गोफण | देवाभाऊंकडेच जाणार सत्तेची सूत्र

gofan sakal article
gofan sakal articleesakal

या जगात आपलं म्हणून कुणीच उरलं नाही.. सगळं जग आपल्याला खायला उठलंय अन् आपण कुठल्यातरी कोपऱ्यात निपचित पडलोय; अशा मानसिक गर्तेत देवाभाऊ गेले होते. प्रसंग बाका होता परंतु परिस्थितीच्या छाताडावर नेटाने उभं राहण्याचं कसब त्यांच्या ठायी होतं... म्हणूनच एक मन कायम उभारी देई.

जीवावर संकट बेतलं किंवा सत्तेवर बालंट आलं तर ताज्या दमाच्या सेनेची एक तुकडी त्यांनी तैनात ठेवली होती. वैऱ्यावरसुद्धा असा प्रसंग येऊ नये, अशी परिस्थिती सध्या निर्माण झालेली. घरचे-दारचे, स्वपक्षातले, परपक्षातले; सगळेच चाल करुन आले होते. त्यामुळे त्यांनी त्या सैन्य तुकडीला कामाला लावलं होतं. त्यांच्यासोबत आज एक गुप्त बैठक ठेवली होती.

सैन्य तुकडीचं नाव चुळबुळ सेना होतं. जेव्हा गरज भासेल तेव्हा त्यांना चावी दिली जाई. मग हे लोक वाट्टेल ते, वाट्टेल तसं आणि वाट्टेल तिथे चुळबुळी कारवाया करीत. यातून देवाभाऊची इमेज घडत होती की बिघडत होती? हा प्रश्न अनुत्तरितच आहे म्हणा. पण आज बैठक बोलावली होती. तीन शिलेदार लगबगीने देवाभाऊच्या 'सागरा'एवढ्या सदनात दाखल झाले.

पहिले होते नितू (दादा) नरहरी राणबोके. बोक्यासारखं धावून जाण्याचं हुनर त्यांच्यात होतं. मुंबई प्रांत अन् कोकणी खाचखळग्यातल्या हालचालींवर ते बारीक लक्ष ठेवून असत. दुसरे गोपाडाकू धुमधडाके. यांच्याकडे बारामती खोऱ्याची जबाबदारी होती. परिसरात दहशत कायम ठेवून जमीनदारांवर अंकूश ठेवण्याची जबाबदारी त्यांच्याकडे असे.

तिसरे होते मनमोहक खंबोज. नाव मनमोहक असलं तरी ते कमालीचे चाणाक्ष अन् रागीट होते. नवनवं तंत्रज्ञान आत्मसात करुन सत्तेविरोधातल्या गटांची खबरबात ठेवण्याचं काम ते करीत. सगळ्यांच्या कुंडल्या आपल्याकडे आहेत, असं ते खासगीत बोलत. हे तीनही शिलेदार देवाभाऊंच्या पुढ्यात बसलेले होते.

देवाभाऊ फडफडे नावाप्रमाणेच फडफड करीत बोलले. ''आम्हांस म्हणून काही अब्रू वगैरे आहे की नाही? कधी वरचे तर कधी खालचे.. सगळे आमचा घास घ्यायला निघालेत. जहागीरदार राहिलेला माणूस जेव्हा दुसऱ्याच्या हाताखाली हिशोब ठेवायला लागतो तेव्हा जीव खालीवरी होतो. काहीतरी केलंच पाहिजे...''

नितूदादा बोलले, सरदारSS आपणाला काळजीची गरज नाही. ह्यो पठ्ठ्या रक्ताचं पाणी करुन तुम्हास बळ देईल. उधारराजेंपासून तुम्हास काडीचाही सोस होणार नाही, हे ध्यानात असू द्या.

त्यानंतर गोपाडाकू बोलले, आमच्या बारामतीच्या खोऱ्यात लांडग्यांचा बंदोबस्त केलाय. कुणाची हिंमत न्हाई तुमच्याकडं वाकडा डोळा करुन बघायची. तुम्ही निर्धास्त असा.

मागोमाग मनमोहक म्हणाले, किसका कागज चाहिए बोलो.. या व्हिडीओ ही भेजू. सिर्फ नाम बोलो... आपको तकलीफ होगी तो हमको चैन की निंद कैसे आएगी...

देवाभाऊंची फडफड बंद झाली होती. शांतपणे शून्यात बघत ते काहीतरी विचार करत होते. त्यांची विचार करण्याचा प्रक्रिया म्हणजे तांदळाची खिचडी बनवण्याएवढं अवघड होतं. कुणाला कुठे टाकायचं अन् कुणाला कुठे मिसळायचं हे त्यांच्याएवढं कुणालाच जमत नसेल. मनात काहीतरी शिजत होतं. तेवढ्यात ते बोललेच-

''बस्स झालं आता! दिल्लीश्वर म्हणतील ते ऐकायचं नाही. आपल्यालाही मनं आहेत.. असंच त्यांचं ऐकत राहिलोत तर एक दिवस देशोधडीला लागू. पोटापाण्याची पंचाईत होईल... ज्यांच्यावर कारवाया केल्या ते पुन्हा बळ एकवटून हल्ला चढवतील. त्यामुळे आता आपण आपल्या पद्धतीनं काम करायचं''

म्हणजे नेमकं काय करायचं? असा चेहरा करुन तिघेही देवाभाऊकडं बघत होते. काहीतरी मोठी खेळी शिजतेय, याची जाणीव त्यांना झाली होती. देवाभाऊ पुढे बोलले, ''आता आपल्याला व्हायचंय जहागीरदार... या राज्याची सूत्र आपल्यालाच हवीत.. मग हवं ते करु! कुणीही मागून येतो अन् पुढे जातो. हे चालणार नाही''

''ना दादाराव.. ना नाथाबावू! आता फक्त देवाभाऊ!! कळलं का? लागा कामाला. आपापल्या विचारांचे सरदार एकत्र करा अन् लढा सुरु करा. वाट्टेल ते बोला.. वाट्टेल ते करा. आता माघार नाही म्हणजे नाही.. म्हणजे नाही. नाही..नाही..नाही!'' असं म्हणत त्यांनी एका जुन्या व्हिडीओ क्लिपची आठवण करुन दिली.

बैठक संपली. तिघे निघून गेले. देवाभाऊंच्या डोळ्यात चमक होती. तिकडे शिलेदार कामाला लागले. सत्तापक्षातल्या बड्या सहकाऱ्यांबाबत उलटसुलट बोलायला लागले. दिल्लीकरांच्या मनात पुन्हा उजळण्यासाठी देवाभाऊंनी ही खेळी केली होती. परंतु २०१९ सालापासून ते जे करीत त्याचं उलटंच काहीतरी होई. तेवढ्यात टीव्हीवर बातमी लागली- लबाड लांडग्याचं पिल्लू.... जहागीरदार होण्यासाठी १४५ लागतात वगैरे...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com