मध व्यवसायाचा ललिता रेड्डी पॅटर्न

S. Lalita Reddy farmer story by sachin charati
S. Lalita Reddy farmer story by sachin charati

आपल्याकडे मार्च महिन्यापासून पुढे मधाचा हंगाम सुरू होतो. काजू, आंबा, जांभूळ, करवंद यांसह अन्य फुलोरा येणाऱ्या वनस्पती मध व्यवसायाला पूरक ठरतात. याशिवाय पश्‍चिम घाटात अशी काही गवत आहेत, ज्यांना ठराविक कालावधीनंतर फुलोरा येतो. त्यांचाही मधनिर्मितीला फायदा होतो. कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केल्यास प्रत्येक हंगामात साधारण तीस टनांच्या पुढे मधनिर्मिती होते. प्रामुख्याने गगनबावडा, शाहूवाडी, आजरा, चंदगड, राधानगरी, भुदरगड या तालुक्‍यांत मधाचे उत्पन्न मिळते. या व्यवसायात बहुतांश धनगर बांधव गुंतलेले आहेत. याशिवाय खादी ग्रामोद्योगाच्या माध्यमातून काही शेतकरी शेतात पेट्या ठेवून मध उत्पादन घेतात; पण हे प्रमाण अगदी कमी आहे. आपल्याकडे दुग्ध व्यवसायाप्रमाणे मध व्यवसाय बहरायला संधी आहे; पण म्हणावी तशी जागृती याबाबत झाल्याचे दिसत नाही. शिवाय ज्या शेतकऱ्यांनी हा प्रयोग केला त्यांच्या गाठीला काही ना काही कारणाने तितके यश आल्याचे पाहायला मिळत नाही. यातून मध व्यवसायाकडे शेतकरी मनात किंतू ठेवूनच पाहत असल्याचे चित्र आहे.


आंध्र प्रदेशमधील पश्‍चिम गोदावरी जिल्ह्यातील सिपाईपेठा गावातील एका शेतकरी महिलेची पंधरा एकर शेती आहे. येथे त्या भात, मका, उडीद, मूग, ऊस अशी पिके घेतात. नारळ, काजू, आंब्याची झाडेही त्यांच्या शेतात आहेत. यांसह पोल्ट्री आणि दुग्ध व्यवसायातूनही त्या अर्थार्जन करतात. काही वर्षांपूर्वी त्यांना मध व्यवसायातील संधी लक्षात आली. त्यांनी राष्ट्रीय कृषी योजनेअंतर्गत आयोजित प्रशिक्षण वर्गातून मध व्यवसायाचे रीतसर शिक्षण घेतले.

मध व्यवसायातून त्यांना परागकण, रॉयल जेली, मेण, मधमाश्‍यांचे डंख आणि मध इतकी उत्पादने मिळू शकतात, हे लक्षात आले. त्यांनी आपल्या शेतात मधुमक्षिकापालन करायचा निर्णय घेतला. सुरुवातीला आठ पेट्यांच्या माध्यमातून व्यवसायाला सुरवात केली. पुरेसा अंदाज आल्यावर आठाच्या सोळा पेट्या केल्या. सध्या त्या महिन्याला तीस किलो मधाचे उत्पादन घेतात. तीनशे रुपये किलोप्रमाणे त्याची विक्री होते. शिवाय किलोभर मेण महिन्याकाठी गोळा होते. तेही तीनशे रुपये किलोने विकले जाते. वर्षाला एकूण साधारण एक लाख अठरा हजार चारशे रुपयांचे उत्पन्न मध व्यवसायातून त्या मिळवत आहेत. हे त्यांचे अन्य पिकांव्यतिरिक्तचे उत्पन्न आहे. एस. ललिता रेड्डी असे या धडपड्या महिलेचे नाव असून केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयाने त्यांचा प्रगतशील महिला शेतकरी म्हणून गौरव केला आहे.


तसे तर आपण सरकारने केलेल्या घोषणेनुसार उत्पन्न दुप्पट होण्याच्या आशेने २०२२ ची वाट पाहतो आहोत. सध्याची स्थिती पाहता तो पल्ला गाठणे दूरच दिसते आहे. अशा वेळी एकास एक जोडून आहे त्या संरचनेत जादाचे काय करता येईल, याचा विचार करायला हवा. एस. ललिता रेड्डी यांनी तो केला आणि तसे करणे शक्‍य असल्याचे दाखविले आहे इतकेच.

संपादन- अर्चना बनगे
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com