नायजेरीया...सारे काही राम भरोसे : अनुभव सातासमुद्रापारचे 

आशुतोष गांगरस, लागोस (नायजेरिया) 
शनिवार, 23 मे 2020

नायजेरिया...आफ्रिकेतील या देश सतत यादवीने ग्रासलेला. ओघानेच गरिबीने पिळून निघालेला. कोरोनासारखी आपत्तीला फुलायला इथे मोठा वाव. टाळेबंदीची चैन इथे न परवडणारी. मग सरकारने शेवटी ती उठवून टाकली.

नायजेरिया...आफ्रिकेतील या देश सतत यादवीने ग्रासलेला. ओघानेच गरिबीने पिळून निघालेला. कोरोनासारखी आपत्तीला फुलायला इथे मोठा वाव. टाळेबंदीची चैन इथे न परवडणारी. मग सरकारने शेवटी ती उठवून टाकली. इथे शासकीय आकडेवारी पाहता कोरोनाची भयावहता फार नाही मात्र एकूण इथली वैद्यकीय व्यवस्था पाहिली तर मात्र सारे काही राम भरोसेच ! 

भारताप्रमाणेच इथे 23 मार्चपासून टाळेबंदी सुरू झाली. महिनाभर चालली पण लोक रस्त्यावर यायला सुरवात झाली. आम्हाला भुकेने मरण्यापेक्षा कोरोनाने मरू द्या, अशी हाक देत लोकांनी सरकारला टाळेबंदी मागे घ्यायला भाग पाडले. आता दिवसभर सारे व्यवहार सुरू असतात. रात्री संचारबंदी असते. 

अज्ञातात सुख असतं. तसंच इथं आहे. सरकार फक्त सतरा हजार रुग्णसंख्या सांगते. चाचण्याच होत नसतील तर कळणार कसे? सुमारे 17 कोटींच्या या देशात व्हेटींलेटर आहेत अवघे सात. त्यातला एक अध्यक्षांनी राखीव करून ठेवला आहे म्हणे. अध्यक्षांचा सचिवच कोरोनाने नुकताच मेला. यावरून इथल्या वैद्यकीय व्यवस्थेची तयारी लक्षात यावी. सध्या कोरोना हॉस्पिटल म्हणून एका स्टेडीयममध्ये तंबू टाकला आहे. लोक तिकडे जाण्यापेक्षा घरीच राहणे पसंत करतात. त्यामुळेही अनेकजण दगावले असावेत. लोक प्रतिकार क्षमतेवर निभावून जातील असे वाटते. तसे झाले तर कृपाच. काहींच्या मते, आफ्रिका कोविडचे दुसरे केंद्र ठरेल. काय होईल कोण जाणे ! 

आमच्या शहर व परिसरातील पंधरा भारतीयांना कोरोनाने गाठले आहे. सध्या नायजेरियात सुमारे पंधरा हजार भारतीय आहेत. भारतीयांच्या मंडळाने एकत्र येत इथे सव्वाशे बेडचे तात्पुरते हॉस्पिटल उभे केले आहे. पाच-सहा भारतीय डॉक्‍टर आहेत. त्यांनी भारतीयांना त्रास होत असेल तर घरी थांबू नका इकडे या, असं आवाहन केलंय. ही एक इथल्या त्रासदायक स्थितीतील आशादायक गोष्ट. 

नायजेरिया आफ्रिका खंडातील सर्वाधिक लोकसंख्येचा तर जगातील सातव्या क्रमांकाच्या लोकसंख्येचा देश आहे. इथली सारी अर्थव्यवस्था तेलावरची. मी इथे पाच-सहा वर्षांपासून भारतातून धान्य निर्यातीच्या व्यवसाय करतो. वर्षातून तीन महिने मी इथे असतो. 26 मार्चला पुण्याचे माझे तिकीट होते, मात्र नेमका टाळेबंदीत अडकलो. माझी परिस्थिती बरी. पण इथल्या सामान्य माणसांचे जगणे बिकट आहे. आपले सरकार "वंदे भारत' योजनेचा बराच गाजावाजा करतेय. मात्र इथे अजून एकही विमान फिरकलेले नाही. 23 मे रोजी ते येणार होते असं सांगितले होते, मात्र ते आता 2 जूनला येणार असं सांगतात. त्यातून जाणार दोन अडीचशे लोक. या गतीने कदाचित मला भारतात परतायला दोन वर्षे लागतील. 

प्रत्येकाला आपल्या देशात यायचे आहे. पण सर्वच देशांच्या विमानसेवा सुरू झाल्या तरच ते लगेच शक्‍य होईल. आशा करुयात की तसे व्हावे. व्हीसा वाढवून मिळणे इथे फार अवघड नाही. कारण थोडी चिरिमिरी हातावर ठेवली की भागते. मात्र इस्लामिक अतिरेकी संघटनांच्या एकूण प्रभावाखालील इथली अर्थ-प्रशासन व्यवस्था आहे. रुग्णसंख्या फार दिसत नाही. मात्र उपचारच नाहीत. ही स्थिती खूप वाईट आहे. पुण्या-मुंबईतही तीच स्थिती असल्याने आम्ही इथे बरेच आहोत, असं स्वतःलाच सांगायचं. 

इतर ब्लॉग्स

संपादकीय बातम्या