क्रांतीवीरांचे स्मरण हेच परम कर्तव्य

क्रांतीवीरांचे स्मरण हेच परम कर्तव्य

सातारा : आपला भारत देश गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी अनेकांनी आपला प्राण गमावला, प्रसंगी आंदोलनाची शस्त्र उपसली. क्रांतीची धगधगती मशाल हातात घेऊन देशात स्वातंत्र्याचा प्रकाश आणण्यासाठी ज्या हजारो हुतात्म्यांनी आपल्या प्राणाची पर्वा न करता आहुती दिली, अशा अमर हुतात्म्यांचा स्मृतीदिन म्हणून जो दिवस साजरा केला जातो त्याला ऑगस्ट क्रांती दिन असे म्हणतात. नऊ ऑगस्ट रोजी देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी छोडो भारत आंदोलनाची गर्जना केली होती. याच दिवशी गांधीजींचा करेंगे या मरेंगे हा मंत्र देशातील हजारो तरुणांच्या नसानसात भिनला होता. इंग्रजांच्या गुलामगिरीतून भारताला मुक्त करण्यासाठी ज्यांनी प्राणांचे बलिदान दिले त्यांना आठवण्याचा दिवस म्हणजे नऊ ऑगस्ट, अर्थात क्रांती दिन! पण, स्वातंत्र्याचा उपभोग घेण्यात दंग असलेल्या आजच्या पिढीसाठी हा दिवस अनोळखी झाला आहे. सर्वाच्या हृदयात क्रांतिवीरांची ती मशाल आठवणीच्या रूपाने धगधगत राहणे अपेक्षित असले तरी ती मशाल केव्हाच विझली आहे. एवढेच काय प्रशासकीय यंत्रणेसाठीही या दिवसाचे महत्त्व आता औपचारिकतेपुरते शिल्लक आहे, त्यामुळे आजच्या या क्रांती दिनाला फारसे महत्व प्राप्त नाही.
 
आज देशभरात अनेक दिन साजरे होत असतात. मात्र, जो तो आपल्या सोयीनुसार ते उत्सव साजरे करताना दिसत आहे. आज आपण 21 व्या शतकात जगत असलो तरी, हा दिन पाहण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. मात्र, आज याच हुतात्म्यांचा विसर आपल्याला पडलेला दिसत आहे. आज केवळ सत्ता टिकवण्यासाठी महापुरुषांच्या नावाची टिमकी वाजवली जात आहे, हे कितपत योग्य आहे, हे ज्याचं त्यानच ठरवलं पाहिजे.
 
ऑगस्ट क्रांती दिनाला आज 78 वर्षे पूर्ण होत आहेत. नऊ ऑगस्ट 1942 मुंबईत भरलेल्या कॉंग्रेस अधिवेशनात महात्मा गांधींनी केलेली छोडो भारतची गर्जना आणि दिलेला करेंगे या मरेंगे हा मंत्र ऑगस्टच्या दिवशी संपूर्ण देशात पसरला होता. त्यामुळे यादिवशी क्रांतीची ज्योतच जणू पेटली. देशभरात ब्रिटिश सत्तेला हाकलून लावण्यासाठी आंदोलनांना सुरुवात झाली. प्रत्येकाला जे योग्य वाटेल ते तो करत होता. ब्रिटिश सत्ता पार हादरून गेली होती. हे रोखायचे कसे? असा प्रश्न पडला होता. गांधीजींच्या केलेल्या आवाहनाला संपूर्ण देशातून प्रतिसाद मिळाल्याने ब्रिटिशांची धाबे दणाणले. देशातील आंदोलनाची ब्रिटिशांना आदल्या रात्री बातमी मिळाल्याने पहाटे पाच वाजताच महात्मा गांधी आणि त्यांच्या कुटुंबीयांना बिर्ला हाऊसमधून ताब्यात घेण्यात आले. आता प्रत्येकजण पुढारी होईल, असा संदेश यावेळी गांधीजींनी दिला. ब्रिटिशांनी कॉंग्रेसच्या सर्व नेत्यांना अधिवेशनाच्या जागीच अटक केली होती. या सर्व नेते मंडळींना पुण्यात हलवण्यात आले. त्यांची रवानगी गुप्त ठिकाणी करण्यात आली. मात्र, ब्रिटिश सरकारने गुप्तता पाळूनही या घटनेची माहिती वा-याच्या वेगाने पसरली. नेत्यांची धरपकड झाल्याने शांत होईल, अशी अपेक्षा ब्रिटिशांना होती. मात्र, घडले भलतेच. नेत्यांच्या अटकेमुळे आंदोलन लोकांच्या ताब्यात गेलं. देशभर जागोजागी आंदोलने, मिरवणुका, मोर्चे यांना ऊत आला. सरकारने जमावबंदी लागू केली; पण लोक आता आदेशांना भीक घालत नव्हते. देशातील जनतेने ब्रिटिशांविरुद्ध युद्ध पुकारल्याची परिस्थिती होती. 

संपूर्ण देश पेटून उठला होता. दंगल, जाळपोळ, गोळीबार, रेल्वेचे अपघात, सरकारी कार्यालयांना आगी लावणे, सरकारी खजिन्यांची लुटालूट असे प्रकार सुरू होते. भारतावर दीडशे वर्षे राज्य करणा-या इंग्रजांना देशातून हुसकावून लावण्यासाठी नऊ ऑगस्ट रोजी क्रांतीची ठिणगी पडली होती. त्यांच्या स्मृती जपण्यासाठी त्या क्रांती लढ्याची आठवण म्हणून नऊ ऑगस्टला क्रांती दिन पाळला जातो; परंतु आज या दिवसाचे महत्त्व नवीन पिढीलाच नाही, तर नेते-पुढा-यांनाही राहिलेले नाही, हे आपले दुर्दैव आहे. आज अनेक हुतात्म्यांनी आपला प्राण गमावत आपल्या देशाला विशेष स्वातंत्र्य मिळवून दिले. मात्र, त्यांचे कोणीही स्मरण करताना दिसत नाही. उलट जो-तो राजकीय स्वार्थासाठी या महापुरुषांच्या नावावर आपली पोळी भाजून घेत आहे. मात्र, हे निर्थक आणि स्वार्थीपणाचे लक्षण आहे, हे कदापि नाकारून चालणार नाही. आजच्या या दिनी क्रांतीवीरांचे स्मरण करणे हे आपले परम कर्तव्यच आहे, जे सर्वांनीच स्वीकारला हवे. 

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com