प्रशांत किशोर विरोधकांच्या आघाडीसाठी नायक की खलनायक?

देशातील प्रादेशिक पक्षांना सोबत घेऊन 2024 मध्ये मोदी सरकारचा पराभव करता येऊ शकतो या विश्वासावर प्रशांत किशोर बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली विरोधकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहेत.
prashant kishor
prashant kishorsakal

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर देशातील विरोधी पक्षाची मोट बांधण्याचा जोरदार प्रयत्न राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर सातत्याने करत आहेत. देशातील प्रादेशिक पक्षांना सोबत घेऊन 2024 मध्ये मोदी सरकारचा पराभव करता येऊ शकतो या विश्वासावर ते बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली विरोधकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहेत.

मागील काळात त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्याही भेटी घेतली. तथापि त्यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या काही महत्वपूर्ण नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्यानंतर आता नेमकं काय शिजतंय, याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत.

आता ही राजकीय घडामोड भाजपसाठी मोठी धोक्याची घंटी आहे. याचा भाजपला अंदाज आल्यामुळे त्यांनी त्यासंदर्भात उपाययोजना करायला सुरुवात केली आहे. मोदी सरकारच्या कॅबिनेट विस्तारातील सोशल इंजिनिअरिंग बघता ते लक्षात येते. परंतु या सर्व घडामोडीत खरंच विरोधी पक्ष एकत्र येणार का? आणि जर एकत्र आले तर नेतृत्व कुणाचे असणार? काँग्रेस एखाद्या प्रादेशिक पक्षाच्या नेत्याचे नेतृत्व देशपातळीवर स्विकारेल? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले आहेत. याआधीही देशात तिसरी आघाडी तयार केली गेली होती, त्यामाध्यमातून केंद्रात सरकारही आले, पण नंतर त्यांची झालेली फाटाफूट बघता या तिसऱ्या आघाडीचे भविष्य काय असेल याविषयीही अजून साशंकता आहे.

प्रशांत किशोर यांच्या कामाचा इतिहास!

२०१२ ला गुजरात विधानसभा निवडणुकीत आणि २०१४ च्या भाजपच्या अभूतपूर्व यशात किंवा मोदींना निवडून आणण्यात प्रशांत किशोर यांचा वाटा होता. त्यानंतर त्यांनी भाजपची साथ सोडली. देशातील प्रादेशिक पक्षांसोबत प्रशांत किशोर यांनी काम करायला सुरुवात केली. त्यांनी आतापर्यंत ८ पक्षांच्या निवडणुकीचे काम बघितले त्यातील २०१७ च्या काँग्रेसच्या उत्तर प्रदेश विधानसभेचे काम वगळले तर किशोर यांनी जवळपास सर्व निवडणुका संबंधित पक्षाला विजय मिळवून दिला आहे. यात त्यांनी ज्या पक्षाचे काम केले निवडणुकीनंतर त्या पक्षाचा मुख्यमंत्री झाला आहे ही विशेष बाब आहे.

दक्षिण भारतात भाजपला फारसे यश मिळालेले नाही, त्यामुळे हिंदीभाषिक पट्ट्यात अखिलेश यादव आणि तेजस्वी यादव, बंगालमध्ये ममता बॅनर्जींना सोबत घेऊन तर दक्षिणेत एम. के. स्टॅलिन आणि जगनमोहन रेड्डी यांच्या बळावर भाजपच्या बऱ्याच जागा कमी करता येऊ शकतात, अशी प्रशांत किशोर यांची रणनीती आहे. परंतु यात ममता बॅनर्जी किंवा महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याव्यतिरिक्त कोणत्याही प्रादेशिक पक्षाला रस नाही, अशीच सध्या परिस्थिती आहे.

राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सर्वात जुने सहकारी अकाली दल आणि शिवसेना या दोघांनीही अजून याबाबत अधिकृतपणे ठोस भाष्य करणे टाळलेले आहे. त्यामुळे या पक्षांना सोबत घेणे हे फार जिकीरीचे काम असेल याची कल्पना प्रशांत किशोर यांना आहे, म्हणूनच जो प्रयोग महाराष्ट्रात झाला तोच देशात करायचा असेल तर पवारांकडे विरोधकांच्या एकजूटची सुत्रे द्यायला हवी, आणि ते सध्या त्याच मार्गावर आहेत.

prashant kishor
पवार-शहांची दिल्लीत भेट; राजकीय चाणक्यांमध्ये काय झाली चर्चा?

आधी भाजपची साथ आता फिरवली पाठ!

प्रशांत किशोर यांनी २०११ ला नरेंद्र मोदी यांच्या बरोबर 'वैयक्तिक राजकीय सल्लागार' म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर किशोर यांनी ठरवलेल्या राजकीय रणनीतीमुळे भाजपने २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या पाच राज्यांत सत्ता मिळवली. त्याचवेळी 'मोदी लाट' तयार करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. देशाला २०१४ साली केंद्रात भाजपने बहुमतासह सत्तेत बाजी मारली. यातही प्रशांत किशोर यांचा सिंहाचा वाटा होता.

देशातील राजकीयदृष्ट्या सर्वात महत्वाचे राज्य उत्तर प्रदेशमध्ये लोकसभेच्या ८० पैकी ७२ जागा भाजपला मिळाल्या. याचेही श्रेय किशोर यांनाच जाते. त्यामुळे भाजपसोबत त्यांची एक मोठी इनींग आता जवळपास संपलेली आहे. पंतप्रधान मोदी आणि भाजपबरोबर काम केल्याचा मोठा अनुभव त्यांच्याबरोबर आहे. कदाचित तो त्यांना विरोधकांच्या एकजूटीसाठी आणि परिणामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत वापरता येऊ शकतो. त्यामुळे भाजपसाठी ही मोठी डोकेदुखी ठरण्याची चिन्हं आहेत.

prashant kishor
शरद पवार-नितीन गडकरींची दिल्लीत भेट!

काँग्रेस प्रवेशाच्या चर्चा?

मागील काही काळापासून प्रशांत किशोर हे काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांतून प्रसिद्ध झाल्या. ही काही पहिली वेळ नाही, याआधी प्रशांत किशोर यांनी नितीन कुमारांच्या जनता दल (यूनायटेड) या पक्षातही प्रवेश केला होता. आता त्यांनी काँग्रेस नेत्यांच्या भेटीगाठी वाढवल्यावर त्यामुळे पक्षप्रवेशाच्या बातम्या जोर धरत आहे. यानिमित्ताने एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मुळात प्रशांत किशोर हे काही राजकारणी नाहीत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर ते आपल्या वैयक्तिक राजकीय महत्वाकांक्षा जाहीर करु शकतात. त्याआधीच कबूल करणं त्यांना परवडणारे नाही. त्यामुळे २०२४ मध्ये मोदी सरकारचा पराभव करणाऱ्या विरोधी आघाडीचा किंग बननं ते कधीही पसंत करतील.

नायक की खलनायक?

मोदीविरोधातील आघाडीचे प्रशांत किशोर हे नायक जरूर बनू शकतील परंतु सध्या ते भाजपसाठी खलनायकाच्या भूमिकेत आहेत. भाजपच्या नेतृत्वाने त्यांच्या या प्रयत्नांचा मोठा धसका घेतल्याची चर्चा आहे. त्यातून ते सिद्ध होत आहे. विरोधी पक्षांच्या आघाडीबाबत अजूनही काही ठोस उपाययोजना झालेल्या नाहीत. तरीही ते आघाडीसाठी नायक असतील की खलनायक हे आगामी काळच ठरवेल.

(लेखात व्यक्त केलेले विचार ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com