गोष्ट पैशापाण्याची: अर्थ साक्षरतेेकडे घेऊन जाणारा पुस्तक प्रवास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

gosht paishapanyachi book

गोष्ट पैशापाण्याची : अर्थ साक्षरतेकडे घेऊन जाणारा पुस्तक प्रवास

पुस्तक परिचय : शिल्पा पी. एस

प्रकाशनाआधीच आगाऊ बुकिंगचे सर्व विक्रम मोडीत काढणारे उद्योजक लेखक प्रफुल्ल वानखेडे यांचे 'गोष्ट पैशापाण्याची' हे पुस्तक नुकतेच ऍमेझॉन वरून मिळाले. वीकएंडला वाचायला घेऊन संपवण्याचा प्लॅन होता. त्याआधीच थोडं वरवरून हाताळून पाहूया म्हणून चाळायला सुरूवात केली ते शेवटच्या पानावर जाऊनच थांबले. आजच्या काळात आर्थिक साक्षरता हा जगण्याचा अविभाज्य भाग झाला आहे. त्यावर आपल्या मध्यमवर्गीय मराठी कुटुंबांमध्ये फारशी चर्चा होत नाही अथवा आपल्यावर आर्थिक संस्कार घडत नाहीत. मला नोकरी लागल्यापासून ते आजपर्यंत म्हणजेच गेल्या ११ -१२ वर्षांत 'पैसे कसे वापरावे, वाचवावे, गुंतवावे आणि वाढवावे' याचे धडे माझ्या घरून किंवा नातेवाईकांकडून मिळाले नाहीत. आपणच चाचपडत, धडपडत राहायचे, आपल्या बऱ्या-वाईट अनुभवातून शिकत राहायचे असा माझा अनुभव! 'पुढच्यास ठेच मागचा शहाणा' या उक्तीप्रमाणे लहान बहिणींना थोडेफार मार्गदर्शन करू शकले पण आपल्याला सांगणारे कुणीच नव्हते याचे वाईट वाटते.

ह्या पुस्तकात जवळपास सगळ्या कॉमनसेन्सच्या गोष्टी आहेत. 'Commonsense is not that common !' याची प्रचिती यावी इतका ह्या पुस्तकाचा खप आहे. मी ही त्यातलीच! एक ही गोष्ट नाही जी आपल्याला याआधी माहीत नसेल, उदा: बचत करावी, अवाढव्य खर्च करू नये, साधी राहणी असावी, अंथरून पाहून पाय पसरावे, अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊ नये वगैरे! आणि असं असूनही हे पुस्तक वेगळं आहे कारण यात आपल्याला माहीत असणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा वेगवेगळी जीवंत उदाहरणं देऊन ऊहापोह केला आहे. ३१ छोट्या छोट्या भागांमधून हि गोष्ट पुढे पुढे जात राहते. खूप महत्वाच्या आणि फायदेशीर गोष्टी उलगडत जातात. लेखकाचा स्वानुभव आपला विश्वास वृद्धिंगत करतो आणि त्यांची कळकळ पानापानांत दिसून येते. पैसे गुंतवण्यासाठी लागणारी शिस्त, त्या शिस्तीचे महत्व, भविष्याचे Big Picture पाहून ठरवलेला आर्थिक आराखडा, सुरक्षाकवच आणि त्याची गरज का असते, त्याचे फायदे, घरातल्या स्त्रियांचे आर्थिकदृष्ट्या साक्षर असणे का महत्वाचे आहे, Sales and Marketing स्किलचे महत्व अशा अनेक मुद्द्यांना अधोरेखित करत पुस्तक स्पर्श करते. प्रत्येक भागांत एक तरी महत्वाची tip सापडते. कुठे ही कानपिचक्या नाहीत किंवा spoon feeding आढळत नाही. लेखक प्रफुल्ल वानखेडे यांनी वाचकाला स्वाध्यायासाठी भरपूर मुभा दिलेली आहे. कुठेही आग्रह दिसत नाही वा कुठल्या एखाद्या विचारधारेचा प्रचार दिसत नाही. अगदी unbiased, neutral पद्धतीचे आर्थिक मार्गदर्शन क्वचितच मिळते. थोडक्यात काय, तर 'मला असे-असे अनुभव आलेत, त्यातून मी हे-हे शिकलोय. मला माझी गोष्ट कळकळीने सांगायची आहे परंतु आग्रह नाहीय , पटलं तर घ्या!' इतकं सरळ आहे हे पुस्तक!

गरीब म्हणजे कोण, श्रीमंत म्हणजे कोण, गरीब ‘गरीब’ का आहेत आणि श्रीमंत ‘श्रीमंत’ का आहेत याचे उत्तम विश्लेषण या पुस्तकात वाचायला मिळते. तसेच काही जुन्या समजुतींना तडा देत नवीन विचार पाहायला मिळतात. एक काळ होता ज्यावेळी ‘पैसा हे सर्वस्व नाही’ मानणारी ज्येष्ठ मंडळी पैशाच्या मागे लागू नको असं सांगायचे. आजघडीला हे सत्य नाही. पैशाविना स्वतःचं करिअर, उत्तम आरोग्य, उत्तम शिक्षण, बहिण-भावांचं शिक्षण किंवा लग्न, नंतर मुलाबाळांचं शिक्षण आणि करिअर, घरातल्या व्यक्तींचे आजारपण, थोडेफार पर्यटन आणि मग रिटायरमेंट यातले काहीच शक्य नाही. नोकरी लागली की हजार वाटांनी पैसा खर्च होतो. तगडे आर्थिक नियोजन ह्या सर्व खर्चांना तोंड देण्यास मदत करते. ह्या पुस्तकात हा उल्लेख वारंवार आलाय. एखाद्या मोठ्या आर्थिक संकटाला सामोरं जाण्यासाठी लागणाऱ्या Emergency Fund चं महत्व देखील पुनःपुन्हा अधोरेखित केलंय. माणुसकी, नेटवर्क आणि गुडविलच्या जोडीला धनसंचय ही हवाच, हा तो नवा विचार. त्यामुळे वय वर्ष २१ ते ३५ दरम्यानच्या सर्व तरुणांना पुढे आयुष्यभर उपयोगी पडतील असे खूप छोटे आणि कृतीत उतरवता येतील असे बरेच उपाय या पुस्तकांत सापडतात.

२०२० मध्ये अचानक उद्भवलेल्या कोविडच्या साथीने मोठमोठ्या देशांच्या अर्थव्यवस्थेला भगदाड पडले आहे. भारतातल्या जनसामान्यांना देखील निरनिराळ्या समस्यांना तोंड द्यावे लागले. कितीतरी उद्योग एका रात्रीत होत्याचे नव्हते झाले आणि काहीजणांना गलेलठ्ठ पगारच्या नोकरीवरून एका दिवसांत पायउतार व्हावे लागले. गरीब, मध्यमवर्गीय, श्रीमंत, अतिश्रीमंत सगळ्याच प्रकारची मंडळी रस्त्यावर आली. ही अलीकडील काळातली सत्य परिस्थिती आहे. यातून तेच तरले ज्यांच्याकडे Crisis Management ची तरतूद होती. आपण बहुदा ह्या बाबतीत विचारच केलेला नसतो. अनपेक्षित आर्थिक संकट येऊ शकतं हे आपल्या गणतीतच नसतं. भविष्यातल्या संकटांचा अंदाज घेऊन सुरक्षित आणि भरवश्याची गुंतवणूक केलेली नेहमीच फायद्याची ठरते. पुस्तकवाचनातून अर्थसाक्षरता साधता येऊ शकते आणि आत्मसात करता येते हे ह्या पुस्तकाच्या माध्यमातून ठळकपणे दिसून येते.

मराठी माणसांचे काही स्वभावदुर्गुण या पुस्तकाच्या निमित्ताने पुन्हा प्रकाशात आले आहेत, जसे की सेल्स आणि मार्केटिंगबाबतचा न्यूनगंड! हे स्किल अतिशय कमकुवत असते आपले! आपल्याला कुठेतरी ह्या कामाची लाज वाटते, कमीपणा वाटतो. हे फक्त कामाच्याच ठिकाणी आहे असे नाही. स्वतःच्या कलागुणांचे मार्केटिंग करण्याचे स्किल ही आपल्यात अभावानेच सापडते. मी स्वतः बऱ्याचदा या स्किलच्या अभावामुळे personal and professional life मध्ये तोट्यात गेले आहे. यावर काम केले पाहिजे तरच मराठी उद्योजक वाढीस लागतील. तसेच मारवाडी, गुजराती, सिंधी समाजात दिसून येणारा चिकाटी हा गुणधर्म आपल्या मराठी माणसामध्ये थोडा कमीच आहे, हे ही नव्याने अधोरेखित होते. एखादा व्यवसाय सुरु करताना Calculated risk घेण्याची आणि कुटुंबाने पाठींबा देत ‘तू चाल पुढं..’ म्हणण्याची संस्कृती मराठी घरातून रुजली पाहिजे. रिन काढून सण करणं आपल्याला जमत नाही पण व्यावसायिक कारणांसाठी झेपेल तेवढं कर्ज काढण्यात काही वाईट नाही. आपल्या कुटुंबांमध्ये आर्थिक बाबींचं डिस्कशन झालं पाहिजे, ते सर्वसमावेशक असायला हवं, भले-बुरे प्रसंग सर्वांसमक्ष तडीस नेले पाहिजेत तरच येणाऱ्या पिढ्यांच्या आर्थिक आणि व्यावहारिक ज्ञानात भर पडेल आणि कुठलाही आर्थिक निर्णय घेताना तो भीतीतून न घेता विचारपूर्वक घेतला जाईल.

याला जोडून एक सांगायचे ते असे कि, माझ्याकडे जॉबसाठी विचारणा करणारे खूप मुलं- मुली येतात. मार्केटमध्ये Sales and Marketing क्षेत्रांत कायम मानव संसाधनांची वानवा असते. अशावेळी मुख्यतः पदवीधर असणारे आजकालचे तरुण मुलं Sales and Marketing च्या जॉब्स साठी सर्रास नकार देतात. काहीजण तर ठणकावून सांगतात कि आम्हाला Sales and Marketing चे जॉब्स बिलकुल नको, भलेही त्या कामाचा पगार जास्त असला तरीही! या क्षेत्राबद्दलची अनास्था कमी व्हावी आणि इथे उपलब्ध असणाऱ्या भरपूर संधींचा फायदा आपल्या मुलांना मिळावा, यासाठी काही संस्थांना विशष सत्रं घ्यावी लागत असतात. म्हणजे काय तर, ह्या क्षेत्राबद्दलची आपली अनामिक भीती पिढ्यानपिढ्या pass on होतेय. यावर long term तोडगा काढला पाहिजे.

प्रत्येकाने एकदातरी वाचावे असे हे पुस्तक आहे. फक्त डिजिटल साक्षर असून चालणार नाही तर अर्थ साक्षर असणं ही महत्वाचं आहेच. या पुस्तकातलं एक वाक्य लक्षात राहिलं : 'वेळ आणि पैसा विचारपूर्वक गुंतवला तरच फायदा ... धसमुसळेपणाने वापरला की संपला!' आपल्या आयुष्यातील अनेक प्रसंग आपल्यासमोर मांडत आपल्याला अर्थसाक्षर होण्यासाठी प्रेरणा देणाऱ्या वानखेडे सरांचे विशेष धन्यवाद आणि या पुस्तकाला खूप खूप शुभेच्छा!

पुस्तक : गोष्ट पैशापाण्याची

लेखक : प्रफुल्ल वानखेडे

प्रकाशन : सकाळ प्रकाशन

किंमत : २५०

टॅग्स :marathiBook