
ऐन गणेशोत्सवातील मिरणुकीच्या काळात रात्री उशीरा पुण्यातील रोडवर फिरत होतो. गणेश मंडळांच्या मिरवणुकीतील देखाव्याशिवाय भिरभिरत्या नजरेने काहीतरी टिपण्यासाठी मी सतत शोधक नजरेने पाहत होतो. त्यावेळी पेठातील रस्त्यावर मला एका डोंबाऱ्याचं कुटुंब दिसलं. दोन-दोन बांबू उभे करून बांधलेल्या दोरीच्या एका बाजूला एक कोवळी पोरगी बसली होती. जेव्हा मी तिच्याकडे बघितलं तेव्हा ती त्या दोरी बांधलेल्या काठ्यांवर गुडघ्यात डोकं खुपसून हमसून हमसून रडताना मला दिसली. ती दिवसभर त्या दोरीवर चालत होती. थकली असेल बिचारी. पण जसजसा लोकांचा लोंढा येताना तिच्या आईला दिसला तेव्हा तिच्या आईने आवाज दिला अन् ती परत उभी राहून दोरीवर चालायला लागली. पण त्या चिमुकलीच्या डोळ्यातील पाणी क्षणात काळजाला भिडून गेलं.
जेमतेम १०-११ वर्षाची पोर असेल ती. तिची आई खाली बसून ढोल वाजवत होती. पण त्या माऊलीच्या चेहऱ्यावर कोणतेच भाव दिसत नव्हते. एक छोटं बाळ बाजूला समोस्याचा कागद चिवडत असताना मध्येच नाचण्याचा आव आणत होतं. दोरीच्या खाली ठेवलेल्या ताटात काही चिल्लर अन् १०-१० च्या तीन-चार नोटा होत्या. ढोलाच्या तालावर ती पोर दोरीवरून खाली वर होत पुढे सरकत होती. ढोलाचा ठेका, दोरीची हालचाल, पुढे पुढे सरकत राहणारी ती पोर अन् ढोलाच्या तालावर बाळाचे डोलावणारे हात. सगळं काही अलबेल होतं.
गर्दीत मी पुढेपुढे जात होतो. सेम दृश्य. फक्त इथे हा पोरगा उभ्या केलेल्या बांबूचा आधार घेऊन उभा होता. तराटलेल्या डोळ्याचा आणि एक पाय दुसऱ्या गुडघ्यावर ठेवलेल्या त्या १०-१२ वर्षाच्या पोराचा फोटो टिपला. लगेच त्याचे भाव बदलले अन् चोरून माझ्याकडे पाहू लागला. बाजूला एका टॉवेलवर रिंग होती. एक पाचेक वर्षाची चिमुकली हातात दुसरी रिंग घेऊन तिथेच बागडत होती. त्याची बहिण असावी बहुतेक. पण अतिशय लवचिक. क्षणात त्या रिंगमधून आख्ख शरीर इकडून तिकडे करायची अन् गर्दीतले निरागस चेहरे शोधून मागायला यायची. कोण दहाची नोट द्याचचं कोण मान डोलावून पुढे निघून जायचं. पण तिच्या चेहऱ्यावरचे भाव सारखेच. काहीच बदल नाही. इथे ढोल वाजत नव्हता पण सगळं काही सेम. अलबेल.
एव्हाना गर्दी वाढायला सुरूवात झाली होती. घोळक्याने मुलं, मुली पेठाच्या रस्त्यावर येत होते. काही श्रीमंत घरातील लोकं आपापल्या मुलांना घेऊन गणपतीच्या देखाव्याचा आनंद घेत होते. या गर्दीतून मी पुढे पुढे जात होतो. वेगवेगळ्या आकाराचे फुगे विकणारे लेकरं फिरत होते. आईवडिलांनी त्यांच्या हातात चार-पाच वेगवेगळ्या आकाराचे फुगे देऊन विकण्यासाठी पाठवलं असेल बहुतेक. चालत असताना एका श्रीमंत बापाच्या पोराने त्याच्या आईला फुगा घेण्यासाठी हट्ट केल्याचं दिसलं. मागोवा घेत मीही तिथेच रेंगाळलो. अखेर ६० रूपये किंमत सांगितलेला फुगा २० रूपयाला घेण्यात आला. गर्दी हळूहळू पुढे सरकत होती. इथंही सगळं काही अलबेल.
फिरून फिरून मला आता कंटाळा आला होता. रूमच्या वाटेला लागायचं ठरवलं रस्ता बदलण्यासाठी आता टिळक रोडला जावं लागणार होतं. मी चौकात आलो. फुटपाथवर एका फुगेवाल्याचं लेकरू बिनधास्त पाय लांबून पहुडलं होतं. कशाचीच पर्वा नव्हती त्याला. शेजारी झोपलेली त्याची आई असावी बहुतेक. बाजूला फुग्यांचा गुच्छ पडला होता. पण ते घेण्याची कुणाचीही हिंमत होत नव्हती. दोघेही चौकातल्या फुटपाथवर बिनधास्त झोपले होते. माझा गणपती देखावा बघण्याचा उत्साह कधीच मावळला होता. अस्वस्थ झालो होतो मी. एवढा खर्च करून केलेल्या सजावटीचं, देखाव्याचं मला काहीच कौतुक वाटत नव्हतं. चालणं सुरूच होतं. चालता चालता एका ठिकाणी फुलांचा सुगंध आला. त्या सुंगधित फुलांपेक्षा फुलं विकाणाऱ्या बाईच्या कुशीतली चिमुकली जास्त आकर्षक वाटली मला. मला जास्त वेळ रेंगाळायचं नव्हतं आता. एक फुल २० रूपयांना होतं पण गरज नसतानाही २० रूपयाचं फुल घेऊन पुढे निघालो.
मी गर्दीतून आता बराचसा बाजूला आलो होतो. रूमच्या रस्त्याने मी जात होतो. पायात मुंडके घालून बसलेली मुलगी, गुडघ्यावर पाय ठेवून दोरीच्या आधाराने उभ्या असलेल्या मुलापासून ते फुटपाथवर बिनधास्त पहुडलेल्या आणि समोस्याचा कागद चिवडत असेलेल्या लेकरांच्या आयुष्याचं काय होत असेल पुढे? हा प्रश्न मनाला चाटून गेला. फुटपाथवर वस्तू विकणार? की असंच पिढ्यान् पिढ्या दोरीवर चालावं लागणार त्यांना? मग त्यांच्या शिक्षणाचं काय? त्यांचं काय करायचंय आपल्याला? आपलं बरं आहे त्यांच्या तुलनेत. हे मनात आल्यावर हायसं वाटलं. त्यांच्या शिक्षणाचं काय करायचंय आपल्याला? आणि आपण काही आवाज उठवलाच तर आपल्याला काय मिळणार त्याच्या बदल्यात? तरीही आवाज उठवलाच तर त्यांना खरंच मदत मिळणारे का? त्यांच्या समस्या सुटणारेत का? बदल होणारे का? अशा अनेक प्रश्नांनी मनात घर केलं 'पण'...
बघता बघता टिळक चौकाजवळ पोहोचलो होतो. डीजेचा आवाज येऊ लागला होता. पण दोरीवर चालण्यासाठी वाजवलेल्या ढोलाच्या आवाजापुढे टिळक चौकातल्या गणपती विसर्जन मिरवणुकीतील डीजेचा आवाज फिका वाटला मला. "तूच सुखकर्ता तूच दु:खहर्ता अवघ्या दिनांच्या नाथा, बाप्पा मोरया रे चरणी ठेवितो माथा" हे गणरायाचं गाणं वाजत होतं. पुढे जाताना खांद्यावर ढोल घेऊन जाणाऱ्या डोंबाऱ्याच्या लेकराचे कुटुंब दिसलं. मी मागे मागे चालत होतो. ते कुटुंब माझ्या पुढं. बिनधास्त. सगळं कसं अलबेल!!!
- दत्ता लवांडे (dattalawande9696@gmail.com)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.