देऊ नका. परिसरात खरेदी करा. उठला आणि घराबाहेर पडला, असे दिसणारे सर्वसाधारण चित्र बदलण्याची आता टोकाची वेळ आली आहे. कोरोनावर जिल्ह्यात खूप मोठा निधी खर्च होतोय. हा सारा पैसा आपल्या विकासकामांचा आहे. सार्वजनिक जीवनाबरोबर त्याचा मोठा आघात आपल्या वैयक्तिक जीवनावरही होणार आहे. या गोष्टी आपण वेळीच लक्षात घेतल्या नाहीत तर उद्याची परिस्थिती खूपच भयावह असणार आहे. कल्पनेपलीकडचे भेसूर चित्र होण्यापूर्वीच कृतीला लागू यात! त्यासाठी कोविड योद्‌ध्यांनी केलेले आवाहन आपण "आव्हान' म्हणून स्वीकारूया! 

संपादन - धनाजी सुर्वे 
 

इतर ब्लॉग्स