"पावा कधिगल' आणि स्त्री-शोषण 

 "Pava Kadhigal" and woman-exploitation
"Pava Kadhigal" and woman-exploitation

घाव वासनेचे अजुनी "ती' सोसतेच आहे 
हुंदक्‍यांनाही अंत असू दे, घाव नको घालू... 

स्त्रीचे शोषण तेव्हाही होत होते आणि आजच्या नव्या युगातही होतेच आहे. फक्‍त दशकागणिक त्याची तऱ्हा बदलत गेली आहे. या बाबतीत अनेक कायदे, प्रबोधन करून झाले; तरी पुरुषी मानसिकतेत काही बदल झालेले नाहीत. जातीपातीच्या भिंतीही अजूनही काहींच्या मनात घट्ट आहेत. सरकारी कागदांमध्येच समानता दिसते, हे कटू सत्य आहे. स्त्रीचे हे शोषण अनेकदा चित्रपटांचाही विषय ठरला आहे. अनेक भाषांमध्ये हा विषय सातत्याने मांडला जातोय. याच पार्श्वभूमीवरील 'पावा कधिगल' ही तमीळ मिनी सिरीज मनाचा ठाव घेते. यू-ट्यूबवर याचा हिंदी अनुवादही उपलब्ध आहे. स्त्री-शोषण आणि सामाजिक विषमतेच्या चार कथा चार वेगवेगळ्या दिग्दर्शकांनी त्यामध्ये मांडल्या आहेत.

थंगम : ही कथा आहे तृतीयपंथीय सथर याच्या प्रेमाची. तो बालमित्र सर्वाननवर प्रेम करतो; मात्र सर्वाननचे सथरच्या बहिणीवर प्रेम असते. त्यांच्या प्रेमातही धर्म आडवा येतो. सथर त्यांना पळून जाण्यास मदत करतो; पण त्याची किंमत त्याला मोजावी लागते. 

लव्ह पन्ना उथ्रानम : या भागात जुन्या आणि नव्या विचारांचा संगम चितारला आहे. आदिलक्ष्मी आणि ज्योतीलक्ष्मी या जुळ्या बहिणी. गावपुढारी वडील वीरसिम्हन यांच्यासमवेत ज्योती राहते, तर आदि शहरात नोकरी करतेय. वीरसिम्हनच्या गाडीच्या ड्रायव्हरवर ज्योतीचे प्रेम जडते. गावातील इतर घटनांप्रमाणेच "ऑनर किलिंग'मध्ये तिचाही करुण अंत होतो; पण आदिलक्ष्मी मात्र या प्रकाराला कडाडून विरोध करते. 

वानमंगल : या भागात अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराचे विदारक सत्य मांडले आहे. सत्या, मती यांना मोठा मुलगा भारत आणि दोन मुली वैदेही अणि पोन्नुथाई; एक आनंदी कुटुंब. वैदेही "मोठी' झाल्याने तिच्या ऋतुप्राप्तीचा कार्यक्रमही ते उत्साहाने साजरा करतात; मात्र काही टारगट मुले पोन्नुथाईवर अत्याचार करतात. सत्या-मती यांचे कुटुंब सैरभैर होते. शेवटी मती एक निर्णय घेते, पोन्नुथाईची स्वप्ने पूर्ण करण्याचा... 

ओर लव्ह : ऑनर किलिंगचा आणखी एक भयावह प्रकार या भागात मांडला आहे. सुमथीने भिन्न जातीतील हरी याच्याशी पळून जाऊन लग्न केले आहे. दोघेही शहरात सुखी जीवन जगताहेत. सुमथी गरोदर असल्यामुळे तिच्याबद्दलचा राग बाजूला ठेवून वडील जानकीरामन तिला घरी घेऊन येतात. तुझ्यामुळे आमचे शिक्षण थांबले, असे घरातील इतर मुलींचे टोमणे तिला सहन करावे लागतात. गावप्रमुख वडिलांनाही ऐकून घ्यावे लागते. यातून वडील तिच्याबाबत "तो' निर्णय घेतात... 

या चारही कथा मन सुन्न करणाऱ्या. दिग्दर्शकांनी तेवढ्याच संवेदनशील आणि बांधीवपणे मांडल्या आहेत. भाषा, प्रदेश वेगळा असला तरी आपल्या आसपासच्या घटनांशी मिळत्याजुळत्या वाटतात, मनाचा ठाव घेतात. स्त्री-शोषणाचे सत्य सर्वदूर असल्याचे अधोरेखित करतात, हे नक्की. 

संपादन : युवराज यादव 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com