शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती (भाग-1) 

राजकिरण चव्हाण
Friday, 4 September 2020

आज शिक्षण क्षेत्रामध्ये देखील व्हिडीओंची निर्मिती अगदी झपाट्यानं होताना दिसतेय. अगदी सगळ्या विषयांच्या, सगळ्या धड्यांवर आज व्हिडीओ निर्मिती करण्यावर भर दिला जात आहे. यात काही कंपन्या तसंच शासन स्तरावरूनही ई-कंटेंटकरिता व्हिडीओ निर्मिती केली जात आहे. व्हिडीओ निर्मिती दोन माध्यमांतून करता येते. एक म्हणजे कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपवर आणि दुसरा म्हणजे मोबाईल किंवा टॅबलेटवर. 

असं म्हणतात, की एक चित्र हजारो शब्दांचं काम करतं. तर मग विचार करा, एक व्हिडीओ किती शब्दांचं काम करत असेल! नक्कीच एक व्हिडीओ लाखो शब्दांचं काम करू शकतो. अनेक गोष्टी आपण न सांगताही व्हिडीओच्या माध्यमातून समोरच्या व्यक्तीला पटवून देऊ शकतो. 

आज शिक्षण क्षेत्रामध्ये देखील व्हिडीओंची निर्मिती अगदी झपाट्यानं होताना दिसतेय. अगदी सगळ्या विषयांच्या, सगळ्या धड्यांवर आज व्हिडीओ निर्मिती करण्यावर भर दिला जात आहे. यात काही कंपन्या तसंच शासन स्तरावरूनही ई-कंटेंटकरिता व्हिडीओ निर्मिती केली जात आहे. व्हिडीओ निर्मिती दोन माध्यमांतून करता येते. एक म्हणजे कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपवर आणि दुसरा म्हणजे मोबाईल किंवा टॅबलेटवर. आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत, की मोबाईलच्या माध्यमातून व्हिडीओ निर्मिती कशी करायची? 

मोबाईलवर व्हिडीओ निर्मिती करत असताना ऍप्लिकेशन वापरावे लागतात. यात काही फ्री ऍप्लिकेशन्स आहेत तर काही पेड ऍप्लिकेशन्स आहेत. जर फ्रीमध्ये व्हिडीओ निर्मिती करण्यासाठी क्विक, विवा व्हिडीओ, व्हिडीओ शो, माय मुव्ही हे ऍप्लिकेशन वापरू शकता. पण याला फ्रीमध्ये वापरताना वॉटरमार्क येतो. जर आपल्याला पेड ऍप्लिकेशन घ्यायचे असतील तर त्याच्यामध्ये काईनमास्टर, वंडर शो फिल्मोरा यांचा उल्लेख करता येईल. अगदी प्रोफेशनल व्हिडीओ करण्यासाठी काईनमास्टर आणि फिल्मोरा यांचा उपयोग केला जातो. परंतु एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, ती म्हणजे कोणताही व्हिडीओ पूर्णपणे एकाच ऍप्लिकेशनमधून तयार होईलच असे नाही. अन्यही ऍप्लिकेशनचा वापर करून व्हिडीओ निर्मिती करावी लागते. उदाहरण द्यायचं झालं तर अक्षरांना ऍनिमेशन देण्यासाठी टेक्‍स्ट ऍनिमेशन, लेजंड आदी नावाचे ऍप्लिकेशन वापरावं लागेल. व्हिडीओ निर्मिती करताना अनेकांचा हा गैरसमज असतो, की फक्त व्हिडीओ शूटिंग केली म्हणजे आपण व्हिडीओ तयार केला. परंतु हे पूर्णपणे खरं नाही. शूट केलेल्या व्हिडीओला आपण एडिटिंग करून त्याच्यातील अनावश्‍यक भाग कट करणं गरजेचं असतं. काही ठिकाणी बॅकग्राउंड म्युझिक, व्हिडीओ कशासंदर्भात आहे, तसंच एडिटिंगच्या वेगवेगळ्या प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतात; तरच एक परिपूर्ण असा शैक्षणिक व्हिडीओ आपल्याला तयार करता येऊ शकतो. 

व्हिडीओ करत असताना तो समोरच्या मुलांचं वय, समज लक्षात घेऊन त्यांना समजेल, उमजेल या पद्धतीनं सादर करणं हे व्हिडीओ निर्मिती करणाऱ्या शिक्षकांच्या कौशल्यावर अवलंबून आहे. एखाद्या व्हिडीओच्या माध्यमातून संपूर्ण धड्याचा अर्थ चांगल्या पद्धतीनं मुलांच्या समोर सादर करू शकतो. लॉकडाउनच्या काळात त्याला आज मुलं घरबसल्या व्हिडीओ पाहूनच आपला अभ्यासक्रम, पाठ्यक्रम पूर्ण करत असल्याचा कल आपल्याला दिसत आहे. (क्रमशः) 

- राजकिरण चव्हाण, 
राज्य तंत्रस्नेही शिक्षक तथा जिल्हा समन्वयक, सर फाउंडेशन, सोलापूर 

संपादन : श्रीनिवास दुध्याल 

इतर ब्लॉग्स