नव्या वर्षाचा असाही एक संकल्प करूया

new year story by dr pramod farande
new year story by dr pramod farande

दरवर्षी ‘नवे वर्ष नवे संकल्प’ करीत आपण मार्गक्रमण करीत असतो, विकसित, प्रगत होत असतो. बदल हा स्थायीभाव असल्याने एकूण मानवात अनेक बदल झालेले आपल्याला दिसतात. जसे नवे शोध, तंत्रज्ञानाच्या उगमातून मानवी जीवनात क्रांतिकारी बदल झाले आहेत. सध्याच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात ज्ञानाची कवाडे अधिक खुली होऊन जग जवळ आले. संपूर्ण जगच ऑनलाईन झाले आहे. इंटरनेट, सोशल मीडियाचा सर्वांत जास्त प्रभाव आपल्या सर्वांच्या विचारप्रक्रियेवर पडत आहे. यामधून येणारी प्रत्येक गोष्ट आपल्याला खरी वाटू लागली आहे. अमेरिकेतील एका संशोधनातून, निरोगी व्यक्ती दिवसभरात अडीच हजाराहून अधिक वेळा आपल्या मोबाईलला हात लावत असल्याचा निष्कर्ष समोर आलेला आहे.

इतके आपले मनोविश्‍व सोशल मीडियाने व्यापले आहे. प्रिय व्यक्तीने जसे काहीही सांगितले तरी खरे वाटते, त्याप्रमाणे सोशल मीडियातील प्रत्येक शब्दावर आपण अंधविश्‍वास ठेवतो. त्यातून अनेकांची फसगत झाल्याचे उघड होत आहे. आपला देश जगातील सर्वाधिक तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो. जगभरात ज्या काही क्रांती, सामाजिक, आर्थिक, औद्योगिक परिवर्तन झाले, त्यामध्ये तरुणाई अग्रभागी होती. त्यामुळे साहजिकच साऱ्या जगाचे लक्ष आपल्या देशाकडे लागले आहे. पण तरुणाईवर सोशल मीडियाचे गारूड झालेले आहे. बहुतांश तरुणाई रोज दोन जीबी डाटा संपवण्यात व्यग्र दिसत आहे. ती आभासी जगात वावरू लागली आहे. सोशल मीडियाने अनेकांचे विचारविश्‍व, मेंदू व्यापला आहे.

अपप्रवृत्तीकडून त्याचा गैरफायदाही उठविला जात आहे. असत्य, खोटे, संदर्भाची मोडतोड करून लोकांच्या भावना भडकतील असे लिखाण करून समाजस्वास्थ्य बिघडविले जात आहे. आपल्या देशात विविध जाती-धर्मांचे लोक एकोप्याने राहतात हे देशाचे वैशिष्ट्य आहे. त्यावरच काही जण जाणीवपूर्वक हल्ला करत आहेत. त्याला अनेक लोक बळी पडून इतरांविषयी मने कलुषित होत आहेत. समाजात एकमेकांविषयी गैरसमज निर्माण होत आहेत. या देशाने जगाला स्वातंत्र्य, समता, बंधुतेची शिकवण दिली. त्यावर आधारित समाजनिर्मितीसाठी अनेक संत, महापुरुष, समाजसुधारकांनी आपले आयुष्य खर्ची घातले. स्वातंत्र्यलढ्यात सर्वच जाती-धर्मातील लोकांनी प्राणाची आहुती दिली. या मागे हा देश एकसंध राहून देशातील प्रत्येक नागरिकाला विकासाची संधी मिळावी, देश अधिक उन्नत व्हावा हे ध्येय होते.

धर्मा-धर्मात, जाती-जातीत भांडणे लावल्यास देश उद्‌ध्वस्त होण्यास वेळ लागणार नाही, असे जगभरातील तत्त्ववेत्त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे सोशल मीडियातून पसरविले जाणारे जातिभेदाचे विष, धर्माविषयीच्या अपप्रचाराला बळी न पडणे यातच हित आहे. नववर्षात संकल्प करताना सोशल मीडियातील द्वेषभावना वाढीस लावणाऱ्या लिखाणाला आपल्या विचारविश्‍वात स्थान न देण्याचा व या माध्यमाचा नवनिर्मितीसाठी वापर करण्याचा संकल्प करूया आणि जगाला हेवा वाटावा असा देश निर्माण करूया!

संपादन- अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com