esakal | सत्तावीस वर्षांनंतर "कोरोना' काळात सोलापूरचे ढिसाळ व्यवस्थापन
sakal

बोलून बातमी शोधा

Killari

किल्लारी भूकंपानंतर सत्तावीस वर्षांत आपत्ती व्यवस्थापनात आपण काही शिकण्यापेक्षा भ्रष्टाचार अधिक चांगल्या पद्धतीने करण्यात सरस झालो आहोत, हे मात्र दररोज दिसत आहे. अशावेळी सत्तावीस वर्षांपूर्वी लातूर - किल्लारीच्या भूकंपाचे अतिशय यशस्वीपणे व्यवस्थापन करणारे व जगात नाव कमावणारे सोलापूरचे सिव्हिल हॉस्पिटल व संपूर्ण वैद्यकीय क्षेत्र हेच का, असे खेदाने विचारावेसे वाटते. 

सत्तावीस वर्षांनंतर "कोरोना' काळात सोलापूरचे ढिसाळ व्यवस्थापन

sakal_logo
By
डॉ. संदीप आडके

सप्टेंबर 1993... अत्यंत काळोखी रात्र. पण तो दिवस सोलापूरच्या वैद्यकीय क्षेत्रासाठी मोलाचा ऐतिहासिक ठरला! पहाटे 3.50 मिनिटांनी सोलापूरपासून जवळच असलेल्या लातूर जिल्ह्यातील किल्लारीजवळ प्रचंड मोठ्या प्रमाणात भूकंप झाला. मी ऑर्थोपेडिक डिपार्टमेंट, सिव्हिल हॉस्पिटल, सोलापूरमध्ये युनिट दोनचा रजिस्ट्रार होतो. माझ्या ज्युनिअर्सने सकाळी पाच वाजता इमर्जन्सी वॉर्डातून कॉल करून काही लोक जखमी झाल्याचे सांगितले. जाऊन बघतो तर दर पाच-दहा मिनिटांनी मिळेल त्या गाडीने जखमी लोकांचे जत्थेच येऊ लागले. अंधारामुळे लोकांना काय झाले माहीत नव्हते, पण थोड्याच वेळात बातमी आली की मोठा भूकंप झाला आहे. लगेच माझे युनिट इन्चार्ज डॉ. के. पी. डागा यांना माहिती सांगितली व बोलावून घेतले. सर्व इतर विभागप्रमुख व पोलिसांना त्वरित संपर्क केला. सुरवातीला आमच्याकडे डिझास्टर मॅनेजमेंटचा कोणताही प्लॅन किंवा अनुभव नव्हता; परंतु ऑर्थोपेडिक डिपार्टमेंटच्या दोन युनिटच्या 20 रेसिडेंट डॉक्‍टर्स व चार कन्सल्टंट यांच्याबरोबरीने सिव्हिलमधील सगळ्याच डिपार्टमेंटचे डॉक्‍टर, स्टाफ नर्सेस, शिकाऊ नर्सेस, शिकाऊ डॉक्‍टर झपाट्याने कामाला लागले. एक टीम घटनास्थळी पोचली पण तिथे रेस्क्‍यू करण्यासारखे काहीच उरले नव्हते. सुरवातीला आम्ही सगळेजण भांबावलेलो होतो; पण आहे त्या तुटपुंज्या साधनांनी जखमींना फर्स्ट एड देणे, त्वरित ऍडमिट करणे, जरुरी चाचण्या करणे सुरू केले. 

पोलिस, टेलिफोन व एनजीओने एक इन्फॉर्मेशन काउंटर उघडले. संध्याकाळपर्यंत 460 रुग्णांना ऍडमिट करून घेतले. त्यापैकी 229 पुरुष व 231 स्त्रिया होत्या. अपघाताच्या तीव्रतेनुसार वर्गीकरण करून सिरिअस रुग्णांना सुरवातीला उपचार देणे चालू केले. सिव्हिलमधील इतर वॉर्डातील रुग्ण तातडीने डिस्चार्ज करून सर्वच वॉर्डातील बेड उपलब्ध करून देण्यात आले. तसेच इमर्जन्सी नवीन वॉर्ड उघडण्यात आले. त्या दिवशी रात्रीपर्यंत सर्व कागदपत्रे तयार झाली व रात्री नऊपासून इमर्जन्सी शस्त्रक्रिया सुरू झाल्या. रेडक्रॉस व काही एनजीओने रक्तपुरवठा केला. काहींनी मोफत पाणी व जेवणाचे स्टॉल लावले. फार्मा व इन्प्लाट कंपन्यांनी औषधे व ऑपरेशनसाठीची साधनसामग्री मोफत पुरवली. 

दुसऱ्या दिवशीपासून दोन टीममध्ये आम्ही दहा दिवसांमध्ये 750 अस्थिरोगावरील शस्त्रक्रिया व काही इतर शस्त्रक्रिया पार पाडल्या. यामध्ये 24 रुग्ण दगावले. तिसऱ्या दिवशी मुंबईवरून अस्थिरोगतज्ज्ञांची टीम आली. परंतु त्यांच्या खाणे-राहण्याची मागणी व सहकार्याचा अभाव पाहून दुसऱ्या दिवशी त्यांची बोळवण करण्यात आली. बातमी पसरल्यानंतर जगभरातून औषधे व सर्व साधनसामुग्री सोलापूरकडे आली; परंतु एकही विमान इथल्या विमानतळावर उतरू शकले नाही, त्यामुळेही मदत उशिरा पोचली व गरजू रुग्ण व डॉक्‍टरांपर्यंत अतिशय तोकड्या पद्धतीत पोचली. यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला; परंतु त्यावर कुठलीही कारवाई झाली नाही. 27 वर्षांनंतरसुद्धा आज येथे विमानतळ नाही, ही किती लाजीरवाणी गोष्ट आहे. 

पंधरा दिवसांनंतर जर्मनीहून डॉक्‍टरांची एक टीम आली परंतु तोपर्यंत आम्ही सर्व काही अत्यंत व्यवस्थितपणे मॅनेज केलं होत. हे पाहून ती मंडळी अतिशय खूश व प्रेरित झाली. कुठल्याही पुढारी व शासकीय अधिकाऱ्यांनी आमच्यापर्यंत व रुग्णांपर्यंत येऊन काही लागते का? याची विचारणा केली नाही; तरीसुद्धा फक्त स्थानिक पातळीवर अत्यंत कुशल पद्धतीने व नियोजनबद्ध सर्व परिस्थिती हाताळण्यात आली. बऱ्याच रुग्णांचे नातेवाईक वारल्यामुळे किंवा अपघातग्रस्त झाल्यामुळे व राहण्यासाठी घरे नसल्यामुळे चार महिन्यांपर्यंत हे रुग्ण सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये होते. 27 वर्षांपूर्वी साध्या एक्‍स-रे मशिनवर ही सर्व ऑपरेशन्स करण्यात आली व त्यात अतिशय कमी कॉम्प्लिकेशन उद्भवली. सर्वांना सायकॉलॉजिकल ट्रीटमेंट देण्यात येत होती. मला आठवते, की एकाही रुग्णाची डॉक्‍टर किंवा वैद्यकीय क्षेत्राबद्दल तक्रार नव्हती. इतके मोलाचे काम करूनसुद्धा प्रशासनाकडून साधे सर्टिफिकेटसुद्धा देण्यात आले नाही. दिवस-रात्र आम्ही रेसिडेंट डॉक्‍टर न खाता-पिता काम करत होतो; परंतु कोणी आमच्याबद्दल विचारायला आले नाहीत, परंतु, पंधरा दिवसांनंतर सेलिब्रिटी व पुढाऱ्यांची फोटोसेशनसाठी स्टंटबाजी सुरू झाली. परंतु हॉस्पिटलमध्ये कोणालाही रुग्णांपर्यंत पोचता आले नाही. सोलापूरच्या सिव्हिलबरोबरच सोलापुरातील वाडिया, अश्विनी सहकारी रुग्णालय व इतर काही प्रायव्हेट व शासकीय हॉस्पिटल्सने मोलाचा हातभार लावला. सोलापुरातून शिकून गेलेली अस्थिरोगतज्ज्ञ मंडळी आपले असिस्टंट व शस्त्रक्रियेची हत्यारे घेऊन आमच्या मदतीला सातारा, सांगली, कोल्हापूर या ठिकाणांहून पोचली. 

सत्तावीस वर्षांपूर्वी आपत्ती व्यवस्थापनाचा जो मोलाचा अनुभव मी व माझ्या सर्व सहकाऱ्यांना लाभला, त्याचा आताच्या कोरोनाच्या जागतिक लढ्यामध्ये उपयोग करून घेण्यासारखा होता. परंतु सोलापुरातील आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे त्याची साधी कल्पनासुद्धा नाही. 12 एप्रिलपासून सोलापुरातील पहिला कोरोनाचा रुग्ण आढळल्यापासून आजतागायत करोनाच्या ट्रीटमेंटबद्दल सिव्हिल हॉस्पिटल व प्रशासनाचा संपूर्ण ढिसाळ कारभार चालू आहे. आम्ही कुठलीही पूर्वसूचना न मिळता केवळ एका दिवसात एवढ्या मोठ्या आपत्तीचे व्यवस्थितपणे व्यवस्थापन केले व युद्ध जिंकले; परंतु कोरोनाची चाहूल खूप दिवसांपासून लागूनसुद्धा व हे रुग्ण हळूहळू वाढत असतानासुद्धा प्रशासनाला त्यावर काहीही करता आले नाही. सुरवातीच्या वेळेत प्रायव्हेट हॉस्पिटल व डॉक्‍टरांचे हात बांधून ठेवले. याउलट त्यांच्यावर अतिशय कडक निर्बंध व एफआयआर दाखल केले. पर्यायाने मीडियामध्ये डॉक्‍टरांविरोधात उलट-सुलट बातम्यांच्या चर्चा होऊ लागल्या. डॉक्‍टरांच्या असोसिएशन्स आपली बाजू मांडण्यात अपयशी ठरल्या; परंतु वेळीच आमच्यासारख्या अनुभवींची प्रशासनाने आपत्कालीन बैठका बोलून मते व मदत घेतली असती तर कोरोना फार लवकर आटोक्‍यात आला असता. आज सिव्हिल हॉस्पिटलची बहुमजली इमारत उभी आहे, आयसीयू व अनेक प्रगत मशिन्स उपलब्ध आहेत; परंतु योग्य व्यवस्थापन नसल्याने परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात आहे. व्यवस्थापन फक्त कारणे दाखवण्यात मग्न आहे व धान्य गोळा करून मदत मिळाल्याचे फोटो वर्तमानपत्रात छापून आणण्यात धन्यता मानत आहे. 

सत्तावीस वर्षांत आपत्ती व्यवस्थापनात आपण काही शिकण्यापेक्षा भ्रष्टाचार अधिक चांगल्या पद्धतीने करण्यात सरस झालो आहोत, हे मात्र दररोज दिसत आहे. अशावेळी सत्तावीस वर्षांपूर्वी लातूर - किल्लारीच्या भूकंपाचे अतिशय यशस्वीपणे व्यवस्थापन करणारे व जगात नाव कमावणारे सोलापूरचे सिव्हिल हॉस्पिटल व संपूर्ण वैद्यकीय क्षेत्र हेच का, असे खेदाने विचारावेसे वाटते. 

- डॉ. संदीप आडके, 
अस्थिरोग तज्ज्ञ, सोलापूर