दिवे : यांचे - त्यांचे - माझे - आपले

patitlgne.jpg
patitlgne.jpg

दिवा लावायचा होता तो सकारात्मक वातावरणनिर्मितीसाठी-ती झाली का? नक्कीच. बरेच जण आपापल्या घरासमोर, गॅलरीत येऊन शेजाऱ्यापाजाऱ्यांशी बोलले, हसले, काही जणांनी घराघरांवर लखलखणारे दिवे आपापल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केले. काहींनी सोशल मीडियावर जरा त्रागा केला पण त्यापैकी संकल्पनेला विरोध नसलेल्यांनी दिवे लावले.
दिवा लावायचा होता कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी-वैद्यकीय क्षेत्रातले, शासकीय कर्तव्य बजावणारे, अत्यावश्यक सेवा पुरवणारे, पोलिस, समाजसेवक, ज्यांच्याकडे दिवा लावायलाच काय चटणीवर घ्यायलाही तेल नाही किंवा लॉकडाउनमुळे मिळवणं शक्य नाही अशांची काळजी घेणारे स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते.. यांच्याविषयीच्या भावना व्यक्त करण्यासाठी.
तर दिवे लागले. वरवर सगळं रुटीन चालू असलं तरी कदाचित आपण सगळे जीवन-मरणाच्या उंबरठ्यावर उभे आहोत, अशा वेळी आपण एकटे नाही, हा लढा सगळ्यांचा आहे, ही उमेद देऊन गेले.

आता पुढे काय!
सोशल मीडियावर राजकीय दंभ मिरवत हमरीतुमरीवर येऊन वादावादी करणारे सोफापटू, टाळ्या वाजवण्याऐवजी थाळ्या वाजवत जत्थ्याने मिरवणुका काढणारे थोर लोक, शासकीय आदेश धुडकावून अकारण बाहेर हिंडणारे अतिहुशार नागरिक, छद्म विज्ञानावर आधारित पोस्ट उपरोधिक आहे एवढीही समज नसल्याने ती अभिमानाने फॉरवर्ड करणारे भाबडे जीव, स्वयंघोषित कोरोना तज्ज्ञ-ग्रीड तज्ज्ञ, सामाजिक विलगीकरणाशिवाय दुसरा कोणताही उपाय समोर दिसत नसतानासुद्धा लॉकडाउनमुळे देशाची कशी वाट लागणार आहे याबद्दल घरबसल्या टीका एके टीका करत राहणारे स्वयंप्रकाशित अर्थ तज्ज्ञ.... अशी ज्ञानदीप पाजळणारी बरीच मंडळी सभोवती दिसत असल्याने खंत वाटत असली तरी प्रत्यक्षात माणुसकीने वागणाऱ्यांची संख्या त्यांच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे हे पाहून बरं वाटतंय. मग तो गरीब रुग्णाची राहिलेली इच्छा म्हणून त्याला मासे-भात भरवणारा चेन्नईचा डॉक्टर असेल किंवा एखाद्या पालावर अन्नाची पाकिटे वाटणारा अनाम तरुण. स्वयंसेवी संस्थांचे, संघाचे कार्यकर्ते असतील किंवा लंगरमध्ये मुस्लिम बालकांच्या भोजनाची सोय करणारे शीख बांधव. मदत करताना आपल्यालाही लागण होण्याचा धोका पत्करुन, विरुद्ध राजकीय कल, वैचारिक भिन्नता हे सगळं बाजूला ठेवून या जैविक युद्धात आपल्या समाजासोबत ठामपणे उभे असलेले असे निरलस नागरिक प्रत्यक्ष कृतीतून दिवा लावतायत. उजेड पेरतायत.

यात आपल्या परीने आपणही सामील आहोत का?
आपल्या घरच्या मदतनीसांना पगारी रजा देणं, व्यावसायिक असलो तर कर्मचाऱ्यांना पगारी रजा देणं किंवा शक्य असेल तिथे घरून काम करण्याचा पर्याय देणं, जे रोजंदारीविना किंवा आपल्या घरी पोचू न शकल्याने अडकून पडले आहेत, त्यांची पोटापाण्याची सोय करणाऱ्यांना आर्थिक बळ देणं. इतकं तर प्रत्येक जण आपल्या कुवतीनुसार करू शकतो ना!
ते ही करून झालं? आता आपलं कसं होणार याची चिंता अनेकांना विशेषत: खासगी उद्योग क्षेत्राला सतावते आहे. नोकरी टिकेल ना! व्यवसाय पुन्हा पहिल्यासारखा उभा होईल ना! अनेक प्रश्न आ वासून उभे आहेत.
कुटुंबाला वेळ देता येत असल्याच्या नवलाईचं रुपांतर आता रुटीनमध्ये झालंय. लहान घरं असलेल्यांना घरात सतत माणसं असल्याने अडचण होऊ लागली आहे. अशा स्थितीत घरून काम करणं अवघड व्हायला लागलंय. मनसोक्त आराम करून झाला, नातलगांशी, जुन्या मित्र मैत्रिणींशी गप्पा मारुन झाल्यात, आता पुढच्या कॉलमध्ये नव्याने बोलायचं काय असे प्रश्न पडू लागलेत. आवडीचे मेनू चाखून झालेत, राहिलेले सिनेमे, वेब सिरीज पाहून झालेत. खरं तर आता मनोरंजनात जास्त वेळ घालवला की, अपराधी वाटायला लागलंय. एकूण वरवर आपण खूश असल्याचं दाखवत असलो, एकमेकांना मीम्स पाठवत असलो तरी आतून आपण घाबरलेलो आहोत. मग वस्तुस्थितीचा स्वीकार करून कोणालाही दूषणं न देता, येत्या काळाला सामोरं जाण्यासाठी आपण तयार आहोत का!
त्यासाठी घरात सतत सोबत असलेल्या व्यक्तींमध्ये तणाव वाढू नये यासाठी शब्द जपून वापरायला हवे आहेत. सोशल मीडियावर तावातावात प्रतिक्रिया देण्याऐवजी प्रतिसाद देण्याला प्राधान्य द्यायला हवे आहे. काळ कठीण आहे, पण अशा वेळीच परिपक्वतेची कसोटी असते. आपण आजवर माणूस म्हणून जसं घडलो आहोत ते योग्य आहे ना हे तपासायची, आपल्या आतला दिवा लख्ख करण्याची ही संधी आहे. नैराश्य वाटत असेल तर ते मान्य करणं ही त्यातून बाहेर पडण्याची पहिली पायरी आहे. एकदा ते कळलं तर संगीत, वाचन, अध्यात्म, सकारात्मक विचार, व्यायाम, कुटुंबासह केलेली एखादी अ‍ॅक्टिव्हिटी, ऑनलाइन समुपदेशकांची मदत अशा पर्यायांच्या साहाय्याने या नकारात्मकतेतून बाहेर पडणं अवघड असलं तरी अशक्य नाही. कोरोनाने जगाला वेढलं आहे, या पार्श्वभूमीवर भविष्यात काम करण्याच्या पद्धती, ग्राहकाची मानसिकता, गरजा यात आणि त्यामुळे एकूणच उद्योग-व्यवसायक्षेत्रात आमूलाग्र बदल होणार आहे.
या बदलांसाठी आपण तयार आहोत का?
ASK (अ‍ॅटिट्यूड-स्कील-नॉलेज) या त्रयीच्या साथीने प्रगती होते, हे सत्य मात्र अद्यापही बदललं नाही. मग या उरलेल्या ब्रेकचा उपयोग आपण त्यासाठी नक्कीच करू शकतो. या ब्रेकमध्ये काही नवीन स्कील्स शिकता येतील, एखादा वेगळा विषय नीट समजून घेता येईल, आपले व्यावसायिक संबंध संवादी राहून दृढ करता येतील, अशा काळात साधलेला संवाद अधिक चांगली प्रतिमानिर्मिती करणारा ठरेल. आजवर शिकलेलं रिचवण्यासाठी आणि पचवण्यासाठी या वेळेचा वापर करून आपण स्वत:ची मानसिक आणि बौद्धिक स्थिती सावरू आणि उंचावू शकतो. स्वातंत्र्यपूर्व काळात अनेक महत्त्वाच्या नेत्यांनी कारावासात असताना जागतिक दर्जाची साहित्यनिर्मिती केलेली आहे. आपला तेवढा व्यासंग, आवाका नसला तरी आपल्याच घराच्या चार भिंतीत कैद असल्याने आपल्या वकुबानुसार आपल्या सर्जनशीलतेला वाव नक्कीच देता येईल, उद्योग-व्यवसायातील नव्या कल्पनांवर खोलवर विचार करता येईल. असं म्हणतात व्यावसायिकाने किमान पुढच्या 5 वर्षांचं नियोजन करावं. सध्या पुढचं सगळं इतकं संदिग्ध असताना ते कसं करणार! परवा सॅटर्डे क्लबच्या आमच्या एका ‘झूम’ मिटिंगमध्ये वक्ते आणि प्रख्यात मानसोपचारतज्ज्ञ डॉ. दीपक केळकर यांनी याबाबत छान उदाहरण दिलं. जसं धुक्यात गाडी चालवताना आपण हेडलाईटच्या झोतात अंदाज घेत हळूहळू थोडं पुढे जात राहतो तसंच आपल्याला करावं लागणार आहे. वेगात निघालो तर पुढे दरीही असू शकते. हे सगळं केवळ व्यावसायिकांना नाही तर नोकरी करणाऱ्यांना, गृहिणींना, विद्यार्थ्यांनाही लागू होणार आहे. केवळ व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुकच्या पलिकडे मोबाईलचा वापर करून आपण बरंच काही करू, शिकू शकतो हे एव्हाना बहुतेकांच्या लक्षात आलंय. याकडे संधी म्हणून पाहूया. माझंच उदाहरण द्यायचं तर ऑनलाइन ट्रेनिंग देण्याबाबत मी काहीशी निरुत्साही होते. वेबिनार अनेकदा अटेंड केले असले तरी स्वत: शिकवताना प्रत्यक्षात वाटणारी सहजता, थेट संवादातून येणारा नेमकेपणा त्यात नाही असं मला वाटायचं. आता शिकणारे यासाठी मानसिक आणि तांत्रिकदृष्ट्या तयार झाले आहेत मग ऑनलाइन तीच सहजता असणं शक्य असल्याचा प्रकाश डोक्यात पडला आहे.

कोरोनानंतरचा समाज अतिशय वेगळा असू शकेल. त्या समाजाचा भाग म्हणून देखील आपल्याला स्वत:मध्ये बदल करावे लागणार आहेत. भातात एक मटारदाणा घातला तरी आता तो पुलाव वाटतोय, पण सध्या जरी आपण 90 च्या दशकात गेल्यासारखं आणि साधं सोपं जगतोय असं वाटत असलं तरी ही उपरती तात्पुरती आहे हे आपल्याला माहित आहे. लॉकडाउन संपताच सगळे जण जे काय मिस केलं त्यावर तुटून पडणार आहेत. मी माझ्या पातळीवर यावर नियंत्रण ठेवू शकेन का! फार अर्जंट असं काही नसतं हे कळलंय तर जरा ‘माईंडफुलनेस’कडे लक्ष देऊ शकेन का! भांडी घासणाऱ्या पुरुषांवरच्या विनोदांपलिकडे जाऊन बऱ्याच भारतीय पुरुषांना घरकामाला हातभार लावण्याची चांगली सवय लागलीय ती ते जपू शकतील का! विकसीत, विकसीनशील सगळे स्तर भेदून जग आता नाईलाजाने एका पातळीवर आलंय. बदलतंय. मग लॉकडाउन संपल्यानंतर मी पुन्हा पूर्वीचीच व्यक्ती तर होणार नाही ना! नसेन, तर हे ही दिवा लावणंच आहे.

अकोला
mohinimodak@gmail.com 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com