वंचित विद्यार्थ्यांच्या मातु:श्री : विनया निंबाळकर

Vinaya Nimbalkar
Vinaya Nimbalkar

स्वतःच्या पोटच्या दोन मुलांचा सांभाळ करण्याची जबाबदारी आपल्या आई-वडिलांवर सोपवून चक्क राज्यभरातील चाळीस वंचित मुलांच्या पालनपोषण आणि शिक्षणाची जबाबदारी पार पाडणाऱ्या बार्शी येथील विनया महेश निंबाळकर या आईच्या ममतेने सर्वांना वाढवीत आहेत. बार्शी-पानगाव रोडवरील कोरफळे येथे "स्नेहग्राम' नावाचा प्रकल्प राबविताना विनया माईंनी आपल्या शिक्षकपदाचा राजीनामा देऊन या कार्यात स्वतःला झोकून दिले आहे, हे विशेष. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना "छाया-प्रकाश फाउंडेशन'ने मानपत्र व पन्नास हजार रुपये देऊन गौरव केला आहे. 

मे 2007 मध्ये विनयाताईंचा विवाह बार्शी येथील महेश निंबाळकर यांच्याशी झाला. आणि पुढच्याच महिन्यात म्हणजे जून 2007 मध्ये त्या शिक्षक म्हणून सेवेत रुजू झाल्या. तेव्हा त्यांचे पती वंचित मुलांच्या शिक्षणासाठी धडपडत होते. पण त्यांना घरातून आई-वडील, भाऊ या सर्वांचा कडाडून विरोध होता. पण पती आपल्या भूमिकेवर ठाम होते. त्यामुळे "आपल्या पतीच्या पाठीशी आपणच खंबीरपणे उभे राहिले पाहिजे', असा विचार करून अतिशय जड अंतःकरणाने विनयाताईंनी शिक्षकपदाचा राजीनामा दिला. पती महेश निंबाळकर यांनीही शिक्षकपदाचा राजीनामा देऊनच वंचित मुलांच्या भवितव्यासाठी स्वतःचे जीवन पणाला लावले होते. आता दोघांच्याही नोकऱ्या गेल्याने एकीकडे स्वतःचा संसार चालविताना वंचित मुले गोळा करून त्यांना शिक्षित करण्याचे शिवधनुष्य दोघांनी उचलले होते. त्यासाठी "स्नेहग्राम' नावाने त्यांनी प्रकल्प चालू केला. 

पोटाची खळगी भरताना राज्यभर भटकंती करणाऱ्या पारधी, डवरी गोसावी आदी जमातीच्या पालावरील सहा ते चौदा वयोगटातील मुलांचा शोध घेणे आणि त्यांच्या शिक्षण व पालनपोषणासाठी लागणाऱ्या पैशाची जमवाजमव करणे यसाठी महेश निंबाळकर दिवस-रात्र एक करून पायाला भिंगरी लावून फिरत होते. त्याचवेळी दाखल झालेल्या मुलांना शिक्षण देणे, त्यांना खाऊ-पिऊ घालणे, त्यांचा सांभाळ करणे ही सर्व जबाबदारी विनयाताई पार पाडत होत्या. 

स्नेहग्रामसाठी स्वतःचे आणि आईचे सर्व सोने विकले 
निंबाळकर दाम्पत्याने प्रथम स्नेहग्राम प्रकल्प खांडवी (ता. बार्शी) येथे भाड्याच्या इमारतीत चालू केला होता. त्यासाठी महिना अडीच हजार रुपये भाडे ठरले होते. पण या ठिकाणी भेटायला येणाऱ्या पालकांना कंटाळून इमारतीच्या मालकाने अचानक भाडे दुप्पट करून वर्षाचे भाडे एकदम भरण्यासाठी तगादा लावला. तेव्हा त्यांच्या पायाखालची वाळूच सरकली. अशा परिस्थितीत हा प्रकल्प पुढे न्यायचा असेल तर स्वतःची जागा हवी, असा विचार पुढे आला. पण जागा घेण्यासाठी जवळ फुटकी दमडीसुद्धा नसताना काय करायच,? हा यक्ष प्रश्नही समोर उभा राहिला. तेव्हा विनयाताईंनी स्वतःच्या अंगावरील सर्व दागिने विकण्याची तयारी दर्शविली. पण तेवढ्याने भागणार नव्हते. तेव्हा मुलीच्या मदतीला आई धावून आली. आईने आपल्या धाकट्या मुलीच्या लग्नासाठी राखून ठेवलेले दागिने विकून पैसे दिले. मामानेही काही आर्थिक हातभार लावला. त्यातून कोरफळे (ता. बार्शी) येथे पावणेतीन एकर जमीन खरेदी करून "स्नेहग्राम' प्रकल्प तिथे हलविण्यात आला. 

आमटे यांच्या "आनंदवन'ची मदत 
प्रकल्पासाठी जमीन तर झाली पण निवाऱ्याचे काय, हा प्रश्न अजून तसाच होता. त्या वेळी पती महेश निंबाळकर यांनी आजपर्यंत राज्यभरातील गरजूंना केलेली मदत कामी आली. अशाच वंचित आणि गोरगरीब गरजवंतांना सुमारे वीस लाख रुपयाहून अधिकची मदत त्यांनी मिळवून दिली होती. त्यांची ही धडपड "आनंदवन'च्या आमटे कुटुंबीयांना माहीत होती. त्यामुळे कौस्तुभ आमटे यांनी त्यांच्या स्नेहग्रामविषयी विचारणा केली. तेव्हा इमारतीचा प्रश्न त्यांना कळला. तातडीने त्यांनी दहा लाख रुपयांची मदत देऊन एकाच महिन्यात तीन खोल्या उभारून दिल्या. त्यामुळे इमारतीचाही प्रश्न आता मार्गी लागला. 

स्वतःची मुले आई-वडिलांकडे आणि विनयाताई स्नेहग्राममध्ये 
दरम्यान, विनयाताईंना दोन मुले झाली. कोणतीही आई आपल्या मुलांच्या बाललीलांमध्ये हरखून गेली असती; पण इथेही विनयाताई वंचित मुलांच्या कर्तव्यापासून जराही विचलित झाल्या नाहीत. त्यांनी आपल्या मुलांना चक्क स्वतःच्या आई-वडिलांच्या स्वाधीन करून त्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी त्यांच्यावर दिली आणि स्वतः मात्र स्नेहग्राममध्ये राहून दोनच नव्हे तर वंचित चाळीस मुलांची आई होणे पसंत केले. येथे त्यांनी स्वतःची आई गमावलेल्या साडेतीन वर्षाच्या चिमुकलीपासून ते तेरा वर्षापर्यंतच्या मुलांची सेवा करण्यास सुरवात केली. यामध्ये अगदी डोक्‍यातील उवा, लिका काढणे, नखे काढणे, वेणी-फणी करणे, आंघोळ घालणे, आदी प्रकारची सेवा त्या स्वतःहून करू लागल्या. 

मुलाच्या आजारपणातही स्नेहग्राम सोडले नाही 
दोन वर्षांपूर्वी विनयाताईंचा एक मुलगा जाम आजारी पडला. तो तब्बल तीन आठवडे दवाखान्यात ऍडमिट होता. या कालावधीतही विनयाताईंनी हीच आपली सत्वपरीक्षा असल्याचे मानून त्या रोज सकाळी स्नेहग्राममधील आपल्या चाळीस मुलांची व्यवस्था करून दवाखाना गाठायच्या आणि सायंकाळी पुन्हा त्यांच्या सेवेत दाखल व्हायच्या. या कालावधीत सकाळी सहा ते रात्री दहा अशी "नॉनस्टॉप' धावपळ झाल्याने त्यांच्या गुडघ्यावर ताण येऊन त्या आजारी पडल्या. तेव्हा डॉक्‍टरांनी सक्तीची विश्रांती घ्यायला सांगितले. "आता स्नेहग्राममधील मुलांचे काय', हा विचार त्यांच्या मनात आला आणि आपल्याशिवाय स्नेहग्राम ही कल्पनाच शक्‍य नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. मग तेथूनच ठरली पुढील कामाची दिशा. 

स्नेहग्रामचे व्यवस्थापन मुलांकडेच 
आता विनयाताईंनी मुलांना स्वावलंबी बनवितानाच स्नेहग्रामचे व्यवस्थापनच मुलांच्या हाती सोपविण्याचा धाडसी आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. आपल्या माघारी स्नेहग्रामचे कोणतेही काम अडून राहून नये यासाठी त्यांनी नियोजन करून मुलांना घडविण्यास सुरवात केली. त्यातून सर्वांना स्वयंपाक शिकविणे, स्वच्छतेचे महत्त्व, जबाबदारीची जाणीव, कामाची विभागणी आदी सर्व कामांवर भर दिला. आज मुलांचे गट पाडलेले असून रोटेशन पद्धतीने मुलेच सर्वांचा स्वयंपाक करून स्वच्छतेची कामे करतात, हे विशेष. 

मुलांना साप पकडण्याचे प्रशिक्षण 
एकदा विनयाताई आणि मुले स्नेहग्राममध्ये असतानाच रात्रीच्या वेळी साप निघाला. त्यातच विजेची सोय नव्हती. त्यामुळे त्यांची खूपच तारांबळ उडाली. अशाही परिस्थितीत त्यांनी "वास्तविक पाहता इथे प्रत्येक सजीवाला राहण्याचा अधिकार आहे, आपणच (माणूस) त्यांच्या जागेवर अतिक्रमण करतो आहोत,' असा विचार मुलांच्या मनावर बिंबवलाच पण मुलांचा बौद्धिक, मानसिक, भावनिक असा सर्वांगाने विकास झाला पाहिजे, असे नेहमी त्यांना वाटायचे. म्हणून सापांचाही जीव वाचला पाहिजे आणि आपलेही संरक्षण झाले पाहिजे असा विचार करून त्यांनी बार्शी येथील सर्पमित्रांना बोलावून सर्व विद्यार्थ्यांना साप पकडण्याचे प्रशिक्षण दिले. त्यानंतर त्या परिसरात निघालेल्या अनेक सापांना पकडून मुलांनी निसर्गाच्या सान्निध्यात सोडून दिले आहे. आज कोणताही प्रकारचा साप येथील तेरा वर्षाखालील मुले सहज पकडून निसर्गात सोडून देतात. 

एक हजार वृक्षांची लागवड 
चार भिंतींच्या आत फक्त पाठ्यपुस्तकातून दिलेले शिक्षण विनयाताईंना मान्यच नाही. प्रत्येक गोष्टीचे ज्ञान मुलांना प्रत्यक्ष अनुभवातूनच मिळाले पाहिजे, यासाठी त्यांचा कटाक्ष असतो. यातून पर्यावरणाचे महत्त्व आणि त्यातील वृक्षांचे स्थान मुलांना पटवून देताना त्यांनी स्नेहग्रामच्या परिसरात तब्बल एक हजारहून अधिक झाडे लावून त्यांचे यशस्वी संगोपन केले आहे. विशेष म्हणजे झाडांना खड्डे घेण्यापासून ते त्यांची जोपासना करण्यापर्यंतची सर्व कामे त्यांनी मुलांकडूनच करवून घेतले आहे. त्यामुळे पर्यावरणाशी मुलांची नाळ छान जोडली गेली आहे. शिवाय मुलांना शिकविताना त्यांचा भर वर्गखोल्यांपेक्षा बाहेर निसर्ग सान्निध्यातील मुक्त वातावरणात शिक्षण देण्यावरच जास्त असतो. याशिवाय स्नेहग्रामचा परिसर प्लॅस्टिक आणि तंबाखूमूक्त बनविला आहे. 

ग्रामपंचायत, बॅंक, न्यायालय आणि बरेच काही 
मुलांना दिले जाणारे औपचारिक शिक्षण दैनंदिन जीवनात उपयोगी पडेल, याबाबत विनयाताईंच्या मनात अनेक शंका आहेत. त्या म्हणतात, "आपण उच्चशिक्षित लोक प्रथम बॅंकेत जातो तेव्हा पैसे भरण्याची किंवा काढण्याची स्लीपसुद्धा दुसऱ्याकडून भरून घेतो. मग आपल्या शिक्षणाचा काय उपयोग?' म्हणून स्नेहग्राममधून बाहेर पडलेला विद्यार्थी त्याच्या जीवनात कोठेही अडला नाही पाहिजे यासाठी त्यांची तळमळ आहे. यातूनच त्यांनी "स्नेहग्राम बॅंक' स्थापन केली असून त्याचे व्यवस्थापनही मुलांकडेच दिले आहे. यासाठी त्यांनी मुलांना प्रत्यक्ष बॅंकेत नेऊन तेथील व्यवहार कसे चालतात, हे दाखविले. आता त्यांची मुले स्नेहग्राम बॅंकेत स्वतः स्लीप भरून पैसे जमा करतात आणि काढतातही. गावचा कारभार कसा चालतो, हे दाखविताना केवळ नागरिक शास्त्राच्या पुस्तकातील धडा शिकवूनच त्या थांबल्या नाहीत तर स्नेहग्राममध्येच ग्रामपंचायत स्थापन केली आहे. त्यासाठी पाच-पाच विद्यार्थ्यांचे सात प्रभाग करून प्रत्यक्ष मतदानातून सरपंचाची निवड केली आहे. त्यातून स्वच्छता, वीज, पाणी, आदींवर देखरेखीसाठी जबाबदाऱ्या वाटून दिल्या आहेत. हे सर्व सुरळीत चालण्यासाठी निवडलेला सरपंच देखरेख ठेवत असतो. अशाच पद्धतीने शाळेतच न्यायालयही स्थापन केले आहे. त्याचे कामकाज कळण्यासाठी भूम येथील न्यायालयाची सफर घडवून आणली. तेव्हा लहान मुलांना काय कळतंय? म्हणत प्रथम त्यांना न्यायालयाचे कामकाज पाहण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला गेला. पण "मुलांना समजत नाही हे ठरविण्याचा अधिकार आपल्याला नाही' असे ठणकावून सांगत विनयाताईंनी "मुलांना समजत असते, पण त्यांचाच अधिकार आपण हिरावून घेत असतो' अशी समजूत घालून न्यायालयात प्रवेश मिळविला. आता त्यांच्या स्नेहग्राममध्ये स्वतंत्र न्यायालय असून मतदान प्रक्रियेतून तीन जणांची न्यायाधीश म्हणून नेमणूक केली आहे. दररोज सायंकाळी भरणाऱ्या बालसभेमध्ये कोणाच्या काही तक्रारी असल्या तर मांडल्या जातात. त्यावर दोन्ही बाजूंकडील म्हणणे ऐकून आणि पुराव्यांचा विचार करून तीन न्यायाधीश चर्चा करून एकमताने शिक्षा सुनावतात. पण ही शिक्षा हिंसक पद्धतीची नसून एखादे झाड लावा, झाडांना पाणी घाला, स्वच्छता करा, या प्रकारची असते. 

मुलांचे मानसशास्त्र लक्षात घेऊन शिक्षण 
प्रकल्पात दाखल झालेल्या मुलांना सरसकट समान शिक्षण देणे विनयाताईंना मान्य नाही. प्रत्येक मुलाचे मानसशास्त्र समजून घेऊन त्या पद्धतीने त्यांना न रागावता, शिक्षा न करता माया लावून हसतखेळत शिक्षण देण्यावर त्यांचा भर असतो. अशा पद्धतीने शिकविले तरच मुलांचा आपल्यावरील विश्वास तर वाढतोच पण ते अधिक सहजतेने शिकतात, असा त्यांचा अनुभव आहे. शिवाय "परीक्षेतील गुण म्हणजेच गुणवत्ता किंवा हुशारी' यावरही त्यांचा विश्वास नाही. याबाबतीत त्या पहिलीत दाखल झालेल्या दीपालीचा अनुभव सांगतात. अभ्यासात अजिबातच रस नसणाऱ्या दीपालीला नियमांच्या चौकटीतील जीवन मान्य नव्हते. ही गोष्ट लक्षात आल्यानंतर त्यांनी तिच्या पुस्तकी शिक्षणाचा हट्ट सोडून दिला आणि तिला हवे ते करण्याची मुभा दिली. पुढे एक दिवस त्यांनी बेरजेची गणिते शिकविल्यानंतर मुलांना एक तोंडी करण्यासाठी गणित दिले. तेव्हा त्याचे उत्तर सगळ्यात आधी दीपालीने दिले. आता दीपाली तिच्या मनाप्रमाणे सर्वकाही करते आणि शिक्षणही मनापासून घेते आहे. 

पोलिस अधीक्षकांना दहा रुपयांचा दंड 
स्नेहग्राममध्ये मुलांना चांगल्या सवई लागाव्यात, त्यांच्या वर्तनावर काही निर्बंध असावेत, यासाठी काही नियम ठरवून दिलेले आहेत. त्या नियमांचे उल्लंघन केले तर रोख स्वरूपात दंड भरावा लागतो. या नियमांमध्ये व्हरांड्यात चप्पल घालून आल्यास दहा रुपये दंड, तंबाखू अथवा दारू पिऊन स्नेहग्राम परिसरात आल्यास दोनशे रुपये दंड (पालकांसाठी), अशा काही नियमांचा समावेश आहे. सोलापूर जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हा पोलिस अधीक्षक वीरेश प्रभू यांनी स्नेहग्रामला भेट दिली तेव्हा ते आपले बूट न काढता व्हरांड्यात आले. तेव्हा सदर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी सोपवलेला विद्यार्थी लगेच पुढे आला आणि त्याने वीरेश प्रभू यांना दहा रुपये दंड भरण्यास सांगितले. यामुळे श्री. प्रभू यांनी दहा रुपये दंड तर भरलाच पण त्यांचा स्नेहग्रामविषयीचा आदरभाव अधिकच वाढला. 

सर्वकाही लोकवर्गणीतून 
राज्यभरातील वंचित मुलांना शोधून त्यांच्या शिक्षणाची आणि पालनपोषणाची जबाबदारी पार पाडताना फार मोठा आर्थिक भार सोसावा लागतो. पण स्वतःच्या नोकरीचे राजीनामे देऊन हे अनोखे व्रत स्वीकारल्यानंतर निंबाळकर दाम्पत्यांची दमदार वाटचाल चालू आहे ती केवळ समाजातील चांगुलपणाच्या भरवशावर आणि दानशूर व्यक्ती देऊ केलेल्या आर्थिक मदतीच्या जीवावर. अनेक वेळा चाळीस मुलांच्या खाण्या-पिण्याची व्यवस्था करताना अगदी दुसऱ्या दिवशीच्याही अन्नपाण्याची सोय नसते. तेव्हा मनात नाना प्रश्नांचे काहूर माजून मन सैरभैर होते, असे विनयाताई सांगतात. पण त्याच वेळी स्वतःच्या निःस्वार्थी कार्यावर विश्वास असल्याने आपल्याला कोठून तरी नक्की मदत होणार, याबाबतही मन निःशंक असते, असे सांगताना त्या एक उदाहरण सांगतात. एके दिवशी शेंगदाणे आणि तेल सर्व संपून गेलेले असताना जवळ काही पैसेही शिल्लक नव्हते. अशा परिस्थितीत मुलांना उपवास घडण्याची भीती सतावत होती. तेवढ्यात एका सद्गृहस्थाचा फोन आला आणि त्यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त स्नेहग्रामसाठी तेलाच्या एका डब्यासह काही किराणा माल घेऊन येत असल्याचे सांगितले. तेव्हा झालेला आनंद शब्दात वर्णन करणे केवळ अशक्‍य असल्याचे विनयाताई भावूकतेने सांगतात. 

अशा पद्धतीने प्रथम नोकरीचा आणि नंतर स्वतःच्या सासरचा, स्त्रीधनाचा, एवढेच नाही तर पोटच्या दोन मुलांचाही त्याग करून केवळ वंचित मुलांच्या शिक्षणासाठी आपले संपूर्ण जीवनच अर्पण केलेल्या आणि बाबा आमटे व साधनाताई आमटे यांना श्रद्धास्थानी मानणाऱ्या विनया निंबाळकर स्नेहग्राम या प्रकल्पावर सुद्धा वंचित मुलांचाच अधिकार असल्याचे नम्रपणे सांगतात, तेव्हा त्यांच्या आभाळाएवढ्या उंचीची जाणीव झाल्याशिवाय राहात नाही. 

- सूर्यकांत बनकर, 
करकंब 

संपादन : श्रीनिवास दुध्याल 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com