खरंच, बापूजी परत होणे नाही... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खरंच, बापूजी परत होणे नाही...

ते आजच्या सत्तेत असणाऱ्यांसारखे लाखांचा सुट घालू शकत होते. पण त्यांनी असे वर्तन केव्हाच केले नाही. ते आजच्या सत्ताधीशांसारखे फक्त सत्तेला हपापले नव्हते.

खरंच, बापूजी परत होणे नाही...

एकदा महात्मा गांधीजी शेतकरी आंदोलनासाठी चंपारण्य येथे गेले होते, त्या ठिकाणी जाताच त्यांनी पाहिले की तेथे आंदोलनासाठी फक्त पुरूषच दिसत आहेत. आंदोलनात त्यांना स्त्रीया कुठेच दिसल्या नाहीत. त्यामुळे बापूंनी लगेच कस्तूरबा गांधी यांना काय झाले, महिला का आल्या नाहीत? याची माहिती घेण्यासाठी पाठविले. कस्तूरबा यांनीही या गोष्टीची दखल घेत, त्या लगेच त्याची माहिती घेण्यासाठी तेथे गेल्या असता; त्यांना कळाले की येथील महिलांना घालायला पुरेसे कपडे नाहीत, म्हणून त्या आंदोलनात सहभागी झाल्या नाहीत. येथे महिला आहेत, पण त्यांच्याकडे पुरेसे कपडे उपलब्ध नाहीत म्हणून त्या आंदोलनात सहभागी झाल्या नाहीत, असे कळताच त्या क्षणी गांधीजींनी आपल्या अंगावरची सगळी वस्त्रे काढून टाकली. फक्त पंचा आणि आपले अंग झाकेल एवढेच कपडे अंगावर ठेवले आणि लगेच त्या ठिकाणी एक पण केला. ''जोपर्यंत माझ्या देशातील प्रत्येक माणसाच्या अंगावर पुरेसे कपडे येणार नाहीत, तोपर्यंत थंडी असो, पाऊस असो, ऊन-वारा काहीही असो मी फक्त एवढेच कपडे परिधान करेन.''  

ही कहाणी सांगण्यामागचा एकच उद्देश आहे. महात्मा गांधीजी देखील गुजराती होते. ते आजच्या सत्तेत असणाऱ्यांसारखे लाखांचा सुट घालू शकत होते. पण त्यांनी असे वर्तन केव्हाच केले नाही. ते आजच्या सत्ताधीशांसारखे फक्त सत्तेला हपापले नव्हते. बापूंनी महान होण्यासाठी देशाची केव्हाही प्रतारणा केली नाही. आजच्या सत्ताधीशांनी मात्र, देशातील सर्व सरकारी संस्था विक्रीला काढल्या आहेत. अर्थव्यवस्था नुसती अ़चणीत नाही, तर खड्ड्यात गेली आहे. त्यामुळे ''हर पीला चीज सोना नही होता और हर गुजराती गांधीजी नहीं होता", असेच म्हणावं लागेल. गांधीजी यांच्या मूर्तीसमोर नतमस्तक व्हायचे, फूलं वाहायची आणि त्यांच्या प्रत्येक विचाराला मात्र तिलांजली द्यायची असेच हीन दर्जाचे राजकारण देशातले सध्याचे सत्ताधीश करत आहेत. 

आज केंद्र सरकारने केलेल्या शेतकरी विरोधी तीन कायद्यांविरोधी महिना झाला, तरीही शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच आहे. एकीकडे दिल्लीतील तो थंडीचा कडाका, 5 अंश सेल्सिअसवर घसरलेला पारा तर दुसरीकडे बापाचा आपल्या पुढच्या पिढ्यांवर वाईट वेळ येऊ नये, जमीन विकण्याची वेळ येऊ नये, यासाठी सुरू असलेला लढा. ऑल इंडिया किसान सभा (AIKS) च्या दाव्यानुसार या आंदोलनात 39 शेतकऱ्यांनी जीव गमावला आहे. तरीही या निष्ठूर केंद्र सरकारला जाग येत नाही. आज जर गांधीजी असते तर, त्यांनी ज्या प्रमाणे नीळ शेतकऱ्यांसाठी इंग्रजांविरोधात आंदोलन केले होते, तसेच आज आपल्या या शेतकरी बांधवांसाठी ते या सरकारविरोधात आंदोलनात उभे राहिले असते. सध्या देशातील शेतकरी रोज आत्महत्या करतो आहे.

दरम्यान, हे सत्ताधीश महाशय सांगत आहेत, शेतकऱ्यांचे उत्पन्न मला दुप्पट करायचे आहे. रोज देशाच्या अर्थव्यवस्थेची मात्र, वाट लागत चालली आहे. बापूंनी शेतकरी व गावची अर्थव्यवस्था सुधारावी, यासाठी 'हिंदस्वराज्य' नावाचे पुस्तक लिहिले होते. आपल्या सत्ताधीस महाशयांनी देखील एक पुस्तक लिहिले आहे. माहीत नाही, हे पुस्तक त्यांनीच लिहिले आहे का? कारण आजपर्यंत त्यांनी चहा विकलेले रेल्वे स्टेशन सापडले नाही, ते कुठल्या शाळेत, महाविद्यालयांत शिकले हे कोणीही सांगू शकले नाही. त्यांनी घेतलेली डिग्री कुठे घेतली हेही आजतागायत कोणीच सांगू शकले नाही, तसेच हे पुस्तक त्यांचेच आहे का? हेही कोणी सांगू शकत नाही. 

महोदयांनी लिहिलेल्या पुस्तकामध्ये ते म्हणतात, ''मनुष्याला कचरा उचलण्यात, गटारे साफ करण्यात खरे आध्यात्मिक सुख मिळते. आता आजतागायत मला तरी माहिती नाही की अशाही रितीने अध्यात्मिक सुख मिळते. जर मिळेत असेल तर प्रत्येक राजकारण्याने रोज सकाळी उठून गटारामध्ये डुबकी मारायला हवी. यांच्या लाॅजिकला तर सलामच करायला हवा. आपले दुर्दैव आहे की असे सत्ताधीश आपल्याला लाभले आहेत. जे आपले अपय़श लपविण्यासाठी नेहमी काही ना काही बहाणे शोधत असतात. काही झाले की काँग्रेसने मागील साठ वर्षांत असे केले, तसे केले असे बहाणे दिले जातात. आता झाले की, काँग्रेस 2014 पासून सत्तेत नाही. त्याला आता 6 वर्षे झाले आहे. हे महाशय म्हणतात NPA काँग्रेसच्या काळात एवढे लाख करोडने वाढले; पण मला एक कळत नाही, एप्रिल 2014 नंतर तीन लाख 16 हजार कोटींचे कार्पोरेट लोण तुम्ही माफ केले आहे. याबाबत तर प्रश्न तुम्हालाच विचारावा लागेल ना, का हे पण नेहरू किंवा इंदिरा गांधींना विचारायला जावे का? आपल्या निष्क्रीयतेचे खापर दुसऱ्यावरच फोडायचे हीच यांची खरी पाॅलिसी आहे. काही झाले की हिंदू खतरे में है, अशी रट लावली जाते. मध्यंतरी एका न्यायालयातील न्यायाधीश म्हटले की मोराने मोरणीच्या डोळ्यात डोळे घातले की मुल होते. हे ऐकून मला एकच वाटते हिंदू तो खतरे में नहीं, पण देशातील विज्ञान, इतिहास, तर्कशास्त्र, गणित, अर्थव्यवस्था हे सगळंच खतरे में है असं म्हणावं लागेल.

- सागर डी. शेलार

Web Title: Sagar Shelar Writes About Farmers Agitations Compare Mahatma Gandhi Vs Pm Narendra Modi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top