Lata Mangeshkar: पृथ्वीवर शेवटचा मानवी श्वास सुरु राहील तोपर्यंत दीदींचा सूर तरळत राहील

लता मंगेशकर नावाचा सूर नव्हे सुरांचे एक युग आहे वसंत ऋतूच्या आगमनकाळीच या गानकोकिळेने निरोप घेतला.
Lata Mangeshkar
Lata Mangeshkarsakal

भक्ती निटवे-मांगले मेलबर्न

लता मंगेशकर : उत्तररात्रीच्या रत्नखचित आकाशाकडे पाहताना सहज उत्तर दिशेला युगानुयुगे तेवणाऱ्या ध्रुव ताऱ्याकडे आपले लक्ष जाते आणि जगदाकारात धूलिकणासम असलेल्या इवल्याशा पृथ्वीवरल्या इवल्याशा जीवालाही धीर येतो. आपल्यासारख्या नगण्य मानवी जीविताला तो ध्रुवतारा अढळपणाचे जणू आशीर्वचन देत असतो. तोच ध्रुवतारा नभातून अदृश्य झाल्याची, निराधार करणारी भावना प्रत्येक भारतीय मनात घर करून गेली. तो दिवस म्हणजे ६ फेब्रुवारी २०२२.

लता मंगेशकर नावाचा सूर नव्हे. सुरांचे एक युग त्या रविवारी निमाले, वसंत ऋतूच्या आगमनकाळीच या गानकोकिळेने निरोप घेतला. या दैवयोगास काय म्हणावे? हा क्षण कधी येऊच नये, असं प्रत्येकालाच वाटत होते. पण कालगतीचे नियम देवदूतांनाही पाळावे लागतात.

गेल्या दोन अडीच वर्षात विषाणूच्या उद्रेकामुळे अनेक प्रतिभावंत आपण गमावले. अनेकांना आपल्या आप्तांना अकाली निरोप द्यावा लागला. त्याचे दुःखही सहन करण्यावाचून गत्यंतरच नव्हते. परंतु, लतादीदी नावाचा अलौकिक स्वर जिथे उमटला, तो कंठ मुका झाला हे दुःख सहन होण्यापलीकडचे आहे. कारण लता मंगेशकर नावाचा हा स्वर कुण्या व्यक्तीच्या मालकीचा राहिलाच नव्हता. तो भारतीय मनाचा आत्मस्वर होता. तो आपला आप्तस्वर होता.

Lata Mangeshkar
Lata Mangeshkar Birth Anniversary : लता दीदी आई-वडिलांचे पाय धुऊन प्यायच्या पाणी

गानसम्राज्ञी लता मंगेशकर म्हणजे भारतीय चित्रपटसृष्टीतील पार्श्वगायनाच्या इतिहासातील एक सुवर्णपान! त्यांच्या स्वर्गीय स्वरांना प्रांतांची, देशांच्या सीमांची मर्यादा नव्हती. या स्वरांना कोंदण लाभले होते ते केवळ उत्कटतेचे अन् भव्यतेचे!लतादीदींच्या संगीतमय जीवनाला भारतरत्नाची झळाळी लाभली तसेच नव्वदीच्या टप्प्यावर त्यांना 'डॉक्टर ऑफ द नेशन' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तेव्हा खऱ्या अर्थाने त्या गानकोकिळा बनल्या.

चोवीस तासांतला कोणताही क्षण असा असणं शक्य नाही जेव्हा लतादीदींच्या स्वरानं वातावरण भरून आणि भारावून गेलेलं नाही. देवळात, शाळेच्या प्रार्थनेत, घरात, नाट्यमंदिरात, उत्सवात, लग्नसमारंभात, तुम्ही कुठेही जा त्यांचा स्वर आपल्या कानावर येतोच. तो देखील थोडाथोडकी नव्हे, तर सत्तरहून अधिक वर्षे !वडिलांना ही गोष्ट आवडली नाही. आपल्या मुलीने चित्रपटातील गाणी गावित हे वडिलांना मंजूर नव्हते. त्यामुळे हे गीत चित्रपटातून वगळण्यात आले. पण लतादीदींच्या गायन -कौशल्यामुळे वसंत जोगळेकर प्रभावित झाले.

१९४२ साली दीनानाथ मंगेशकरांच्या निधनानंतर वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षी कुटुंबाची जबाबदारी लतादीदींच्यावर आली. भावंडांमध्ये दीदी मोठ्या असल्यामुळे उदरनिर्वाहासाठी त्यांनी पार्श्वगायनाच्या क्षेत्रात पाऊल टाकले. त्या काळी नूरजहाँ, शमशाद बेगम, अमीरबाई कर्नाटकी, राजकुमारी या गायिकांचा समाज मनावर पगडा होता. अशावेळी आपली स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करणे ही गोष्ट सोपी नव्हती. कौटुंबिक जबाबदाऱ्या पेलताना त्यांना खूप संघर्ष करावा लागला.खरंतर त्यांना अभिनयाची तितकीशी आवड नव्हती पण वडिलांच्या अकाली मृत्युमुळे त्यांना पैशासाठी हिंदी व मराठी चित्रपटांमध्ये काम करावे लागले.

अभिनेत्री म्हणून त्यांचा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला तो 'पहिली मंगळागौर (१९४२) ज्यामध्ये त्यांनी स्नेहप्रभा प्रधानच्या छोट्या बहिणीची भूमिका केली. त्यानंतर त्यांनी 'चिमुकला संसार' (१९४३), 'गजाभाऊ' (१९४४), 'बड़ी माँ (१९४५), 'जीवनयात्रा' (१९४६), 'माँद' (१९४८), 'छत्रपती शिवाजी' (१९५२) इत्यादी चित्रपटात भूमिका केल्या. त्यानंतर त्या पार्श्वगायन क्षेत्राकडे वळल्या.

१९४९ हे वर्ष दीदींच्या आयुष्याला कलाटणी देणारे वर्ष होते. 'महल' या चित्रपटातील 'आयेगा आनेवाले' या गीतामुळे त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्या. हे गीत लतादीदींनी त्या काळातील एक सुंदर व लोकप्रिय अभिनेत्री 'मधुबाला' यांच्यासाठी गायलेले होते. हा चित्रपट लोकप्रिय ठरला. या चित्रपटामुळे लतादीदी व मधुबाला यांची कीर्ती सर्वत्र पसरली. यानंतर लतादीदींनी मागे वळून कधी पहिलेच नाही.

Lata Mangeshkar
Lata Mangeshkar : अयोध्येच्या चौकाला लता दीदींचे नाव, PM मोदींनी दिली जयंतीच्या दिवशी अनोखी भेट

लता मंगेशकर.. अभिजात भारतीय संगीतातील कोहिनूर! त्यांची गाणी ऐकत ऐकत आपण लहानाचे मोठे झालो आहोत. अनेक हिंदी, मराठी गाणी दीदींनी अजरामर करून ठेवली आहेत. लतादीदींनी हजारो गाणी गायली आहेत. आपण सारे खरंच भाग्यवान यासाठी की आपल्या हयातीत आपण त्यांना पाहू शकलो, ऐकू शकलो. आपला जीवनप्रवास दीदींच्या स्वराने सुखकर झालाय.

अमृतवेलीवर चांदण्यांची शुभ्र, मृदुल फुले झंकारावी. असा दीदींचा स्वर! हा नुसता गोड नव्हे तर अजोड होता. खरंतर साक्षात सरस्वतीचा स्पर्श लाभलेला त्यांचा हा आवाज, शब्दापलीकडचा होता. ज्ञानेश्वरांच्या ओव्यांपासून ते गालिबच्या गजलांपर्यंत गेल्या कित्येक दशकात दरवळणारा तो एक स्वरसुगंध होता.दीदींच्या आवाजाचा परिसस्पर्श अनेक कवी, शायर, संगीतकार, अभिनेत्रींच्या प्रतिभेला लाभला. त्यांचे सोने झाले.

दीदींच्या या ईश्वरी आवाजाची रूपे वर्णावी ती किती? सकाळी भक्तिगीतांचा कार्यक्रम रेडिओवर सुरु झाला की 'सुंदर ते ध्यान...... ऐकू येतं. काही क्षणात 'मोगरा फुलाला....... " चे शब्द कानावर पडतात, ते संपताच गणराज रंगी नाचतो.....' हे गीत सुरु होते. त्यांच्या आवाजातील 'पसायदान' ऐकताना त्या 'माऊली' होऊन आपल्याला भेटतात. ने मजसी ने परत मातृभूमीला...' हे दीदींचे गीत ऐकताना स्वातंत्रवीर सावरकरांच्या मनातील देशभक्ती जाणवते. 'मराठा तितुका मेळवावा....' या चित्रपटातील 'अखेरचा हा तुला दंडवत' हे दीदींनी गायलेलं गीत ऐकलं की हृदयात गलबलतं. दीदींनी या गाण्याला संगीत दिले होते. 'आनंदघन' या टोपणनावांनी दीदींनी आपला ठसा उमटविला. त्यांच्या गाण्यातील आर्तता थेट हृदयाला जाऊन भिडते.

कुठलाही प्रहर असो, ऋतू असो, रस असो, भाव असो भारतीय भाषा व नृत्यप्रकार असो, सणवार व उत्सव असो. कोणतेही वय वा प्रसंग असो. दीदींच्या स्वरांनी सर्वकाही सकळांसाठी सजवून ठेवले आहे.

गेली सात दशकं आपण ते स्वरवैभव अनुभवले. त्यांच्या गाण्याची दखल घेऊन २००१ मध्ये भारत सरकारने त्यांना सर्वोच्च असा मानाचा 'भारतरत्न' 'किताब बहाल केला. १९८९ मध्ये त्यांना 'दादासाहेब फाळके' पुरस्कारही बहाल करण्यात आला. १९७२, १९७५ व १९९० मध्ये त्यांना राष्ट्रीय पुरस्कार ही देण्यात आले होते.

सन १९७४ मध्ये जगात सर्वाधिक गीते गाणाऱ्या गायिका म्हणून नावाची नोंद केली गेली. गिनीज बुकात दीदींच्या९० वर्षे वयातही त्या गात होत्या. ३० पेक्षा अधिक भाषांमध्ये त्यांची गीते गेली. भारतीय सिनेसृष्टीत पार्श्वगायिका म्हणून त्या सर्वपरिचित होत्या.'भारतरत्न' लता मंगेशकरांच्या गाण्यातील ईश्वराची रूप शोधण्यातच आपल्या जन्माचे सार्थक आहे.

स्वातंत्र्य प्राप्तीनंतर दीदींनी "ए मेरे वतन के लोगों, जरा आँख में भर लो पानी....." हे गीत गायले. ते ऐकताना त्या वेळचे आपले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनाही आपले अश्रू आवरता आले नाहीत.दीदींच्या हजारो गाण्यांपैकी १९६४ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'वह कौन थी?" या चित्रपटातील पहाडी रागात गायलेले व दादरा तालाचे एक उत्कृष्ठ उदाहरण असणारे 'लग जा गले' हे माझे अत्यंत आवडते गाणे आहे. ५० वर्षाहूनही अधिक काळ

पंडित दीनानाथ मंगेशकर यांच्या ज्येष्ठ कन्या लतादीदी यांचा जन्म २८ सप्टेंबर १९२९ रोजी मध्यप्रदेशातील इंदौर येते एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे वडील हे कलाकार व गायक होते. त्यांच्या परिवारामध्ये भाऊ हृदयनाथ मंगेशकर तसेच बहिणी उषा, आशा, मीना यांनी देखील 'संगीत' हेच कार्यक्षेत्र निवडले.लता मंगेशकर यांचे बालपण महाराष्ट्रात गेले. आपल्या कुटुंबाचं कर्तेपण शिरावर घेणाऱ्या लतादीदींचा प्रवास सांगली, पुणे, कोल्हापूर ते मुंबई असा झाला. तो खडतर होता.

Lata Mangeshkar
Lata Mangeshkar: लता दीदींची स्वप्नपूर्ती! कलाकारांसाठी वृद्धाश्रमाची होणार निर्मिती

काळ १९३२-३३ चा संगीत रंगभूमीच्या विपन्नावस्थेची परमावधी झालेली. सांगलीच्या घरात बळवंत संगीत नाटक मंडळीचे मालक मा. दीनानाथ, नाटका कंपनीचे कुटुंब सावरण्याच्या विचारात अस्वस्थ आहेत. एका दिवेलागणीला आपल्या शिष्याला गाणं शिकवत आहेत. उजळणी करायला सांगून थोडे बाहेर जाऊन येत आहेत. तेव्हा अवघी साडेचार वर्षाची लता शिष्याला सांगते, "बाबांनी असं शिकवलंय, मी म्हणून दाखवते "तुला" वडील ते ऐकून चकित होऊन म्हणतात, "माझ्या घरातचं गवई आहे. मी दुसरं कुणाला काय शिकवु?"

लतादिदींची शिकवणी सुरु झाली. बाबांचं निधन होईपर्यंत ती अखंड राहिली. एकदा ते माईना म्हणाले, "लताच्या रूपाने मला उद्याचा सूर्योदय दिसतोय". अवघ्या साडेबारा वर्षे वयाच्या मुलीला वडिलांनी जवळजवळ दीडशे चिजा शिकवून पारंगत केलं होतं.

१९४१ मधील दीदींच्या बालपणीची आणखी एक घटना! पुण्यात 'खजांची' च्या गाण्याची स्पर्धा जिंकल्यावर मेडल व बक्षीस मिळालेला दिलरुबा घेऊन आलेल्या आपल्या मुलीला वडील म्हणाले, "यश डोक्यात जाऊ देऊ नकोस. तुला खूप मोठं व्हायचं आहे आणि खूप पुरस्कार मिळवायचे आहेत." या आणि अशा असंख्य घटनांनी दीदींच्या बालपणीचा काळ व भावी काळ उजळलेला होता. लहानपणापासूनच दीदींना गायिका बनायचे होते.वसंत जोगळेकर निर्मित 'किती हसाल' या चित्रपटासाठी एक गीत लताने गायले तेव्हा लोटला तरी आजही या गाण्याची गोडी कायम आहे.

सामाजिक बांधिलकी जपणे हा तर दीदींच्या स्वभावाचा स्थायीभाव! रसिकांनी केलेल्या प्रेमाची परतफेड म्हणून दीदींनी माई मंगेशकर व दीनानाथ मंगेशकर ही दोन सुसज्ज हॉस्पिटल्स पुण्यात सुरु केली.आपल्या कुटुंबावर मायेची पखरण घालणाऱ्या लताजींनी आपल्या भावंडांना अखेरपर्यंत मातृप्रेमाचे छत्र दिल्याचे हृदय चित्र आपण पहिले आहे. लताजींच्या बरोबर सुरांच्या ओढीनं झपाटलेली मंगेशकर भावंडं लताजींच्या पश्चातही आपापल्या वेगळ्या वाटेनं गाण्याची साधना करत आहेत.

एकदा पु. ल. म्हणाले होते की, "मला आकाशात देव आहे का नाही हे माहित नाही पण आकाशात सूर्य आहे, चंद्र आहे आणि लताचा स्वर आहे".

खरंच, असा स्वर, असा सूर, पुन्हा होणे नाही. जोपर्यंत सूर्याचे तेज,चंद्राची शीतलता, फुलातील सुगंध गंगेचे पावित्र्य शाश्वत आहे अगदी त्याचप्रमाणे जोपर्यंत आकाशात चंद्र सूर्य राहतील व पृथ्वीवर शेवटचा मानवी श्वास सुरु राहील तोपर्यंत दीदींचा सूर हा वायुलहरींवर तरळत राहील. स्वरलतेच्या या साऱ्या आठवणी म्हणजे जणू आपल्या मर्मबंधातली ठेव !

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com