आयुष्याचे मिशन अधिक स्पष्ट झाले...!

- डॉ. मुक्तेश दौंड, नाशिक
सोमवार, 29 जून 2020

स्टेट सायकॉलॉजिस्ट असोसिएशन (स्पा) म्हणजेच राज्य मानसशास्त्रज्ञ संघटना यांच्यातर्फे मे महिन्यात म्हणजेच लॉकडाउनच्या काळात राज्यस्तरीय ऑनलाइन निबंध स्पर्धा घेण्यात आली. या राज्यस्तरीय स्पर्धेला राज्याबाहेरूनही तसेच परदेशातूनही प्रतिसाद लाभला. एका आठवड्याच्या कालावधीत दीडशेच्या आसपास निबंध आले. "लॉकडाउन... मी आणि माझे मनःस्वास्थ्य' या विषयावर ही निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यातील पुरुष गटातील प्रथम क्रमांकाचा हा निबंध.

माझे असे एक बिलिफ आहे की, "माझ्या आयुष्यात जेव्हा जेव्हा कठीण प्रश्‍न पडतात, तेव्हा तेव्हा पाऊस पडतो आणि निसर्ग धुऊन निघतो. तसे माझे गोंधळलेले मनही सजग, ताजेतवाने आणि आहे त्या परिस्थितीत उत्तरे शोधणारे बनते.' आजही हे बिलिफ रिइन्फोर्स झाले. खरंतर भारतात मार्च ते नोव्हेंबर यामध्ये कधीही पाऊस पडतो, माझ्या बऱ्याच परीक्षाही याच काळात झाल्या आहेत आणि परीक्षेपूर्वीचा काळ म्हणजे नवीन विचारांना धुमारे फुटण्याचा काळ असतो, त्यामुळे असाच एक फुटलेला आणि टिकून राहिलेला विचारांचा धुमारा म्हणजे माझे वरील बिलिफ. तसे पाहिले तर हे असे आयुष्यातील वेगवेगळ्या क्षेत्रातील वेगवेगळे बिलिफ तयार होणे, टिकणे, टिकवणे, मोडणे आणि परत नव्याने तयार होणे म्हणजेच एक प्रकारे आपले मनःस्वास्थ असते, असे मला तरी वाटते. 

अशी वेगळीच सुरवात यासाठी की सध्याच्या काळातही कदाचित आयुष्यातील सगळ्यात मोठी परीक्षा मी देतो आहे. तिची तयारी मीच काय जगातील कोणीही केलेली नव्हती. त्यामुळे आधीच्या आयुष्याच्या लढाईत वापरलेली आधीची बिलिफरुपी शस्त्रे या वेळी अगदीच त्यांच्या बाल्यावस्थेत वाटत होती मला. त्यामुळे तसे पाहिले तर हा लॉकडाउनचा प्रश्‍न जेव्हा माझ्यापुढे येऊन पडला, तेव्हा सर्वांसारखा मीही भांबावलो. अशा अनिश्‍चित काळात असतात त्या सगळ्या भावना मी अनुभवल्या, भीती, काळजी, राग, दुःख याबरोबर थोडेसे सुखही. मग जसजसे एक एक भांबावलेले सरकारी निर्णय येऊ लागले तसे मीही आणखी भांबावू लागलो. जास्त बातम्या पाहू लागलो पण परत जास्तच गोंधळ अंगाशी येऊ लागला. त्यातही डॉक्‍टर असल्यामुळे डॉक्‍टरांच्या नकारात्मक बातम्यांना जास्तच चवताळून सोशल मीडियावर उत्तरे देऊ लागलो आणि या सगळ्या गोंधळात खरंच मी हरवून गेलो. 

मी मनोविकारतज्ज्ञ असण्याचा फायदा या वेळी जास्तच झाला आणि रुग्णांना सांगतो त्या गोष्टी मी स्वतः अगदी नियमितपणे चालू केल्या. छान रूटीन सुरू केले, आधी वेळेवर जेवण, व्यायाम आणि झोप. नंतर हॉस्पिटलचे मॅनेजमेंट, नवीन बाळाचे स्वागत या गोष्टींनी माझा वेळ निघून जाऊ लागला. एकंदरीत मी त्या अनिश्‍चित परिस्थितीत छान रूटीन पाळून स्वतःला छान ऍडजस्ट केले. यात स्वतःबरोबर कुटुंब आणि हॉस्पिटल यांच्यात छान समन्वय जुळूनही आला म्हणजे एकंदरीत अब्राहम मासलोच्या तिसऱ्या पातळीवर असल्यामुळे हे मला जरा लवकर जमले. बऱ्याच दिवसांच्या लांबलेल्या गोष्टी फोटोग्राफी सॉफ्टवेअर आणि फायनान्शियल शिक्षण सुरू केले. माणूस म्हणून मी छान तोंड देत होतो पण डॉक्‍टर म्हणून? 

या माझ्या भारतात कोरोनाने आपल्या आरोग्य व्यवस्थेच्या सरकारी अनास्थेची लक्तरे भर चौकात टांगली आहेत. सरकार कितीही स्वतःची पाठ थोपटून घेवो आणि कितीही डॉक्‍टरांना बळीचा बकरा बनवो पण हेच अंतिम सत्य आहे आणि राहील. हे जेव्हा एकदम लख्खपणे कळाले तेव्हा व्यवस्थेला नावं ठेवण्याचा माझा उत्साह मावळून गेला. लख्खपणेच म्हणेल मी कारण याआधी मी डॉक्‍टर म्हणून नेहमी या गोष्टींकडे भावनिकपणे पाहिले होते आणि त्यामुळे अशी इनसाईट मला दिल्याबद्दल मी या लॉकडाउनचा आभारी आहे. बराचसा डोक्‍यातला गोंधळ कमी झाला होता, आता नवीन बिलिफ जन्म घेत होते, आधीच असलेल्या प्रश्‍नांना नव्याने आणि अधिक चांगले उत्तर देण्याकरता. खरंच सांगतो यावेळी या बिलिफ जन्माचा प्रवास मी अनुभवला, आतापर्यंत फक्त माहिती होता. वेळ, अनुभव आणि ज्ञान दिल्याबद्दल मी लॉकडाउनचा सदैव आभारी राहील आणि एलिसचा इलेगंट चेंज मी या काळात अनुभवला हा माझ्यासाठी मोठा अनुभव आहे. 

डॉक्‍टर म्हणून काय? सध्या मी महानगरपालिकेच्या दवाखान्यात MBBS डॉक्‍टर म्हणून काम पाहतोय, दिवसाआड 150 ते 200 लोकांच्या आयुष्याला स्पर्श करतोय. मनोविकारतज्ज्ञ म्हणूनच काम पाहिल ही माझी पूर्वीची अट मी स्वतःसाठी शिथिल केली आहे आणि वरिष्ठांनी परवानगी दिली आहे. हे मी का करतोय हे लोकांना कधीच कळणार नाही पण मी देशासाठीचा माझा खारीचा वाटा माझ्या पद्धतीने उचलतो आहे आणि हे केल्यामुळे रोज रात्री पहिल्यापेक्षा छान झोपतो आहे. याचबरोबर महानगरपालिका क्षेत्रात क्वारंटाइन झालेल्या लोकांशी मनोविकारतज्ज्ञ म्हणून संवाद साधतोय. हे करताना घरी नव्याने जन्मलेला बाप आहे तर हॉस्पिटलमध्ये डायरेक्‍टर आहे सगळे सगळे सांभाळतो आहे. काळजी आहेच पण भीती नाही आणि आता नवीन बिलिफ आहेतच की जोडीला. मानसिक आरोग्यात भरीव कामगिरी हे आयुष्याचे मिशन लॉकडाउनमुळे आणखी स्पष्ट झाले. 

इतर ब्लॉग्स

संपादकीय बातम्या