एका पत्रकाराचं कळकळीचं पत्र

मनोज साखरे
गुरुवार, 26 मार्च 2020

राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्याची वेळ आली आहे. आपले जवान शत्रूसह नैसर्गिक संकटांना तोंड देत सीमेवर अहोरात्र पहारा देत आहेत. रुग्णसेवेसाठी डॉक्टर, नर्स, रुग्णालयातील इतर स्टाफ घराबाहेर आहे. जीवनावश्यक वस्तू वितरणासाठी काम करणारे, शासन यंत्रणेतील लोक, पत्रकार रस्त्यावर आहेत ते कर्तव्य निभावत आहेत. मग आपणही आपल्या लोकांसाठी घरी बसा आणि देशकार्य करा. देशाला देण्यासाठी तुमच्याकडे वेळ आहे का? असेल तर तुम्ही निश्चितच राष्ट्र वाचवण्याचे कार्य करीत आहात.

प्रियजनहो, आता रात्रीचे दीड वाजताहेत. तरीही मी जागा आहे. लिहीत आहे, लिहीत राहणार. या लेखन प्रपंचाला प्रेमाचे पत्र समजा, भावना समजा, विनवणी समजा, इशारा अथवा व्याकूळताही समजा. कारण तुम्हा सगळ्यांची चिंता लागली आहे. देशाची चिंता आहे. देशच नव्हे तर जग एका मोठ्या संकटातून जात आहे. कुणाच्याच उभ्या आयुष्यात असे प्रसंग कधी आले नसावेत, एवढी भयावह, विदारक आणि ज्याची कल्पनाही करता येणार नाही अशा स्थितीतून आपण जातोय. आज आपली स्थिती स्फोटक आहे. महामारीला तोंड फुटले आहे. आपण सर्व जाणताच आहात की कोरोनाचा (कोविड -१९) प्रादुर्भाव जगात फैलावलाय.

जगातील काही राष्ट्रांची परिस्थिती अत्यंत हाताबाहेर गेली आहे. इटलीची स्थिती विदारक आहे. परिस्थिती झपाट्याने बदलत आहे. त्यामुळे ‘आपले जीवन आपल्याच हाती’ असे म्हणण्याची वेळ आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या व त्या-त्या देशातील सरकारने केलेल्या सूचना, उपाययोजना आणि इशाऱ्यांचे पालन वेळीच तंतोतंत करणे आवश्‍यक आहे. हे जर करता आले नाही तर आपला प्रवास ‘मरण रस्त्याकडे आहे’ असेच समजा.

आपल्याला ही लढाई निशस्त्रपणे लढावी लागणार आहे त्यासाठी संपर्क, सहवास टाळणे अगत्याचे आहे. चीनवर संकट आले तेच संकट इटली, स्पेन आणि युरोपात आले. हेच संकट जागतिक बनले. देशासह महाराष्ट्रात हे संकट वाढतेच आहे. त्यामुळे आपण आपली आणि आपल्या कुटुंबीयांची अत्यंत काळजी घेणे आवश्यक आहे. आज त्यांची काळजी घेतली नाही तर उद्या फक्त स्वतःचीच काळजी करावी लागेल आणि फक्त स्वतःचीच काळजी करण्याची अशी भयावह वेळ कुणावरही येऊ नये हे आपण जाणले पाहिजे. आपल्यावरती आलेले संकट सद्यःस्थितीत तरी गूढ आणि आकलनापलीकडे आहे. हे किती काळ असेल हे निश्चित सांगताही येत नाहीये; पण परिणाम निश्चितच अनिष्ट आहे.

सावरायला खूप काळही लागू शकेल. शंख केव्हाच वाजलाय आपले महायुद्ध सुरू झाले आहे. एक तर ‘जिंकू किंवा मरू’ अशी स्थिती आहे. सावध राहा, कोरोनारुपी (कोविड -19) शत्रू कधी कुणावर हल्ला करेल याची शाश्वती नाही. शरीरावर होणारे हल्ले, जगातील विदारकता जाणल्यानंतर आता ते मनावर होत आहेत, आत्मविश्वासावरही होत आहे; पण तुम्ही ढळू नका, मन घट्ट करा, खंभीर व्हा, आत्मविश्वास बाळगा, निर्धार करा आणि घरातच राहा. परिस्थिती खूपच विदारक आहे, हे कदाचित उशिरा लक्षात येईल तेव्हा आपण नसू अशी वेळ येऊ देऊ नका. एवढं खरं ‘ज्या देशाचे नागरिक अजूनही जागे झाले नसतील, तर तो देश कधीही झोपू शकतो’ म्हणूनच लोकहो..

राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्याची वेळ आली आहे. आपले जवान शत्रूसह नैसर्गिक संकटांना तोंड देत सीमेवर अहोरात्र पहारा देत आहेत. रुग्णसेवेसाठी डॉक्टर, नर्स, रुग्णालयातील इतर स्टाफ घराबाहेर आहे. जीवनावश्यक वस्तू वितरणासाठी काम करणारे, शासन यंत्रणेतील लोक, पत्रकार रस्त्यावर आहेत ते कर्तव्य निभावत आहेत. मग आपणही आपल्या लोकांसाठी घरी बसा आणि देशकार्य करा. देशाला देण्यासाठी तुमच्याकडे वेळ आहे का? असेल तर तुम्ही निश्चितच राष्ट्र वाचवण्याचे कार्य करीत आहात.
आपलाच..
 

इतर ब्लॉग्स