मनावरील बंधने झुगारली पाहिजेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा


    Sri M

मनावरील बंधने झुगारली पाहिजेत

श्री एम

करकचून ब्रेक मारल्यामुळे कार थांबलेली असते. परंतु तुमच्या मनाचे ब्रेक मात्र सैल सुटलेले असतात. अनंत विचारांचे काहूर तुमच्या मनात माजले असते. तुमची नजर त्या म्हाताऱ्याला शोधत असते. कुठे असेल तो? मेला तर नसेल? एवढ्यात तो तुम्हाला दिसतो. तो प्रचंड घाबरलेला असतो. जोरजोराने धापा टाकत असतो. त्याच्या पाठीवरचे ओझे कुठेतरी फेकले गेलेले दिसते. आपण जिवंत आहोत, यावरच खुद्द त्याचाही विश्वास नसल्याचे जाणवते. एका सोनाराच्या दुकानाच्या छताखाली तो सुखरूप उभा असतो. रस्त्यावरून दुकानापर्यंत केवढे अंतर? तरी एवढी लांब उडी याने मारलीच कशी? यावर तुमचाच काय त्या म्हाताऱ्याचाही विश्वास बसत नाही.

म्हाताऱ्याला उंच उडी मारून स्वतःचा जीव वाचविणे शक्य झालेच कसे? जर्जर झालेला, मरायला टेकलेला. ज्याला चार पावले धड टाकणे जड आहे, तो क्षणात उडी मारून जीव वाचवतोच कसा? यावर सुक्ष्म चिंतन केले तर काय लक्षात येते. बघा..

म्हाताऱ्याच्या स्वतःबद्दल स्वतःच्याच काही समजुती असतात. मी आजारी आहे. म्हातारपणामुळे मला दोन पावलेही धड टाकता येत नाही. स्वतःच्या अशा समजुतीमुळे त्याचे मन संमोहित झालेले असते. परंतु, जेव्हा आणीबाणीची परिस्थिती उद्भवली. जीव जाण्याचीच वेळ आली. तेव्हा जीव वाचविण्यासाठी असलेली सर्व शारीरिक यंत्रणा आणि मन कामाला लागते. कोणत्याही परिस्थितीत जीव वाचला पाहिजे, यासाठी आपल्या मनाच्या सर्व मर्यादांवर त्याने मात केली. थोडक्यात सांगायचे तर त्या म्हाताऱ्याला त्याच्या मर्यादांचा विसर पडला आणि त्याने लांब उडी मारली. ती कृती अनैच्छिक असली तरी तिला स्वैच्छिक विचारांची जोड होती. कधीकधी आपल्या विचारप्रक्रियेत एक दरी असते. त्यावेळी मन आपल्या विचारांवर ताबा मिळविते. म्हाताऱ्याचेही तसेच झाले. जगण्या-मरण्याची स्थिती होती. अशावेळी म्हाताऱ्याचे मन त्याच्या सर्व मर्यादांवर आणि त्याबाबतच्या विचारांवर ताबा मिळविते आणि तो तातडीने उडी घेतो व जीव वाचवतो.

अर्थातच यामागील वैद्यकीय आणि शास्त्रीय स्पष्टीकरणही देता येईल. आपल्या शरीरामध्ये ‘एड्रेनालिन’ या नावाचे एक द्रव्य असते. राग, भीती, उत्कंठा या काळात हे द्रव्य रक्तात मिसळते आणि आपल्या हृदयाची क्रिया नियंत्रित ठेवते. म्हाताऱ्याच्या आयुष्यातील या अत्यंत अटीतटीच्या काळात हेच द्रव्य रक्तात मिसळले आणि म्हाताऱ्यात एक अद्भूत प्रकारची शक्ती निर्माण झाली. त्यामुळेच तो त्याच्या आयुष्यातील विक्रमी लांब उडी घेवू शकला. हे द्रव्य मिसळणे ही एक शारीरिक प्रक्रिया तेवढी होती. परंतु ते द्रव्य झरण्याचे बटन कुठे होते? म्हाताऱ्यासोबत हे अकस्मात कसे घडले? कुणी घडविले? त्या क्षणी म्हाताऱ्याने जर त्याच्या मर्यादांचा विचार केला असता, तर तो तडक एवढी उडी मारू शकला असता का? नक्कीच नाही. मला उडी मारणे जमेल की नाही, याचा ताळमेळ तो करीत बसला असता तर उडी मारणे शक्यच झाले नसते. असला कोणताही विचार न करता त्याने कृती केली. म्हणूनच त्याला उडी मारणे शक्य झाले. जीव वाचविणे शक्य झाले.

तुम्ही विचारच करू नका, असे मला म्हणायचे आहे का? तर नाही. मी असे म्हणणार नाही. तुम्ही तर्कनिष्ठ असू नका, असेही मी म्हणणार नाही. हे सर्व आवश्यक नाही का? तर नक्कीच आहे. परंतु आपल्या मनाला असे बहुविध आयाम आहेत जे आपल्या सामान्य, तर्कनिष्ठ आणि तर्कशुद्ध विचाराच्या पलीकडे काम करते. या कथेतून एवढाच बोध आपण घ्यावा, असे मला वाटते.

आपल्या रोजच्या जीवनात विचार करणे खूपच आवश्यक असते. त्याची गरजही असते. परंतु यातून तुम्हाला स्वतःला बाहेर काढण्याचा नैसर्गिक मार्ग शोधता आला पाहिजे. आपल्या मनातील ज्या विचारांना पूर्वग्रहांनी संमोहित करून टाकले आहे, तेवढे विचार आपल्या काढून टाकणे जमले पाहिजे. आणि त्यानंतर या त्रिमितीय जगाने आपल्या मनावर लादलेली सर्व बंधने झुगारून दिली पाहिजे. सामान्य विचार करण्याच्या पलीकडे जात आपल्या मनातून बाहेर पडण्यास उत्सुक असलेली अफाट क्षमता बाहेर काढली पाहिजे. यासाठी अनेक मार्ग आणि साधनेही आहेत. ध्यानधारणा हा यातील एक शास्त्रीय मार्ग आहे. मनाच्या खोल तळापर्यंत किंवा त्याही पलीकडे पोहोचण्याचा हा मार्ग आहे. खोल खोल दडलेल्या सुप्त शक्तींना जागृत करीत विशाल क्षमता विकसित करणे शक्य आहे. या क्षमता मनाच्या एका अनंत उंचीवर आपल्याला नेऊन ठेवतील यात शंकाच नाही.

(उद्याचा लेख ः प्रार्थना हा सुंदर मानसिक व्यायाम)

सकाळ माध्यमसमूह व सत्संग फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय ख्यातीचे आध्यात्मिक गुरू, समाजसुधारक पद्मभूषण श्री एम यांच्यासोबतच्या परम सत्संगाचा सूवर्णयोग नागपुरात येत आहे. श्री एम हे योगगुरू आणि शिक्षणतज्ज्ञ म्हणूनही प्रख्यात आहेत. अध्यात्मिक गुरू होण्याचा त्यांचा प्रवास अतिशय अद्भूत आहे. त्यांच्या सत्संगाच्या निमित्त त्यांच्या निवडक प्रवचनपुष्पांचा भावानुवाद असलेली ही लेखमाला.