"लॉकडाउन' कुठलं आण्णा... ही तर "लक डाऊन'...! 

संजय पाठक 
बुधवार, 25 मार्च 2020

एकवेळ जेठालालला बबिता "हो'म्हणेल... अभिषेकला नवा पिक्‍चर मिळेल... सनी लिओना अंगभर साडीत दिसेल... खासदार महास्वामींचा जातीचा दाखला खरा ठरेल... हल्ली तसे न्यूजमध्ये नसलेले सुभाष अन्‌ विजयकुमार देशमुख एकमेकांना टाळी देतील... ऍड. धनंजय माने केस हरतील... पण आमचा पक्‍या तोंडात माव्याच्या तोबऱ्याविना दिसणं अशक्‍य...!

एकवेळ जेठालालला बबिता "हो'म्हणेल... अभिषेकला नवा पिक्‍चर मिळेल... सनी लिओना अंगभर साडीत दिसेल... खासदार महास्वामींचा जातीचा दाखला खरा ठरेल... हल्ली तसे न्यूजमध्ये नसलेले सुभाष अन्‌ विजयकुमार देशमुख एकमेकांना टाळी देतील... ऍड. धनंजय माने केस हरतील... पण आमचा पक्‍या तोंडात माव्याच्या तोबऱ्याविना दिसणं अशक्‍य...! पण आता "लॉकडाउन', संचारबंदीच्या निमित्तानं पक्‍याचं तोंड मोकळं असेल म्हणून त्याला गाठायला खास घरी गेलो. (पत्रकार हावो आमी, पोलिसांनी वळकपत्र दिलयं म्हटलं आमाला आसल्या कर्फ्यूत कुटं बी फिरायचं...) दरवाजातूनच पक्‍याला हाका मारल्या तर पठ्या बाहेर आला ते तोंडाचा गोल चंबू करूनच. त्याक्षणी आम्ही ओळखलं, पक्‍याचा आजचा दिवसपण खाडा नाही गेला. त्यानं कुठनंतरी मावा मिळवलाच...! 
"लगा पक्‍या, आसल्या संचारबंदीत तुला कुटनं मिळाला मावा...' 
"हा... हा... ही इचारायला हितवर आलावं का...?' 
"नाय रे... पण आपलं दिसला तोंडात म्हणून विचारलो...' 
"धा चा मावा पंचवीसला घेतलो बे... कमीच कर नं ती गुलब्या. रोज तितनंच मावा घेतो तरी बी नायच म्हन्ला....' 
"असं असं... (आम्ही हातची मूठ वळून व अंगठा वर करून म्हटलं...) मी त्याची पन सोय होत असल की मग...' 
"... तर न व्हायला काय झालं, होतीय की. बसायचं का आज रात्री. घरात बसून बसून लै कटाळलोय...' 
छे... छे... मी ऑनड्यूटी आहे, असं सांगून तिथून काढता पाय घेतला...! 
फिरत फिरत सात रस्त्याला आलो. सगळीकडे रस्ते जणू अंगावर येत असल्याचा भास झाला. ही भयाण शांतता नकोशी झाली. सरळ मोदी चौकीवरून रेल्वे स्टेशन गाठलं. तिथंही नेहमीची लगबग दिसली नाही. नाही म्हणायला आमचा नेहमीचा अंडाबुर्झाचा मोकळा गाडा दिसला. एकवेळ पंढरीतला विठुराय मोकळा दिसंल पण जाधवाचं पान दुकान... पण ते पण बंद, निस्तेज दिसलं. चौकातल्या हसऱ्या चेहऱ्याच्या महात्म्याकडे नेत्रकटाक्ष टाकून पुढे निघालो. शहराची ही निस्तेज, निरव शांतता अनुभवत एनजी मिलची कमान तिच्या अनुभवाच्या जोरावर हेही दुःख गिळून जशी आहे तशी दिमाखात उभी दिसली. थोडं पुढ जात जुनी मिल चाळीची निस्तब्धता अनुभवली. पापय्या तालमीतून येणारा शड्डूचा आवाज खूप कान टवकारूनही कानावर पडलाच नाही. जुन्या मिलच्या जागेवर उभारलेल्या उंचच उंच इमारती आज शांत दिसल्या. 
नवीवेस चौकीच्या चौकात कोपऱ्यात एक पोऱ्या उभारलेला दिसला. 
"असल्या कर्फ्यूत तू बाहेर कसा रे... काय झालं...?' 
"काय नाही, पण रात्री मी चहाची गाडी लावतो ती गाडीच कुणीतरी या कर्फ्यूत चोरून नेली. पोलिसांत तक्रार द्यायला गेलो तर ते नाय नाय ते प्रश्‍न विचारतेत. म्हणून विचार करतोय काय करायचं ते.' 
"बरं बरं... असू दे, तू आता घरी जा. परत पाहू आपण सध्या "लॉकडाउन' आहे नं...' 
""लॉकडाउन'कुठलं साहेब, इथं माझं "लक डाऊन' आहे...! 
(त्याच्या या प्रश्‍नासरशी अंगावर सर्रर्रकन्‌ काटाच आला. निशब्द मी... पुढे निघालो... गाडीच्या आवाजात त्याचे शब्द हवेत विरून गेले...) 

इतर ब्लॉग्स