Mahagauri Devi, Navratri Day 8, Maha Ashtami
esakal
महागौरी: आज नवरात्रीचा आठवा दिवस! महाअष्टमी! अष्टमी तिथीला केलेली उपासना ही विशेष फलदायी मानली जाते.महा अष्टमीला श्रीदुर्गामातेच्या 'महागौरी' स्वरूपाची पूजा करतात. महा म्हणजे मोठी किंवा महान आणि गौरी म्हणजे गौर,शुभ्र व तेजस्वी वर्णाची देवी. पार्वतीने भगवान शंकरांना पती म्हणून प्राप्त करून घेण्यासाठी वयाच्या आठव्या वर्षापासून घोर तपश्चर्या करायला सुरुवात केली होती. 'हरितालिका' हे व्रत आपण जाणतो.हरितालिका या शब्दाचा अर्थ 'हरित' म्हणजे हिरवळीने नटलेल्या वनश्रीच्या सहवासात म्हणजे अरण्यात जाऊन आणि 'आलि' म्हणजे सखी,आपल्या सखीसह जाऊन शिवप्राप्तीसाठी पार्वतीने तप केले होते म्हणून ती हरितालिका. नंतरही ती जसजशी मोठी होत गेली तसतशी तिच्या तपःसाधनेची उग्रता वाढत गेली. या घनघोर तपामुळे ती दिवसेंदिवस कृश होत गेली. तिचा मूळ गोरा रंग लोप पावून तो काळा झाला.कालांतराने तिच्या या कठोर तपाने शिव तिला प्रसन्न झाले आणि तिचा काळा वर्ण पाहून त्यांनी आपल्या जटेतून वाहणाऱ्या पवित्र गंगेने तिला स्नान घातले. मग त्यानंतर ती एकदम वीज, चंद्र आणि शंखासारखी अत्यंत तेजस्वी आणि गौरवर्णी झाली, म्हणून तेव्हापासून तिला महागौरी या नावाने संबोधले जाऊ लागले.