शराटी/ लाल डोक्याचा कुदल्या/ काळा अवाक
शास्त्रीय नाव - Pseudibis papillosa (स्युडिबिस पॅपिलोसा)
इंग्रजी नाव - Red-naped Ibis (रेड नेप्ड आयबिस)
वर्षातील तीन ऋतुपैकी सर्वांना हवाहवासा वाटणारा, सजीव सृष्टीचे जीवनमान अवलंबून असणारा आणि जून पासून चालू होणारा ऋतू म्हणजे पावसाळा. यावर्षी ऐन उन्हाळ्यातील मागील अडीच महिने कोरोनामुळे 'लॉक डॉउन'मध्ये गेले आहेत. त्यामुळे प्रदुषणाची वाढ शुन्यावर आलेली असल्यामुळे असेल कदाचित, पण आपली वेळ पहिल्यांदाच तंतोतंत पाळत पावसाचे आगमन झाले आहे. अगदी एक जूनलाच त्याने सगळीकडे कमी-अधिक प्रमाणात हजेरी लावली आहे. "तुम्ही निसर्गात लुडबुड करणार नसाल तर मीही तुमच्या सेवेत वेळेवर हजेरी लावेन," असा संदेशच त्याने जणू आपल्या कृतीतून दिला आहे. तर अशा या पावसाने ३१ मेच्या रात्री आणि एक जूनच्या पहाटे पाचपासून सकाळी आठपर्यंत संततधार हजेरी लावल्याने मला त्या दिवशी शेतात फिरणे शक्य नव्हते. एव्हाना मागील महिन्याभरापासून माझी निराशा न करता दररोज एखादा तरी अनोळखी पक्षी मला भेटायचा. मग त्याच्याविषयी अधिक जाणून घेत लेखणीबद्ध करताना दिवस निघून गेलेलाही कळायचा नाही. पण या माझ्या दैनंदिनीला आज ब्रेक लागतो की काय, अशा विचारचक्रात अडकून अंगणात बसलो होतो. एवढ्यात समोरुनच वीसेक फूट उंचीवर एक लांब चोचीच्या भल्या मोठ्या पक्षांचा थवा उडत चालला होता. मोबाईल कॅमेरा ओपन करेपर्यंत तो घराच्या छतावरुन पुढे सरकला. पण लगेच मागून दुसरा एक थवा आला. पुढे आमच्याच शेतातील शेवग्याच्या पिकावरुन हे दोन्ही थवे एकत्रित येत आकाशात घिरट्या घालू लागले. निळ्याशार आकाशात कापसासारख्या जमा झालेल्या पांढऱ्या ढगांच्या पार्श्वभुमीवर लांबून काळ्या दिसणाऱ्या या पक्षांचा थवा गोलाकार चक्रा मारत उडतानाचे विहंगम दृष्य मी मोबाईलमध्ये शूट केले. उंच डोंगरावरील वळणावळणाचा घाटाचा रस्ता पार करत वर जाणाऱ्या वाहनांप्रमाणे गोल-गोल घिरट्या घालत हा पक्षांचा थवा आकाशाच्या दिशेने उंच-उंच जात होता. तेव्हा बघताना मन हरपून गेले होते. उंच-उंच जाताना त्यांच्या लहान-लहान होत गेलेल्या प्रतिमा आणि शेवटी विरुन गेल्याप्रमाणे त्याचे दिसानासे होणे, हे दृष्य आमच्या घरातील बालचमुंनिही याची देही याची डोळा अनुभवले. या पाच-सहा मिनिटातील त्यांचे कुतुहल पाहून मला पण समाधान वाटले. चिखलामुळे शेतात जाता आले नाही म्हणून काय झाले! पण माझ्या दुर्दम्य ईच्छाशक्तीला दाद देत हा अनोळखी पक्षांचा थवा मला अंगणात बसलेलो असताना दर्शन देवून गेला, याचा मनस्वी आनंद मला झाला होता.
आता ह्या अनोळखी पाहुण्याचे नाव जाणून घेताना सोलापूर येथिल 'नेचर काँन्झरवेशन सर्कल'चे भरत छेडा यांनी लगेच 'लाल डोक्याचा कुदल्या' (Red naped ibis - रेड नॅप्ड आयबिस) असल्याचे सांगितले तर पुणे येथिल पक्षी अभ्यासक अविष्कार मुंजे यांनी ह्याला 'काळा शराटी' (Black ibis) असेही म्हणत असल्याचे सांगितले. तब्बल ६८ सेंमी असलेल्या या पक्षाची लांब तपकिरी चोच बाकदार असते. ज्यामुळे त्याला चिखल व पाण्यातील आपले भक्ष पकडणे सोपे जाते. काळसर तपकिरी रंगाच्या या पक्षाच्या डोक्यावर त्रिकोणी आकाराचा लालसर भाग दिसतो. डोक्यावर पिसे कमी असतात. मानेजवळ थोडासा पांढरा भाग दिसतो. काही भागात ह्यांना 'काळा अवाक' म्हणूनही ओळखतात. ज्या पक्ष्यांची तीन-तीन नावे आज पक्षीतज्ञांकडून माहित झाली. त्यातील एकही नाव आपल्याला माहित नसावे, याची मला खंत वाटल्यावाचून राहिली नाही. बेडूक, मासे, किडे, खेकडे, साप, सरडे, गोगलगाय अशा प्रकारचे अन्न शोधताना हे 'शराटी/ लाल डोक्यचा कुदल्या/ काळा अवाक' थव्यानेच फिरत असतात. त्यांचा आवाज करकश असतो. गवताळ प्रदेश, शेतात, नदीकिनाऱ्यावर आपले वास्तव्य करतात. मार्च ते ऑक्टोबर हा त्यांचा विणिचा काळ असून ते उंच झाडावर घरटे बांधतात. पण अलीकडील काळात मोठ्या प्रमाणावर झालेल्या वृक्षतोडीमुळे ह्या बिचाऱ्यांना घरटी बांधण्यासाठी मोबाईल टॉवरचा आश्रय घ्यावा लागत असल्याचे निरीक्षण अविष्कार मुंजे यांनी नोंदविले. मादी एका वेळी दोन ते तीन अंडी घालते. ह्याच प्रजातीतील 'पांढरा अवाक' हा पक्षी पूर्ण पाण्यावर अवलंबून असतो तसा 'काळा अवाक' फक्त पाण्यावरच अवलंबून नसतो. कदाचित त्यामुळेच त्याने आमच्या बार्डीसारख्या कमी पाण्याच्या भागातही आम्हाला दर्शन दिले असावे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.