..अन् 'तो' गजरा कस्तूरबांना पडला महागात !

..अन् 'तो' गजरा कस्तूरबांना पडला महागात !

एके रात्री बापूजी (महात्मा गांधीजी) आपल्या सेवाग्राम येथील आश्रमात हिशोबाचे काम करत होते. त्यांना भेटायला दोन व्यक्ती आल्या. बापूजींचे काम सुरू असतानाच, या व्यक्ती त्या ठिकाणी येऊन बसल्या. हिशोबाचे काम झाल्यानंतर बापूजींनी त्या आलेल्या व्यक्तींशी संवाद साधत तेथे सुरू असलेला तेलाचा एक दिवा विझवत दुसरा दिवा पेटवला. हे करत असताना या गोष्टीचे तेथे आलेल्या त्या व्यक्तींना आश्चर्य वाटले. त्यांनी बापूजींना लगेच विचारले की, एक दिवा सुरू असताना तुम्ही तो विझवून दुसरा का पेटवला? बापूजी स्मितहास्य करत म्हणाले, ''मी तो दिवा सुरू असताना आश्रमाच्या हिशोबाचे काम करत होतो. त्यामुळे आश्रमाच्या पैशातील तेलाचा दिवा वापरत होतो. आता मी माझे खासगी काम करत आहे. त्यामुळे माझ्या स्वत:च्या पैशांच्या तेलाचा दिवा पेटवला आहे.'' काय तो प्रामाणिकपणा होता. बापूजी यांच्यातील दहा टक्के जरी प्रामाणिकपणा आजच्या राज्यकर्त्यांनी अंगीकारला तर आपला देश पुढील काही वर्षांमध्येच महासत्ता होईल. पण, आज ते होताना दिसत नाही. आश्रमातील काम झाल्यानंतर आपले खासगी काम करताना आश्रमाचा दिवा विझवून आपल्या पैशांचा दिवा पेटवणारे बापूजी कुठे आणि पीएम केअर फंडला आरटीआय कायद्यातून वगळून त्याचा हिशोब न देताच त्यातील फंडचा आपल्या सुट-बुटावर खर्च करणारी आत्ताची गुजरातची देश चालविणारी जोडगोळी कुठे? बापूजी हेही गुजरातीच होते; आजची देश चालवणारी जोडगळीदेखील गुजराती आहे. त्यांनी बापूजींना फक्त जयंती-पुण्यतिथीला हारफुले वाहण्याऐवजी त्यांचा एखादा विचार तरी विचार आचरणात आणावा. मात्र, ते असे न करता कायमच बापूजींच्या विचारांना तिलांजली देतानाच दिसतात.  

गळणारा रेल्वेचा डबा अन् बापूजी

देशभरात फिरताना बापूजी हे नेहमी रेल्वेने प्रवास करायचे. एकदा घडले असे की, ते रेल्वेने प्रवास करत होते. पावसाळ्याचे दिवस होते. जोराचा पाऊस सुरू झाला. यावेळी ते सेंकड क्लासच्या डब्यातून प्रवास करत होते. बापूजी असलेला डबा पावसाने मोठ्या प्रमाणावर गळत होता. तेव्हा रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी बापूजींना विनंती केली की, आम्ही फर्स्ट क्लासच्या डब्यातील काही नागरिकांना सांगितले आहे, ते या सेंकड क्लासच्या डब्यात बसतील आणि तुम्ही तिकडे फर्स्ट क्लासच्या डब्यात बसा, कारण हा डबा पावसामुळे खुप गळतो आहे. त्यावेळी बापूजी शांतपणे म्हणाले, ''अजिबात नको, इतरांची गैरसोय करून माझी सोय करून घेणे ही गोष्ट मला अजिबात पटणारी नाही. मी विनंती करतो की, हा डबा कितीही गळत असला तरीही, मी या डब्यातूनच प्रवास करेन.'' ही होती बापूजींची वागण्याची पद्धत. त्यांनी केव्हाही कोणाची गैरसोय करून आपली सोय केली नाही.  

आजच्या देशाच्या नेतृत्वाकडे पाहिले तर असे दिसून येते की, यांनी नेहमी आपली सोय करून जनतेची गैरसोयच केली आहे. देशात अनेक गंभीर प्रश्न असताना यांनी नोटबंदीसारखा तुघलकी निर्णय घेऊन एकप्रकारे सर्व देशवासीयांचीच गैरसोय केली. यामध्ये 200 पेक्षा जास्त बळी गेल्याची सरकारी आकडेवारी आहे. त्यानंतर जीएसटीसारखा कायदा लागू करून देशातील छोट्या-मोठ्या व्यवसायिकांवर कुऱ्हाड चालविली. त्यानंतर आलेल्या कोरोनाने तर देशाची अर्थव्यवस्थाच पुरती खड्ड्यात घातली. कोरोना आल्यानंतर या देशाच्या महाशयांनी पूर्वकल्पना न देता अचानक केलेल्या लॉकडाउनमुळे 947 नागरिकांचे जीव गेले. लाखों नागरिकांच्या हातचा रोजगार गेला. आता ते घेत असलेल्या तुघलकी निर्णयांमुळेच देशात महागाईचा आगडोंब उसळला आहे. त्यामुळे सध्या जनता त्राही त्राही झाली आहे. सध्या बँक व्यवस्था खूप अवघड स्थितीतून वाटचाल करत आहे. महागाईचा रेशो 7.35 टक्क्यांवर जाऊन पोहोचला आहे. सरकारी आकडेवारीनुसार, चालू वर्षी 16 लाख नोकऱ्यांचे प्रमाण घटणार आहे. त्यात कमी म्हणून की काय यांनी तीन शेतकरीविरोधी काळे कायदे केले. या कायद्यांमुळेच दिल्लीच्या सीमावर्ती भागात शेतकरी बांधव दोन महिन्यांपेक्षा जास्त काळापासून आंदोलन करत आहेत. आपल्या 'छपन्न इंच' छाती असणाऱ्या नेतृत्वाने इंडोनेशिया या देशाचे प्लेन क्रॅश होताच, दोन मिनिटांमध्येच ट्विविट करत तेथील मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांप्रती संवेदना व्यक्त केली. या बाबीचे कौतुकच आहे. मात्र, दिल्लीतील आपले निवासस्थान लोक कल्याण मार्ग 7 (पुर्वीचे सेव्हन रेसकोर्सपासून) काही किलोमीटर अंतरावर गेल्या दोन महिण्यांपासून आंदोलन करत असलेल्या आणि याच आंदोलनात 157 जण शहीद झालेल्या शेतकरी बांधवांप्रती दोन शब्दही त्यांनी काढले नाहीत. त्यांच्याशी संवाद साधण्याचे साधे धाडसही या 'छप्पन्न इंच' छाती असलेल्या नेतृत्वात नाही. एवढे असंवेदनशील आजचे देशाचे नेतृत्व आहे. 

आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा म्हणजे शेती व गाव होय. या दोन गोष्टींबाबत बापूजी यांनी ‘हिंद स्वराज्य’पुस्तकात लिहिले आहे. यामध्ये बापूजींनी शासन पद्धती व ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था सुधारावी यासाठी मार्ग सुचवले आहेत. आजच्या सत्ताधीश महोदयांनी शेतकरीविरोधी तीन काळे कायदे करून शेतकरी व गावाला संपविण्याचा विडाच उचललेला दिसतो. सध्या ते अदानी-अंबानी उद्योगपतींच्या दावणीला बांधले गेल्यासारखे वर्तन करत आहेत. हे देशाचे खूप मोठे दुर्दैव आहे. देशाचे माजी पंतप्रधान अर्थतज्ज्ञ मनमोहन सिंग यांनी जगात तिसऱ्या क्रमांकावर पोचवलेल्या अर्थव्यवस्थेची सध्याच्या सत्ताधारी गुजराती जोडगळीने अंत्ययात्राच काढायची बाकी ठेवली आहे. देश खड्ड्यात घालण्याच्या पापाचा काही ठराविक चॅनेल (गोदी मिडीया), सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोगही भागीदार होत असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे. हे सर्वात मोठ्या लोकशाही देशासाठी धोक्याचे आहे. आत्ता सध्या देशाचा जीडीपी -23 झाला आहे. देशाचा एनपीए 8.98 लाख कोटींच्याही पुढे गेला आहे. भूकबळीच्या बाबतीत आपण बांग्लादेशाच्याही खाली गेलो आहोत. म्हणजे आपला देश वेगाने 2021 कडून 1947 कडे प्रवास करतो आहे, असेच सद्यःस्थितीवरून दिसते आहे. हे सगळं सुरू असताना आजचे सत्ताधारी महोदय आणि त्यांचे मंत्रिमंडळ मात्र पश्चिम बंगाल, तामिळनाडूच्या निवडणूक प्रचारात गुंग आहेत. तसेच, ते आणि त्यांचा पक्ष शहरांची आणि ड्रॅगन फ्रुटची नावे बदलण्यालाच विकास समजत आहेत. दुसऱ्या बाजूला चीनने घुसखोरी करत अरूणाचल प्रदेश येथे एक गावच वसविले आहे. हे गाव सुबांसीरी जिल्ह्यात 'सारी चू' नदीच्या किनाऱ्यावर वसवण्यात आले आहे. आपले छप्पन्न इंच छाती असणारे नेतृत्व त्याच चीनशी रोज करार करत त्यांच्या विकासात वाटा उचलत आहेत. 

अजून एक महत्वाची गोष्ट सध्या समोर आली आहे. कथित टीआरपी घोटाळ्याच्या अनुषंगाने सुरू असलेल्या पोलिस तपासात रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी आणि 'बार्क' अर्थात ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काउन्सिलचे कार्यकारी अधिकारी पार्थो दासगुप्ता यांच्यात झालेलं कथित व्हॉट्सअॅप चॅट उघड झालं आहे. यामुळे अनेक पडद्यामागच्या गोष्टी उघड झाल्या आहेत. यामधील चॅटनुसार भारतीय वायूसेना बालाकोटमध्ये एअरस्ट्राईक करणार ही गोष्ट अर्णब गोस्वामी यांना 3 दिवस आधीच माहीत होती. त्याचप्रमाणे काश्मीरमधून कलम 370 हटवण्याचा मोदी सरकारचा निर्णयही माहिती होता. बालकोट एअरस्ट्राईकची माहिती सरकारच्या 5 महत्वाच्या बॉडीकडेच होती. ती माहिती अर्णब यांना 5 जणांपैकी एकाने दिल्याचा आरोप विरोधी पक्ष काँग्रेसने केला आहे. काँग्रेसच्या मते अशी गोपनीय माहिती पंतप्रधान, वायुसेना दलप्रमुख, गृहमंत्री, संरक्षण मंत्री, एनएसए यांच्याकडेच असते. यापैकी कोणीतरी एकाने ही माहिती लिक केली आहे. हे प्रकरण गंभीर आहे. देशाच्या सुरक्षेबाबत तडजोड करणारे आहे. एरवी सुशांत, कंगना, ईडी, धनंजय मुंडे, तांडव वेबसिरिज प्रकरणांवर चोवीस तास डिबेट घडवून आणणारी व 'तांडव' करणारी गोदी मीडिया व भाजपचे तथाकथित देशप्रेमी नेते आता मूग गिळून गप्प बसले आहेत. यावर त्यांचे वाचाळवीर 'भक्त'गण नेते व्यक्त होणार की नाहीत? आजच्या आपल्या देशाच्या नेतृत्वाला 19 हजार कोटींच्या अलिशान प्लेनमध्ये जगाची परिक्रमा करण्यासाठीच आपल्याला पंतप्रधान केलं असावं असं वाटतं आहे. हेच आपलं मोठं दुर्दैव आहे. कुठे इतर प्रवाशांची गैरसोय न करता पावसाच्या पाण्याने गळणाऱ्या रेल्वेच्या डब्यातून प्रवास करणारे बापूजी आणि कुठे आजचे 19 हजार कोटींच्या प्लेनमधून फिरणारे नेतृत्व. तुलनाच होऊ शकत नाही.  


...अन् बापूजींनी बूट बाहेर फेकला

एकदा असाच रेल्वेतून प्रवास करत असताना बापूजींच्या पायातील एक बुट खाली पडला. त्यांनी त्याचक्षणी आपल्या दुसऱ्या पायातील बुट देखील काढून रेल्वेच्या खाली टाकला. तेथील सर्व प्रवाशांना या कृतीचे नवल वाटले. त्यातील एका प्रवाशानं कारण विचारल्यावर ते म्हणाले, ''एक बुट माझ्या काही कामाचा नव्हता. पण ज्याला सापडेल त्याला पायातील दोन्ही बुट मिळतील. कमीत कमी ते बुट त्याच्या तरी कामाला येतील.'' हे होते बापूजी. असे वर्तन होते म्हणूनच ते महात्मा या उपाधीपर्यंत पोहोचले. आजच्या देशाचे नेतृत्व करणाऱ्या गुजरातच्या 'महान' जोडगळीकडे पाहिले तर ते बापूजींच्याच भूमित जन्मले आहेत का? इतपत शंका त्यांच्याबाबत उपस्थित होते.

 नजरेतून काहीच सुटणे मुश्किल

एकदा बापूजी सेवाग्राम येथील आश्रमात सर्वांसोबत भोजन करत होते. बा (कस्तुरबा) या सर्वांना जेवण वाढत होत्या. जेवताना बापूजींसोबत कुटुंबातील सर्व व्यक्ती व आश्रमातीलही सर्वजण होते. देवदास हा सर्वात छोटा मुलगा त्यांच्या शेजारीच जेवायला बसला होता. बा या सर्वांच्या ताटात वाढलेल्या भातावर एक एक चमचा तुप वाढत होत्या. त्याचवेळी बा यांनी देवदासच्या ताटातील भातावर एक चमचा जास्त तुप वाढले. शेवटी आईची माया ती. यामुळेच का म्हणून त्यांनी एक चमचा जास्त तुप वाढले. हे बापूजींनी पाहताच ते बा यांच्यावर रागावले. ते म्हणाले, ''तुम्ही सर्वांच्या ताटात एक एक चमचा तुप वाढले; पण देवदासच्या ताटात एक चमचा जास्त का टाकला? हे आपण चुकीच्या वागल्या आहात. असा चुकीचा पायंडा तुम्ही पाडू नका.'' असे बापूंनी बा यांना सुनावले. त्यावर छोट्या देवदासला राग आला. त्यामुळे तो ताट बाजूला सारून उठून निघून गेला. हे पाहताच बापूंनी सांगितले की, जेवणाचे ताट बाजूला सारून गेल्यामुळे आता त्याला आज रात्रीचे भोजन देऊ नका. आम्ही त्याला याबाबत शिक्षा देऊ इच्छितो. पण शेवटी बा यांचे ते आईचे मन. ते कुठे काय ऐकणार होते. कुठल्याही आईला आपला मुलगा उपाशी राहावा कसे वाटेल? मग बा रात्री उशिरा देवदाससाठी जेवणाचे ताट घेऊन गेल्या. त्यावेळी बापूजी शतपावली करत होते. त्यांच्या नजरेस बा ताट घेऊन जाताना दिसल्या. ते लगेच बा यांना रागावले आणि म्हणाले, ''तुम्ही आत्ता त्याला दोन घास खाऊ घालाल, पण तेच दोन घास आयुष्यभरासाठी त्याला परावलंबी बनवतील.'' आपली चुक लक्षात येताच बा देखील ओशाळल्यासारख्या झाल्या. ही गोष्ट सांगण्याचा एकच उद्देश आहे, बापूजींनी 'माझे सत्याचे प्रयोग' हे फक्त लिहिले नाहीत, तर स्वतः व कुंटुबालाही त्याचे अनुकरण करायला भाग पाडले. त्यामुळेच प्रसिद्ध वैज्ञानिक अल्बर्ट आईनस्टाईन बापूजींबद्दल म्हणतात, ''गांधी नावाची हाडामांसांची व्यक्ती अस्तित्वात होती, यावर नवीन पिढीला विश्वासच बसणार नाही. कारण असा आदर्श पुरुष पुन्हा होणे नाही. 
 
'बा' यांना गजरा पडला महागात

एकदा सेवाग्राम आश्रमातील मुले-मुली बा (कस्तुरबा) यांना आग्रह करून बाजारात घेऊन गेले. त्या ठिकाणी गेल्यावर छोट्या मुलींनी बा यांना गजरा घेण्याचा आग्रह केला. परंतु, बा यांनी त्यास स्पष्ट नकार दिला; कारण त्यांच्याकडे असणारे पैसे हे आश्रमाचे होते. ते पैसे स्वतःसाठी कसे वापरायचे असा प्रश्न बा यांना पडला होता. म्हणून त्यांनी मुलींना नकार दिला. मुलींनी खूपच आग्रह केल्यामुळे बा यांनी एक आणा देऊन तो गजरा घेतला. रात्री उशिरा सगळे बाजारातून आश्रमात परतले. त्यानंतर रात्री हिशोब करताना बापूजींना एक आण्याचा हिशोब काही लागता लागेना. तेव्हा ते बा यांना म्हणाले, मला हिशोबात एक आण्याचा घोळ दिसतो आहे. त्यावेळी बा यांनी सांगितले की, ते पैसे त्यांच्याकडूनच खर्च झाले आहेत. हे ऐकताच बापूजी चिडले. ते म्हणाले, ''तुम्ही कोणाला विचारून आश्रमाचे पैसे खर्च केले? हा अधिकार तुम्हाला कोणी दिला? तुम्ही मोठी चूक केली आहे. याची शिक्षा तुम्हाला मिळायलाच हवी. आज रात्री तुम्ही भोजन न करता उपवास करा, असा सक्तीचा आदेशच बापूजींनी काढला. आश्रमातील लहान मुला-मुलींना ही गोष्ट कळताच, त्या सर्वांनी बापूजींना सांगितले की, आम्ही आग्रह केल्यानेच 'बा' यांनी तो हार घेतला आहे. आमच्यामुळेच तो एक आणा खर्च झाला आहे. यात 'बा' यांची काहीएक चूक नाही. त्यांना केलेली शिक्षा आम्हाला करा, नाहीतर 'बा' यांना माफ करा; असा आग्रह त्या छोट्या मुलांनी धरताच बापूजींनी बा यांना माफी दिली. पण आश्रमाच्या हिशोबात थोडासा गोंधळ झाला म्हणून बापूजींनी आपल्या पत्नीला देखील शिक्षा दिली होती. 

क्षणात रक्ताचे पाटही झाले शांत...

'फ्रिडम अॅट मिडनाईट' या पुस्तकामधील नोंदीनुसार 7 नोव्हेंबर 1946 रोजी देशात हिंदू-मुस्लिम दंगे सुरू झाले. हे दंगे खूप भयंकर होते. या ठिकाणी पोलिस यंत्रणा देखील हतबल झाली होती. बिहारमध्ये दंगलग्रस्त भागाचा दौरा करणाऱ्या बापूजींना कोणीतरी सांगितले की, नौखाली पेटले आहे. हे ऐकताच बापूजी लगेच नौखालीला निघाले. प्रशासनाने तुमच्या जीवाला तेथे धोका आहे, असे म्हणत त्यांना तेथे जाण्यास मज्जाव केला. पण, बापूजी यांनी कोणाचेही काहीएक ऐकले नाही. ते नौखालीत दाखल झाले. तेथील हिंसाचारग्रस्त लोकांना कोणताच मार्ग दिसत नव्हता. गुण्यागोविंदाने एकत्र राहणारे आता एकमेकांकडे संशयाने बघू लागले होते. ते एकमेकांच्या रक्ताचे प्यासे झाल्यासारखे वागत होते. तेथील भागात हिंदू-मुस्लिमांच्या रक्ताचे पाट वाहत होते. नौखालीत येताच बापूजींनी हिंसाचारग्रस्त गावात पदयात्रा काढली. अन् एका क्षणात नौखाली शांत झाले. बापूजी पूर्ण पश्चिम बंगालच्या परिसरात चार महिने अनवाणी फिरले व त्यांनी पेटलेला परिसर शांत केला. ज्या भागात पोलिस प्रशासन जायला देखील घाबरत होते, त्या ठिकाणी जाऊन बापूजींनी दंगल थांबवली. ही होती त्यांची खरी ताकद.

बहुजनांचे अश्रू पुसण्यासाठीच आयुष्य

देश स्वतंत्र झाल्यानंतर सर्वजण 15 ऑगस्ट 1947 या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्यात गढून गेले होते. बापूजी मात्र पश्चिम बंगालमधील आदिवासी पाड्यामधील लोकांचे अश्रू पुसत होते. काही लोकांनी त्यांना विचारले की, देश स्वतंत्र झाला आहे, आता तुम्ही आनंदोत्सव साजरा करायला हवा?. बापूजी लगेच म्हणाले, ''आपला देश ब्रिटिशांच्या हातातून स्वतंत्र झाला आहे. तो माझा लढा संपला आहे, पण माझा आदिवासी, दलित,  गोरगरीब, बहुजन समाज अद्यापही अनेक जाचातून मुक्त व्हायचा आहे. आता पुढचा लढा त्यांचे अश्रू पुसण्यासाठी असेल.'' त्यामुळेच असा महात्मा पुन्हा होणे नाही.

हिंदू-मुस्लिमांसाठीच जीव पणाला...

देशाला स्वातंत्र्य मिळून काही महिनेच झाले होते. आणि देशात ठिकठिकाणी धार्मिक तणावाचं वातावरण होतं. 'हिंदू, शीख आणि मुस्लिमांमध्ये एकेकाळी बंधुभाव होता. आता ते राहिलं नाही, हे पाहून माझ्या मनाला यातना होत आहे,' असं बापूजी म्हणाले होते. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने प्रकाशित केलेल्या आणि स्टॅनेले वॉलपर्ट यांनी लिहिलेल्या 'गांधीज मिशन' या पुस्तकात अस म्हटलं आहे. "सर्वांनी एकत्र यावं यासाठी मी आमरण उपोषण करणार आहे," अशी घोषणा बापूजींनी 12 जानेवारीला केली होती आणि दुसऱ्याच दिवशी त्यांनी उपोषण सुरू केलं. 'तुम्ही तुमचं उपोषण सोडा,' अशी विनंती करण्यासाठी देशभरातून लोक येत असत. या लोकांसमवेत बापूजी नित्यनेमाने प्रार्थना करत. पण त्यांनी आपलं उपोषण सोडलं नाही. "जेव्हा मला खात्री होईल की सर्व धर्मांच्या लोकांमध्ये सलोखा निर्माण झाला आहे, तेव्हाच मी माझं उपोषण सोडणार आहे," असं त्यांनी निग्रहानं सांगितलं, अशी नोंद वॉलपर्ट यांच्या पुस्तकात आहे. "जर माझ्या अकार्यक्षमतेमुळं या देशातील हिंसाचार नियंत्रणात येत नाही, असं बापूजींना वाटत असेल तर मी माझ्या पदाचा राजीनामा देतो," असं गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी म्हटलं होतं. पण बापूजींनी त्याही गोष्टीला नकार दिला. 100 हून अधिक नेत्यांनी बापूजींना उपोषण सोडण्यासाठी विनंती केली होती. आम्ही शपथ घेऊन सांगतो की आम्ही धार्मिक सलोखा ठेऊ, असं आश्वासन त्यांनी वारंवार दिलं. त्यानंतर 18 जानेवारीला त्यांनी आपलं उपोषण सोडलं. त्यावेळी पं. जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद असे प्रमुख नेते उपस्थित होते. 


तुम्हा-आम्हाला माहित नसलेले बापूजी...

बापूजींनी बोअर युद्धादरम्यान सैन्यात देखील सेवा केली होती. पण युद्धाच्या भयानक संकल्पना लक्षात येताच त्यांनी हिंसेविरुद्ध लढा देण्यास सुरुवात केली. इथूनच बापूजींचा हिंसेविरुद्ध लढा सुरू झाला. त्याचप्रमाणे बापूजी यांना जागतिक शांतता प्रस्थापित करण्याच्या कार्यासाठी देण्यात येणाऱ्या नोबेल परितोषिकासाठी एक-दोनदा नव्हे, तर 5 वेळा नामांकन मिळालं होतं. परंतु, बापूजींच्या मृत्यूआधी त्यांना हे पारितोषिक देण्यात आलं नाही. हे पारितोषिक मृत्युपश्चात देण्यात येत नाही. त्यामुळे बापूजींना नोबेल कधीच देण्यात येणार नाही ह्याबद्दल खुद्द नोबेल कमिटीनं दिलगिरी व्यक्त केली आहे. 1989 मध्ये जेव्हा दलाई लामांना नोबेलचा शांतता पुरस्कार देण्यात आला तेव्हा ''हे एक प्रकारे बापूजींना अभिवादन आहे'' असं कमिटीचे चेअरमन म्हणाले. 'महात्मा गांधी रोड' नावाने तब्बल 53 मोठे रस्ते भारतात आणि 48 परदेशांत आहेत. मात्र, आपण फक्त रस्ते आणि स्वच्छता मोहिमेच्या लोगो पुरते बापूजींना मर्यादित केले आहे. बापूजींनी सांगितलेल्या मानवता, अंत्योदय, शांतता ह्या रस्त्यांवर आम्ही चालतोय की नाही माहित नाही. पण बापूजींचं नाव आम्ही भरपूर रस्त्यांना दिलं आहे. याच्या एवढे दुर्दैव काय असू शकते? बापूजीं त्यांच्या जीवनातील 40 वर्ष, दररोज साधारण 18 किलोमीटर चालले. त्यांनी 1913 ते 1938 एवढ्या कालावधीत 79,000 किमी अंतर पायी कापलं. हे अंतर पृथ्वीला दोनदा प्रदक्षिणा मारल्याइतकं होईल. ज्या ब्रिटन देशाविरुद्ध बापूजींनी स्वातंत्र्यासाठीचा लढा दिला. त्याच देशानं बापूजींच्या मृत्यूनंतर 21 वर्षांनी त्यांच्या नावानं टपाल तिकीट छापलं. असे शत्रूच्या मनातही स्थान निर्माण करणारे ते होते. त्यांचा मृत्यू झाल्यानंतर अंत्ययात्रेसाठी तब्बल 8 किलोमीटरपर्यंत लोकांची गर्दी होती. याचाच अर्थ किती लोकांच्या मनात त्यांनी घर केलं होतं, हे आपण समजू शकतो. 

बापूजी हे देखील एक सामान्य माणूसच होते. सर्वांप्रमाणेच त्यांनीही जीवनात अनेक चुका केल्या. पण जीवनात केलेल्या चुका जगासमोर मांडण्याची ('माझे सत्याचे प्रयोग') हिकमत असलेले महात्मा आणि ती ताकद असलेले ते प्रेषित होते. ही बाब संपूर्ण जगाने मान्य केली आहे. म्हणूनच आज जगाची महासत्ता असलेल्या अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा व अॅपलचे सर्वेसर्वा असणारे दिवंगत स्टीव्ह जाॅब्ज देखील बापूजींच्या विचारांचे अनुकरण कायमच करताना दिसले. मी शाळेत असताना सिगारेटची थोटकं पेटवून ती ओढली. मी चोरी केली. मी वडिल मरणाच्या दारात असताना संभोग करत होतो. या अशा अनेक चुका जगजाहीर सांगायला वाघाचं काळीज असावं लागतं. हे कुठल्याही ऐऱ्यागैऱ्याचे काम नाही. त्यासाठी बापूच व्हावे लागते.  

मरणालाही जिवंतपणीच मारणारा महात्मा...

20 जानेवारी रोजी बापूजी बिर्ला हाऊसच्या बागेत प्रार्थनेसाठी पोहोचले. प्रार्थनेसाठी शेकडो लोक जमा झाले होते. इथं बापूजींसाठी एक छोटंसं व्यासपीठ तयार करण्यात आलं होतं. त्या व्यासपीठावरून ते बोलू लागले; पण माइक खराब होता. तरी देखील त्यांनी आपलं भाषण सुरू ठेवलं, 'जे मुस्लिमांचे शत्रू आहेत ते भारताचेही शत्रू आहेत' असे ते म्हणाले. तितक्यात एक स्फोट झाला. इम्प्रोव्हाइज्ड एक्स्प्लोजिव्ह डिव्हाइसने हा स्फोट घडवून आणण्यात आला होता. व्यासपीठापासून काही अंतरावरच हा स्फोट झाला होता. मात्र, यावेळी कोणालाही काही इजा झाली नव्हती. त्यानंतर पोलिसांनी बापूजींना त्यांचे संरक्षण वाढवत असल्याचे सांगितले. तसेच, त्यांना पुढचे काही दिवस सकाळची प्रार्थना टाळण्याचा आग्रह केला. मात्र, सिंहाचे काळीज असणाऱ्या बापूजींनी संरक्षण नाकारत रोज प्रार्थना करणार असल्याचे सांगितले. शेवटच्या श्वासापर्यंत ते रोज प्रार्थना करत होते. असा हा मारणालही जिवंतपणी मारणारा महात्मा होता.
 

हत्येचा अनेकदा प्रयत्न...

1) पुणे टाऊन हॉलजवळ बापूजींच्या ताफ्यातील गाडीवर हॅंडग्रेनेड टाकण्यात आलं होतं. 1934मध्ये ते 'हरिजन यात्रे'निमित्त पुण्यात आले होते. दोन कारमधून बापूजी आणि त्यांचे सहकारी येत होते. बापूजींची कार टाऊन हॉलला उशिरा पोहोचली. पण हल्लेखोरांना वाटलं की पहिल्याच कारमध्ये बापूजी आहेत. त्यांनी त्यांच्या गाडीवर हॅंडग्रेनेड टाकलं. हे ग्रेनेड गाडीच्या बॉनेटवर पडलं आणि बाजूला जाऊन त्याचा स्फोट झाला. या हल्ल्यात कुणाला दुखापत झाली नव्हती.

2) त्यांच्यावर दुसरा हल्ला पाचगणी इथं झाला होता. 1944मध्ये बापूजींची प्रकृती खालावली होती. त्यांना विश्रांतीसाठी पाचगणी इथं नेण्यात आलं होतं. 'दिलखुश' नावाच्या एका बंगल्यात त्यांची व्यवस्था करण्यात आली होती. इथं ते गावकऱ्यांसोबत रोज संध्याकाळ प्रार्थना करत असत. एकदा प्रार्थनेच्या वेळी त्यांच्यावर एक युवक चालून आला. त्याच्या हातात खंजीर होता. बापूजींचे रक्षक भिल्लारे गुरूजी यांच्या लक्षात आलं की समोरून कुणी चाल करून येत आहे. त्यांनी त्या युवकाला जेरबंद केलं आणि त्याच्या हातातून खंजीर हिसकावून घेतला. त्या युवकाला सोडून द्या, असं बापूजींनी सांगितलं होतं. त्यामुळे त्याच्यावर कारवाई झाली नाही. तो युवक नथुराम गोडसे होता, असं भिल्लारे गुरूजींनी म्हटलं होत.

3) बापूजींच्या हत्येचा तिसरा प्रयत्न झाला तो सेवाग्राममध्ये. 1944मध्ये बापूजी वर्धा स्टेशनहून रेल्वेने जाणार होते. त्यावेळी एक युवक बापूजींवर चालून आला. पोलिसांनी तत्परतेने त्याला पकडलं. त्याची प्राथमिक चौकशी करून त्याला सोडून देण्यात आलं. त्याची नोंद देखील घेतली गेली नाही, असं बापूजींचे चरित्र लेखक प्यारेलाल यांनी म्हटलं आहे. 

4) या प्रयत्नाच्या पुढच्याच वर्षी म्हणजे 1945मध्ये बापूजी मुंबईहून पुण्याकडं रेल्वेने येत होते. एक गार्डचा डबा, एक इंजिन आणि एक तिसऱ्या वर्गाचा डबा अशी ही रेल्वे होती. रात्रीची वेळ होती. रेल्वे कसारा घाटात पोहोचली. तेव्हा तिथं रुळांवर काही ओंडके ठेवण्यात आले होते. तसेच, दगडांचा एक ढिगारा करण्यात आला होता. तो ढिगारा चालकाला दिसला आणि त्याने करकचून ब्रेक दाबला. त्या इंजिनाचा हलका धक्का त्या ढिगाऱ्याला बसला पण एक मोठा घातपात टळला. बापूजी पुण्याला आले आणि म्हणाले, ''ज्या लोकांना मला मारावयाचे आहे त्यांनी मला खुशाल मारावे. पण माझ्या सोबतच्या लोकांना नुकसान पोहोचवू नये.'' आपल्या जीवाची पर्वा न करता इतरांच्या जीवाची पर्वा करणारा महात्मा आता परत होणे नाही. 

हत्या झाली कशी?

वर सांगितलेल्या माहितीनुसार, नवी दिल्लीतील बिर्ला हाऊसमध्ये बापूजी यांना ठार मारण्याचा प्रयत्न झाला होता. या घटनेनंतर अवघ्या दहाच दिवसांनी 30 जानेवारी 1948 ला नथुराम गोडसेने त्यांची गोळ्या झाडून हत्या केली होती. बापूजींच्या हत्येसाठी या अगोदर नथुराम गोडसेनी अनेक वेळा प्रयत्न केले होते. 'जर 20 जानेवारीच्या घटनेनंतर जर पुरेशी दक्षता घेतली असती तर आजचा इतिहास काही वेगळा असता. 30 जानेवारीपूर्वी त्यांच्या हत्येचा अनेकदा प्रयत्न झाला होता आणि सर्वांत धक्कादायक गोष्ट म्हणजे हे सर्व प्रयत्न गोडसे आणि त्याच्या साथीदारांनीच केले होते.

एक दिवा जो असा पेटला, वात न त्याची विझली हो!! 
आसमंत फाडले जयाने, अशी गर्भनभातील बिजली हो!!

बापूजींचा शरीररूपी दिवा जरी 30 जानेवारी 1948 ला विझला असला, तरी त्यांचा विचाररूपी दिवा कोणीही विझवू शकले नाही. अद्यापही तो तेवतच आहे. तो तीन गोळ्या घातल्याने विझेल असा गैरसमज असणाऱ्या गोडसे प्रवृत्तींनी हे लक्षात घ्यावे! गांधी विचारांचा दिवा केव्हाही विझला नाही. तो केव्हाही विझू शकत नाही. तो पुढची कित्येक शतके तसाच तेवत राहील, यात तीळमात्र शंका नाही. मला सुरेश भट यांच्या या गझलेकरवी बापूजीच बोलतात असे वाटते...

विझलो आज जरी मी,
हा माझा अंत नाही..
पेटेन उद्या नव्याने,
हे सामर्थ्य नाशवंत नाही..

बापूजींच्या पुण्यतिथी निमित्ताने त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन!!
  

- सागर डी. शेलार (8262049634)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com