कोरोना लॉकडाउन : व्यक्ती आणि वल्ली

नितीन बक्षी
Sunday, 26 April 2020

मित्रांनो, कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे आपल्यावर जे लॉकडाउन लादण्यात आले आहे, त्या दरम्यान संपूर्ण समाजामध्ये संमिश्र भावना दाटल्याचे आढळून येत आहे. समाजातील वेगवेगळ्या स्तरावरील व्यक्तींच्या मनात भीती, उदासी, बेफिकरी, राग, आळशीपणा, चंगळवादी वृत्ती, वैताग असे वेगवेगळे भाव दाटलेले दिसतात. याच मनोवृत्तींवर आधारित वेगवेगळे व्यक्तीसमूह समाजात निर्माण झाले आहेत.

मित्रांनो, कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे आपल्यावर जे लॉकडाउन लादण्यात आले आहे, त्या दरम्यान संपूर्ण समाजामध्ये संमिश्र भावना दाटल्याचे आढळून येत आहे. समाजातील वेगवेगळ्या स्तरावरील व्यक्तींच्या मनात भीती, उदासी, बेफिकरी, राग, आळशीपणा, चंगळवादी वृत्ती, वैताग असे वेगवेगळे भाव दाटलेले दिसतात. याच मनोवृत्तींवर आधारित वेगवेगळे व्यक्तीसमूह समाजात निर्माण झाले आहेत. आज आपण या सर्वच व्यक्तीसमुहांचा आणि त्यांच्या मनातील भाव-भावनांचा किंवा वृत्तींचा विचार करणार आहोत. आपण या भाव-भानांचा विचार करताना आवश्यक ती मनोरंजनात्मक कारणीमीमांसा करण्याचा प्रयत्न देखील करणार आहोत. अर्थातच आजच्या लॉकडाउनच्या काळात प्रत्येक व्यक्ती आपला व्यक्तीसमूह बरोबर की, चूक हे ठरविण्यास स्वतंत्र आहे.

मनात भीतीची भावना ठेवणारा व्यक्तीसमूह : आपल्या एकंदरीत लोकसंख्येचा विचार केला तर जवळपास साठ टक्के लोक या समूहात आहेत. दुबळी मनोवृत्ती आणि नकारात्मक विचारसरणी हाच या व्यक्तीसमुहाचा स्थायी भाव. कोरोनाचा झपाट्याने वाढणारा प्रादुर्भाव, त्या विषयी मीडियावर होणारा नकारात्मक प्रचार, वाढणारी मृतांची संख्या आणि कोरोनावर कोणत्याही प्रकारची उपाययोजना उपलब्ध नाही ही वास्तविकता ही सर्व ती कारणे आहेत. ज्यामुळे या व्यक्तीसमूहाच्या मनात प्रचंड भीतीची भावना निर्माण झाली आहे. या समूहामध्ये वयोवृद्ध व्यक्ती, मृत्यूविषयी प्रचंड भीती मनात असणाऱ्या व्यक्ती तसेच नेहमी नकारात्मक विचार करणाऱ्या व्यक्तींचा प्रामुख्याने समावेश आहे. या व्यक्तींना जर दुर्दैवाने कोरोनाचा प्रादुर्भाव झाला तर त्या मानसिकरित्या पहिलेच खचून जातात. अश्या व्यक्तींच्या मानसिकतेमध्ये परिवर्तन घडवून आणणे अत्यावश्यक आहे.

मनात उदास भावना ठेवणारा व्यक्तीसमूह : या समूहातील व्यक्ती मूलतः नुसत्याच नकारात्मक असतात असे नाही तर त्यांच्या मनात काही करण्याचीच भावना नसते. बरेचदा ह्या व्यक्ती आपल्या नकारात्मक भावनांचे उदात्तीकरण करत असतात. आता कोरोना आला आहे तर मग जे आहे ते होणारच आहे. अपघात होऊन मरणे काय किंवा कोरोना होऊन मारणे काय यात काही विशेष फरक ह्यांना वाटत नाही. आपल्या आयुष्यात ह्यांनी काहीही केले नसल्याने कोरोनाचे आव्हान स्वीकारणे वगैरे गोष्टी ह्यांना अगदी अनावश्यक वाटतात. सगळ्यात वाईट बाब ही की, हा समूह स्वतःलाच काय ते सगळे समजते अश्या विचारांचा असल्याने त्यांना समजावून सांगणे महत्कठीण कर्म आहे.

बेफिकीर वृत्तीने जगणारा व्यक्ती समूह : एका अर्थाने विचार करता हा समूह स्वतःला पूर्णपणे शहाणा समजणारा समूह आहे. आपण घराबाहेर जाऊ, आपण नियमांचे पालन नाही करू, आपल्याला जे शौक असतील ते तर आपण पूर्ण करणारच, आता लॉकडाउन आहे तर आम्ही काय करावे, आम्ही काय जगणे सोडून द्यावे, पहिले तर आम्हाला कोरोना होतच नाही आणि आता झाला तर झाला, उद्या कोणी पहिला आहे त्यामुळे आजच दिवस तर मजेत घालवू असे एका न अनेक प्रकारचे विचार करणारा हा समूह. तसे पहिले तर बेफिकीर असणे आणि मूर्ख असणे यात काही खूप मोठा फरक नाही. या व्यक्तीसमूह स्वतःसाठीच नव्हे तर समाजासाठी सुद्धा अतिशय घातक सिद्ध होऊ शकतो. या विचार प्रवृत्तीला वेळीच आवर घालणे ही आजची गरज होऊन बसली आहे.

चंगळवादी वृत्तीचा व्यक्ती समूह : या व्यक्तीसमुहातील लोक म्हणजे आजच्या काळातील सरकारी, निमसरकारी किंवा खासगी नोकरी करणारे लोक आहेत. आता ऑफिसमध्ये जाता येत नाही त्यामुळे दिवसभर आराम करणे हाच ह्यांचा वेळ घालवायचा फंडा. दोन वेळा नाश्ता, दोन वेळा चमचमीत जेवण आणि कितीतरी वेळा चहा-कॉफी, टीपॉयवर पाय टाकून दिवसभर टीवीवर बातम्या किंवा सिनेमे पाहणे हीच या समूहाची लॉकडाउनमध्ये वेळ घालवायची पद्धत. जेव्हा लॉकडाउन संपल्यावर ह्यांना कामावर जावे लागेल तेव्हा हे असे कर्मदरिद्री आहेत की, ‘कोरोना जरा लवकरच गेला’ अशी कॉमेंट मनातल्या मनात करायला हे कमी करणार नाही.

सकारात्मक लोकांचा व्यक्तीसमूह : या व्यक्तीसमूहामध्ये अर्थातच बोटावर मोजता येईल अशीच मंडळी आहे. कोरोना आहे म्हणून आता काय हातावर हात धरून बसायचे असा सवाल ही मंडळी इतरांना करतात. कोरोनामुळे आलेले लॉकडाउन ही संपूर्ण देशावरील आपत्ती असल्याने देशाला, कोरोनाग्रस्तांना, गरीब लोकांना मदत करणे ही असा व्यक्तीसमूह आपली सामाजिक बांधिलकी समजतो. हा समूह प्रतिभाशाली लोकांचा असल्याने कोरोना काय आहे आणि त्याचे किती आणि कसे दूरगामी परिणाम होऊ शकतात याची ह्यांना पूर्ण जाणीव आहे. त्यामुळे हे सर्व नियमाचे मनापासून पालन करतात आणि इतरांना करायला लावतात. त्या नंतर आपली नोकरी किंवा व्यवसाय या परिस्थितीत वेगळ्या पद्धतीने कसा करता येईल याचा विचार हे सर्वप्रथम करतात. आपला व्यवसाय किंवा नोकरी काही वेगळ्या पद्धतीने करून कोरोना सारख्या संकटावर मात करण्यासाठी समाजाच्या विकासात काय हातभार लावता येईल याचा विचार हा व्यक्तीसमुह सातत्याने करतो. अर्थातच असा व्यक्तीसमूह हा समाजासाठी आदर्श प्रस्थापित करून लोकोत्तर कार्य करून जातो.

या विवेचनावरून प्रत्येक व्यक्तीस आपण कोणत्या व्यक्तीसमुहाचा भाग आहोत हे समजायला काही विशेष वेळ लागणार नाही. आपला व्यक्तीसमूह कळल्यानंतर देशासाठी आणि समाजासाठी आपली बांधिलकी ओळखून आपल्या मनातील चुकीच्या भावनांचा त्याग करून कोरोना सारख्या वैश्विक महामारीला आव्हान देण्यासाठी आपण सर्वांनीच सकारात्मक व्यक्तीसमुहात आपण कसे राहू याचा प्रकर्षाने विचार करणे आवश्यक आहे.

इतर ब्लॉग्स