pride month
pride monthgoogle

Blog: माणसाने माणसाशी माणसासम वागणे! Pride Month च्या निमित्ताने...

मनात शंका अनेक असतात पण आजूबाजूला उदाहरणं नसतात किंवा मोकळेपणाने चर्चा करता येईल असं कोणी नसतं. काय करायचं अशावेळी?

तेजाली चंद्रकांत शहासने

जून महिना हा जगभरात प्राइड मंथ म्हणजेच अभिमान मास म्हणूनही साजरा केला जातो. जगभरातील समलिंगी, बहूलिंगी, मिश्रलिंगी, लिंगपरावर्तित अशा समस्त वर्गाच्या जगण्याला सन्मान मिळवा, या संज्ञांबद्दल समाजात जे गैरसमज आहेत ते दूर व्हावेत, त्यांना सारखेच अधिकार आणि मान समाजात मिळवा आणि त्याबाबत जनमानसात जागृती निर्माण व्हावी हा यामागचा उद्देश. यानिमित्ताने जगभरात या विषयावर जनजागृती करण्यासाठी पदयात्रा, उत्सव, मेळावे, चर्चासत्रे आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन होते.

भारतीय समाजजीवन लक्षात घेता किन्नर भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग आहेत. मात्र असे असले तरीही समाजात त्यांच्या वाट्याला उपेक्षाच येते. हीन वागणूक मिळून, टाळ्या वाजवत भिक्षा मागण्याचे आयुष्य त्यांच्या वाट्याला येते. मात्र आता हे चित्र बदलतताना दिसतंय. कायद्यातील बदल, जनजागृती यामुळे शासकीय पातळीवरही किन्नर तसेच समलिंगी, बहूलिंगी, मिश्रलिंगी, लिंगपरावर्तित यांचे अधिकार जपून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामावून घेण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. सर्वसमावेशकता, सर्वंकष अधिकार, त्यांच्या उत्थानासाठी खास शासकीय यंत्रणा अशा प्रकारचे हे प्रयत्न आहेत. National Portal For Transgender Persons : Ministry of Social Justice and Empowerment - Government of India (dosje.gov.in) ही खास किन्नर किंवा ट्रान्सजेंडर लोकांसाठीची वेबसाईट आहे. यामार्फत त्यांच्यासाठी शिष्यवृत्ती, आरोग्य सेवा, ओळखपत्र याबद्दल सुविधा पुरवल्या जातात आणि विविध योजनांची माहिती दिली जाते.

पण फक्त एवढ्यानेच चित्र बदलेल का? आजही LGBTQA+ समुदायातील व्यक्तींबाबत सरसकट गैरसमज आहेत, अगदी मोठ्या शहरांत सुद्धा त्यांना राहण्यास जागा मिळताना अडचणी येतात, त्यांच्याकडे साशंकतेने पाहिलं जातं. अगदी कौटुंबिक पातळीवरही त्यांना झिडकारले जाण्याची भीती भेडसावते. यामुळे अनेकजण आपली खरी ओळख लपवून दुहेरी जीवन जगतात. कुटुंबाची प्रतिष्ठा, पत, सामाजिक स्थान यांचा बाऊ करून कुटुंबाकडूनही LGBTQA+ व्यक्तीस तिची खरी ओळख समाजापुढे आणण्यापासून परावृत्त केले जाते. यातून निर्माण होणारा मानसिक तणाव असह्य असतो. किंबहुना सत्य लपवण्यासाठी मनाविरुद्ध लग्नही लावले जाते. घरून लग्नासाठी येणार दबाव आणि त्यातही लग्न झाल्यास त्यातून समलिंगी व्यक्तीची फरफट ही दुख:दायी असतेच पण त्यातून दुसऱ्या व्यक्तीचीही फसवणूक होते आणि तीही वैवाहिक सुखापासून वंचित राहते. कौटुंबिक न्यायालयात या कारणास्तव घटस्फोटाचे दावे दाखल होण्याचे प्रमाण मोठे आहे. मिश्रलिंगी व्यक्तींचीही परिस्थिती बिकट आहे. शरीर आणि मनातील द्वंद्व घेऊन जगताना होणारी फरफट जीवघेणी असते. त्यात समाजाकडून मिळणारी अवहेलना माणसाची कसोटी बघते.

आता या अडचणी वाचून अशा परिस्थितीत, “मग मी काय करू, माझ्या हातात काय आहे?” असं म्हणून आपल्याला हतबल वाटू शकतं. पण एक सुजाण नागरिक म्हणून आपण काय करू शकतो हा प्रश्न संवेदनशील मनाला नक्कीच पडू शकतो. आणि त्याचं उत्तर सुदैवाने सकारात्मक आहे. LGBTQA+ मधला शेवटचा A आहे ally ज्याचा एक अर्थ आहे असे लोक जे या कुठल्याही प्रकारात मोडत नाहीत परंतु ते या चळवळीला पाठिंबा देतात; जे या समुदायाचे मित्र असतात. अनेकदा आपल्यालाही वाटतं की आपणही सर्वसमावेशक असावं, पण नक्की काय करायचं लक्षात येत नाही. मनात शंका अनेक असतात पण आजूबाजूला उदाहरणं नसतात किंवा मोकळेपणाने चर्चा करता येईल असं कोणी नसतं.

काय करायचं अशा वेळी?

१. माहिती घ्या. जेवढी मिळेल तेवढी... त्यातून तुमच्या समजुतीच्या कक्ष रूंदवातील. तुम्ही आणखी खुल्या मनाचे व्हाल. यासाठी इंटरनेट हा एक चांगला स्रोत ठरू शकतो. फक्त स्रोत खात्रीशीर आहेत ना हे लक्षात घ्या. द्वेष, गैरसमज पसारवणाऱ्या महितीपासून दूर रहा. मुक्तपणे चर्चा करा.

२. थोडी परानुभूती आणि दयाळूपणा दाखवा. त्यांना समजून घ्या. (हे तर आपण अगदी शाळेत शिकलोय, हो ना?) व्यक्तीची लैंगिकता आणि लैंगिक कल गृहीत धरू नका. वाटल्यास पुढे येऊन विचारा. माझ्या अनुभवानुसार, प्रत्येकजण तुम्हाला आनंदाने माहिती देईल.

३. सर्वसमावेशक विचार ठेवा आणि आणि मनमोकळे राहा. कोणीही तुमच्याकडे विशेष वागणूक मागत नाही पण समान वागणूक आणि समान संधी मिळणे हा प्रत्येकाचा हक्क आहे. भेदभाव करू नका. (महिला हक्कांची चळवळ आठवते का?)

४. ज्यांनी अजूनही त्यांची लैंगिकता किंवा लैंगिक कल समाजासमोर उघड केलेला नाही त्यांची माहिती गोपनीय ठेवा. त्यांनी तुम्हाला हे सांगितलेलं असेल तर त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नका, त्यांना पाठिंबा द्या. त्यांच्यासाठी आयुष्य खूप कठीण आहे, ते आणखी कठीण बनवू नका.

५. त्यांना हाक कशी मारायची हे विचारा. ते लक्षात ठेवा, लिंग ही तरल, प्रवाही संकल्पना आहे. (तो/ती/ते, he/she/they)

६. त्याबद्दल चेष्टा, मस्करी करू नका. खरंच, ही अत्यंत गंभीर बाब आहे. बाय, गे, लेस्बियन, ट्रान्सजेंडर... या सर्व फक्त संज्ञा आणि विशेषणे आहेत. त्या माणसाच्या लैंगिकतेबद्दल माहिती देतात. ते कुत्सितपणे शिव्या किंवा हेटाळणीचे शब्द म्हणून वापरू नका.

७. आणि आता शेवटी, याबद्दल माहितीचा महापूर उपलब्ध आहे. पण असे असले तरी, हे शब्द, संकल्पना समजून घेण्याचा प्रयत्न करा. एकेका संज्ञेचे बारकावे समजून घ्या. त्याचं दडपण घेऊ नका. एक-एक करून सुरुवात करा. तुम्हाला नक्की लक्षात येईल.

थोडक्यात काय तर अगदी साधा, ‘माणसाने माणसाशी माणसासम वागणे’ हा विचार अंमलात आणला तरी अर्धी बाजी जिंकलीच. उरलेल्या पन्नास टक्क्यांसाठी ही यादी तुमच्या नक्की उपयोगी पडेल.

- तेजाली चंद्रकांत शहासने

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com