संशयाचं भूत..!

रविकांत बेलाेशे
Sunday, 4 October 2020

दोघंही रोजच्या कटकटीला कंटाळले होते. रोज सकाळी ऑफिसला जाताना भांड्याला भांड लागत होतं आणि सायंकाळी घरी आल्यावर विनाकारण वादाला तोंड फुटत होतं. त्याला कारण होतं मोबाईल. याच मोबाईलने दोघांत गैरसमज निर्माण केला होता. एवढा विश्वास नाही का? मग कशाला घेतला मला मोबाईल? माझा जुनाच बरा नव्हता का? तुझं-माझं आयुष्य या मोबाईलपेक्षा छोट आहे का? रोजच्या या हेरगिरीचा तिलाही विट आला होता...

सं दोघांचही अरेंज मॅरेंज झालेलं. तो पुण्यात कॉम्प्युटर इंजिनिअर झाला. घरची परिस्थिती बेताची. तरीही जिद्दीनं शिकला, मोठा झाला. पुण्यात मोठ्या कंपनीत चांगल्या पोस्टवर नोकरीला लागला. पगार मध्यम, तरीही सुखी होता. तीही त्याच्या गावाच्या शेजारचीच. शहरात जाऊन कॉलेज पूर्ण केलं. शाळेत हुशार पण घरच्या परिस्थितीने तिने पार्टटाइम नोकरी करून कॉलेज पूर्ण केलं. दिसायला गोरी गोमटी, उंचपुरी, कुणाच्याही मनात बसेल अशी देखणी पण, काहीही करण्याची जिद्द तिच्या तनामनात रुजली होती.

दोघांचही लग्न झालं अगदी थाटामाटात... कुणाचीही दृष्ट लागावी असं. तो नोकरीला पुण्यात असल्याने त्यांचा छोटासा संसार गावाहून पुण्यात सुरू झाला. त्याची ऑफिसला जाण्याची रोजची धावपळ, सायंकाळी थोडा वेळ मिळेल तेवढाच आनंद, कधी तरी मॉलमध्ये जाऊन शॉपिंग, कधी तरी हॉटेलात यथेच्छ पार्टी हे सगळं आनंदात चालू होतं. सुटीत गावाला गेल्यावर घरच्यांच्यात घालवलेला वेळ. शेतात घराच्यांना मदत त्यामुळे रोजच्या लाइफस्टाइलमध्ये थोडा चेंज आणि पुन्हा पुण्यात त्याच जगात ते सहभागी व्हायचे. अधून-मधून सलग सुटी आल्यावर थंड हवेच्या ठिकाणी मनसोक्त पर्यटन हे नित्याचेच होते. अगदी सुखाचा संसार... या सुखी संसारात लडिवाळ अशा वरदच्या पावलांनी प्रवेश केला आणि आणखी बहर आला. तिच्या मात्र रोजच्या कामात वाढ झाली तरीही न दमता ती ते उत्साहाने करीत होती.

त्या दिवशी त्याने सकाळी उठल्याउठल्याच तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि आज आपण सायंकाळी बाहेर पार्टी करायची असं सांगितलं. वाढदिवस असल्याने तीही खुश होती. दोघेही वरदला घेऊन पार्टीला गेले. अनपेक्षितपणे त्याने तिच्या हातात बर्थडे गिफ्ट ठेवलं. तीही आश्‍चर्यचकित झाली. काय असेल यात? तिची उत्सुकता चाळवली. तिने अधशासारखं गिफ्टचा कागद फाडला. मोबाईल होता त्यात. 
ती पुटपुटली एवढा महागडा कशाला घ्यायचा
 अग, गिफ्टला का किंमत असते?
दोघांनीही स्मित हास्य केलं. हॉटेलच्या काउंटरवरील रेडिओमध्ये मन्ना डे यांचं तू प्यार का सागर है हे गाणं चालू होतं. तिने त्याचा हात हातात घेतला. ती जाम खूश झाली होती. रोजच्या या कामाच्या ताणाने तीही कधी कधी वैतागायची. त्याचही प्रमोशन झाल्याने वर्कलोड वाढला होता. घरी पोचल्यावर तोही कधी-कधी चिडचिड करायचा. वेळ मिळाल्यावर निवांतपणे टीव्ही पाहणे व पेपर वाचण्यापेक्षा तोही मोबाईलशी सारखा चाळे करीत होता. व्हॉट्‌सॲप, फेसबुकशी गुंगून जात होता. कधी-कधी ती ही ओरडायची...
ठेवा ते कौतुक बाजूला’ ‘थोडं आमच्याशी बोला, वरदशी खेळा 
तोही हुंकार देऊन पुन्हा त्यात डोकं खुपसायचा. मग तीही चिडून आदळआपट करायची. का कुणास ठाऊक तोही अचानक तिचा मोबाईल घेऊन हाताळायचा. तिलाही थोडा राग यायचा. पण, ती शांत राहायची. मेसेज चेक करणं... इनकमिंग फोन चेक करणे... हे सारखंच घडू लागलं.

एवढा विश्वास नाही का? मग कशाला घेतला मला मोबाईल? माझा जुनाच बरा नव्हता का? तुझं-माझं आयुष्य या मोबाईलपेक्षा छोटं आहे का? रोजच्या या हेरगिरीचा तिलाही विट आला होता. परवा तर त्याने कहरच केला. ऑफिसवरून घरी पोचल्यावर फ्रेश झाला. तिने गरमागरम चहाचा कप त्याच्या हातावर ठेवला. रोजच्यापेक्षा त्याचा वेगळाच मूड तिला दिसला. चहा झाल्यावर नेहमीप्रमाणे त्याने तिचा मोबाईल चाळायला सुरवात केली आणि हा कुणाचा नंबर?, तो कुणाचा नंबर?, हा फोन कशाला आला होता? अशा एक ना अनेक प्रश्नांचा भडिमार होत होता. ती त्याच्या अशा अचानक वागण्याने वैतागली होती. पण, सगळ्या प्रश्नांची उत्तरे तिने त्याला दिली.

अशा प्रश्न-उत्तरांचा तास रोज होऊ लागला. कोण पास, कोण नापास याचा रिझर्ट लागतच नव्हता कधी. त्याच्या अशा विक्षिप्त वागण्याने वरदकडे लक्ष कमी होतं होते. त्याच्या शाळेतूनही अधून-मधून फोन येत होते. त्याची बुद्धिमत्ता पाहा, अभ्यासात थोडा कच्चा होतोय लक्ष द्या, या साऱ्यातून ती त्याचा अभ्यास घेत होती. परंतु, त्याच्या अशा संशयी वागण्याने तिचं कशातच लक्ष लागत नव्हतं.
किरकोळ बोलण्यावरून वाद विकोपाला जाऊ लागले. मोबाईल मेसेजवरून रोज वादावादी होत होती. एखादं काम राहील की तो लगेच गुरकत होता. ‘बसली असशील मोबाईल घेऊन’ ‘दिवसभर तुला तोच धंदा’ त्याने भुईनळा उडवला तशी तिची फाटाकडी तडतड उडाली.
‘अहो बाकीची कामं कोण करतं? बाहेरील लोक येतात का?’
‘विट आलाय मला आता या साऱ्याचा’
‘इथं राहूच नये असं वाटायला लागलंय’
‘जा ना मग तुला जायचंय तिकडं’
‘जाणारच आहे’
तिची रोज घुसमट होत होती. अंथरुणावर पडल्यावर ती डोळ्यातील अश्रूंना वाट मोकळी करून समजावत होती स्वतःला. हळव्या मनाला फुंकर घालत होती. ‘जातील हे ही दिवस’ म्हणून समजावत होती स्वतःला.
 
कधी-कधी तो तिच्यावर हात उगारू लागला. सोशिकपणाने आणि वरदकडे पाहून हे सारं ती सहन करत होती. तोही तिच्या सहनशीलतेचा अंत पाहत होता. तीही त्याच्या रोजच्या कटकटीला त्रासली होती. अखेर तिने एक दिवस बॅग भरली. वरदची दिवाळीची सुटी पाहून तिने त्याला मेसेज केला. 
‘आम्ही गावाला जातोय. तुम्ही राहा खुशाल आता.’
ती बस पकडून गावाला पोचली. आण्णांना त्यांच्या रोजच्या कामातून त्रास नको म्हणून काहीच सांगत नव्हती. आता पाणी डोक्‍यावरून जायला लागलंय म्हणून तिनेही आण्णांच्या कानावर हा सारा प्रकार घातला.
‘सुनबाई काळजी करू नकोस,’
या एकाच शब्दाने तिला धीर आला.
तोही आज एकटा होता. मेसेजवर तो समजून गेला होता. त्यामुळे त्याने गावी फोन करायचीसुद्धा तसदी घेतली नाही. आता आपलं एकट्याचं जग. त्याला शांत-शांत वाटलं. कसलीही कटकट नाही, भांडण नाही, सगळं घर शांत, हवं तिथे लोळा, हवं ते खा, ना रुसवा ना फुगवा. पहिला दिवस आनंदात गेला, पण, दुसऱ्या दिवशी मात्र त्याला घर खायला उठलं. वरदची पळापळ, अभ्यासासाठी तिने दर्डावल्यावर त्याच्या जवळ येऊन खोटी-खोटी चुगली, हे आज नव्हतं. असं शांत-शांत राहवत नव्हतं. खरंच आपण विनाकारण वाद घालतोय का? तिचं नसणं त्याच्यासाठी असह्य वाटत होतं. माझच चुकतंय का? आपण कितीही रागावलो तरी ती त्या प्रसंगाला सोशिकपणे सामोरी जात होती. तिचं स्पष्ट वागणं असूनही आपण तिला संशयाच्या भोवऱ्यात अडकवतोय. त्याच्या डोक्‍यात विचारांचं वादळ उठलं. उचलावा फोन आणि तिला सांगावं...

‘ओरड माझ्यावर हवं तेवढं, भांड, आदळआपट कर. पण, मला ऐकट्याला सोडू नकोस गं!’ पण, धारिष्ट्य होईना. करावा का मेसेज? नको अगोदरच मेसेजनं रामायण घडलंय. आपणच बदललोय का? खूपच ताणतोय का? अजूनही ताणलं तर तुटेल याची भीती वाटतेय. माफी मागावी का तिची? या साऱ्या प्रश्नांनी तो दोलायमान झाला. विचारांच्या काहिलीत तो पूर्णपणे बुडून गेला होता. रात्रभर झोप आली नाही. सकाळी उठून ऑफिसला गेला. डबा नसल्याने कॅन्टीनचं जेवण घ्यायचं आणि दिवस ढकलायचा.

संध्याकाळी तो नेहमीप्रमाणे घरी पोचला. एकटाच असल्याने पुन्हा एकाकी पडल्याचं दुःख वाटत होतं. फ्रेश होऊन टीव्हीसमोर बसला. तेवढ्यात बेल वाजली. कोण असेल? दरवाजा उघडला समोर आण्णा... रागीट चेहरा... विस्फारलेले डोळे... मिशिवरून हात फिरवत त्यांनी आतमध्ये प्रवेश केला. वरदने धावत येऊन त्याला मिठी मारली. तिने त्याच्याकडे पाहिलंसुद्धा नाही. चार दिवसांचा विरह त्याला कित्येक महिन्यांचा वाटत होता. तिने चहा टाकला. तो आणखी घाबरागुबरा झाला. आता काही खरं नाही. आण्णांची चौकशी केली तर त्यांनी नुसतीच मान डोलावली. त्याला मेल्यासारखं झालं. कान भरलेत तिने माझ्याविरोधात? भरू देत... एवढी कुठली मोठी चूक मी केलीय? तो विचारात पडला. वरदच्या आणि त्याच्या गप्पा सुरू झाल्या. फक्त वेळ दवडत होता तो. जेवण झाल्यावर आण्णा आणि वरद झोपी गेले. दोघेही बेडरूममध्ये गेले. काय बोलावं तिच्याशी दोघेही अबोल. जावं, तिला मिठीत घ्यावं आणि चुकलं म्हणून सांगावं. पण, धाडस होत नव्हतं. तिही लालेलाल झाली होती. नाही बोलायचं म्हणजे नाही, म्हणून तिनेही चंग बांधला. दोघेही अंथरुणावर कलंडले. कुशीवर कुशी बदलू लागले. दोघांनाही झोप लागत नव्हती. सुरवात कुणी करायची? माफी कुणी मागायची? कुणाची चूक, कुणाचं बरोबर? या साऱ्या प्रश्नांमध्ये रात्र संपायला लागली. दोघांची तोंडं परस्परविरोधी होती. कुणीही कुणाला समजवायचा प्रयत्न करीत नव्हते. तिच्या डोळ्यातून अलगद पाणी झिरपू लागले. साऱ्या आठवणींनी तिलाही नकोसं झालं होतं. कुठं गेलं ते प्रेम... कुणाची दृष्ट लागली असेल संसाराला... सुधारेल का तो आपल्या चुका... पुन्हा पहिल्यासारखा वागेल का तो आता... अशा सर्वच प्रश्नांनी तिला घेरलं होतं. ती एकटी सहन करीत होती त्याला. कुणालाही सांगत नव्हती... आण्णांना नाईलाजाने सांगितलं होतं, काय करतील शिक्षा ते त्याला... ती हमसाहमशी रडू लागली. काही क्षण त्याला वाटलं तिचे डोळे पुसावेत आणि तिला घट्ट मिठीत घेऊन आपणही आपल्या चुकांची कबुली द्यावी. पण, धाडस होईना. अख्खी रात्र दोघांनी अबोलपणे जागून काढली.

सकाळी दोघेही उठले. आण्णांनी उठून आपलं आवरलं आणि नाष्ट्याच्या प्रतीक्षेत कोचवर टेकले होते. सकाळचा पेपर नजरेखालून घातला आणि त्यांनी आवाज दिला.
‘सुनबाई उरकलं का? मला जायचंय’
‘माधव, चिरंजीव या लवकर मला तुमच्याशी बोलायचंय थोडं’ 
त्याला मेल्यासारखं झालं. आता न्याय-निवडा होणार वाटतं. छातीत धस्स झालं त्याच्या.
माधव आटोपून आण्णांच्या समोर येऊन बसला. तोपर्यंत शुभदानेही नाश्‍त्याच्या प्लेट्‌स समोर टिपॉयवर आणून ठेवल्या.
‘माधव, बोला काय चाललंय,’
‘काही नाही आण्णा.’ त्याची नजर आण्णांपर्यंत पोचत नव्हती.
‘कुठं हरवलाय, बाळा जग बदललं पण तू काही बदलला नाहीस’
त्याला हायसं वाटलं.
‘ठोंब्या, यांत्रिकीकरणाच्या नादात तूही यंत्र झालायंस वाटतं.’
‘असं काही नाही.’
‘मग कसली कटकट चालू आहे.’
‘अरे जग कुठं चाललंय चंद्रावर आणि तू अजूनही जुन्याच जगात वावरतोयस. डोकं फिरलंय का तुझं, त्या खेळणाच्या नादात तू शांतता हरवून बसलायस, हे कळतंय का तुला.’
शुभदानं त्याच्याकडे पाहिलं. तो मख्खपणे खाली पायाकडे पाहत होता.

‘एकमेकांवर विश्वास असणे म्हणजे प्रेम, एकमेकांना समजून घेणं म्हणजे प्रेम, मेसेज पाठवून शब्दात व्यक्त करण म्हणजे प्रेम नाही रे राजा, हवीत कशाला असली थेरं, टाइमपास आहे नुसता. आम्हीही याशिवाय मोठे झालो ना. कशात अडलं आमचं. उलट आता खूपच आळशी झालाय तुम्ही आणि असे वाद घालत बसलाय.’
‘अरे मेसेज, मेसेज म्हणजे काय रे, नुसतेच उपदेशाचे ढोस... त्याच्या नादात तुम्ही सवांद हरवून बसलाय एकमेकांचे. तुमच्या या मेसेजच्या वादाचा मेसेज वरदपर्यंत काय जातोय, हे जाणलं का तुम्ही दोघांनी. त्या कोवळ्या मनाचा विचार केलाय का तुम्ही? अरे चार बुकं शिकला म्हणजे मोठं झाला का तुम्ही? वेडे झाला आहात तुम्ही. क्षणभर सुखासाठी तुम्ही आयुष्य पणाला लावू नका रे’... आण्णांनी दोघांनाही दरडावले.

‘सुनबाई उद्यापासून हा वाद संपला. दोघांनीही आता एकमेकांना मेसेज द्या. मनाला संदेश द्या आणि आता थांबवा हे सारं.’ 
‘माधव या मोठ्या शहरात तुला यांची काळजी घ्यायला पाठवलंय, मौजमजा करायला नाही. भानावर ये आणि संशयाचं भूत मनातून काढून टाक आणि कामाला लाग, नाहीतर तुझं काही खरं नाही बघ.’
आण्णांनी नाश्‍ता संपवला आणि गावाला जायच्या तयारीला लागले.
‘आण्णा, आज थांबा एक दिवस’ माधव पुटपुटला.
‘नाही रे बाबा, उसाला पाणी द्यायचंय, मला जायला हवंय.’

तेवढ्यात वरद धावत आला ‘आण्णा चला ना आपण मंदिरात जाऊ.’ आण्णांनी त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाले ‘सुनबाई, मी मंदिरातून येतो. नंतर जातो म्हणून आण्णांनी वरदच्या बोटाला घट्ट पकडले आणि दोघेही घराबाहेर पडले. ते पाठमोरे होताच शुभदाने दरवाजा लावून घेतला. दोघांनीही एकमेकांकडे पाहिलं. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याला स्वतःचीच चीड आली होती, आपल्या वागण्याचा त्याला पश्‍चात्ताप झाल्याचं त्याच्या चेहऱ्यावरून स्पष्ट जाणवत होतं. दोघांनाही विरह सहन होत नव्हता. माधव धावत तिच्याजवळ गेला आणि अलगद तिला कुशीत घेतलं. ती रडत होती. अगदी विश्वासानं त्याच्या मिठीत विसावली होती. त्यानं तिच्या डोक्‍यावरून हात फिरवला आणि ‘आय ॲम सॉरी शुभा.’
ती अर्धमेली झाली आणि या मिठीतून बाहेरच येऊ नये, असं तिला वाटत होतं. तेवढ्यात मोबाईलच्या मेसेजचा अलर्ट वाजला. दोघांनीही एकमेकांकडे पाहिलं. दोघांनीही एकदमच स्मित हास्य केलं आणि पुन्हा एकमेकांना बिलगले.

Edited By : Siddharth Latkar

इतर ब्लॉग्स