"भाऊ (माझे बाबा) आज रिटायर होताहेत !' 

नितीन कदम
Monday, 5 October 2020

आजवर सारं काही देऊन कसलीच अपेक्षा न ठेवता जेव्हा वडील खुर्चीवर शांत बसतात... तेव्हा वाटतं की जणू आभाळच खाली झुकलं... कधीतरी या आभाळाला जवळ बोलवावं आणि खूप काही बोलावं वाटतं... पण तेव्हा लक्षात येतं... आभाळ कधीच झुकत नाही, ते झुकल्यासारखं वाटतं... आभाळाची छत्रछाया खूप काही देऊन जाते. 

आज का कुणास ठाऊक, 
माझं अंतःकरण जड झालंय. 
कारण, रोज ठरलेली दिनचर्या उद्यापासून पूर्णविराम घेणार आहे. 
असे म्हणतात, की बदल हा निसर्गाचा नियम आहे... 
तरी त्यांनी त्याला सामोरं जाणं हे आपलं कर्तव्य समजलं 
आणि निसर्गाचा नियम त्यांनीसुद्धा पाळला... 

खरं तर काय लिहावं हे सुचत नव्हतं. कारण हे शब्दात मावणार नव्हतं. लहानपणापासूनच रेल्वे या शब्दाशी नाळ जुळली होती. कारण, घरातच वडील रेल्वेत कामाला असल्यामुळे रेल्वेविषयीचं नातं जरा जवळचं होतं. रेल्वे म्हणजे आमचं मायबापच. तेव्हा गावातील शंभरएक लोकं रेल्वेत कामाला होती. आमचं गाव तसं रेल्वेवाल्यांचं गाव म्हणून ओळखलं जायचं, नंतर शिक्षकांचं आणि आता अधिकाऱ्यांचं ! 

आमच्या लहानपणापासून पहाटे चारपासूनच ताई-भाऊंचा (आई-वडिलांचा) दिवस चालू व्हायचा... ताई (आई) पहाटे उठून भाऊंचा डबा तयार करणे व भाऊ कामावर गेल्यावर घरातील इतर कामे, म्हशीची धार काढणे, आम्हा तिघा भावंडांना शाळेत पाठवणे, दिवसभर रानात जाणे... असा गेली 35 वर्षे झाली अविरत दिनक्रम असायचा... 

मला आठवतंय, भैय्या (मोठा भाऊ सचिन कदम, जो सध्या अकोला येथे डीवायएसपी म्हणून कार्यरत आहे) दहावीत असताना त्याची व भाऊंची आठ-आठ दिवस गाठ नाही पडायची. कारण भैय्या त्या वेळी रात्र अभ्यासिकेत अभ्यासाला असायचा. सकाळी सहाला शाळेतून यायचा, तोपर्यंत भाऊ पहाटे पाचलाच कामावर गेलेले असायचे. तर भैय्या जेवण करून रात्री आठ वाजता अभ्यासिकेत जायचा तर भाऊ रात्री नऊ-साडेनऊ वाजता कामावरून यायचे. परीक्षेच्या वेळी भैय्या पहाटे पाचला येऊन भाऊंच्या पाया पडून परत जायचा. म्हणजे कामापुढं मुलांनाही भेटायला वेळ नसायचा. 

ताई - भाऊ दोघेही अशिक्षित पण आम्हा मुलांच्या शिक्षणाला काही कमी पडू दिलं नाही. बाहेरगावी शिकत असताना कोणत्या शाखेत प्रवेश घेतला हे सुद्धा कधी विचारलं नाही; कारण शिक्षणातलं काही कळतच नव्हतं, पण शिक्षणाचं महत्त्व त्यांनी जाणलं होत. फक्त "तुमच्या मनाने काही शिकायचं आहे ते शिका, पैसे पुरवायला मी तयार आहे' असे म्हणायचे. कारण, त्यांना माहीत होतं ही फक्त एक इन्व्हेस्टमेंट आहे. त्याचे फायदे अनेक प्रकारचे होणार आहेत. आम्हा भावंडांत कधी भेदभाव केला नाही. सर्वांना सारखं वागवतात. रेखा (माझी मोठी बहीण सोनाली कदम, जी सध्या अलिबाग येथे डीवायएसपी म्हणून कार्यरत आहे) तर गावाबाहेर शिकायला सोलापूरला जाणारी, तसेच इंजिनिअरिंगला पुण्याला जाणारी गावातील पहिली मुलगी होती. भैय्या आणि रेखा दोघेही इंजिनिअरिंगला असताना पैसे कमी पडत असत. वडिलांचा पगार सर्व कट होऊन जेमतेम तीन हजार होता (आईच्या भाषेत इन मीन तीन टिकली!). मग पगारावर लोन काढून दोघांचे पैसे भरावे लागत असे, पण त्यांनी बाहेरील कर्जाला कधी हात नाही लावला. 

घराला कायम साथ दिली ती एका म्हशीने. तिला आम्ही लक्ष्मी मानायचो. घरी एक म्हैस होती (तसेच सपोर्टला म्हणून काही दिवस घरी शेळी, कोंबड्या, गायीसुद्धा होत्या). तिच्या दुधाचे येणारे पैसे ताई सेव्हिंग्स करून ठेवायची, जे पुढे कामी आले. रविवारी म्हशी चारायला शेतात जाणे हीच आमची सुटी असायची. घरखर्चही म्हशीच्या दुधावरील पैशावरूनच चालायचा. आजही म्हशीला लक्ष्मी मानतो. आजही एक म्हैस आहे आमच्या घरी. 

भाऊंनी आम्हा तिघा भावंडांना बारावी झाली म्हणून महागडी घड्याळे घेतली, पण स्वतः कधी घड्याळ घेतलं नाही. कॉलेजला जायला तिघांनाही सायकल घेतली, पण स्वतः मात्र त्याच 25-30 वर्षं जुन्या सायकलने रोज 10-15 किलोमीटर अंतर कापून रेल्वे स्टेशन गाठायचे. कधी कधी उशीर झाल्यावर डबा न घेता तसेच कामावर जायचे. शिकायला पैसे कमी पडत असत म्हणून मग भाऊ डे करून नाईट ड्यूटी करायचे; कारण पगार जास्त यायचा. रविवारी सुटीच्या दिवशीही शेतातील कामे करत असत. त्यांना फक्त कष्ट करणे एवढेच माहीत होतं. त्या कष्टाची फळे आज आली आहेत. 

वडिलांचा मला कळलेला अर्थ... 
बाबा म्हणजे अपरिमित कष्ट करणारं शरीर 
बाबा म्हणजे अपरिमित काळजी करणारं मन 
बाबा म्हणजे स्वतःच्या इच्छा-आकांक्षा बाजूला ठेवून 
मुलांसाठी अहोरात्र झटणारं अंतःकरण... 

भैय्याला इंजिनिअरची नोकरी लागल्यावर गावभर पेढे वाटले. अन्‌ मोठ्या पगाराची नोकरी न करता तो ताई-भाऊंना म्हणाला, की 'मला स्पर्धा परीक्षा करायची आहे.' ताई नको म्हणायची; कारण एवढे दिवस पैसे पुरवले आणि आता चांगल्या पगाराची नोकरी लागतेय आणि स्पर्धा परीक्षा करायची म्हणतोय. जो की पुढे अंधार आहे, यशाची खात्री नाही.' पण भाऊ म्हणाले, की "बापू (वडील आम्हा भावांना बापू आणि बहिणीला बाई म्हणतात) तुझ्या मनानं तुला काय करायचं आहे ते कर. मी अजून पैसे पुरवायला खंबीर आहे.' भैय्याने यूपीएससीच्या चार मुलाखती दिल्या, पण सिलेक्‍शन झालं नाही. पण भाऊंचं एकच वाक्‍य असायचं, "बापो, मी आहे, तू अजून परीक्षा दे...' तोपर्यंत बहीण एसटीआय झाली होती, जी की सोन्याचा चमचा तोंडात घेऊनच जन्माला आली होती. कायम भैय्याच्या पावलावर पाऊल ठेवून चालणारी... काटा कधी रुतलाच नाही. सगळं आयतं मिळायचं... परीक्षेचं रिझल्टही लागलेले माहीत नसायचं. सांगावं लागायचं. 

आणि अखेर 16 मार्च 2017 हा दिवस उजाडला. संध्याकाळी पाच वाजता एमपीएससीचा रिझल्ट लागला आणि दोघाही बहीण-भावाची डीवायएसपीपदी निवड झाली. जेव्हा ताई - भाऊंची गावातून मिरवणूक काढली, तेव्हा त्या आयुष्यभर केलेल्या कष्टाची त्यांना विसर पडली होती. वडिलांनी ज्यांच्या बंगल्यावर 20 वर्षांपेक्षा जास्त काळ माळीकाम केलं, मुलांचा रिझल्ट आल्यावर त्याच रेल्वे डीआरएमच्या (रेल्वेवाल्या लोकांचा देव) हस्ते स्वतःच्या गावात स्वतःचा सत्कार होणे यातच त्यांच्या कष्टाची चीज झाल्यासारखं होत... यापेक्षा मोठं काय असू शकतं! त्यांना आकाश ठेंगणं झाल्यासारखं वाटतं होत. 

खरं तर भैय्या आणि रेखा कामावर जॉईन झाल्यानंतर वाटायचं, भाऊंनी आता रिटायर व्हायला हवं... थकले आहेत. पण सांगायचं कोणी त्यांना? आपला अधिकार नव्हे सूर्याला सांगायचं, की मावळ आता म्हणून. 

परंतु कोरोनामुळे अचानक लॉकडाउन सुरू झालं, त्या वेळेस ताई अलिबागला होती बहिणीकडे, भैय्या-वहिनी अकोल्याला, मी मावस बहिणीकडे टेंभुर्णीला आणि भाऊ (वडील) नोकरीमुळे गावात... सगळे वेगवेगळीकडे... तेव्हा तर दोन-अडीच महिने स्वयंपाक भाऊंनी हातानेच केला. सगळंच ठप्प होतं ना तेव्हा. मग काय करणार! कोरोना खूप वाढत असल्याने आणि रोज सोलापूरलाच जावे लागत असल्याने भाऊंनी रिटायर व्हावे म्हणून आम्ही सर्वांनी आग्रह धरला आणि भाऊंनी ऐच्छिक सेवानिवृत्ती घेतली. 

आजवर सारं काही देऊन कसलीच अपेक्षा न ठेवता जेव्हा वडील खुर्चीवर शांत बसतात... तेव्हा वाटतं की जणू आभाळच खाली झुकलं... कधीतरी या आभाळाला जवळ बोलवावं आणि खूप काही बोलावं वाटतं... पण तेव्हा लक्षात येतं... आभाळ कधीच झुकत नाही, ते झुकल्यासारखं वाटतं... आभाळाची छत्रछाया खूप काही देऊन जाते. 

आणि अखेर 35 वर्षे रेल्वेत सेवा केल्यानंतर भाऊ आज निवृत्त होताहेत... 

"सेवा निवृत्ती ही नाही निवृत्ती' 
ही तर आहे नवी आवृत्ती जगण्याची... 

हीच आहे वेळ आयुष्याच्या संध्याकाळची स्वागत करण्याची... 
चाकोरीबद्ध आयुष्य सोडून निवांत जगण्याची... 

अपूर्ण राहिलेले छंद जोपासण्याची आणि त्यात रममान होण्याची! 
नवीन सोबती बनवण्याची आणि जुनी नाती जपण्याची... 

आपल्या जोडीदाराला वेळ देण्याची आणि समजून घेण्याची... 
पुन्हा सेकंड इनिंगची सुरवात करण्याची... 

"आपल्या आतापर्यंतच्या 
डेडिकेशन आणि हार्डवर्कसाठी, 
तुम्ही डिझर्व्ह करता ही निवृत्ती...' 

"तुमच्या रिटायरमेंटचा अर्थ असा होतो की... 
तुमच्या जीवनातील बेस्ट रोलसाठी तुम्हाला प्रमोशन मिळालं...' 

भाऊ, तुम्हाला सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा..! 

35 वर्षे इंडियन रेल्वेच्या सेवेची सांगता 
Thank you @INDIAN RAILWAY... 

- नितीन तुकाराम कदम 

संपादन : श्रीनिवास दुध्याल 

इतर ब्लॉग्स