New Year : कोकणी गाणी अन् गोवन कॅथोलिक कुटुंबांतला डान्स फ्लोअर, ४० वर्षांपूर्वीचा न्यू ईयर

ज्येष्ठ पत्रकार कामिल पारखे यांच्या बालपणी त्यांनी गोव्यात अनुभवलेलं न्यू इयर या निमित्ताने सर्वांसोबत शेअर करत आहेत.
New Year
New Yearesakal

नवीन वर्षाचे स्वागत करताना जुन्या आठवणींचा उजाळा होणं फारच स्वाभाविक आहे. कारण जसे दिवस सरत जातात तसे अनुभव, आकलन आणि सभवताल सारंच बदलत जातं. ज्येष्ठ पत्रकार कामिल पारखे यांच्या बालपणी त्यांनी गोव्यात अनुभवलेलं न्यू इयर या निमित्ताने सर्वांसोबत शेअर करत आहेत.

बारावीला असताना घडलेला हा प्रसंग. गोव्यात म्हापशाजवळ असलेल्या तिव्हिम या गावी मित्राच्या घरी गेलो होतो. त्याच्या घरी कुणाचा बर्थ-डे की इतर काहीतरी कार्यक्रम होता. आमच्या जेसुईट पूर्व-नॉव्हिशिएट काही मुलं आणि त्याचे कुटुंबिय असे मोजकेच दहापंधरा लोक तिथे होते. केक कापून झाल्यानंतर गोव्यातल्या पार्टी सॉंग्सची गाणी गायली जातो लागले तसे तिथली मंडळी एकत्र किंवा जोडीने नाचू लागली. मी थक्क होऊन पाहत राहिलो.

कारण ज्याच्या घरी आम्ही आलो होतो तो माझा मित्र रॉडनी दोनतीन वर्षांनी लहान असलेल्या आपल्या बहिणीबरोबर नाचत होता. एक हात तिच्या खांद्यावर आणि दुसरा हात तिच्या कमरेभोवती लपेटून गाण्याच्या लयीत ते दोघे नाचत होते. त्यानंतर माझ्याबरोबर आलेले इतरही मित्र त्या नृत्यांत सहभागी झाले. कहर म्हणजे रॉडनीचे आईवडील सुद्धा त्या नाचगाण्यात सामिल झाले. मध्यमवयीन असले तरी त्या दोघांचे पदलालित्य मला थक्क करून गेले.

तिथं हजर असलेले गोव्यातले माझे मित्र आणि रॉडनीच्या घरातले सगळे जण नृत्यांत पारंगत होते हे स्पष्ट दिसत होते. गोव्यातल्या पार्टीतली ती पारंपारीक इंग्रजी, कोकणी गाणी गायली जात असताना नाच करत असणारी सर्व जण न चुकता अचूक पावलं म्हणजे स्टेप्स उचलत होते. गंमत म्हणजे दोन मुलं किंवा दोन मुलीसुद्धा एकत्रितपणे असे नृत्य करत असत, म्हणजे एकानं पुरुषाची आणि दुसऱ्यानं स्त्रीची नृत्यपावलं उचलायची.

हे साल होते १९७८. अशा प्रकारचं संगीत आणि नाचगाणं मी पहिल्यांदाच पाहत होतो असं काही नव्हतं. मात्र याआधी अशा प्रकारची पाश्चात्य गाणी आणि नृत्य मी फक्त हिंदी चित्रपटांतच पहिली होती. साठीच्या आणि सत्तरीच्या दशकांत अनेकदा नायक किंवा इतर कुणी पियानोवर गाणी म्हणायचा आणि तोंडात सिगार असलेले प्राण वगैरे सारखे थ्री-पिस सुटांतले

खलनायक नायिकेबरोबर नृत्य करत असायचे. उदाहरणार्थ, `वक्त' चित्रपटात ' आगे भी जा न साके तू पिछे भी जण न साके तू' हे शशिकलाने गायलेले प्रसिद्ध गीत. त्याकाळात अनेक हिंदी चित्रपटांत अशी गाणी आणि पाश्चात्य धर्तीची गाणी हमखास असायची, आता पंजाबी किंवा उत्तर भारतातील गाणी असतात तशी.

रॉडनीच्या घरातले हे नृत्याचे प्रकार पाहिले आणि लक्षात आलं कि प्रत्येक गोवन कॅथोलिक कुटुंबांत वयात येणाऱ्या प्रत्येक मुलाला आणि मुलीला असे नृत्याचे धडे आपल्या घरांत आणि आपल्या आईवडिलांकडून आणि भावंडांकडून मिळत असतात. कुठल्या गाण्यासाठी नाचताना कशी पावले म्हणजे स्टेप्स उचलावी याचं बाळकडू या त्यांना षोडशवर्षांतच मिळत असतात.

दुसरं म्हणजे या अनेक घरांतली मुलं या वयात गिटार, व्हायोलिन अशी पाश्चिमात्य वाद्ये शिकत असतात. आपल्या घरांत, नातेवाइकांकडे, मित्रांकडे वाढदिवस, कुठलाही फेस्त म्हणजे सण वगैरेसाठी गेलं म्हणजे छोटीशी पार्टी होतेच आणि त्यावेळी अशा नृत्याची तालीम होते आणि लवकरच ही मुलंमुली वेगवेगळ्या नृत्यप्रकारांत अगदी तरबेज होतात. एखाद्या कार्यक्रमांत नृत्यप्रकारांत तरबेज असलेली अशी मुलंमुली लगेचच इतरांचे लक्ष वेधून घेतात.

मात्र लवकरच नृत्यकलेत मी पारंगत झालो असं म्हणता येणार नाही मात्र ही नृत्यकला मी बऱ्यापैकी शिकलो, ही नृत्यकला मला शिकावीच लागली याचं कारण म्हणजे लोयोलो हॉल या आमच्या जेसुईट प्री-नॉव्हिशिएट (पूर्व-सेमिनरी ) मधलं दैनंदिन सांस्कृतिक जीवन. आम्ही कॉलेजची विद्यार्थी जेसुईट फादर होण्यासाठी या प्री-नोव्हिशिएटमध्ये दाखल झालेले असलो तरी जीवनाच्या विविध क्षेत्रांतली माहिती, ज्ञान आणि कला संपादित करण्यासाठी आम्हाला प्रवृत्त केले जायचे, तसे अनुभव आणि शिक्षण आम्हाला दिले जायचे. आमचे सुपिरियर असलेले फादर इनोसन्ट पिंटो याबाबत फारच दक्ष असायचे.

जीवन परीपुर्ण जगावे आणि विविध क्षेत्रांत पारंगत असावे असा जेसुईट फॉर्मेशन किंवा प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश असतो, अशा विविध क्षेत्रांमधून आपल्या आवडीचे आणि कुवतीचे क्षेत्र निवडून मग त्यात उत्तुंग झेप मारायाची असते. त्यामुळेच शिक्षण, समाजकार्य, मानसशास्त्र, इतिहास अन अगदी ज्योर्तिंविद्याशास्त्र अशा क्षेत्रांत जेसुईटांनी मोठे योगदान दिल्याचे आढळते.

तर तिशीच्या आसपास असलेल्या फादर इनो यांनी विविध भौगोलिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमी असलेल्या आम्हा प्री-नॉव्हिस मुलांना फिल्म अँप्रेसिएशनचे, जागतिक कॅथॉलिक चर्चमध्ये सर्रासपणे वापरल्या जाणाऱ्या लॅटिन भाषेचे धडे दिलेच अन त्याशिवाय नृत्यकलेचीही दीक्षा दिली. टॅंगो टॅंगो डान्स असे शब्द त्यावेळी पहिल्यांदा ऐकले.

आम्हा विसपंचवीस मुलांचे वाढदिवस, जेसुईट संस्थेचा संस्थापक सेंट इग्नेशियस लोयोला आणि सेंट फ्रान्सिस झेव्हियर यांचे सण, ख्रिसमस वगैरे सण यानिमित्त सेलिब्रेशन व्हायचे तेव्हा ग्रुप डान्स हमखास व्हायचे, त्याकाळात सीडी प्लेअरचे युग आले नव्हते, मोबाईल वगैरे तर दूरच. त्यामुळे आगळे जण एकत्रितरीत्या गात असत अन त्याचबरोबर नृत्यसुद्धा करत असत. बुगी बुगी बुगी, गोल्यात सांखळी सोन्याची, ही पोरी कोनाची ' वगैरे गाणी नियमितपणे गायली जात.

पणजीतल्या चर्चशेजारी असलेल्या एका जुन्या इमारतीत पहिल्या मजल्यावर असलेल्या `क्लुबे नॅशनल' Clube Nacional येथे एकदा कुठल्यातरी कार्यक्रमानिमित्त - बहुधा कुणाच्या तरी लग्नानिमित्त - मी माझ्या मित्रांसह गेलो होतो. जुन्या सागवानी लाकडी फळ्यांचा तळ असलेल्या किंवा फ्लोअरवर अनेक दांपत्य म्युझिक बँडच्या तालावर नाचत होती. भरगच्चं गर्दीत नृत्याचा असा लाईव्ह कार्यक्रम पाहण्याची माझी ही पहिलीच वेळ, त्यामुळे अगदी बावचळून मी त्या गळ्यात टाय आणि सुटाबुटात असलेल्या पुरुषांकडे आणि अत्यंत स्टायलिश पोशाख केलेल्या महिलांकडे पाहत होतो.

त्यानंतर अशा अनेक कार्यक्रमांना हजर राहिलो, भिड मोडत गेली अन इतरांसह बिनदिक्कीतपणे मी या डान्स फ्लोअरवर जाऊ लागलो, इतरांबरोबर आणि अगदी मुलींबरोबरसुद्धा नाचू लागलो.

अशा सार्वजनिक कार्यक्रमांत तुम्ही कुणाबरोबरही नृत्य करू शकता, मात्र त्या व्यक्तीची सहमती असेल तर. `आय एम टायर्ड नाऊ' असं म्हणून ती दुसरी व्यक्ती नृत्य करण्याऐवजी आपल्या टेबलाकडे जाणं अधिक पसंत करू शकते. वॉऽल्स् या नृत्यप्रकारात नाचणाऱ्या स्त्री-पुरुषाचे पदलालित्य पणाला लागते आणि त्यांच्याकडे इतरांच्या नजरा खिळून राहतात.

चोवीस डिसेंबरला रात्री ख्रिसमसनिमित्त्त पणजी आणि गोव्यातल्या इतर शहरांत `ख्रिसमस बॉल्स' आयोजित केले जायचे. ख्रिसमसनिमित्त मिडनाईट मास असल्यानं त्याऐवजी `ख्रिसमस बॉल'ला हजेरी लावणं गैरकृत्य मानलं जायचं, त्याऐवजी थर्टीफर्स्ट डिसेंबरला म्हणजे जुन्या वर्षाला निरोप देत नव्या वर्षांचं स्वागत करण्यासाठी आयोजित केलेल्या ` न्यू ईअर बॉल'ला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद असायचा.

लग्नसमारंभ यासारख्या खासगी कार्यक्रमाला केवळ निमंत्रित व्यक्तीच हजेरी लावू शकतात, मात्र `न्यु ईअर बॉल्स' सारख्या नृत्याच्या कार्यक्रमांना तिकिटे असल्याने पैसे मोजून कुणीही येऊ शकतो, अर्थात त्यासाठी असलेला ड्रेस कोड वगैरे नियम पाळून.

अशा कार्यक्रमांना `जोडीनं' आलं तर उत्तमच असायचं, नाही तर आपल्या टेबलापाशी बसून केवळ इतरांना नृत्यात सहभागी होतांना पाहण्याची नामुष्की यायची. अशा अनेक नृत्याच्या कार्यक्रमांना उपस्थित असताना गोव्यात घरांघरांत लहानपणीच नृत्याचे, पदलालित्याचे धडे दिले जातात याचं महत्त्व कळालं.

पुरुषांबरोबर हस्तांदोलन करतो तसेच परक्या महिलेशी हस्तांदोलन करण्यात काही वावगे नाही याची जाणिव झाली. त्याशिवाय जवळचे नातेसंबंध किंवा स्नेहसंबंध असलेल्या मुलीला किंवा महिलेला भेटताना, वाढदिवस किंवा इतर कार्यक्रमांत त्यांच्या गालांवर चुम्बन घ्यायचं असतं, हा रीतिरिवाज लवकरच अंगवळणी पडला.

मात्र डान्स फ्लोअरवर आत्मविश्वासपुर्वक उभे राहण्याचा आणि अगदी परक्या तरुणींबरोबर वा महिलेसह नृत्य करण्याचा धीटपणा माझ्यात आला तो मी युरोपात अभ्यासक्रमासाठी गेलो तेव्हाच. गोव्यात `द नवहिंद टाइम्स' या इंग्रजी दैनिकात बातमीदार असताना गोवा युनियन ऑफ जर्नालिस्टसचा सरचिटणीस म्हणून बल्गेरियात पत्रकारितेच्या अभ्यासक्रमासाठी १९८६ ला माझी निवड झाली होती. मी त्याकाळच्या सोव्हिएत रशियाच्या मॉस्कोत ट्रान्झिट व्हिसावर मुक्काम करुन नंतर बल्गेरियाची राजधानी सोफिया येथे राहत होतो.

पत्रकारितेच्या अभ्यासक्रमाचे क्लासेस, विविध संस्थांना आणि स्थळांना भेटी दुपारपर्यंत असायच्या. सुरुवातीचे काही दिवस आम्ही सोफिया येथेच राहायचो, नंतर संपूर्ण बल्गेरियात हिंडलो. तर संध्याकाळी सात वाजताच आमचे जेवण असायचे, त्यानंतर आम्ही त्या गावच्या एखाद्या रेस्तोरेंमध्ये जायचो आणि रात्री नऊपर्यंत तिथं मौजमजा करायचो. एका रेस्तोरेंची ती घटना मला आजही आठवते. तिकडचे रेस्तोरें म्हणजे रस्त्यालगत कुंपण असलेले छोटेसे गार्डन, तिथंच अंधुकशा प्रकाशात खुर्च्या- टेबलं मांडलेल्या आणि एका कोपऱ्यात बार.

मित्रांसह मी व्होडक्याचा आस्वाद घेत असताना अचानक तिथल्या एका केंद्रस्थानी असलेल्या गोलाकार जागेत रंगीत प्रकाश पडू लागला आणि त्याचबरोबर मंद संगीत सुरु झाले. काही मिनिटे गेल्यानंतर एकदोन तरुण त्या प्रकाशझोत फिरत असलेल्या गोलाकार जागेत नृत्य लागले, काही तरुणीसुद्धा मग त्यांना सामील झाल्या. काही जण एकटेच नाचत होते, त्यांच्या साथीला कुणी आले तर आनंदांने त्यांचे स्वागत होत होतं.

तर डान्स फ्लोअरवर गोलाकार आणि विविध पद्धतीनं फिरणारा रंगीत प्रकाश पाहण्याची माझी ती पहिलीच वेळ. `डिस्को डान्स' हा शब्द त्यानंतर काही काळानंतर मी ऐकला. (रशिया आणि बल्गेरियाच्या या दौऱ्यात मी अशा अनेक गोष्टी आणि प्रसंग अगदी पहिल्यांदा अनुभवले, उदाहरणार्थ रॅम्पवरचा कॅट वॉक!)

मी स्वतः आणि आमच्यापैकी अनेक जण तो प्रकार आ वासून पाहात होते. किती सुंदर, आनंददायी प्रसंग होता तो. काही क्षणानंतर मी आणि माझे मित्रही त्या नृत्यात सामील झालो. काही जण एकटेच नाचत होते तर काही जणांनी तिथं असलेल्या तरुणींना साथ द्यायला सुरुवात केली होती. मीसुद्धा कधी एका मुलीसह नाचू लागलो हे मला कळालेही नाही.

बल्गेरियन भाषा एकादी मोडकीतोडकी - काही संवादापुरती - येत असल्यानं संवाद साधण्याचा प्रश्नच नव्हता. मात्र एकमेकांची देहबोली संभाषण साधण्यात यशस्वी ठरत होती.

मात्र एकदा तरुणींशी नृत्य करताना किंवा नृत्य झाल्यानंतर तिनं केलेली प्रतिक्रिया आजही माझ्या लक्षात आहे. ''आम्ही (भारतीय) लोक सेन्शूअस् पद्धतीने नृत्य करतो'' असं तिचं निरीक्षण होतं. ते एकूण मला धक्काच बसला होता. नृत्यात जोडीदारासह सहभागी होताना त्यात कामुक भावना असायलाच हवी, असं थोडंच आहे? पण अनेकदा तसं होतं हे मात्र खरं आहे.

तिचं ते वाक्य ऐकल्यावर आणि डान्स फ़्लोअरवर असलेल्या इतर लोकांना पाहिल्यावर माझ्या लक्षात आलं कि त्यापैकी काही जण एकटेच, आपल्याच जगात वावरत असल्यासारखं मस्तपैकी, एका वेगळ्याच धुंदीत नाचत होते, आपल्याजवळ येऊन कोण नाचत आहे, कशाप्रकारे नाचत आहेत, याविषयी त्यांना काही सोयरसुतक नव्हतं. असं स्वान्त सुखाय नाचून समाधान झालं कि ते मग आपल्या टेबलाकडे, आपल्या साथीदारांकडे जात होते.

यासंदर्भात आपल्या हिंदी चित्रपटांतील सर्वांत प्रख्यात नृत्यांगना हेलेन यांच्यांविषयी नेहेमीच म्हटलं गेलेलं वाक्य आठवतं. कॅबरे डान्सर म्हणून हेलेन यांनी अत्यंत कमी आणि थोडक्या कपड्यांत अनेक चित्रपटांत गाणी म्हटली आहेत, तरीसुद्धा त्यांचे पददालित्य आणि हावभाव `कामुक' भावना उत्तेजित करणारे म्हणजे `सेन्शूअस्' नव्हते असं म्हटलं जातं याची यासंदर्भात मला आठवण येते.

त्यानंतर बल्गेरियातील बुरगॉस, वार्ना आणि प्लॉवडीव शहरांतल्या अशा छोट्यामोठ्या हॉटेलांत अनेकदा वेगवेगळ्या मुलींबरोबर नृत्यांत सहभागी होण्याचा आनंद मी घेतला. हा, एक सांगायचं राहिलंच. जेसुईट धर्मगुरु म्हणून आजन्म संन्याशी राहण्याचे मी ठरवले होते तरी हा निर्णय नंतर मी बदलला होता. डान्स फ्लोअरवर मुलींबरोबर मनसोक्त नाचण्याचं ते आणखी एक कारण होतं.

गोवा सोडून नंतर पुण्यात इंडियन एक्सप्रेसला रुजू झालो तेव्हा लक्षात आलं कि गोव्यापेक्षा या शहरात लष्कराच्या कितीतरी अधिक आणि राष्ट्रीय पातळीवरच्या संस्था आहेत. पत्रकार म्हणून अशा अनेक संस्थांना वेळोवेळी भेटी देता आल्या आणि त्यावेळी ठळकपणे लक्षात राहिली ती या संस्थांतर्फे वेळोवेळी आयोजित केली जाणारी नेव्ही बॉल्स, एनडीए बॉल्स अशासारखे नृत्यांचे वार्षिक कार्यक्रम.

या कार्यक्रमांसाठी आम्हा पत्रकारांना आणि काही निमंत्रितांनाच प्रवेश असतो, त्या निमंत्रण पत्रिकेवर लक्ष गेलं कि मी स्वतःशीच हसायचो. या निमंत्रण पत्रिकेवर लिहिलेलं असायचं : ``Ladies are our guests ! '' या लष्करी संस्थांत मुली नसल्यानं या नृत्यात सहभागी होण्यासाठी मुलींना मुफ्त प्रवेश असतो. अशा मुलींमधून मग नृत्यनिपुण आणि सौंदर्यवती असलेल्या नेव्ही बॉल्स ब्युटी क्वीन, रनर अप यासारख्या किताबांसाठी निवड होत असते.

लग्नसमारंभांसारख्या सार्वजनिक कार्यक्रमांत पाश्चात्य पद्धतीच्या या नृत्यांत तुम्हाला कुणाही पुरुषाबरोबर किंवा महिलेबरोबर नृत्य करता येते. मात्र त्याबरोबर काही तडजोडी तुम्हाला कराव्या लागतात. उदाहरणार्थ, तुमची पत्नी इतर पुरुषांबरोबर अगदी आनंदात नाचते आहे असं दृश्य तुम्हाला पचवावं लागतं. अन्यथा मग आपल्या पत्नीसह आपल्या टेबलापाशीच बसून इतर जणांचे नृत्यकौशल्य पाहत राहण्याची तयारी ठेवावी. अगदी लहानपणापासून अशा नृत्यसमारंभांत सामील होत असल्यानं आता अशी दृशे पाहायची माझी मानसिक तयारी झाली आहे.

सहजसुंदरतेने नाचण्याचा अनुभव आणि आनंद मी घेतलाय आणि नेहेमी घेत असतो ते वसई येथील लग्नांत आणि इतर कार्यक्रमांत सहभागी होताना. पालघर जिल्ह्यातल्या या छोट्याशा वसई तालुक्यांत काही वेगळ्या बोलीभाषा बोलल्या जातात आणि तिथं मोठ्या संख्येनं आलेल्या कॅथोलिक समाजाची एक वेगळी अशी संस्कृती आहे.

काही शतकांपूर्वी म्हणजे ब्रिटिशांनी भारतात आपली सत्ता स्थापन करण्याआधीच पोर्तुगीजांनी वसईत आपला पाय रोवला होता. पोर्तुगिजांच्या या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाच्या कितीतरी खुणा वसईच्या अनेक भागांत आजही स्पष्टपणे दिसतात. वसईतील कॅथॉलिक लग्नासमारंभांत तर हा वारसा अधिकच दिसून येतो.

वसईत लग्नांच्या कार्यक्रमांत पारंपरिक आणि पाश्चात्य अशी दोन्हीही पद्धतीने नाचगाणी होतात आणि गेली तिसेक वर्षे या नाचगाण्यात मी खूप आनंदानं सहभागी झालो आहे.

वसईच्या लग्नात विविध पारंपरिक कार्यक्रमांसाठी किंवा नवरी-नवरदेवाच्या घरुन चर्चकडे मिरवणूक निघते तेव्हा पारंपरिक पद्धतीचा म्युझिक बँड असतो आणि या बँडच्या तालावर मिरवणुकीत सहभागी झालेल्या विविध वयोगटांच्या लोकांची - स्त्री-पुरुषांची - पावलं विशिष्ट पद्धतीनं अगदी लयीत पुढंमागं होत असतात. हे दृश्य अगदी पाहण्यासारखं असतं आणि अगदी त्या नृत्याबाबत अपरिचित असलेल्या व्यक्तीलासुद्धा त्या नृत्यात सहभागी व्हावं अशी इच्छा निर्माण होत असते.

पंतप्रधान इंदिरा गांधी अनेकदा विविध राज्यांतल्या आदिवासी लोंकांच्या पारंपरिक नृत्यांत अगदी सहजगत्या होताना दिसत असता. त्या काळात आजच्यासारखी व्हिडीओ शुटिंग प्रगत नव्हते तरी आदिवासी लोंकांबरोबर नाचताना त्यांच्या अनेक छबी उपलब्ध आहेत. असं मोकळेपणे, सह्जतेने नाचताना बहुधा पुरुष राजकीय नेत्यांना शक्य होत नाही.

आदिवासी आणि समूहनृत्य असं अविभाज्य समीकरण झालेलं दिसतं. प्रजासत्ताक दिनानिमित्त देशाच्या राजधानीत किंवा इतर कार्यक्रमांत आदिवासींची नृत्ये हमखास दाखवतात. कुणी मोठी व्यक्ती आली कि त्यांच्यासमोर आदिवासी लोकांना त्यांच्या पारंपरिक पोषाखांत नाचवायचं अशी एक प्रथा रुढ आहे. अलीकडेच ` The Adivasis Will Not Dance' हे पुस्तक वेगळ्याच कारणानं , महनीय पाहुण्यांसमोर आदिवासींचा केवळ `नाचवण्यासाठी' वापर केला जातो, त्यामुळे ते यापुढे असे नाचणार नाहीत, अशा विद्रोही सुरामुळे हॉन्सदा सौभेंद्र शेखर यांचं हे पुस्तक गाजत आहे.

आदिवासींपेक्षा अधिक प्रागतिक समजल्या जाणाऱ्या नागरी समाजघटकांत अशी समूहनृत्ये का बरी नसावीत ? याची अनेक समाजशास्त्रीय करणे कारणे असतील, त्यापैकी नागरी समाज आपल्या जीवनात सहजपणा, नैसर्गिकता हरवतो हे कदाचित असू शकेल.

अलिकडेच घरातलं एक लग्न पार पडलं तेव्हा संगीत, गाणं आणि नाचणं होतंच. आम्हां दोघांना नाचावं लागलं. मात्र त्या सगळ्या नाचण्याच्या कार्यक्रमात वयानं खूप ज्येष्ठ असलेल्या एका व्यक्तीनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. पंच्याहत्तरीच्या आसपास वय असलं तरी जॉनी अंकल शास्त्रशुद्ध पद्धतीनं आणि मनसोक्त नाचत होते आणि इतरांना - अगदी महिलांना सुध्दा -आपल्या बरोबर घेऊन नाचत होते.

नृत्यांत निपुण असलेली काही जोडपी अशा कार्यक्रमांत सर्वांचे लक्ष वेधून घेत असतात. त्याशिवाय पदलालित्य वगैरे बाबतीत फार काटेकोर नसलेली विविध वयोगटांची जोडपीसुद्धा एकमेकांच्या खांद्यांवर आणि कंबरेवर हात ठेवून डान्स फ्लोअरवर बराच काळ राहतात, त्यांच्याविषयीसुद्धा मला कौतुकच वाटत असतं.

दोन वर्षांपूर्वी एका नातेवाईकाच्या लग्नाला गेलो होतो. एकीकडे जेवण चालू असताना लाईव्ह म्युझिक चालू होतं आणि मध्यभागी जोडपी आणि इतर लोक नाचत होती. बहुतेक सर्व गाणी इंग्रजी आणि पार्टी सॉंग्स होती अधूनमधून मास्टर ऑफ सेरेमनी सर्वांना डान्स फ्लोअरवर येण्यास प्रवृत्त करत होता. शेवटी रात्रीचे दहा वाजत असल्यानं शेवटचं एक गाणं होणार असल्याचं जाहीर झालं. ते शेवटचं गाणं सुरु झालं आणि नृत्य करणाऱ्या लोकांबरोबरच इतरांमध्येही वेगळाच जोष निर्माण झाला. मग इतर खूप जण डान्स फ्लोअरवर आले आणि गाण्याचे बोल म्हणत उत्साहानं नाचू लागले.

ते गाणं होतं नागराज मंजुळे यांच्या `सैराट' चित्रपटातलं `झिंग झिंग झिंगाट'.

त्या गाण्याचं वन्स मोअर झाल्यानंतरच तिथला नाचगाण्याचा कार्यक्रम संपला. यावेळी अजय-अतुल यांच्या संगीताच्या तालावर लोक अगदी देहभान हरपून मोठ्या आनंदात नाचताना दिसत होते.

नव्या वर्षाचे स्वागत करण्याचे निमित्त साधून चर्चतर्फेच चालवल्या पूर्णतः चॅरिटीवर चालणाऱ्या एका दवाखान्याच्या आर्थिक मदतीसाठी चालू ख्रिसमस विकमध्ये न्यु इयर बॉल आयोजित केले आहे. चर्च आणि नृत्याचा कार्यक्रम आणि तोदेखील दवाखान्याच्या आर्थिक मदतीसाठी हा प्रकार अनेकांना अचंबित करणारा असू शकेल पण त्यात नवलाईची तशी काही बाब नाही.

आम्हा दोघांसाठी मी या डान्सची तिकिटं विकत घेतली आहेत. हा कार्यक्रम आर्थिक मदतीसाठी होणार असल्यानं त्याशिवाय आणखी कुणा मित्रांना देण्यासाठी अधिक दोन पासेस विकत घेतले आहेत.

नाचण्यानं पाय मोकळी होतात आणि त्याबरोबरच मनसुद्धा.

(लेखक कामिल पारखे ज्येष्ठ पत्रकार आहेत)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com