हिंदू मतांवर दरोडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Robbery of Hindu votes

हिंदू मतांवर दरोडा

राजकीय खेळपट्टी बदलत असताना, नवा कोरा चेंडू हिरवळ असलेल्या मैदानात उसळत असताना धर्मनिरपेक्ष पक्ष अजूनही त्यांच्या फिरकीचे तेच प्रकार आजमावत आहेत. मोदींचा भाजप जीवघेण्या वेगाने खेळावर विजयी मोहोर उमटवत असताना हिंदू बहुसंख्य त्यांचा जयजयकार करत आहेत.

ही चांगली की वाईट गोष्ट यावर आपण कितीही वाद घालत बसलो तरी मोदींच्या भाजपने आतापर्यंत मोठ्या प्रमाणात आपल्या हिंदुत्वाची पायाभरणी केली आहे यात शंका नाही. यात अल्पसंख्याकांना वगळण्याचा प्राधान्याचा कार्यक्रम आहे. देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या पक्षापेक्षा (काँग्रेस) संख्येने दुप्पट असलेले मतदार या गोष्टीवर समाधानी असतील तर तक्रार कोणाकडे करायची? शेवटी लोकशाहीत संख्याबळाचा विजय होतो. तुम्हाला हे आवडत नसेल तर ही संख्या बदलून दाखवा.

मोदी-शहा भाजपच्या सध्याच्या व्यवस्थेमुळे तुम्ही निराश असाल, तर हा प्रश्न तुम्ही काँग्रेस आणि इतर सर्व ‘धर्मनिरपेक्ष’ पक्षांना विचारला पाहिजे. अखिलेश यादव यांचा समाजवादी पक्ष, मायावतींचा बसप यांनाही. जरी त्यांच्या धर्मनिरपेक्षतेला अल्पकालीन सत्तेमुळे पूर्णपणे बुरशी लागली असली तरी! नरेंद्र मोदींच्या भाजपचे बहुमत कुठून येते? हिंदी हार्टलँडमधून, जी उत्तरेला हिमालयापर्यंत, पूर्वेला झारखंड आणि दक्षिण पूर्वेला छत्तीसगडपर्यंत पसरलेली आहे. त्यात महाराष्ट्र आणि गुजरात या दोन मोठ्या पश्चिमेकडील राज्यांची भर आहे. भाजपच्या अडीचशे जागा खात्रीशीर आहेत. १९८९ नंतर या राज्यांतील हिंदू मतांसाठीचा संघर्ष भाजपने निर्णायकपणे जिंकला. खरा प्रश्न हा होता, की धर्माने एकत्र केलेले जातीने विभागता येईल का किंवा जातीने विभागले ते धर्माने पुन्हा जोडता येईल का? दोन दशके म्हणजे २००९ पर्यंत जात जिंकत होती. २०१४ पासून धर्मयुगाचा आरंभ झाला आहे.

उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये दलित, यादव आणि इतर बहुसंख्य ओबीसींच्या मतांवर दावा करणाऱ्यांनी हिंदू मतांचे विभाजन केले. त्या वेळी ‘उच्चवर्णीय’ किंवा ‘सवर्ण’ हे भाजपसोबत होते आणि सत्ताहीन होते. मुलायमसिंह यादव यांच्या नेतृत्वाखालील राज्यात ते राज्य पुरस्कृत अराजकतेचे, खून, खंडणी अशा गुन्ह्यांचे बळी ठरले. यापासून संरक्षण मिळावे म्हणून त्यांनी मायावतींना मतदान केले. भाजप तोपर्यंत सज्ज नव्हता. त्यांना मत दिल्याने ते वाया गेले असते. त्यामुळे त्यांना सत्ता मिळाली नसती. महाराष्ट्र आणि गुजरात या दोन निर्णायक राज्यांमध्ये काहीसा असाच खेळ अनेक दशकांपासून खेळला जात होता.

इथे मराठा आणि दलित विरुद्ध ब्राह्मणी हिंदुत्व असा लढा होता. स्पष्ट शब्दांत सांगायचे झाल्यास हे ‘केएचएएम’ समीकरण होते. (क्षत्रिय, हरिजन, आदिवासी, मुस्लिम) या दोन्ही राज्यांत हे समीकरण १९८९ ते २०१४ च्या काळात अनेकदा यशस्वी झाले. जोपर्यंत नरेंद्र मोदींनी गुजरातमध्ये हे समीकरण उलटवून लावले नाही. २००२ मध्ये जेव्हा ते पहिल्यांदा निवडणुकीत विजयी झाले, त्यानंतर हे ‘केएचएएम’ समीकरण गाडून टाकण्यात आले. महाराष्ट्रात शिवसेना हिंदू मते परत आणेल, अशी विरोधकांना आशा होती. या परिस्थितीत मात्र ठाकरे परिवाराला शिवसेना परत आणण्याची गरज निर्माण झाली आहे.

दक्षिणेत भाजपची मुळे अद्याप एका राज्यातच वाढली आहेत. कर्नाटक हा काँग्रेसचा अभेद्य बालेकिल्ला होता. पूर्वी इंदिरा आणि सोनिया या दोघींसाठीही तिथे लोकसभेचे सुरक्षित मतदारसंघ होते. इथेही तेच कनिष्ठ आणि मध्यम जातींचे समीकरण होते. प्रथमतः गौडांच्या उदयाने वोक्कलिंगा समुदाय एक शक्तिशाली समूह म्हणून समोर आला. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री आणि लिंगायत समूहाचे कद्दावार नेते वीरेंद्र पाटील यांचा राजीव गांधी यांनी जाहीर अपमान केला. त्यामुळे लिंगायत समुदाय भाजपकडे वळला. तेव्हापासून ते तिथेच चिकटून आहेत.

खरे तर या खेळातील अत्यंत महत्त्वाच्या खेळाडूचा उल्लेख न करता आपण चर्चेत खूप पुढे आलो आहोत, ते म्हणजे मुस्लिम मते. या प्रत्येक राज्यात भाजपच्या विरोधात विजयी जातीय समीकरणात मुस्लिमांचा समावेश होता. या पक्षांनी काही लॉलीपॉप देण्याशिवाय मुस्लिमांसाठी फारसे काही केले नाही. भाजपच्या भीतीपोटी मुस्लिम त्यांना मतदान करतात यात ते आनंदी होते. कालांतराने ‘धर्मनिरपेक्ष मते’ हा मुस्लिम मतांसाठी कोडवर्ड बनला. संरक्षणाच्या बदल्यात खंडणी मागितल्यासारखेच हे होते. भाजपमधील वाजपेयी-अडवानी काळापासून मोदी-शहा काळापर्यंतच्या संक्रमणाने धर्मनिरपेक्षतेची गरज आणि मुस्लिम मतांचा अनुनय करण्याचे ढोंग फेकून दिले.

भाजपचे संस्थापक आनंदाने ‘इफ्तार’चे आयोजन करत असत, पण मोदी फोटोसाठीदेखील मुस्लिमांची टोपी घालायला तयार नाहीत. भाजप हा त्यांचा पक्ष आहे याचे संकेत हिंदू मतदारांना मिळाले. सार्वजनिक चर्चेत मुस्लिमांशी उद्धटपणे वागण्यात, अल्पसंख्याकाचे तुष्टीकरण आणि हिंदूंचे शोषण होत आहे, असा आरोप करण्यात नवीन भाजपला अजिबात संकोच वाटत नाही.

ज्याला हे बदलायचे आहे त्यांनी आधी हिंदूंना त्यांच्या गोटात परत आणले पाहिजे. तुमच्याकडे हिंदू मतदारांची भक्कम संख्या असल्याशिवाय तुम्हाला नरकाचीही अपेक्षा ठेवता येणार नाही. ‘लोकशाही मृतप्राय झाली आहे’, ‘आयडिया ऑफ इंडिया धोक्यात आली आहे’, अशा प्रकारच्या तुमच्या रागाने आणि आक्रोशाने भाजप घाबरणार नाही. संविधानाच्या प्रस्तावनेत ‘धर्मनिरपेक्षता आणि समाजवाद’ हे शब्द जोडण्यास डॉ. आंबेडकरांनी स्पष्टपणे नकार दिला होता. भारतीय प्रजासत्ताकाने भविष्यात कोणत्या समाजव्यवस्थेचे पालन करावे हे ठरवणारे आपण कोण, असे ते म्हणाले होते. भारताला आपल्याच संकल्पनेचा पुनर्विचार करण्यासाठी बहुसंख्य लोकांनी आज मतदान केले आहे. हिंदूंना देण्यासाठी तुमच्याकडे खात्रीशीर काही तरी नसेल, तर हे बदलण्याची शक्यता शून्य आहे. फक्त रागात ट्विट करत राहणे आणि रिट्विट्स व लाईक्स मोजणे सोपे आहे. विजय मिळवण्याचा हाच एक मार्ग आहे. याच पद्धतीने ते होईल.

बचावात्मक प्रतिसाद

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा भाजप जीवघेण्या वेगाने खेळावर विजयी मोहोर उमटवत असताना हिंदू बहुसंख्य त्यांचा जयजयकार करत आहेत. हे विरोधकांना समजले. राहुल गांधींनी मंदिरांना भेटी दिल्या आणि त्यांच्या विश्वासू हरकाम्याने त्यांचे जानवे आणि ब्राह्मण गोत्र आपल्यापर्यंत पोहोचवले. अखिलेश, लालूप्रसाद, तेजस्वी, मायावती हे सर्व ‘सीएए’विरोधी आंदोलनात मुस्लिम कार्यकर्त्यांच्या तुरुंगवासावर सावध भूमिका घेत आहेत, पण हा बचावात्मक, घाबरून दिला जाणारा प्रतिसाद आहे. ते भाजप आणि त्यांच्या हिंदू मतदारांची खिल्ली उडवतात. भारतीय धर्मनिरपेक्षता आपल्या नेत्यांचा उपहास करण्याच्या वृत्तीमुळे दम तोडत आहे.

अनुवाद : कौस्तुभ पटाईत

Web Title: Robbery Of Hindu Votes

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..