अनुभव साता समुद्रापारचे : अमेरिकेला धडा आणि उशिराचे शहाणपण

सचिन कापसे, ऑस्टीन, टेक्‍सास (अमेरिका) 
Friday, 29 May 2020

ऑस्टीनमध्ये मी दहा वर्षांपासून राहतोय. मायदेश सोडून आलेल्यांचे अनुभव इथल्या प्रश्‍नानुसार बदलत जातात. कोरोनाच्या आपत्तीने अमेरिकेला अनेक धडे दिले आहे.

ऑस्टीनमध्ये मी दहा वर्षांपासून राहतोय. अमेरिका म्हटलं की मोठ्या पगाराची नोकरी आणि ऐषआरामी जीवन असं चित्र सर्वासमोर उभे राहते. अशी स्वप्ने घेऊन मायदेश सोडून आलेल्यांचे अनुभव इथल्या प्रश्‍नानुसार बदलत जातात. कोरोनाच्या आपत्तीने अमेरिकेला अनेक धडे दिले आहे. कोरोनाला गंभीरपणे घेतलं नाही हे इथं फारच महागात पडलं. इथे एप्रिलमध्ये टाळेबंदी लावली. मात्र ते उशिराचे शहाणपण होतं. आता परिस्थिती सुधारतेय. टाळेबंदी शिथिल होतेय. कोरोना संकटाने अमेरिकेला बरंच काही शिकवलंय. 

अमेरिकेत कोरोनाने फेब्रुवारीतच शिरकाव केला. तेव्हा मनात अनामिक भीती होतीच. आरोग्याबाबत इथे आम नागरिक थोडे जास्तच बेफिकीर असतात. सुरवातीला सोशल डिस्टन्सिंग नावाचा प्रकारच इथे नव्हता. लोक ते मानायलाच तयार नव्हते. त्यामुळे लॉकडाऊनही केले नाही. मार्चमध्ये रुग्णसंख्या लाखापर्यंत गेली आणि अमेरिका सावध झाली. मात्र तोपर्यंत बराच उशीर झाला होता. न्यूयार्क ही आर्थिक राजधानी. गर्दीचे शहर. इथे सबवे ही अंडरग्राऊंड लोकल. तिथे नेहमीच प्रचंड गर्दी असते. त्यामुळे या रोगाचा प्रसार वाढला. तरीही सरकारने फारसे गंभीरपणे घेतले नाही.

एरवी इथे फ्लूच्या तापाने दरवर्षी अनेक लोक दगावतात. कोरोनाबाबतची सर्वांचा तोच दृष्टीकोन होता. कोरोनाविषयी इथल्या अमेरिकन्सना प्रारंभी काहीच वाटले नाही. मात्र जसजसा कोरोनाचा कहर सुरु झाला आणि तसेच इथे अस्वस्थता वाढत गेली. पुढे एप्रिलमध्ये लॉकडाऊन झाले आणि आम्ही घरातूनच काम करू लागलो. शाळाही बंद झाल्या. आता पुढे काय काय वाढून ठेवले आहे याची भीती मनात होती. आमच्या शहरात भारतीयांची मोठी संख्या आहे. आमचा सर्वांशी चांगला संपर्क असतो. मात्र आता आमच्या भेटी होत नाहीत. इथले सगळे सण रद्द झाले आहेत. अमेरिकन्सचा "साऊथ बाय साऊथ वेस्ट' हा या महिन्यातला मोठा सण रद्द झाला आहे. त्यामुळे थोडा दिलासा मिळाला आहे. 

सध्या एकमेकांची काळजी घेणे हे महत्त्वाचे. मुलांबरोबर खूप वेळ जातो. इथे भीती वाढवण्यात चुकीच्या बातम्याही जबाबदार आहेत. त्यामुळे एप्रिल महिन्यात जास्त बातम्या बघायचंच मी टाळलं. सरकारकडून सूचना मात्र काटेकोर पाळल्या. भाजी आणली तर दोन तास ती बाहेरच ठेवून धुवून वापरण्यापर्यंत आम्ही दक्षता घेतली. अमेरिकेच्या तुलनेत भारतात कोरोनाबाबत सुरवातीपासून दक्षता घेतली याबद्दल सरकारचे कौतुकच. भारतात ग्रामीण भागातही लोकांनी टाळेबंदीचे नियम पाळून चांगले सहकार्य केले. इतर गावी न जाणे, मोठे कार्यक्रम टाळणे हे करून त्यांनी भारतात संकट टाळले म्हणता येईल.

मात्र अमेरिकेतील शहरी माणसांनी हे संकट अधिक वाढवले आहे. ऑस्टीनच्या दोन जिल्ह्यांतील शहरातच जास्त रुग्ण आहेत. इथल्या खेड्यात मात्र घर-शेतीत लोक गुंतले आहेत. ते फारसे उचापत्या करीत नाहीत. त्यामुळे अमेरिकेच्या ग्रामीण भागात फारसा फैलाव नाही. आता एक मे पासून लॉकडाऊन उठविले गेले आहे. पण काही प्रतिबंध घालून दैनंदिन व्यवहार सुरू आहेत. हे उशिराचे शहाणपण आहे मात्र असो. देर आये दुरुस्त आये.... मात्र आता परिस्थिती सुधारतेय. 

इतर ब्लॉग्स

संपादकीय बातम्या