esakal | मनात होतेय वेदनांची गर्दी..!
sakal

बोलून बातमी शोधा

मनात होतेय वेदनांची गर्दी..!

मनात होतेय वेदनांची गर्दी..!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वेदना आणि माणसाचे खूप पूर्वीपासूनचे नाते आहे. जेव्हा माणूस जन्माला आला तेव्हा देवाने वेदनेचा, दुःखाचा संबंध माणसाशी जोडला असावा.

हॉस्पिटलच्या रूममध्ये एक स्त्री कळवळत होती. तिच्या बाळंतपणाची वेळ आली असता, वेदनेच्या गर्दीत ती एकाच सुखकर जीव निर्माण करण्याच्या ध्येयाकडे वाटचाल करीत होती. वेदनेच्या त्या विश्वातच तिला ऑपरेशन थिएटरमध्ये घेतले गेले. डॉक्‍टरांची टीम घेऊन कार्य सुरू झाले होते. काही क्षणातच तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला. वेदना क्षमल्या आणि गोंडस बाळाचा चेहरा बघत तिच्या डोळ्यात अश्रू आले. सुखद वेदनांचा संगम मी पहिल्यांदाच पाहिला होता; परंतु प्रत्येक वेळी असे घडतेच असे नाही. (Pain and man have a pre-existing relationship-ssd73)

वेदना आणि माणसाचे खूप पूर्वीपासूनचे नाते आहे. जेव्हा माणूस जन्माला आला तेव्हा देवाने वेदनेचा, दुःखाचा संबंध माणसाशी जोडला असावा. कारण एकच, जेव्हाही दुःख झाले, वेदनेने वेढले की माणसाला देव आठवतो. अजब असे सुख-दुःखाचे पाढे देवाने मांडले आहे. कोणालाही वेदनेतून पळवाट काढता येत नाही असे दिसते. मानवाच्या हृदय आणि मेंदूचा वेदनेशी संबंध येतो तेव्हा आपला आत्मा सुख शोधतच असतो. मनात खोलवर गेला की वेदनेचा भास होतो. जणू मनाचे आणि जखमांचे नाते खूप जुने असावे. अनेक वर्षांपासून या वेदनेने मानवाची साथ सोडली नाही. या वेदना, दुःख, जखमा आढळल्या आणि उमगल्या अन्‌ त्यांनी जगावर एक ठसा उमटविला आहे. जेवढे वेदनेने मानवाला घडवले आहे त्यापेक्षा जास्त या जगात कोणीही घडू शकले नसते. आत्म्याच्या जखमांनी तर काहींचे विश्व बांधले गेले आहे, या म्हणण्याचा अर्थ असा, की दुःख तर सर्वांनाच असते परंतु त्यातून मार्ग काढत चेहऱ्यावर हसू दाखवत आणि आपल्या मनात अश्रूत डोकावणारे सर्व जग जिंकताना मी पाहिले आहे.

एकदा एक माणूस डॉक्‍टरांकडे गेला व म्हणाला, मला जरा नैराश्‍य आले आहे. डॉक्‍टरांनी त्यांना सांगितले, की तुम्ही चार्ली चॅप्लिनचे चित्रपट पाहा, तुमचं नैराश्‍य निघून जाईल. तेव्हा तो माणूस म्हणाला, हे कसे शक्‍य आहे? पण नैराश्‍यात बुडलेला मनुष्य कोणी दुसरा नसून स्वतः चार्ली चॅप्लिन होता. जगाला हसवणारी आणि जगावर ठसा उमटवणारी व्यक्ती आपल्या वेदनेवर मात करीत दुसऱ्याला जगण्याची आशा देत होती.

"मी जेव्हा मनात पाहिले वेदनेने मला घेरले,

प्रेरणा कुठून येणार चटके हे मला लागले!'

प्रेमात पडणाऱ्या प्रेमीला जेव्हा प्रेम मिळत नाही, त्या वेदना तोच जाणू शकतो; पण त्याच वेदनेची आग करून जो जग जिंकण्याशी संबंध ठेवतो तोच खरा वीर मानला जातो. जगात अनेकांना दुःख आहे. असा कोणी नाही की ज्याच्या वाट्याला दुःखाचे चटके आणि वेदनाही आल्या नाहीत. अशी अनेक उदाहरणे आहेत की ज्या लोकांनी दुःखावर मात केली आहे. एका दाम्पत्याने वीस मुलांना सांभाळण्याची जबाबदारी खूप चांगल्या प्रकारे पार पाडली. त्यांच्याशी बोलताना लक्षात आले, की त्यांची एक मुलगी व एक मुलगा दोघेही वयाच्या एकविसाव्या वर्षी वारले. या वेदनेने कळवळणाऱ्या आईवडिलांनी दुःख सावरत अनेक निराधार मुलांचे पालकत्व स्वीकारले. खरंच सलाम अशा लोकांना!

आज पोटाची भूक खूप मोठी झाली आहे. भुकेने त्रस्त असणारी माणसे, पक्षी, प्राणी हे सर्व अन्नासाठी संघर्ष करताना सहज दिसून येतात. पैशाचे नुकसान वेदनेला दुःखाला आणि त्रासाला निमंत्रण देते. ज्याच्याकडे पैसा आहे आणि नाही असे सर्वच मानव अजून पैसा कमावण्याच्या खटपटीत दुखी होऊन जातात. अनेकजण पैसा कमावण्याच्या नादात सुख विसरून जातात. नकळत वेदना निर्माण होऊन आलेले नैराश्‍य हे सहज दिसून येत आहे. रस्त्यावर अपघात होतात, जीव जातो, शारीरिक इजा होते व कधीकधी अपंगत्व येते. अशा वेळी खचून न जाता पुन्हा नव्याने जगण्यास आणि लढण्यास शिकले पाहिजे. आयुष्य हे एकदाच मिळते, पण आज याच आयुष्याची किंमत कमी झाली आहे. कळवळणारे मन, नैराश्‍य, नकारात्मक विचार हे लढण्याच्या शक्तीला कमी करत आहेत. आज अनेकजण लढण्यापेक्षा आयुष्य संपवणे सोपे झाले, असे समजत आहेत.

वेदनेत लढायची ताकद लपली आहे. वेदनेशी लढणारा मनुष्य कधीही हार मानत नाही. सर्वांत बलवान वेळ आहे. चांगली वेळ आली की सर्व मनासारखे होते आणि वाईट वेळ आली की वेदनेचे बळ मनात वाढत जाते. याच वेदनांना वेळ देत नवीन सुरवात करणे म्हणजे आयुष्यातील लढाई आहे. वाईट वेळ येते तेव्हा थोडे थांबत आणि संयम ठेवून त्यावर मात करण्यास शिकले पाहिजे. आज कलियुग आहे. दुःख, त्रास, वेदना यांचा सुळसुळाट होत असताना, संवेदनशीलता दाखवत त्याचा वर्तमानात आणि भविष्यात उपयोग केला पाहिजे. सर्व प्रश्नांवर मरण हे उत्तर नाही. वेदनेवर मात करणे हाच एकमेव मार्ग आहे.

दुःख, त्रास, अपमान, नाराजी यांचे भांडवल करण्यापेक्षा त्यातून मार्ग काढावा. त्रास करण्यापेक्षा आणि मन मारण्यापेक्षा जगात अनेक मार्ग निघू शकतात. पण एकच ध्येय ठेवा, ते म्हणजे आयुष्याच्या वाटेवर घेतलेला निर्णय. तुमचे ठरवलेले लक्ष्य त्याच्याशी एकनिष्ठ राहा. आयुष्यात लक्ष्य ठेवा. मोठे होण्याच्या मार्गावर अडथळेही खूप असतात. अपेक्षा कमी ठेवा म्हणजे अपेक्षाभंगाचे दुःख होत नाही. अपेक्षाभंगाचे ओझे खूप जड असते. ते काहीजण पेलू शकतात तर काहीजण पेलू शकत नाहीत. अपेक्षा कोणाकडून ठेवू नका; परंतु आपले लक्ष्य पार पाडण्यासाठी प्रयत्नशील राहा. त्रास, दुःख, वेदना यांना सोबती बनवा. ठरविलेल्या मार्गावर चालताना प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. कष्ट होणारच. वेदनांचा उपयोग नाही तर त्याचा आपल्या मार्गाचे ऊर्जास्रोत बनवा. आपले लक्ष्य मिळेपर्यंत प्रयत्न करत राहा.

लक्ष्यप्राप्तीपेक्षा ध्येय पूर्ण होण्यापेक्षा त्याच्या मार्गावरील संघर्षाचा अनुभव घ्या. मन दुखावणे, अपघात, घटस्फोट, आर्थिक नुकसान, आपल्या लोकांची साथ न लाभणे, मृत्यू हे सर्व घडतच राहणार. आपल्या कलागुणांना वाव द्या. आपल्यातील सुप्त गुणांना ओळखा. कला ही उमगते आणि वेदनेतून ती बहरते, असा अनुभव अनेकांनी अनुभवला आहे.

आणि एक सांगतो, सर्व आयुष्यात एक लढाई आहे. एकट्याने लढणे शिकले पाहिजे. जिंकू किंवा हरू पण आयुष्यात संघर्ष करण्यास शिकले पाहिजे. जिंकलात तर आत्मा तृप्त होईल आणि हरलात तर अनुभवाची शिदोरी पदरात पडेल.

- ऋत्विज चव्हाण

loading image