
आय.पी.एल चा चेन्नई विरुद्ध दिल्ली सामना. अंतिम फेरीत जाण्यासाठी दोन्ही संघाची प्रयत्नांची पराकाष्ठा. पारडे दिल्लीकडे झुकलेले. एक विकेट पडली आणि नंतर जडेजा येणार का ब्राव्हो ही उत्सुकता. चेंडू कमी शिल्लक, धावा जास्त. नखं कुरतडून संपली होती. बाहेर बॅटिंगसाठी ४० वर्षांच्या योद्ध्यांचे आगमन. संपूर्ण स्पर्धेमध्ये बॅटिंगमध्ये सुमार कामगिरी. का आला हा आधी असा प्रश्न मनात आला. पण, पुढच्या दोन ओव्हर्स फक्त स्वप्नवत. दिल्ली ची गोलंदाजी फोडून काढत झोकात संघाला विजय मिळवून दिला या पठ्ठ्याने. वाटलं, TV वर धोनीचं चित्र फ्रीझ करावं आणि उमेश गवळी चे जोमदार गाणे, "ओ शेठ, तुम्ही माणूस हाय लयी ग्रेट" फुल्ल आवाजात लावून, बेहोष होईपर्यंत नाच करावा !!! अंतिम सामन्यात, त्याच्या कल्पक नेतृत्वाच्या बळावर त्याच्या संघाला त्याने विजयी केले आणि अक्षरशः विजयादशमीला सोने लुटले.
तुझे जेव्हा प्रथम भारतीय एक दिवसीय संघात बांगलादेश विरुद्ध आगमन झाले आणि त्यानंतर एका वर्षाने श्रीलंका विरुद्ध कसोटी संघात आगमन झाले आणि सुरुवातीच्या काही सामन्यात तुला अजिबात चमक दाखवता आली नाही, तेव्हाच तुला क्रिकेट पंडितांनी आणि क्रिकेट रसिकांनी सामान्य खेळाडू म्हणून गृहीत धरले होते. परंतु कोणाला माहीत होते की रांचीसारख्या त्या मानाने छोट्या आणि क्रिकेट साठी विशेष पायाभूत सुविधा नसलेल्या शहरातून आलेला हा खेळाडू नंतर इतिहास घडवेल, नुसताच घडवणार नाही तर, सगळ्यांचे डोळे दिपवणारी कामगिरी करेल!
माही, किती आनंद दिला आहेस तू आम्हा क्रिकेटप्रेमींना ! तुझी बॅटिंग, विकेट किपिंग की नेतृत्व यामध्ये जास्त श्रेष्ठ काय आहे हे ठरविणे केवळ अशक्य ! संघ अडचणीत असताना तू संकटमोचक म्हणून येऊन, संघाला Finish line च्या पुढे कितीतरी वेळा नेले आहेस. तुझ्या आधी मायकल बेव्हन व हसी हे बेस्ट फिनिशर समजले जायचे. तू आल्यापासून निर्विवादपणे तुझाच या बिरुदावली वर जन्मसिद्ध हक्क आहे हे निश्चित. ते पहिल्या इयत्तेत असतील तर तू मॅट्रिक मध्ये. तुझ्या बॅटिंगचे दिवाने करोडो आहेत.
उगीच नाही गावसकर म्हणाला
"आयुष्यातील शेवटचे ३० सेकंद तुला काय करायची इच्छा आहे असे मला कुणी विचारले तर मी लगेच सांगेन, भारताला वर्ल्ड कप मिळवून देताना धोनी ने मारलेली ती सिक्स मला नक्कीच बघायला आवडेल".
तुझे यष्टीरक्षण तर "परग्रहा" वरचेच आहे यात क्रिकेट रसिकांना मुळीच शंका नाही. तुझी 'Stumping' करतानाच्या 'Reaction Time' वर भविष्यात नक्कीच कोणितरी प्रबंध करेल. तुझे डीआरएस ची Appeals, एवढी अचूक कशी असू शकतात रे ? तू घेतलेले झेल म्हणजे जणू सुंदर काव्यच !!
तुझ्या नेतृत्वाबद्दल काय बोलावे ! तिन्ही प्रकारच्या क्रिकेट मध्ये देशाला उंचावर नेऊन आम्हा सगळ्यांची मान उंचावली आहेस. T-20 च्या स्पर्धे साठी, संघा मध्ये अनेक अनुभवी आणि दिग्गज खेळाडू असताना तुला कर्णधारपदाचा काटेरी आणि आव्हानात्मक मुकूट परिधान करण्यात आला होता. १ टक्का भारतीय क्रिकेट रसिकांना सुद्धा तुझ्याकडून आणि संघाकडून काहीही अपेक्षा नव्हती. पण तू सगळ्यांना खोटे ठरवलेस. अफाट कामगिरी करून दाखवलीस. विजेतेपदाला गवसणी घातलीस. गोलंदाजीत तू केलेले बदल आणि क्षेत्ररक्षण रचना एकदम लाजवाब ! अत्यंत बिकट परिस्थिती असताना देखील तुझे डोकं इतकं शांत कसें राहूं शकते रे ? डोक्यावर ठेवायला अदृश्य बर्फाची लादी कुठे मिळते, सांगशील का ? पाकिस्तान विरुद्ध अंतिम सामन्यात मोक्याच्या वेळेस जोगिंदर शर्माला गोलंदाजी दे असे तुला परमेश्वराने कानात येऊन सांगितले होते काय ? परवाच्या दिल्ली विरुद्ध च्या सामन्यात खराब फॉर्म मध्ये असताना तू बॅटिंग ला आलास याला कारण, तुझी या स्पर्धेत फिरकी गोलंदाजीवर ससेहोलपट होत होती आणि त्या वेळेस फक्त वेगवान गोलंदाजांची गोलंदाजी शिल्लक होती ही बाब तुझ्या सुपर कॉम्पुटर असलेल्या मेंदूने कशी काय बरोबर जाणली ?
विजयाचे श्रेय स्वतः सोडून इतरांना देणारा फक्त तूच असू शकतोस. विजयाचा करंडक अन्य खेळाडूंकडे देऊन फ्रेम च्या एकदम कोपऱ्यात जाणारा दुसरा कोणी पाहिला नाही रे ! इतका मोठा आहेस, इतके अफाट कर्तृत्व आहे, तरी इतका नम्र, इतका साधा, इतका 'Down to Earth' कोणी कस राहू शकतो ? गाजावाजा न करता योग्य वेळेस निवृत्ती घेऊन, " 'Why not, ऐवजी 'Why?' हा प्रश्न लाखो रसिकांना विचारायला लावलास. नाही तर वैयक्तिक विक्रम (100 hundreds) साठी प्रेक्षकांना कंटाळा येईपर्यंत खेळणारे पण होऊन गेले आहेत.
लवकरच होऊ घातलेल्या T-20 च्या जागतिक स्पर्धेसाठी, भारतीय संघाचा mentor म्हणून तुझी निवड करण्यात आली आहे. किती उचित निवड आहेही ! तुझी नुसती ड्रेसिंग रूम मधील उपस्थिती संघा साठी खूप उपयुक्त असेल यात तिळमात्र शंका नाही. तुझ्या temperament चा फायदा खेळाडूंना नक्की होईल. ही नवीन जबाबदारी स्वीकारताना तू कोणतेही आर्थिक फायदे घेणार नसल्याचे वाचनात आले आहे. तसे असेल, तर तुला हॅट्स ऑफ !
तुझ्या 'Swag' वर भले भले फिदा आहेत. तू लांब केस वाढवले असताना तर तू परवेझ मुशर्रफ यांना देखील मोहित केले होतेस. प्रत्येक केशरचना तुझ्यावर शोभून दिसते - तुझे ते 'Style Statement' आहे. तुझी खेळपट्टीवर वावरण्याची पद्धत, तुझे ते मंद हसणे, शांत, संयमित व्यक्तिमत्व, सर्व काही अत्यंत मनमोहक आहे.
माही, तू भारताचा सर्वकालीन सर्वश्रेष्ठ क्रिकेटपटू आहेस यात माझ्या प्रमाणे कोट्यवधी लोकांच्या मनात यत्किंचितही शंका नाही. खूप, खूप आनंद दिला आहेस तू आम्हा सगळ्यांना. तुला परमेश्वरा कडून 'Midas Touch' लाभलेला आहे. तुझ्या स्पर्शानेच सगळ्याचे सोने झाले आहे. नुसतेच भारतीय नाही तर जागतिक क्रिकेट जगतात तू सुवर्णाक्षराने तुझे नाव इतिहासामध्ये कायमचे कोरून ठेवले आहेस. भविष्यामध्ये लोकांना एम एस धोनी ही दंतकथा होती असे वाटले तर त्यात आश्चर्य नसेल. आता लवकरच IPL मधून देखील निवृत्त होशील, अगदी तुझ्या स्वभावाला अनुसरून - गाजावाजा न करता. तुझ्या पश्चात क्रिकेट कसे असेल हा विचारच बेचैन करणारा आहे. तुझ्या योगदानासाठी आपला देश तुझा कायमचा ऋणी असेल ही खात्री बाळग.
मी अभिनानाने सांगू इच्छितो की 'I am a proud 'MSD'ian forever' !!!
तुझे शतशः आभार आणि तुला उदंड आयुष्य लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना !!!
- अनिरुद्ध पावसकर
(अनिरुद्ध पावसकर हे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख आहेत आणि क्रिडा विषयावर सातत्याने लेखन करतात)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.