esakal | एक झुंज स्वतःशी!
sakal

बोलून बातमी शोधा

एक झुंज स्वतःशी!

समोर एक जहाज उंच लाटांशी संघर्ष करताना पाहत होतो; जणू आयुष्याच्या वाटेवर माणूस संघर्ष करतो तशी ही झुंज समुद्राशी नसून स्वतःशी होती, स्वतःचे अस्तित्व टिकवण्याची होती.

एक झुंज स्वतःशी!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पावसाळ्याचे दिवस होते. हलक्‍या सरी पडत होत्या. थेंबांच्या जत्रेतून वाट काढत मी पुढे सरकत होतो. छत्री असूनसुद्धा हलक्‍या थेंबांचे शिंतोडे अंगावर उडत होते. हवा थंड होती. समुद्रकिनारी पोचलो तर पावसाने जोर धरला. समोर एक जहाज उंच लाटांशी संघर्ष करताना पाहत होतो; जणू आयुष्याच्या वाटेवर माणूस संघर्ष करतो तशी ही झुंज समुद्राशी नसून स्वतःशी होती, स्वतःचे अस्तित्व टिकवण्याची होती.

हेही वाचा: विकासाची स्वप्ने गाजराची पुंगी ना ठरो..!

आज कलियुग आले आहे. आपल्यामधील दुःख, वाईटपणा, त्रास व संकटे ही डोके वर काढत आहेत. अशावेळी स्वतःचीच स्वतःशी झुंज आहे, असे वाटत आहे. आज प्रत्येकजण जगण्यासाठी संघर्ष करत आहे. प्रत्येक व्यक्ती आज सुख शोधायच्या मार्गावर आहे. दुःखात उभारत सुख कुठे मिळते का याची वाट पाहात आहे. जणू आत्म्याच्या भेटीला सर्व व्यक्ती व्याकूळ आहेत. अशावेळी नवीन काय करावे, जेणेकरून प्रेम मिळेल असे वाटत आहे. सर्व जग जेव्हा पैशाच्या मागे पळत आहे, तेव्हा व्यक्ती स्वतःलाच विसरून गेला आहे. जगण्यासाठी पैसा तर लागतोच, पण सुख देखील लागतं, हे तो विसरत चालला आहे. मनुष्य आज फक्त स्वतःपुरता विचार करतोय, याचाच दूरगामी परिणाम म्हणजे माणसे तुटली जातात आणि दुःख मार्गी येतं.

हेही वाचा: BLOG : कोरोना, मंदिर आणि राजकारण!

आज तंत्रज्ञानाच्या युगामध्ये व्यक्ती, लोक अगदी प्राणीसुद्धा मार्केटिंग दुनियेच्या आहारी गेल्यासारखे वाटत आहेत. अति संवेदनशीलता माणसाला वाईट मार्गावर घेऊन जात आहे. अशा वेळी स्वतःच्या मनात डोकावणे गरजेचे आहे. जेवढे प्रेम आपण लोकांना देतो, त्याच्याहून जास्त प्रेम आपण स्वतःवर केले पाहिजे. स्वतःपुरते नाही तर या जगात स्वतःची ओळख करण्यासाठी आणि या आयुष्याचा उपभोग घेण्यासाठी करावे. आज शेतकरी हवालदिल झाला आहे. मालाला भाव नाही, पावसाचा भरोसा नाही, स्वतःच्या कष्टावर जरी विश्वास असला तरी परिस्थिती वाईट झाली आहे. आज आत्महत्या वाढत आहेत. पण दिलेले आयुष्य सुंदर आहे, हे फक्त स्वतःच्या मनात पाहिल्यानंतरच जमते आणि ते उमगते. जर आत्महत्या हा पर्याय असेल आणि सर्वांनी तो निवडला तर कसं होणार? स्वतःला संपवण्याच्या आधी कधीतरी आपल्यावर प्रेम करणाऱ्या लोकांकडे बघावे. संघर्ष तर चालूच राहणार आहे, पण स्वतःवर प्रेम केले तरच मार्ग सापडतील. गरजेपुरतेच खर्च करावे म्हणजे पैसा वाचतो. संकट येत राहतात, त्यातून मार्ग काढला पाहिजे. स्वतःचा स्वतःशी संघर्ष केला पाहिजे. घरातील तंटे, भांडणं, वाद हे होत रहाणार. जिथे प्रेम आहे तिथे हे सर्व उद्भवणारच. त्यामुळे कौटुंबिक जबाबदारीमुळे नाराज होऊन चालणार नाही.

आज रोगराई वाढत आहेत. रोगराईला आळा घालण्यासाठी लवकरात लवकर उपाय करावे. स्वतः आजारी पडल्यास मी बरा होईन, हीच एक उमेद मनात ठेवावी. मला पुन्हा उभे राहायचे आहे आणि या जगात आनंदात जायचं आहे हेच सतत सांगत राहावे. आपण लोकांसाठी काय करतो किंवा लोक आपल्यासाठी काय करतात, याचा विचार करण्यापेक्षा स्वतःला आवडत्या गोष्टी कराव्यात. प्रवासाला जावे, सकारात्मक गोष्टींचा विचार करावा, चांगला मार्ग निवडावा आणि येणाऱ्या प्रत्येक मार्गात जी संकटे येतात त्यांना तोंड द्यावे तरच आयुष्याची लढाई सार्थ ठरेल. आज अनेक लोक स्वतःपेक्षा लोक काय म्हणतील याच्यावर जास्त भर देतात आणि त्याचा परिणाम स्वतः न जगणे आणि दुसऱ्यांना सुखी ठेवणे यातच वेळ जातो. वेळ खूप बलवान आहे. आयुष्यात वेळ वाईट किंवा चांगले असेल तर त्या दोन्हींचा उपभोग घेतला पाहिजे. चांगल्या वेळेचा सदुपयोग आणि वाईट वेळेत संयम हे दोन्ही शस्त्र वापरले तर आयुष्यात काही कमी नाही होत. स्वतःवर प्रेम करायला शिका, कलागुणांना वाव द्या, एखादा छंद जोपासा, भटकंतीला जा, मित्र-मैत्रिणींबरोबर हसा, सहज चहाचा घोट घेत गप्पा मारा, नकारात्मक गोष्टींपासून दूर राहा, याचा सर्वांचा परिणाम तुमच्या मानसिक, शारीरिक, आर्थिक आणि सामाजिक आयुष्यावर होणार आहे. स्वतःला कमी लेखू नका. लोकांशी बोलताना वाणीत नम्रता ठेवा आणि वेळ पडल्यास अन्यायाविरुद्ध उभारून लढा द्या. हा आयुष्याचा लढा तुम्हाला एका वेगळ्या वळणावर नेवून ठेवेल. स्वतःला ऊर्जितावस्थेत न्यायला शिका .काही वेळ स्वतःसाठी काढा. स्वतःच्या लक्ष्यावर एकनिष्ठ राहा, तरच तुम्ही पुढे जाऊ शकाल. आज लढाई स्वतःच्या मनाची, आत्म्याची आणि शरीराची आहे. ती जिंकायची असेल तर प्रथम स्वतःला ओळखा, स्वतःचा स्वभाव ओळखा, त्याचा अभ्यास करा. स्वतःचे गुण ओळखा आणि त्या गुणांचा सदुपयोग करा, हीच एक अपेक्षा आणि हाच एक मार्ग असावा.

- ऋत्विज चव्हाण

loading image
go to top