

pune nostalgia
esakal
श्रीकृष्ण वा. देव
सहकार नगर नं. २, पुणे ९
माझ्या लहानपणीच्या पुण्याची आठवण झाली की मन आनंदाने व आठवणीने भरून येते. आज पुण्याचा कायापालट झाला आहे. त्यावेळचे पुणे हे अत्यंत शांत, सुंदर व आल्हाददायक होते. त्यावेळचे राहणीमान खूपच साधे व सरळ व धार्मिक होते. त्यावेळी अन्नाला, पाण्याला खूप गोड चव होती. सर्वच समाज अत्यंत सुखी व समाधानी होता. आम्ही त्यावेळी मंडईजवळ बारी वाड्यात राहत होतो. त्यावेळी वाड्यात ३० बिऱ्हाडे होती. वाड्यातील वातावरण अत्यंत चांगले होते. कुणाकडे भजी केली किंवा खमंग चिवडा केला की त्याचा वास सबंध वाड्यात येत असे. कुणाचे लग्नकार्य असले तर सर्वजण आपल्या घरचे कार्य समजून मदत करीत असत. कुणाचे दुखले खुपले तरी सर्वांचे हात मदतीसाठी पुढे येत असत. खूप गुण्यागोविंदाने माणसे रहात होती.
आमच्या घरात आईवडील व चार भावंडे. खूप श्रीमंत नसले तरी खाऊन पिऊन सुखी होतो. अशी अनेक कुटुंबे व नातेवाईक यांच्यात खूप आपलेपणा असे. ते दिवस आठवले की डोळ्यातून अश्रू येतात. आताच्या फ्लॅट संस्कृतीमुळे या गोष्टी लोप पावल्या आहेत. माणूस आपमतलबी व स्वार्थी झाला आहे असे वाटते.