मातीत मिसळलेले थेंब..

प्रा. गजानन वाघ, वाशीम
रविवार, 17 मे 2020

"वि  sss मान..! वि  sss  मान!"  असा त्याचा गोड स्वर कानावर आदळला तेव्हा दादाराव बापू काहीसे भानावर आले. शोधक नजरेच्या जोडीला आपला डाव्या हाताचा पंजा
कपाळाजवळ नेत त्यांनी एकटक आभाळाकडे बघितले. आकाशातले विमान त्या जुन्या खोडालाही दिसले. सरकारच्या वंदे भारत मिशन अंतर्गत परदेशात काम करणाऱ्या लोकांना आपल्या देशात आणले जात आहे, हे पेपर वाचणाऱ्या अन् टीव्हीवर बातम्या पाहणाऱ्या दादाराव बापूच्या चटकन लक्षात आले. लागलीच त्यांची दुसरी नजर कृष्णाच्या कागदी विमानाकडे गेली. दोन्ही विमाने पाहून त्यांना आठवले पायदळ चाललेले कुटुंब अन् मातीत पुरलेला चिमुकला देह! 

"अहो, दुसरं काही नाही आणलं तरी भागते. पण झाडू आणा लागते आठवणीनं. झिजू झिजू किती खराब झाला. आता नवाच लागते.." वाशीमला माल घेऊन जाणाऱ्या आपल्या
नवऱ्याकडे सुवर्णाने अशी मागणी नोंदवली, तेव्हा सुभाषने आधी मानेने कबुली जवाब दिला. नंतर तो म्हणाला, "बाई, लाॅकडाऊन आहे! दुकानं उघडी लागतील का नाही? भेटला तं
आणतो!"

बायकोने मागून मागून काय मागितलं तर झाडू! झाडू हे खरं तर लक्ष्मीचं रुप. गृहलक्ष्मीनं स्वतःसाठी काही न मागता घरासाठी केलेल्या या वाजवी मागणीची सुभाषनेही मनोमन नोंद
घेतली.  बापासाठी वाचायला पेपर अथवा साप्ताहिक घेऊ, मुलासाठी भातकं आणायचं, असं मनातल्या मनात बोलत तो घराबाहेर पडण्यासाठी तयार झाला. गावातील चार अल्पभूधारक शेतकऱ्यांची वीस पोते सोयाबीन घेऊन एक पिकअप बोलेरो सुभाषसह वाशिम बाजार समितीकडे निघून गेली. 

ओसरीत बसलेल्या बापाचं सुभाष आणि सुवर्णा या नवरा बायकोच्या बोलण्याकडे म्हणावं तेवढं लक्ष नव्हतंच. घरात कुलर नसलं तरी बाहेर यावेळी कुलरसारखीच थंडी हवा लागते, म्हणून ते बाहेर बसलेले. कुठूनतरी मिळवलेला चार दिवसांपूर्वीचा पेपर हातात पडल्याने दादाराव बापू त्यातच खूश होते. वाचनात गढून गेले होते. ओसरीवर त्यांच्या बाजूला खेळणाऱ्या
नातवाकडे मात्र अधूनमधून त्यांचे हटकून लक्ष जाई. वर्तमानपत्रातली बातमी वाचून ते स्वतःशीच दुखऱ्या स्वरात बोलू लागले. जिथे त्यांची नजर स्थिरावली, त्या बातमीचे हेडिंग होते, "
मजुराच्या मुलाने रस्त्यातच सोडला प्राण" अशी मनाला सुन्न करणारी बातमी. अरेरे किती विदीर्ण परिस्थिती ओढवली या कुटुंबावर! कोरोनाच्या या भीषण काळात हेद्राबाद ते बालाघाट
असा अक्षरशः पायी प्रवास करणाऱ्या कुटुंबाची कहाणी होती ती. तसं पाहिलं तर अशा कैक कहाण्या काळाच्या उदरात गडप झालेल्या. प्रवासाचा शीण अन् तळपते उन सहन झाले नाही.
म्हणून कासावीस होऊन चार वर्षीय लेकराने आपल्या आईच्या कुशीतच प्राण सोडला होता. शेजारच्या यवतमाळ  जिल्ह्यात पिंपळखुटी ते पाटणबोरी रस्त्यावर घडलेला हा दुर्दैवी प्रसंग
बातमीमधून कळला, तेव्हा म्हातारपणाकडे झुकलेल्या दादाराव बापूचेही डोळे पाणावले. त्या अनोळखी प्रदेशात बाळावर अंत्यसंस्कार करताना, आईने आपल्या काखेतला चिमुकला देह
नदीकाठच्या मातीत पुरला होता.  पेपर वाचता वाचता दादाराव बापू शोकमग्न झाले. बाजूला त्यांचा चारवर्षीय नातू  कुठल्याशा खेळण्यात गढून गेला होता. विमनस्क नजरेने बापूंनी त्याच्याकडे बघितले. तो कागदाचे विमान खेळत होता. आपल्या हातातले विमान त्याने जसे आकाशात भिरकावले, तसे त्याला आकाशात खरेच एक विमान दिसले. आभाळातले खरेखुरे विमान पाहून चिमुकल्या कृष्णाने टाळ्या पिटायला सुरुवात केली. 

"वि  sss मान..! वि  sss  मान!"     असा त्याचा गोड स्वर कानावर आदळला तेव्हा दादाराव बापू काहीसे भानावर आले. शोधक नजरेच्या जोडीला आपला डाव्या हाताचा पंजा
कपाळाजवळ नेत त्यांनी एकटक आभाळाकडे बघितले. आकाशातले विमान त्या जुन्या खोडालाही दिसले. सरकारच्या वंदे भारत मिशन अंतर्गत परदेशात काम करणाऱ्या लोकांना आपल्या देशात आणले जात आहे, हे पेपर वाचणाऱ्या अन् टीव्हीवर बातम्या पाहणाऱ्या दादाराव बापूच्या चटकन लक्षात आले. लागलीच त्यांची दुसरी नजर कृष्णाच्या कागदी विमानाकडे गेली. दोन्ही विमाने पाहून त्यांना आठवले पायदळ चाललेले कुटुंब अन् मातीत पुरलेला चिमुकला देह!  दोन विमानांमधील अंतर पाहून की काय, पण एव्हाना आभाळही काळवंडून आले होते. आता काही कालावधीतच भर उन्हाळ्यात पाऊस पडणार, अशा खाणाखुणा दिसू लागल्या. 

इकडे सुभाष वाशीमच्या मार्केटात पोचला तेव्हा बाजार समितीमधील टीन शेडखालचे ओटे व्यापाऱ्यांनी काबीज केलेले होते. ओट्यांवर नेहमीप्रमाणे व्यापाऱ्यांचा माल. नाईलाजानेच त्याला आपली सोयाबीन ओट्याच्या खालील जागेत ठेवावी लागली. तरीही नाराज न होता तो आता हराशीची वाट पाहू लागला. मधूनच मोठ्या प्रेमाने पोत्यावरुन हात फिरवू लागला.  आईने बाळाच्या तरल रेशमी वस्त्रावरुन फिरवावा तसा! 

"बाबा, इकडे पाणी आला. आई मंते संभाळून या. आईनं कपडे बी घरात घेतले.." चिमुकल्या कृष्णाचे बोबडे स्वर ऐकून सुभाषच्या काळजात कालवाकालव झाली. तो अर्धमेला झाला.
अशाच स्थितीत मोठ्या मेहनतीने त्याने आपल्या मालाकडे पाहिले. त्याचा माल पावसात भिजत होता.. ते पाहून सुभाषच्या काळजाचेही पाणी झाले. एवढ्यात वीज चमकली. विजेसरशी
सुभाषलाही  दिसला बायकोचा झाडू, बापाचा पेपर अन् कागदी विमान उडविणाऱ्या लेकराचं भातकं! दुसरी वीज जेव्हा भर पावसासह कडाडली, तेव्हा सुभाषच्या  काळजातले पाणी डोळ्यात अन् डोळ्यातले पाणी पावसात मिसळले होते.. 

(लेखक हे भाषा अभ्यासक, निवेदक आणि मुक्त पत्रकार आहेत)

इतर ब्लॉग्स

संपादकीय बातम्या