पर्यावरणाला घातक वस्तूंना प्राध्यापकाने शोधला पर्याय 

राजेंद्र कृष्णराव घोरपडे 
Sunday, 20 September 2020

करवंटीपासून तयार केलेल्या वस्तू पर्यावरणपूरक तर आहेतच; पण आकर्षकही आहेत. विशेष म्हणजे त्यातून एक नवा उद्योग उभा राहू शकतो, हे त्यांनी दाखवून दिले आहे. मालवणमधील स. का. पाटील महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून ते काम करतात. त्यांनी ही कल्पना त्यांच्या विद्यार्थ्यांना सांगितली. आता हे विद्यार्थी या वस्तू तयार करतात.

पर्यावरण संवर्धनाचे वेड असेल, तर आपण पर्यावरणाला घातक वस्तूंना पर्याय निश्‍चितच उभा करू शकतो. मालवणमधील पर्यावरणप्रेमी प्रा. हसन खान यांनी त्याचाच ध्यास घेतला. पर्यावरणाला घातक वस्तूंना पर्याय अर्थात विकल्प त्यांनी शोधले आहेत. फायबर आणि प्लास्टिक हे पर्यावरणास घातक आहे. मग ते रक्षाबंधनासाठी वापरली जाणारी राखी असो वा दीपावलीत वापरले जाणारे आकाशकंदील असोत. त्याला पर्याय शोधण्याचे त्यांनी ठरविले अन्‌ नारळाच्या करवंटीपासून विविध आकर्षक वस्तू त्यांनी तयार केल्या. 

कोकणात नारळाचे उत्पादन अधिक असते. साहजिकच कोकणी माणसाच्या भोजनात नारळ नित्याची बाब आहे. नारळाला कल्पवृक्ष म्हटले आहे. त्याच्या प्रत्येक घटकाचा वापर होतो. नारळाची करवंटी तशी जळण म्हणूनच वापरली जाते, त्यातूनही प्रदूषण होते. म्हणून खान यांनी पर्यावरण संवर्धनासाठी म्हणून त्याला पर्याय शोधण्याचे ठरविले. यातूनच त्यांनी करवंटीपासून आकर्षक वस्तू तयार करण्याचे ठरविले. सर्वप्रथम त्यांनी करवंटीपासून राख्यांची निर्मिती केली. आकर्षक वाटणाऱ्या राख्या अनेकांना पसंतीस पडल्याने त्यांनी अन्य वस्तूही तयार करण्याचे ठरविले. आता ते करवंटीपासून पणत्या, हॅंगींग लॅम्प, तोरण, आकाशकंदील, ब्रेसलेट, फ्रेंडशिप बॅंड, लॉकेट आदी वस्तू तयार करतात. यापुढे जाऊन त्यांनी ज्वेलरी करण्याचाही प्रयत्न सुरू ठेवला आहे. करवंटीपासून तयार केलेल्या वस्तू पर्यावरणपूरक तर आहेतच; पण आकर्षकही आहेत. विशेष म्हणजे त्यातून एक नवा उद्योग उभा राहू शकतो, हे त्यांनी दाखवून दिले आहे. मालवणमधील स. का. पाटील महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून ते काम करतात. त्यांनी ही कल्पना त्यांच्या विद्यार्थ्यांना सांगितली. आता हे विद्यार्थी या वस्तू तयार करतात. त्यातून "कमवा आणि शिका' असा संदेश देत त्यांनी विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर बनण्यासाठी प्रोत्साहित केले आहे. यंदा या विद्यार्थ्यांनी राख्या तयार करून विकल्या. आता दीपावलीसाठी आकर्षक आकाशकंदील त्यांनी तयार केले आहेत. पर्यावरणाला घातक वस्तूंना हा पर्याय असल्याने त्यांनी या ब्रॅंडला विकल्प असे संबोधले आहे. 

या प्रयोगाबाबत खान म्हणाले, ""हा प्रयोग यशस्वी झाल्यास भविष्यात नारळाच्या करवंटीपासून कोकणात उत्तम वस्तू तयार करण्याचा उद्योग निश्‍चितच उभारला जाऊ शकेल. उत्पन्नाचे नवे स्रोत तेही पर्यावरणपूरक असल्याने याला प्राधान्य देण्याची गरज आहे. गेली तीन वर्षे मी स्वतःसाठी या वस्तू तयार करीत होतो. यातून विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले. यंदा विद्यार्थ्यांनी राख्या तयार करून याला व्यावसायिक स्वरूप आणण्याचा प्रयत्न केला. यात मिळालेले यश पाहून आता दीपावलीसाठी आकर्षक आकाशकंदील, पणत्या या वस्तू तयार केल्या आहेत. अजय आळवे, पायल शिरपुटे, मधुरा ओरसकर या विद्यार्थ्यांनी या कामी परिश्रम घेतले आहेत.'' 
 

इतर ब्लॉग्स