Mahatma Phule Death Anniversary: वडिलांनी त्या दोघांच ऐकलं अन् जोतिबा शाळेत जाऊ लागले... जडण घडणीत आहे सिंहाचा वाटा

महात्मा फुले यांच्या प्राथमिक जडणघडणीत दोन व्यक्तींचे महत्त्वाचे योगदान आहे, त्या दोन्हीही व्यक्तींबाबत आज काहीही माहिती उपलब्ध नाही.
Mahatma Phule Death Anniversary: वडिलांनी त्या दोघांच ऐकलं अन् जोतिबा शाळेत जाऊ लागले... जडण घडणीत आहे सिंहाचा वाटा

महात्मा फुले यांच्या प्राथमिक जडणघडणीत दोन व्यक्तींचे महत्त्वाचे योगदान आहे, त्या दोन्हीही व्यक्तींबाबत आज काहीही माहिती उपलब्ध नाही. त्या दोन व्यक्ती म्हणजे गोविंदराव फुले यांचे शेजारी उर्दू शिक्षक गफार बेग मुनशी आणि धर्मोपदेशक किंवा सरकारी अधिकारी असलेले लिजिट साहेब. गोविंदरावांनी आपल्या हुशार मुलाचे शिक्षण पुन्हा सुरु करावे असा आग्रह या दोन सदगृहस्थांनीं केला, गोविंदरावांनी त्यांचे ऐकले आणि लहानगा जोतिबा स्कॉटिश मिशनरींच्या शाळेत जाऊ लागला आणि एका महात्म्याचा अशा प्रकारे जन्म झाला.

सावित्रीबाई आणि जोतिबा फुले यांच्या व्यक्तिमत्त्वांची जडणघडण करणाऱ्या अनेक व्यक्तींच्या नावांचा फुले दाम्पत्त्यांच्या चरित्रांत अगदी ओझरता उल्लेख होतो, कधी तर अनुल्लेखाने त्यांना टाळले जाते. मात्र असे करण्याने सावित्रीबाई आणि जोतिबा फुले यांची समग्र चरित्रे आतापर्यंत लिहून झालेली नाहीत. या दोन महान व्यक्तींची ही एकप्रकारे उपेक्षाच आहे.

जोतिबा स्कॉटिश मिशनरींच्या शाळॆत शिकले, वडलांनी घराबाहेर काढल्याने आणि नंतर स्वतःच्या शाळा चालवताना अर्थार्जनासाठी स्कॉटिश मिशनरींच्या शाळेत जोतिबा अर्धवेळ शिक्षकाची नोकरी करत असत असेही उल्लेख अनेक चरित्रकार करतात. स्कॉटिश शाळेत जोतिबांना शिकवणाऱ्या स्कॉटिश मिशनरींची नावे मात्र कुठेही झळकत नाहीत.

जोतिबा फुले आपले मित्र सदाशिवराव गावंडे यांच्याबरोबर अहमदनगरला अमेरिकन मराठी मिशनच्या सिंथिया फरारबाई यांच्या मुलींच्या शाळेला भेट देतात, त्यांच्याशी सविस्तर बोलणे होऊन, त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन आपण पुण्यात मुलींच्या शाळा सुरु केल्या असे स्वतः जोतिबा लिहितात. धनंजय किरलिखित फुले चरित्रात यावर दोनअडीच पाने आहेत.

फरारबाईंचे पूर्ण चरित्र कागदपत्रांच्या रूपात गेले एक शतकभर उपलब्ध आहे. तर या `मिस सिंथिया फरार' कोण याविषयी बहुतेक फुले चरित्रकार मौन बाळगतात. कागदपत्रांच्या आधारे अलीकडेच सावित्रीबाईंच्या शिक्षिका असलेल्या सिंथिया फरारबाईंचे चरित्र आणि कार्य याविषयी माहिती देणारे पुस्तक मी स्वतः लिहिले आहे.

रेव्हरंड जॉन स्टीव्हन्सन यांच्यासह रेव्हरंड जेम्स मिचेल हे स्कॉटिश मिशनरी पुण्यात १८३० पासून कार्यरत होते. जेम्स मिचेल यांनी आपल्या निधनापर्यंत वीस वर्षे पुण्यातल्या स्कॉटिश मिशनची जवळजवळ एकखांबी धुरा वाहिली. जोतिबांना आपल्या स्कॉटिश शाळेत १८४१ ते १८४७ या काळात शिकवणाऱ्या जेम्स मिचेल आणि जॉन मरे मिचेल यांचे यांचे केवळ ओझरते उल्लेख फुले दाम्पत्याच्या चरित्रांत आढळतात.

मुलींच्या शाळा चालवणाऱ्या जोतिबांचा पुण्यात जंगी सत्कार झाला, त्याकाळच्या वृत्तपत्रांत त्या कार्यक्रमाला हजर असणाऱ्या प्रतिष्ठित देशी आणि परदेशी व्यक्तींच्या यादीत जोतिबाचे शिक्षक असलेल्या रेव्हरंड जेम्स मिचेल आणि मिसेस मिचेल यांचे नाव साहजिकच झळकते.

सावित्रीबाईंनीं पुण्यात स्कॉटिश मिशनरी मिचेलबाई यांच्याकडे अद्यापनाचे धडे घेतले असे हरी नरके आणि इतर अभ्यासक लिहितात, हंटर शिक्षण आयोगासमोर साक्ष देताना आपण आपल्या शाळा मिचेलबाईंकडे चालवण्यासाठी दिल्या आणि त्या शाळा आजही (१८८२) चालू आहेत असे जोतिबा फुले म्हणतात.

नॉर्मल स्कुल चालवणाऱ्या या मिचेलबाई कोण? रेव्हरंड जेम्स मिचेल यांच्या पत्नी असलेल्या ( मार्गारेट शॉ) मिचेलबाईंबद्दल उपलब्ध कागदपत्रांत कितीतरी माहिती आहे, मात्र त्याकडे कानाडोळा करून मिचेलबाईंची उपेक्षा केली जाते.

रेव्हरंड जेम्स मिचेल यांच्या मदतीसाठी मुंबईहून नंतर रेव्हरंड जॉन मरे मिचेल पुण्यात आले, मेजर थॉमस कँडी यांच्या गैरहजेरीत ते पूना कॉलेजचे (डेक्कन कॉलेज) प्रिन्सिपॉल आणि संस्कृत-मराठी विभागाचे प्रमुख होते.

महात्मा फुले यांचे एक महत्त्वाचे चरित्रकार असलेल्या धनंजय कीर यानी `चटईचा विटाळ' या संदर्भात जोतिबांनी जॉन मरे मिचेल यांच्या शाळेत पाठवलेल्या एका महार मुलाची अत्यंत हृदयद्रावक कथा सांगितली आहे. रेव्हरंड जॉन मरे मिचेल यांनी आपल्या आत्मचरित्रात लिहिलेली आणखी एक घटना धनंजय कीर यांनी सांगितली आहे.

कीर यांनी लिहिले आहे : `रेव्हरंड आदम व्हाईट यांनी एकदा पुण्याजवळील सरकारी शाळेला भेट दिली. त्या शाळेतील ब्राह्मण पंतोजीजवळ एक वेताची छडी होती. तिचा उपयोग ते पंतोजी अधूनमधून चांगलाच करीत. आदम व्हाईट यांनी त्या ब्राह्मण पंतोजीला विचारले की, 'ही ढेकळं तुमच्याजवळ कशाकरिता ठेवली आहेत?"

पंतोजी उत्तरले, "स्पृश्य मुलांच्याबाबतीत मी छडी वापरतो. जर मी छडीने महार मुलास मारले तर तो अस्पृश्य असल्यामुळे काठीबरोबर विटाळ येईल आणि माझे सर्व शरीर विटाळेल. म्हणून जेव्हा महार मुलगा मूर्खपणाने वागतो तेव्हा मी एक ढेकूळ घेतो आणि त्याच्याकडे फेकतो. जर चुकलं तर दुसरं मारतो."

या दोन्ही घटनांचे वर्णन कीर यांनी जॉन मरे मिचेल यांच्या आत्मचरित्राच्या आधारे केले आहे आपले आत्मचरित्र आणि इतर कितीतरी लिखाण करणारे जॉन मरे मिचेल यांच्या या साहित्याचा मात्र फुले चरित्रकार प्राथमिक चरित्रसाधने म्हणून मुळी विचारच करत नाहीत.

खूप जुनी, शंभर-दीडशे वर्षांपूर्वी अमेरिकन मराठी मिशनची आणि स्कॉटिश मिशनची पुण्यामुंबईत मराठीत आणि इंग्रजीत लंडनमध्ये आणि अमेरिकेत प्रकाशित झालेली अनेक पुस्तके आणि कागदपत्रे आजही उपलब्ध आहेत. मात्र या साहित्याचा फुले दाम्पत्याची प्राथमिक चरित्रसाधने म्हणून का वापर केला जात नाही याचे आश्चर्य वाटते.

जॉन मरे मिचेल यांचे सर्वात महत्त्वाचे कर्तृत्व म्हणजे त्यांनी भारतात केवळ मुस्लिम मुलींसाठी असलेली शाळा पुण्यात चालवली, या शाळेत तब्बल ७० मुली होत्या आणि त्याहून विशेष म्हणजे जॉन मरे मिचेल या मुलींना फी सुद्धा आकारात असत. त्याकाळी म्हणजे १८६२ ला शाळेत येणाऱ्या मुलांमुलींसाठी पैशाची रक्कम, खाणेपिणे अशी आमिषे दाखवावी लागत, फुले दाम्पत्याला सुद्धा असे करणे भाग पडले होते.

मात्र जॉन मरे मिचेल यांची मुस्लिम मुलींसाठी शाळा भारतातील हा असा पहिला प्रयोग नव्हता. त्याआधी कितीतरी वर्षे आधी स्कॉटिश मिशनरी वजीर बेग यांनी पुण्यात केवळ मुस्लिम मुलींसाठी शाळा सुरु केली होती. रेव्हरंड वजीर बेग यांना याना भारतात मुस्लिम मुलींच्या आधुनिक शिक्षणाचे जनक ते म्हणता येईल. ही शाळा अल्पावधीत - बहुधा अल्प प्रतिसादाने - बंद पडली होती.

ही सर्व माहिती अनेक पुस्तकांत उपलब्ध असली तरी स्त्रीशिक्षणाच्या ग्रंथांत आणि फुले चरित्रांत या माहितीचा उल्लेखच आढळत नाही.

फुले दाम्पत्याने केलेले योगदान महत्त्वपूर्ण आहे. सावित्रीबाई आणि जोतिबा फुले यांची माहितीपूर्ण असलेली आणि समग्र म्हणावीत अशी चरित्रे आजही लिहिली जात नाही याचे वैषम्य वाटते.

महात्मा जोतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आदरांजली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com