मानसिक आरोग्य सर्वांसाठी : अधिक गुंतवणूक, अधिक मिळकत 

Mental Health
Mental Health

जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) व्याख्येनुसार "आरोग्य म्हणजे केवळ आजार व दुर्बलता यांचा अभाव नव्हे, तर त्या जोडीने शारीरिक, मानसिक व सामाजिक स्वास्थ्याची परिपूर्ण स्थिती असणे होय.' या व्याख्येत केलेल्या मानसिक आरोग्याच्या समावेशाने त्याचे महत्त्व लक्षात येते. 

"डब्ल्यूएचओ'नुसार मानसिक आरोग्य म्हणजे, "ज्यामध्ये व्यक्ती आपली क्षमता ओळखून त्याजोगे पुरेपूर वागू शकेल, दैनंदिन जीवनातील ताणतणाव व्यवस्थित हाताळू शकेल, उत्पादनक्षम राहून कार्यरत होऊ शकेल व समाजाप्रती योग्य ते देऊ शकेल.' 

मन व शरीर एकमेकांना पूरक आहेत. मन स्वस्थ असेल तर व्यक्ती प्रतिकूल परिस्थितीवरही मात करू शकते. परंतु सध्याच्या स्पर्धात्मक, धकाधकीच्या जीवनात मानसिक स्वास्थ्याकडे दुर्लक्ष झाल्याने वेगवेगळे मानसिक आजार बळावत आहेत. शिवाय समाज मनोरुग्णांकडे आणि मानसिक आजारांकडे कलंकित नजरेने पाहतो. हा कलंक पुसून काढण्यासाठी दरवर्षी 10 ऑक्‍टोबर हा दिवस "जागतिक मानसिक आरोग्य दिन' तसेच 4 ऑक्‍टोबर ते 10 ऑक्‍टोबर "जागतिक मानसिक आरोग्य सप्ताह' म्हणून साजरा केला जातो. 

या वर्षीची थीम आहे "मानसिक आरोग्य सर्वांसाठी : अधिक गुंतवणूक, अधिक मिळकत'. ही थीम निवडण्यामागे कारण म्हणजे सध्याची कोव्हिड महामारी व त्याला आळा घालण्यासाठी केलेले लॉकडाउन, सोशल डिस्टन्सिंग इत्यादी बंधनांमुळे आर्थिकच नाही तर प्रचंड मानसिक- भावनिक आव्हानांना तोंड द्यावं लागत आहे. अशा संकटसमयी लोकांचे मानसिक खाच्चीकरण टाळण्यासाठी, मानसिक आरोग्य क्षेत्रात जेवढी जास्त गुंतवणूक करता येईल तेवढा अधिक फायदा होऊ शकतो, असे डब्ल्यूएचओचे मत आहे. 

अधिक गुंतवणूक कशी करता येईल? 

  • नुसता एक दिवस साजरा करून उपयोग नाही तर केंद्र व राज्य सरकार यांनी मिळून मानसिक आरोग्य जनजागृती अभियान राबविले पाहिजे. 
  • मानसिक आरोग्याचा समावेश शालेय अभ्यासक्रमात केला जाऊ शकतो 
  • वृत्तपत्रे, न्यूज चॅनेल, टीव्ही आदी प्रसार माध्यमे या उपक्रमामध्ये मोलाची भूमिका पार पाडू शकतात 
  • सेलिब्रिटी या उपक्रमाला प्रेरित करून समाजाचे या नैतिक कार्यासाठी लक्ष वेधू शकतात 

अधिक फायदा कसा होईल? 

  • मनोरुग्ण, मानसिक आजार तसेच मानसोपचार तज्ज्ञ यांच्याकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन सकारात्मक होईल 
  • संकोच न बाळगता लोक मानसिक आजारांवर उपचार करून घेतील 
  • मनःस्वास्थ्य सुधारल्याने लोकांची कार्यक्षमता वाढून उत्पादकता वाढेल 
  • वेळीच निदान व उपचार शक्‍य झाल्याने कित्येक आत्महत्या रोखल्या जाऊ शकतील 

मित्रहो, चला तर मग या जागतिक मानसिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने संकल्प करू आणि मानसिक स्वास्थ्य सुधारणेच्या या नैतिक उपक्रमामध्ये अधिकाधिक गुंतवणूक करू. शेवटी, संत रविदास यांनी म्हटलं आहे - 
"मन चंगा तो कठौती में गंगा !' 

- डॉ. महेश देवकते
मानसोपचारतज्ज्ञ, बार्शी 

संपादन : श्रीनिवास दुध्याल 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com