Women's Day 2021 : ''फेमिनिझम शिवी नाही, वास्तव आहे!''

woman day 2021
woman day 2021

Womens Day 2021 :  तो माझा पहिला वाचक आहे. पहिल्या भेटीच्या वेळी माझ्यातल्या समंजस स्त्रीला पाहून तो आकर्षित झाला होता म्हणे. मला ते इतकं नवल वाटणारं नव्हतं. कारण तरुण, चुटुकदार अन् स्त्रीत्वाच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या माझ्यासारख्या कित्येकींना समवयीन तरुणांकडून दाद मिळणं, एव्हाना ओळखीचं झालं होतं. त्याचं असणं, दिसणं, वावरणं हे इतर सर्वसामान्य तरुणांसारखं असलं तरी त्याची समोरच्याला वाचण्याची पद्धत वेगळी होती. मित्राच्या रूपात मन मोकळं करायला, आपल्याला समजवणारा हक्काचा कान असणं भाग्याचं असतं! 

मला आजही स्पष्ट आठवतंय, पोस्टग्रॅजूएशनचे ते दिवस होते. छातीवर आयुष्याच्या जबाबदाऱ्या येणारं थोडं समंजस होण्याचे पण अल्लडपणाने बहरणारे ते वय होतं. शिक्षणाच्या गुर्मीत असलेले आम्ही प्रत्येकजण मोठ्या हिरीरीने शिकत होतो. त्या दिवशी 'महिला सबलीकरणा'च्या विषयाचा तास सुरू असताना एकजण त्याचं फ्रस्ट्रेशन काढत म्हणाला,  ''हे असलं काहीतरी पुस्तकात आणि शायनिंग मारायला बरं असतं. कारण स्त्रिया भंपक आणि खोट्या असतात. त्यांच्या दुःखाचं सार्वजनिक प्रदर्शन करून प्रसिध्दी मिळवतात ! केवळ दिखाऊ ढोंग आहे हे फेमिनिझम अन् सबलीकरण. पाहायला गेलं तर एका हाताच्या नसतात. वगैरे वगैरे वगैरे''

स्त्रीवरचा आरोप ही माझी दुखरी नस असल्यामुळे मी त्याला प्रत्युत्तर करत स्त्री-पुरुष समानतेतून स्त्रियांच्या अस्तित्वाबद्दल बोलायला गेले. त्यावेळी तिथे असणाऱ्या प्रत्येकाच्या मनात हाच विचार होता की, ''हिला काय गरजे, नको त्यात पडण्याची ? हे अस बोलणं तर बायकांसाठी रोजचंच आहे, मग त्याला एवढं मनावर घ्यायचं का?''  त्यांना सगळ्यांना डावलून मी मनात या ठाम निर्धाराने त्याला विरोध केला की, ''मला जर त्याच्या बोलण्याने त्रास होतोय तर ते मी कधीच मनावर घेतलं आहे. पण मला फेमिनिझम या शब्दाचा एवढा त्रास का होतो?'' हा प्रश्न मलाच पडू लागला. या चक्रव्युहात होतेच. पण तेवढ्या वेळात माझ्या या वागण्याला खोटं फेमिनिझम ठरवून माझ्या विरोधात वर्गातले सगळेच उभे राहिले होते. हा काळ केवळ सोशल मीडियावर बदल घडणारा आणि सोशल मीडियासाठी ट्रेण्ड म्हणून हा बदल स्वीकारणारा आहे, हे त्यादिवशी घडलेल्या घटनेमुळे माझ्या लक्षात आलं होतं.

या सगळ्यांच्या  गर्दीत मला सावरत तो म्हटला, "नेमकं तुझा प्रोब्लेम काय आहे? तू व्यक्त हो, नाही कोण म्हणतं. पण परिवर्तन हे लेखणीला शोभतं. चार चौघात वावरताना 'स्त्री'साठी समाजाने बनवलेल्या चौकटीत असशील तर जग तुझ्यासाठी टाळ्या वाजवेल. नाहीतर तुझ्या वाट्याला हा तिरस्कार अटळ आहे.''  तुला माहितीये ना, ते म्हणतील, ''स्त्रीने व्यक्त व्हावं!'' पण जेव्हा तू समाज परिवर्तन  आणि तुझ्या हक्काच्या गोष्टीवर बोट ठेवशील तेव्हा तुझा आवाज धमक्या, अब्रू नुकसान आणि बदनामी करून दाबला जाईल.  या जगात बदल घडवायचा असेल तर तो तुझ्या आप्तस्वकीयांमध्ये घडव, समाजाच्या भानगडीत पडू नकोस.

''अरे पण किती दिवस यांचं ऐकुन घ्यायचं हे? यापूर्वीही स्त्रीला कमी लेखण्याचा तोरा मिरवला, आणि आज ज्या विषयाचं शिक्षण घेताय त्या विषयालाच खोटं ठरवून मोकळे... ? आणि खरं सांगू ना तर माझा राग संपूर्ण पुरुष वर्गावर नाहीचे मुळी. पुरुषी वृत्तीमुळे स्त्रीच्या वाट्याला आलेल्या समस्यांवर आहे. तुला माहितेय, प्रत्येक बाईच्या फेमिनिस्ट होण्याला कारण असतं. तिची वैयक्तिक आणि वास्तविक कथा असत''

माझ्या आयुष्यातल्या या कथेचं शीर्षक होतं, ''कधीही न संपलेली स्त्री जन्माची कथा!'' या कथेची पात्र म्हणजे माझ्या आयुष्यातील प्रत्येक स्त्री. लिटरली प्रत्येक स्त्री! माझ्या आईपासून मावशी, आजी, वहिनी, बहीण, कामवाल्या ताई अन् खुद्द मी! ही कथा जशी माझी आहे तशी ती तुझी आणि आपल्यासारख्या प्रत्येकाची आहे, ही खात्री आहे मला. या कथेची सुरुवात माझ्या जन्मापासून झाली. किंबहुना माझ्या जन्मानंतर मला ती दिसली, मात्र याचा सुरुंग खूप पूर्वीपासून पेटलेलाच होता, बाईच्या चूल अन् मुलाच्या चौकटीत.  समाज आज बदलत असला तरी माझ्या आयुष्यातल्या या सगळ्या स्त्रियांच्या वाट्याला आलेलं दुःख पुरुषाची देण होतं. त्यामुळे माझं पुरुषांप्रतीचे मत तितकस बरं नव्हतंच! 

कारण आजही माझ्या आईचा अख्खा जन्म हे ऐकण्यात जातो की, 'तुला एक वंशाचा दिवा देता आला नाही, पाची पोरीच.' पण ती आमच्या जन्मापासून जाणून आहे, पाच मुली म्हणून जन्मलेल्या पाच पणत्या दिव्याएवढ्याच  तेजोमय असतात.

मावशीचं सांगू तर तर तिचं लग्न ही सगळ्यात मोठी फसवणूक निघाली. मावशी चौथीपर्यंत शिकल्यामुळे नवऱ्याला बाहेरच्या बाईचं वेड लागलं. कमी शिक्षणाचं फक्त निमित्त झालं... तिच्या संसारासारखाच तोही तिच्या आयुष्याला बुक्का लावून गेला. आज तिचं अख्खं आयुष्य कुठल्याही अपत्याशिवाय माहेरच्यांच्या गुलामीखाली पुढे सरकत आहे. कुठलही मत नसलेली, आवड, निवड असूनही हक्काने बोलता न येणारी, भविष्याबाबत कुठलेच स्वप्न न बघणारी मावशी! नवऱ्याच्या एका निर्णयाने तिच्या आयुष्याचा रस पिळून घेतला, नापीक जमिनीने कुठल्याच स्वतंत्र सुखाचं साक्षीदार होऊ नाही, इतकं रुक्ष आयुष्य जगत आली ती! हे कुणामुळे? तर या पुरुषसत्ताक विषाणूमुळे!

 ''तुझं चिडणे खरंच योग्यच असावं, या दोघींचं ऐकूनच आजीच्या दुःखाचा अंदाज येतोय'', तो व्याकूळ झाला. 

''अजिबात नाही. यापेक्षा तर जास्त राग मला आजीचा येतो. बाईनेच बाईचं आयुष्य कसं विस्कळीत करावं याचं मूर्तीमंत उदाहरण माझी आजी. तिने स्वतः आजोबांच्या मागेपुढे करत पूर्ण आयुष्य काढलं. ''त्यात गैर काही नाही'', असं आजही ती मला म्हणते. पण ज्या आजोबांसाठी हे केलं त्यांना तिच्याबद्दल कणभरही आदर नव्हता हे मला खटकणारं आहे. त्यांच्या या कृतघ्न आणि पितृसत्ताक मनस्थितीमुळे आजोबांनी मरण्याआधी संपूर्ण संपत्ती एका मुलाच्या नावावर करून चार मुलींच्या नावे एक पैसा सुद्धा जाणार नाही याची खबरदारी घेतली. मुलगा सासरी जात नाही म्हणून मुलाच्या नावे अख्खी संपत्ती करून देताना त्यांना पोटच्या मुलींचं अस्तित्व सुद्धा जाणवलं नाही, इतक्या दुर्लक्षित असतात मुली! अन् त्याच एका मुलाच्या बायकोचं म्हणजेच आजीच्या सुनेचं आयुष्य आजीने बाई असून बाईवर पूर्वापार लादलेल्या परंपरांनी ओरखडे काढल्यासारख कुरूप बनवलं. जशी आजी राबत आली, तशीच सूनही राबली पाहिजे ही संस्कृती जपली.''

''हे घरातलं झालं. पण घरी येणाऱ्या कामवाल्या ताईचं काय सांगू? लोकांची धुणी भांडी करून घराचा भक्कम आधार बनणारी ती जेव्हा घरी कामाला येते तेव्हा तिच्या साड्यांवर बसलेला मळाचा काठ एका बाजूला अन् तिच्या त्या चाळीशी पूर्ण केलेल्या पाठीवर नवऱ्याने हाताने अन् बेल्टने मारलेले व्रण एका बाजूला. ते फटक्यांचे व्रण तिच्या चेहऱ्यावरच्या खोट्या पण मजबूत हास्याएवढेच ताकदवर असतात. हे सगळं बघून कोणाला त्रास होणार नाही? हे बघितल्यानंतरही जर तो व्यक्ती या परंपरा पुढे चालू ठेवाव्या म्हणत असेल आणि याविरुद्ध आवाज उठवणाऱ्यांना फेमिनिस्ट नावाची शिवी देत असेल तर माझ्यासारख्या अनेकजणी येणाऱ्या पिढी बरोबर संतापाने प्रत्युत्तर देतीलच. कारण फेमिनिझम हा दिखावा नाहीये, आणि ती शिवी तर त्याहून नाहीये. ते कित्येक पिढ्यांपासून चालत आलेल्या गुलामिविरुध्द पुकारलेले युद्ध आहे. आज फक्त त्यावर बोललं जातंय, त्याला सेलिब्रेट केलं जातं म्हणून त्रस्त झालेले पुरुष ही सत्यता समानतेच्या तत्वावर जेव्हा खरंच समाजात दिसेल तेव्हा स्वीकारू शकतील ? त्यांच्या अहंकाराच्या आत्महत्या होण्यास एवढं कारण पुरेस ठरेल, नाही.''

हा खोडकर विचार मांडत असतानाच तो म्हणाला, ''तुझ्यासारख्या सगळ्यांनाच मी एवढंच सांगतो, 
''तुझा जन्म तुझ्या आयुष्याचा लढा बनला खरा,
तुझी स्पर्धाच कोणी करावी असा तुझा जन्म नाही, 
त्यामुळे त्याच सेलिब्रेशन कर!
अन् बेफिकीर उधळून दे संस्कृतीच्या गंज आलेल्या बेड्या,
कारण तू विश्वनिर्मितीची क्षमता ठेवते उदरात!'
'
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com